प्रकरण  आठवें


पहिली  महादीक्षा


या पुस्तकांत येथवर ज्या पायऱ्यांच़ें वर्णन केलें आहे त्या सर्वांत शिष्याच़ा ऋणानुबंध व्यक्तिशः फक्त त्याच्या जीवन्मुक्त सद्गुरूशीं ज़ोडलेला असतो. प्रस्तुत प्रकरणांत ज्या नव्या पायरीची माहिती सांगण्यांत येणार आहे तिला पहिली महादीक्षा असें म्हणतात, व त्या ऋणानुबंधानें तो शिष्य व जीवन्मुक्तांचा सबंध संघ यांच़ा प्रथमतः संबंध ज़ोडला ज़ाऊन शिष्य त्या संघांतला अगदीं कनिष्ठ प्रतीच़ा सभासद होत असतो. पूर्वींच्या पायऱ्या व ही पायरी यांमध्यें हा मोठा फरक आहे. [आपल्याकडच्या उपनिषदादि ग्रंथांत बहूदक म्हणून एक पायरी सांगितली आहे. पहिल्या महादीक्षेच़ें तें संस्कृतांतलें पारिभाषिक नांव असावें असें वाटतें.]

ऋषिसंघांत प्रवेश होऊन त्याच़ा सभासद होणें म्हणजे ज्या कार्याकरितां ऋषिसंघ झ़टत असतो त्या कार्यापैंकीं कांहीं भाग आपल्या अंगावर घेणें होय. अर्थात् या ऋषिसंघांत प्रवेश मिळविण्यासाठीं त्या संघाच़े जे अधिपति आहेत त्या सनत्कुमारांची संमति लागते, तसेंच़ तो शिष्य संघांत घेण्यालायक आहे अशी ग्वाही दोन जीवन्मुक्तांनीं द्यावी लागते. तेव्हांच़ दीक्षेच़ा विधि करण्यांत येऊन शिष्याच़ा त्या संघांत प्रवेश होतो. पहिल्या व दुसऱ्या दीक्षाविधींच्या वेळीं संघाच़े अधिपति हे बहुशः हज़र असत नाहींत. ते कोणातरी महान् ऋषीला तो दीक्षासंस्कार करावयास सांगतात आणि ते ऋषि त्या अधिपतींच्या नांवानें त्या दीक्षा देतात.

