प्रकरण  नववें


संतांची  साक्ष


प्रत्येक धर्मांत विधि व संस्कार असतात ही गोष्ट सर्वांना मान्य आहे. नामकरण, चौल, मुंज, विवाह, श्राद्ध, होम, पूजा, उपवास, व्रतें वगैरे गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या असल्यामुळें धर्मांत नाना प्रकारच़े विधि असतात या गोष्टीबद्दल मतभेद होणें शक्य नाहीं. हिंदुधर्मांत ज़से हे विधि आहेत तसे इतर सर्व धर्मांतहि आहेत. असल्या विधींच़ें साम्राज्य कांहीं प्रसंगीं हिंदुधर्मांत इतकें जास्त माज़लेलें होतें कीं हे कर्मकांडाचे विधि म्हणजेच़ धर्म असें लोकांस एके काळीं वाटत असे. पण ज़से हे नाना संस्कार धर्मांत आहेत तसे अध्यात्ममार्गावरहि कांहीं विशिष्ट विधिसंस्कार असतात ही गोष्ट मात्र तितकी प्रसिद्ध नाहीं. अध्यात्मप्रगति म्हणजे वेदान्ताच़ा वाद होय असेंहि अलीकडे पुष्कळांस वाटूं लागलें आहे. त्यामुळें अध्यात्ममार्गावर कांहीं संस्कार करावयाच़े असतात ही गोष्ट जनमनाच्या दृष्टीआड झ़ालेली आहे. अध्यात्मप्रगतीच्या अनेक गोष्टी गुप्त असतात आणि म्हणूनच़ त्या प्रगतिपथावरील विधिसंस्कारांचीं वर्णनें धर्मग्रंथांत उघड येणें अशक्य असतें. या कारणामुळेंहि अध्यात्मप्रगतीच्या मार्गावर विधिसंस्कार असूं शकतात ही गोष्ट जनतेच्या मनांतून ज़ाणें सुलभ झ़ालें आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याच़ें नामकरण, चौल, मौंजीबंधन, विवाह, श्रावणी, समावर्तन हे ज़से संस्कार आहेत, म्हणजे देह जन्मल्यानंतर तो वाढत असतांना ज़से अनेक विधिसंस्कार करावयाच़े असतात, तशी जीवाची अध्यात्ममार्गावर प्रगति होत असतांनाहि कित्येक विधिसंस्कार करावे लागतात. अध्यात्ममार्गासंबंधीं आम्हीं या पुस्तकांत जी माहिती देत आहों त्यांत असल्या विधींच़ा उल्लेख आलेला आहे. पण या विधींची माहिती सामान्य जनतेला नाहीं; इतकेंच़ नव्हे तर अध्यात्मप्रगतिपथावरून माणूस वाटच़ाल करीत असतांना कांहीं विधिसंस्कार करावे लागतात, हें आमच़ें म्हणणें आज़ अनेकांना विचित्रहि वाटण्याच़ा संभव आहे. यासाठीं खरोखरच़ असले विधि होत असतात याविषयीं आपल्या महाराष्ट्रीय संतांच्या ग्रंथांतलीं कांहीं वचनें देऊन ती गोष्ट सिद्ध करण्याच़ा आम्हीं या प्रकरणांत प्रयत्न करीत आहों. हे विधि सर्व माणसांना करावे लागत नाहींत, तर अध्यात्ममार्गांत ज्यांची बरीच़ प्रगति झ़ालेली असेल त्यांनाच़ करावे लागतात. खेरीज़ ते गुप्त असतात. अर्थात् त्यांची सविस्तर माहिती आपल्या ग्रंथांत सांपडणें शक्य नसणार हें उघड आहे. पण त्या विधींसंबंधानें अस्पष्ट व त्रोटक असे उल्लेख आपल्या ग्रंथांत कित्येक ठिकाणीं आहेत. त्यांवरून अध्यात्ममार्गावरहि विधिसंस्कार असतात व अध्यात्ममार्ग म्हणजे नुसता शब्दप्रचुर वेदान्त नव्हे, नुसत्या हृदयांत सळसळणाऱ्या भावनाहि नव्हेत, तो एक सुव्यवस्थित, सुसंघटित, टप्प्याटप्प्यांचा मार्ग आहे हें ज़ें आमच़ें या पुस्तकांत म्हणणें आहे त्याच़ा खरेपणा आमच्या वाचकांच्या डोळ्यांत भरेल. तसेंच़ संतांच्या ग्रंथांतील व थिऑसफ़ीच्या वाङ्मयांतील तपशील कांहीं ठिकाणीं तरी एक आहे हें आमच्या वाचकांस ओळखेल. त्या हेतूनेंच़ हें प्रकरण आम्हीं लिहीत आहों.