साधनचतुष्टय

ही दीक्षा मिळविण्यासाठीं
शिष्याच्या अंगीं कोणते गुण असणें अवश्य आहे त्याच़ें सविस्तर विवेचन पूर्वीं पांच़व्या प्रकरणांत आम्हीं केलेंच़ आहे. ते गुण अंगीं असल्याशिवाय दीक्षा देण्यांत येत नाहीं. अनादिकाळापासून ते गुण मुक्रर करण्यांत आले आहेत. या पायरीवर च़ढण्यासाठीं जे गुण अवश्य असतात त्यांत कधींहि बदल होऊं शकत नाहीं. शाळा-कॉलेजांत ज्या परीक्षा होत असतात त्यांत कधीं कधीं बदल होऊं शकतो. एखाद्या वर्षाच्या अभ्यासाचीं पुस्तकें कठीण असतात तर दुसऱ्या एखाद्या वर्षाचीं सोपीं असतात. कांहीं वर्षें एक अभ्यासक्रम असतो तर कांहीं वर्षें त्याच़ परीक्षेच़ा अभ्यासक्रम बदलण्यांत येतो; कधीं परीक्षेच़े कागद सोपे असतात, तर कधीं कठीण असतात; कधीं एक परीक्षक सढळ हातानें मार्क देतो तर दुसरा मार्क देण्याबाबत फार कंजूष असतो. अशा प्रकारच़े बदल ह्या किंवा ह्यापुढच्या दीक्षांच्या बाबतींत कधींहि होत नाहींत. प्रत्येक दीक्षेला जे गुण अवश्य म्हणून ठरविलेले आहेत आणि जितक्या प्रमाणांत अवश्य ठरविलेले आहेत ते गुण व तें प्रमाण हीं सारीं वज्रलेप असतात. पण यावरून या दीक्षाद्वारांतून जीं माणसें पुढें ज़ातात तीं सारीं एका साच्याचीं व एकाच़ योग्यतेचीं असतात असें मात्र नाहीं. निरनिराळ्या मनोरचनेच्या माणसांना येथें भरपूर वाव असतो. एकच़ परीक्षा पास होणाऱ्या पदवीधरांमध्यें ज़सें विषयपरत्वें व बुद्धिपरत्वें वैचित्र्य असूं शकतें, उच्चनीच भावहि असूं शकतो, तसें या सर्व महादीक्षांसंबंधानेंहि होत असतें. दोन माणसें एम्.ए. झ़ालीं असलीं तरी तीं सर्व बाबतींत सारखींच़ असतात असें नाहीं. मात्र अमुक एका मर्यादेच्या ज़ो खालीं असेल तो एम्.ए. होऊं शकत नाहीं; तसेंच़ ह्या पहिल्या महादीक्षेविषयीं व इतर पुढल्या दीक्षांविषयींहि संभवतें. विवेक, वैराग्य, षट् संपत्ति व प्रेम (मुमुक्षा) हे चार अधिकार अंगीं असल्याशिवाय कोणींहि मनुष्य पहिल्या महादीक्षेच्या द्वारांतून पुढें ज़ाऊं शकत नाहीं. प्रत्येक गुण अंगीं सोळा आणे असलाच़ पाहिजे असें नाहीं. एकंदर सारे गुण बऱ्या प्रमाणांत लागतात, व सगळेच़ गुण अगदीं बेताच़े असून च़ालत नाहीं.  प्रत्येक गुण निदान विवक्षित पायरीपर्यंत तरी असला पाहिजे असें ज़रूर आहे. शाळा-कॉलेजांतल्या परीक्षांच्या कांहीं बाबी या आध्यात्मिक गोष्टींस लागू पडत नाहींत हें आपण नुकतेंच़ पाहिलें आहे. पण त्या परीक्षांसंबंधाच्या कांहीं इतर गोष्टी लागू पडतात हें लक्षांत ठेवलें पाहिजे. प्रत्येक विषयांत शेंकडा अमुक मार्क मिळाले पाहिजेत असें परीक्षांत ठरविलेलें असतें. तद्वत् अमुक अमुक गुण किमानपक्षीं इतक्या इतक्या प्रमाणांत अंगीं असला पाहिजे, तितका तो अंगीं नसला तर त्या दीक्षेच्या पायरीवर माणसाला घेण्यांत येणार नाहीं, असें ठरलेलें असतें. शिवाय प्रत्येक विषयांत त्या किमान मर्यादेच्या इतके गुण मिळाले तरीहि च़ालत नाहीं. प्रत्येक विषयांत ज़रूर तितके मार्क मिळवूनहि एकंदर सर्व विषयांतले गुण शेंकडा अमुक प्रमाणांत पडले पाहिजेत, असाहि पुष्कळ परीक्षांत निर्बंध असतो; व ही एकंदर मार्कांची मर्यादा प्रत्येक विषयांतील किमान मर्यादेपेक्षां ज़रा वर असते. उदाहरणार्थ, अमुक विषयांत शेंकडा पंचवीस मार्क व तमुक विषयांत शेंकडा तीस मार्क मिळाले पाहिजेत असा निर्बंध असूनहि एकंदर मार्कांची बेरीज़ शेंकडा तेहतीस झ़ाली पाहिजे अशासारखाहि नियम असतो. त्यामुळें एका विषयांत विद्यार्थ्याला जेमतेम पास होण्याइतकेच़ मार्क मिळाले असले तर दुसऱ्या विषयांत जास्त मार्क मिळवून त्याला एकंदर मार्कांची बेरीज़ वाढविणें अवश्य होतें. तद्वत् एखादा गुण अगदीं जेमतेम अंगीं असला तर दुसरा एखादा गुण ज़रूरीपेक्षां बऱ्याच़ जास्त प्रमाणांत लागतो.  यामुळें एकाच़ दीक्षेच्या द्वारांतून पुढें ज़ाणाऱ्या माणसांमध्यें स्वभाववैचित्र्य आणि उच्चनीच भाव हीं दोन्हींहि असूं शकतात. खेरीज़ एक माणूस मोठ्या मेटाकुटीनें एका पायरीवर येतो, तर दुसऱ्याच्या अंगीं बहुतेक सर्व गुण पुष्कळच़ जास्त प्रमाणांत बाणलेले असतात आणि एक विशिष्ट गुण ज़रूरीपेक्षां किंचित् कमी असतो; अर्थात् हा एक गुण त्यानें त्या प्रमाणांत अंगीं आणला कीं तोहि त्याच़ पायरीवर येतो. पण सर्व गुणांत मोठ्या मेटाकुटीनें वर च़ढलेला माणूस व हा माणूस यांमध्यें श्रेष्ठकनिष्ठपणाच़ा पुष्कळच़ भाग असणार हें उघड आहे. अर्थात् पहिल्या माणसाला त्या पायरीवरून पुढच्या पायरीपर्यंत प्रगति करण्याला जास्त खटपट व वेळ लागेल व दुसरा ती प्रगति लवकर करील. या सर्व गोष्टी विचारांत घेतल्या तर पहिल्या दीक्षेच्या द्वारांतून जे पुढें गेले ते सर्व एकाच़ योग्यतेच़े असले पाहिजेत असें मानणें योग्य नाहीं हें स्पष्ट आहे.