हे विधिसंस्कार प्रायः 'स्वप्न' नांवाच्या ज़ाणिवेच्या एका उच्च पायरीवर होत असतात असें संतांच़ें म्हणणें आहे. येथें 'स्वप्न' हा शब्द पारिभाषिक आहे. आपणांस जीं वेडींवांकडीं स्वप्नें वारंवार पडतात तीं ह्या 'स्वप्न' शब्दानें अभिप्रेत नाहींत. सूक्ष्म देहानें सूक्ष्म भूमिकेवर ज़ाऊन माणूस ज्या ज़ाणिवेनें व्यवहार करतो त्याला अध्यात्मशास्त्रांत 'स्वप्न' म्हणतात. [थिऑसफ़ीच्या परिभाषेंत स्वप्नाला Astral Conciousness असें म्हणतात.]  संतांना जे दृष्टान्त झ़ालेले आहेत ते या स्वप्न नांवाच्या स्थितींत झ़ालेले आहेत. स्वप्न ही एक विशिष्ट अशी स्थिति आहे. प्रारंभीं प्रारंभीं ही स्वप्नस्थिति व वेडींवांकडीं रोज़ पडणारीं अज्ञानमूलक स्वप्नें यांतला फरक माणसाला ओळखतां येत नाहीं. दोन्हींहि प्रकार सकाळीं उठल्यावर सारखेच़ स्मृतींत येतात. त्यामुळें त्यांत फरक व तारतम्य हीं असतील हें माणसाला प्रारंभीं समज़त नाहीं. पण अध्यात्मप्रगति जास्त झ़ाली म्हणजे 'स्वप्न' नांवाची जी ही उच्च ज़ाणीव आहे, तिच़ा अधिक परिचय होतो; व ती ज़ाणीव व वेडींवांकडीं स्वप्नें यांत ज़मीनअस्मानाच़ें अंतर आहे हें त्यास समज़ून येतें; इतकेंच़ नव्हे तर ही स्वप्न नांवाची उच्च प्रकारची ज़ाणीव जागृतीसारखीच़ पण एक वेगळी ज़ाणीव आहे, ती जागृतीसारखीच़ किंबहुना अधिक खरी असते हें माणसाला समज़तें. 'ज़ैसा कां जागृतीचा मेळा। स्वप्नही तैसेंचि दिसे डोळां।।' असा तुकाराममहाराज़ांनीं आपला अनुभव नमूद केलेला आहे, त्यावरून आमच़ें म्हणणें उघड होईल.

विधींतील  तपशील

तुकाराम महाराज़ांस आपल्या गुरूच़ा ज़ो अनुग्रह झ़ाला तो स्वप्नांत
झ़ाला हें सर्वश्रुत आहे. त्या वर्णनांत आपल्या डोक्यावर गुरूंनीं हात ठेविला 'मस्तकीं तो ज़ाणा ठेविला कर' असें तुकाराम महाराज़ म्हणतात. त्या वेळीं 'सांगितली खूण माळिकेची', 'मंत्र दिला रामकृष्ण हरी', 'केला अंगीकार तुका म्हणे' वगैरे गोष्टींच़ा त्यांनीं उल्लेख केला आहे. हा सर्व प्रकार तुकाराम महाराज़ांस जागृतींत नीट व सुसंगत रीतीनें आणतां आला नाहीं असें दिसतें. कारण या अनुभवाविषयीं  'पडिला विसर स्वप्नामाजीं'  असा त्यांनीं उल्लेख केला आहे. रामदासस्वामींनाहि असे कांहीं दृष्टान्त स्वप्न नांवाच्या स्थितींत होत असत असें दिसतें. 'स्वप्नीं जें देखिलें रात्रीं। तें तें तैसेंचि होतसे।।'  व  'हे साक्ष देखिली दृष्टी' असें त्यांनीं एके ठिकाणीं लिहिलेलें आहे. संत बहिणाबाईंच़े गुरु तुकाराममहाराज़ होते हें सर्वश्रुत आहे, पण बहिणाबाईंना ज़ो गुरूच़ा अनुग्रह झ़ाला तोहि 'स्वप्न' नांवाच्या स्थितींतच़ झ़ालेला आहे, बहिणाबाई म्हणतात -- 'ठेऊनियां कर मस्तकीं बोलला। मंत्र सांगितला कर्णरंध्रीं।। कार्तिकांत वद्य पंचमी रविवार। स्वप्नींच़ा विचार गुरुकृपा।।'

डोक्यावर हात ठेवण्याची क्रिया ही ज़शी तुकाराममहाराज़ांच्या अनुभवांत आहे तशी येथेंहि आहे. [गुरूंनीं डोक्यावर हात ठेवल्याच़े प्रसंग व परिणाम पूर्वीं
सहाव्या प्रकरणांत वाचकांसमोर ठेविले आहेत.] मंत्र दिल्याची गोष्टहि दोहींकडे आहे. या क्रिया एखाद्या विशिष्ट विधीच्या वेळीं केल्या ज़ातात असें दिसतें. ज्ञानदेवांनींहि स्वतःसंबंधानें, 'ज्ञानदेव म्हणे मीं चाडें। सद्गुरूंनीं केलें कोडें। माथां हात ठेविला तें फुडें। बीजचि वाइलें।।' असें म्हटलें आहे. तेव्हां या क्रिया एखाद्या विशिष्ट विधीच्या अंगभूत असल्या पाहिजेत हें उघड आहे.

गुरुशिष्याच्या भेंटींत कांहींतरी विधि असतो असें दाखविणारे उल्लेखहि पहाण्यासारखे आहेत -- 'दयासमुद्रं सद्गुरुं विधिवद् उपसंगम्य' असें मुक्तिकोपनिषदांत म्हटलें आहे (१,५). म्हणजे मुमुक्षूनें विधीप्रमाणें दयासागर सद्गुरूकडे गेलें पाहिजे. मुंडकोपनिषदांत 'शौनको ह वै महाशालः अंगिरसं विधिवदुपसन्नः प्रपच्छः।' (१,१,३) असें म्हटलें आहे. म्हणजे महाशाल
शौनक अंगिरसऋषींकडे विधीप्रमाणें गेला असा अर्थ आहे. अर्थात् ऋषीकडे ज़ाण्याच़ा कांहींतरी विधि असला पाहिजे हें उघड आहे. तुरियातीतोपनिषदामध्यें संन्यासमार्गीयांच्या कुटीचक, बहूदक, हंस, परमहंस अशा क्रमवार च़ढत्या पायऱ्या असतात व माणूस त्या टप्प्यांवरून पुढें ज़ातो असें वर्णन आहे.