पहिल्या महादीक्षेपर्यंत येण्याला स्थूलदेह, वासनादेह व मनोदेह हे तिन्हीं जीवात्म्याच्या स्वाधीन झ़ालेले असावे लागतात. जें जीवात्म्याला नको असेल तें देहात्म्याला म्हणजे या तीन देहांपैंकीं एकालाहि आवडणार नाहीं, त्या गोष्टींना त्या देहांत थारा मिळणार नाहीं, येथपर्यंत शिष्याच़ा विकास झ़ालेला असावा लागतो. एका दृष्टीनें पाहिलें तर दीक्षा ही एक कृत्रिम गोष्ट आहे असें म्हणतां येईल, झ़ाडाला खत घालून त्याला जास्त फुलें आणणें, किंवा कळीवर बाह्यगोल भिंगानें जास्त प्रकाश पाडून ती अगोदर फुलविणें, किंवा कणीक तिंबवून तींत जास्त चिकटपणा आणणें या गोष्टी ज़शा कृत्रिम आहेत त्या अर्थानें माणसाच्या ज़ाणिवेवर व देहावर संस्कारांचे ठसे उमटवून ज़ाणीव विशाल व जास्त संवेदनक्षम करणें या गोष्टी कृत्रिम आहेत. दीक्षेची तयारी करतांना व दीक्षाविधीच्या वेळीं असल्या कृत्रिम गोष्टी कराव्या लागतात; आणि त्याच़ा ताण शिष्याच्या सर्व देहांवर व मनावर पडतो. तो सहन करण्याइतकी त्याची देहयष्टि निकोप असावी लागते; तरच़ दीक्षाद्वारांतून पुढें ज़ाणें त्याला शक्य होतें.

या सर्व गोष्टींवरून वाचकांच्या ध्यानांत येईल कीं शिष्याच़ा वैयक्तिक प्रयत्नच़ दीक्षा मिळविण्याला कारणीभूत होतो. पण कांहीं वेळा अशा असतात कीं प्रयत्न सिद्धीस ज़ाण्यास त्यांच़ा फार उपयोग होतो; उलटपक्षीं कांहीं काळ अत्यंत प्रतिकूल असतात. ज़शी समुद्राला कधीं भरती येते, कधीं ओहोटी येते आणि कांहीं वेळां एका विशिष्ट दिशेनें पोहणें सोपें ज़ातें तर कांहीं वेळां कठीण ज़ातें; तसें कधींमधीं अध्यात्ममार्गावर होऊं शकतें. इतिहासांत कांहीं वेळा अध्यात्मप्रगतीला भरतीसारख्या असतात, तर कांहीं वेळां ओहोटीसारख्या असतात, आणि त्यामुळें कांहीं प्रसंगीं ह्या मार्गानें प्रगति करणारीं माणसें पुष्कळ असतात आणि त्यांतलीं पुष्कळ यशस्वी होतात, तर कांहीं प्रसंगीं या मार्गानें ज़ाणारे थोडे आणि दीक्षा मिळविणारे त्याहून थोडे अशी  स्थिति असते. हल्लींच्या विसाव्या शतकांतला प्रारंभकाळ भरतीसारखा आहे आणि पुष्कळ माणसांची जलदीनें प्रगति होण्याच़ा सध्यां संभव आहे. या प्रगतीच़ा माणसाच्या शरीरप्रकृतीवर नेहमीं ताण पडत असतो आणि तो ताण देहाला, विशेषतः मज्जातंतूंना दुःसह होणार नाहीं आणि प्रकृति बिघडणार नाहीं याविषयीं या मार्गानें ज़ाणाऱ्यांपैंकीं प्रत्येकानें सावध राहणें अवश्य असतें.