ज्ञानेश्वरांची व संतांची भेंट झ़ाली त्या वेळच़ें वर्णन ज्ञानेश्वरांनीं एके ठिकाणीं केलें आहे. त्यावरून त्या विधींमध्यें कांहीं तरी क्रिया होत असाव्यात असें वाटतें. ज्ञानेश्वर म्हणतात (गाथा, साखरे यांची, क्रमांक १९९) --
'संत भेंटती आजी मज़। तेणें झ़ालों चतुर्भुज। दोन्हीं भुजा स्थूळीं सहज़। दोन्हीं सूक्ष्मीं वाढल्या।। आलिंगनीं सुख वाटे। प्रेम चिदानंदीं गोठे।।' [
शिष्याला गुरूंनीं पोटाशीं धरण्याच़ा विधि मागें सातव्या प्रकरणांत दिला आहे तो पहा. ज्ञानेश्वरांच़ें हें वर्णन याच़ विधीच़ें असावें असें वाटतें. श्रीकृष्णांनीं अर्जुनाला पोटाशीं धरल्याच़ें जें वर्णन वर सातव्या प्रकरणांत आम्हीं दिलें आहे त्यांत ज्ञानेश्वरांनीं जास्त विस्तार केला आहे.]  'दोन्हीं सूक्ष्मीं वाढल्या' या शब्दांवरून हा प्रकार सूक्ष्म भूमिकेवरच़ा आहे असें दिसून येतें. असल्या प्रसंगीं माणसाच्या अंतरंगांत फार मोठाले फरक होत असतात हें पुढील उताऱ्यावरून दिसून येईल --

ठेवितांच़ माथां हात। षड्रिपूंचा झ़ाला घात। दृष्टि मुरडोनि दावितां। ज़ाली मनासि उन्मनता।। सहज़ करतां अवलोकन। गेलें तुटोनि बंधन। शिवनाथें धरितां करीं। तेव्हां झ़ाला
नर-हरी।। [भावेकृत 'महाराष्ट्र सारस्वत' द्वितीयावृत्ति पृ.३५२ व ३५४]

यावरून शिवनाथांनीं मस्तकावर हात ठेवल्यावर नरहरीच्या मनांत उन्मनीची भावना उदित झ़ाली असें होतें.

एक  समारंभ

कांहीं विधींत
मुमुक्षूला विशिष्ट ठिकाणीं उभें करतात व तेथें कांहीं गोष्टी केल्या ज़ातात, असें वरील नरहरीचा शिष्य ज़ो महीपति त्यानें लिहिलें आहे. तो म्हणतो --

'नयन सांठवून नयनांत। उभें मज़ केलें अंगणांत। हळूंच सांगे कानीं दुरुनी। बोट दाखवी गगनांत।। निळी चांदणी लखलखली। प्रभा लोचनीं झ़कझ़कली। पहातां दृष्टी न पुरे माझी। पुढें ज्योती च़कच़कली।। सुंदर सुनीळ नार गं। स्वरूप तिच़ें अरुवार गं।। मस्तकिं एक फूल फुललें। तेंहि सदा गरुवार गं। फुलोनि फुलली पूर्ण कळा। चिन्मय उगवे चंद्रकळा।।'  [मागें आठव्या प्रकरणांत तारा च़मकल्याचें वर्णन आलें आहे. थिऑसफ़ीय अनुभव व संतांच़े अनुभव एकच़ असल्याचें अशा अनेक गोष्टींवरून दिसून येतें.]

या वर्णनांत आकाशांत एक च़ांदणी च़कच़कल्याच़ा उल्लेख आहे. तसेंच डोक्यावरच़ें सहस्रार चक्र फुलून नवी ज़ाणीव उत्पन्न झ़ाल्याच़ा उल्लेख आहे. गुरु व शिष्य विशिष्ट स्थळीं समोरासमोर उभे राहून कांहीं तरी विधि करीत आहेत असें या वर्णनावरून दिसून येतें.