पहिल्या महादीक्षेच़ा विधि भुवर्लोकाच्या भूमिकेवर करण्यांत येतो.  या पायरीवर ज़ाण्यापूर्वीं भुवर्लोकांत वासनादेहानें हिंडणें, तेथें निरनिराळे उद्योग करणें, वगैरे पुष्कळ गोष्टी शिष्याला माहीत असाव्या लागतात. या गोष्टी ज़र अगोदर शिकून झ़ालेल्या नसल्या तर दीक्षेच्या वेळीं त्या शिकणें ज़रूर होतें. तसेंच़ या पहिल्या महादीक्षेच्या वेळीं मनाच्या पलीकडे जी बुद्धीची भूमिका आहे, 'मनसस्तु परा बुद्धिः' या शब्दांनीं जी गीतेंत वर्णिलेली आहे, त्या भूमिकेवर माणसास ज़ाणीव नेणें अवश्य असतें. तेथें ज़ाणीव नेऊन कांहीं गोष्टी शिकावयाच्या असतात. असल्या कारणांमुळें दीक्षेच्या समारंभाला कधीं थोडा वेळ लागतो तर कधीं जास्त लागतो. नुसत्या विधीला सहा तासांहून कमी वेळ पुरतो. पण भुवर्लोकांतील काम शिष्याला त्या वेळीं शिकावयाच़ें असलें, बुद्धीच्या भूमिकेवरच़े अनुभव
हि घ्यावयाच़े असले, तर अनेक दिवस व रात्री या विधीसाठीं ज़रूर लागतात. कित्येक वेळां दीक्षा-विधि लौकर आटपून घेतात आणि वर दिलेल्या गोष्टी शिष्यास शिकविण्याची निराळी व्यवस्था करतात. ही निराळी व्यवस्था म्हणजे सद्गुरु एखाद्या आपल्या वडील शिष्याच्या हातीं या नव्या माणसाला देतात व त्याला हें त्याच़ें शिक्षण पुरें करावयास सांगतात. ज्यांनीं या गोष्टी अगोदरच़ नीट शिकून घेतल्या असतील त्यांना हें काम या वेळीं करणें ज़रूर पडत नाहीं आणि म्हणून त्यांच़ा दीक्षाविधि लवकर आटपतां येतो.

दीक्षेच्या वेळीं बुद्धीच्या भूमिकेवर ज़ाणीव जागृत होते व त्यामुळें अखिल भूतमात्रांशीं जीवैक्यभावाचा मुमुक्षूला पहिला अनुभव येतो; व तसेंच़ त्याच्या मनाच़ा ऋणानुबंध सबंध ऋषिसंघाशीं ज़ोडला ज़ातो आणि त्याच्या अंतरंगांत नवीन स्फुरण उत्पन्न होत ज़ाऊन नवीन शक्ति फुलावयास लागतात. पण या गोष्टी तत्काळ इतर लोकांस स्पष्टपणें दिसण्याइतक्या जलदीनें प्रकट होत नाहींत. मुरांबा घातल्यावर लगेच़ त्याची लज़्ज़त उत्पन्न होत नाहीं, त्यासाठीं तो कांहीं दिवस मुरावा लागतो. पहिल्या महादीक्षेच्या वेळीं ज़ो विकास होतो तो उच्च देहांत होत असतो. त्याच़ा परिणाम एकाएकीं स्थूलदेहांत उतरून दृश्य होत नाहीं. तो विकास अंगवळणीं पडावा लागतो आणि अंतर्यामांत पुष्कळसा मुरावा लागतो; आणि मगच़ त्याचे परिणाम स्थूलदेहांत अधिकाधिक स्पष्टपणें दिसूं लागतात. अर्थात् पहिल्या दीक्षाद्वारांतून ज़ो पलीकडे गेला आहे त्या माणसांत कांहीं अलौकिक गुण च़मकत आहेत असें जगांतील सामान्य माणसांना नेहमींच़ ओळखेल असें नाहीं. झ़ाडाच्या मुळांना पाणी घातलें कीं तत्क्षणींच़ तें टवटवीत होत नाहीं. पोषक रस मुळांतून वर च़ढून झ़ाडाच्या पानांत ज़ाऊन पोहोंच़ेपर्यंत आपणांला वाट पहावी लागते. तद्वत् दीक्षेच़ा परिणाम स्वभावांत, बुद्धिमत्तेंत आणि कार्यक्षमतेंत सर्वांना नीट दिसण्याइतका प्रकट होण्याला पुष्कळ काळ लागतो. दुसरें असें कीं या मार्गानें ज़ाणारीं माणसें स्वभावानें विनयशील असावीं लागतात. पुढेंपुढें करून लोकांत आपली प्रतिष्ठा वाढवावी हें त्यांस बिलकुल योग्य वाटतां कामां नये; आणि जगांतले इतर लोक प्रवृत्तिमार्गी असल्यामुळें आपला प्रकाश सर्वांसमोर आपण मुद्दाम पाडावा व त्यासाठीं आपलेंच़ घोडें सर्वांच्या पुढें दामटावें असें त्यांच़ें धोरण असतें. तेव्हां वरवर पाहणाऱ्याला अध्यात्मप्रगति केलेल्या असल्या माणसांपेक्षां बाहेरची तरतरी दाखविणारीं दिखाऊ माणसेंच़ जास्त हुशार व कर्तीं आहेत असें वाटण्याच़ा संभव असतो.