असाच़ एक समारंभ ज्ञानेश्वरांच्या गाथेंत सूचित केला आहे (साखरेकृत गाथा, क्रमांक ७५०). हा अभंग सबंध वाच़ण्यालायक आहे. पण तो येथें सबंध देण्यास अवकाश
नाहीं. म्हणून त्यांतील कांहीं भाग देतों :-- 'अंध पंगु दृढ झ़ालों। माया पडळ भ्रांती। करचरण विव्हळ गेले। तंव भेंटले निवृत्ति।। ज्ञान मज़ उपदेशिलें। नेलें अज्ञानक्षिती। वृक्ष एक तेथें होता। तेथें बैसविलें रीती।।' याचा अर्थ असा कीं मीं अज्ञ व पंगु होतों, मायेनें ग्रस्त होतों, पण निवृत्तींच्या भेंटीनें मीं धडधाकट झ़ालों. मला निवृत्तिनाथांनीं ज्ञान उपदेशिलें. त्या वेळीं तेथें एक वृक्ष होता व रीतसरपणें मला त्या वृक्षाखालीं बसविण्यांत आलेलें होतें. ज्ञानेश्वर पुढें म्हणतात :-- 'सुटल्या जीवग्रंथी। ऐसें केलें त्या दानें।'  म्हणजे त्या ठिकाणीं मीं जें माझ़ें आत्मदान, आत्मसमर्पण केलें त्यानें माझ्या जीवाच़ें बंधन सुटून मीं मोकळा झ़ालों. 'नयनीं नयन झ़ाले। चक्षु मीं समाधान।'  हे शब्द वर आलेल्या नरहरीच्या 'नयन सांठवून नयनांत' या शब्दांसारखे दिसतात. त्या वेळीं काय परिणाम झ़ाला तें वर्णन पहा: 'दिव्य देह अमृतकळा। दशदिशा परिधान। सर्व हें ब्रह्म झ़ालें। फळद फळलें विज्ञान। निवृत्ति गुरु माझ़ा। अंधपण फेडिलें।।'  म्हणजे देह दिव्य झ़ाला, त्याला अमृतकळा आली; दशदिशा परिधान होण्याइतका तो विस्तृत झ़ाला; सर्व ब्रह्म आहे असा अनुभव आला व निवृत्तिप्रसादानें माझ़ें अंधळेपण ज़ाऊन मीं ज्ञानी झ़ालों. देह दिव्य होणें, दशदिशा परिधान होण्याइतका तो विस्तृत होणें ही गोष्ट स्थूल देहाला लागूं नाहीं. सूक्ष्मभूमिकेवरच्या कोणत्यातरी कोषाला ती लागूं आहे. हा अभंग मुळांत समग्र वाचल्यास कांहीं तरी विधि करण्यांत आला आहे व त्याच़ा परिणाम म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानी झ़ाले हें उघड होईल.

हे सर्व उतारे पाहिले म्हणजे अध्यात्ममार्ग म्हणजे नुसता ग्रंथ वाच़ण्याच़ा, भक्तिभावानें हृदय भरून ठेवण्याच़ा किंवा वेदान्तचिकित्सेचा मार्ग नाहीं. तो एक विशिष्ट प्रकारच्या प्रगतीच़ा नियमबद्ध मार्ग आहे, त्या मार्गावर कांहीं टप्पे आहेत, कांहीं अनुभव आहेत, कांहीं विधिसंस्कार आहेत, आणि मानवी ज़ाणीव फुलविण्याच्या कांहीं क्रिया आहेत हें उघड होतें. ग्रंथवाचन, वेदान्तचर्चा, भक्ति या गोष्टी निरुपयोगी आहेत असें कोणाच़ेंच़ म्हणणें नाहीं. पण त्यांनीं भागत नाहीं. त्याखेरीज़ दुसऱ्या अनेक गोष्टी अध्यात्ममार्गावर असतात असें आमच़ें म्हणणें आहे. या पुस्तकांत अध्यात्ममार्गासंबंधींची जी कल्पना आम्हीं आमच्या वाचकांसमोर ठेविलेली आहे तिच़ा तपशील थिऑसफ़ीय संशोधनांतून उपलब्ध झ़ालेला आहे. त्या तपशिलास आपल्या संतांच्या वचनांच़ा उत्कृष्ट दुज़ोरा मिळत आहे हें वरील उताऱ्यांवरून स्पष्ट होईल.

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण १० : पुढच़ा मार्ग