विधीचें  वर्णन

या दीक्षेच़ा विधि निरनिराळे ऋषि करतात. विशिष्ट प्रसंगीं तो कोणीं करावा हें सनत्कुमार ठरवितात. तो करण्याच़ें काम भगवान् मैत्रेय (हल्लींच़े बोधिसत्त्व) यांच़ेकडें सोंपविलेलें असलें म्हणजे ते तो विधि आपल्या निवासस्थानाभोंवतालच्या बागेंत करतात. ऋषि मौर्य किंवा देवापि (कुठूमी) यांना तो करावयाचा असला  म्हणजे प्रायः आपल्या आश्रमाज़वळील गुहेंत ते करतात. दुसरे कोणीं जीवन्मुक्त त्यासाठीं नेमलेले असले तर तो समारंभ अन्य ठिकाणीं होत असला पाहिजे हें न सांगतांहि आमच्या वाचकांस समज़ण्यासारखें आहे. त्या ठिकाणीं जी मंडळी नेहमीं राहत असतील तीं तेथें स्थूलदेहानें येतात, व जीं दूर राहणारीं असतील  त्यांना स्थूलदेहानें येणें शक्य नसल्यामुळें तीं वासनादेहानें तेथें येणार हें उघड आहे. हे समारंभ नेहमीं भुवर्लोकाच्या भूमिकेवर होत असतात, हें आम्हीं वर सांगितलें आहे. पुढें दिलेल्या पहिल्या महादीक्षा-विधीच्या समारंभाचें वर्णन व माहिती ही श्री.लेडबीटर् यांच्या एका ग्रंथांतून भाषांतरित करून आम्हीं पुढें देत आहों. [श्री. लेडबीटरकृत The Masters and the Path, द्वितीयावृत्ति, पृ.२४७ पहा.]
  हा समारंभ १९१५ सालच्या मे महिन्यांत वैशाख पौर्णिमेच्या एक दोन दिवस अगोदर करण्यांत आलेला होता. त्या वेळीं भगवान् मैत्रेय यांच्याकडे दीक्षा देण्याचें काम असल्यामुळें त्यांच्या बागेंत तो त्यांनीं केला. त्या संबंधानें श्री.लेडबीटर् लिहितात :

" त्या बागेंत समारंभासाठीं पुष्कळ जीवन्मुक्त पुरुष ज़मलेले होते. आम्हांस ज्यांचीं नांवें माहीत आहेत ते सारे तेथें उपस्थित होते. बाग अत्यंत शोभिवंत दिसत होती. लाल फुलांच़े ताटवे सर्वत्र प्रफुल्लित झ़ालेले दिसत होते, आणि पहांटेंस फुललेल्या गुलाबांच़ा सुगंध हवेंत सर्वत्र भरून राहिलेला होता. भगवान् मैत्रेयांच्या आश्रमासमोर बागेंत एक भव्य वृक्ष आहे. त्या वृक्षाखालीं एक मध्यवर्ती संगमरवरी दगडांची वर्तुलाकार बैठक केलेली आहे. तिज़वर भगवान् मैत्रेय आपल्या नेहमींच्या स्थानीं विराजमान झ़ालेले होते. या बैठकीवर ज़रा उंच़ असें एक कोरीव सिंहासन केलेलें आहे. तें अगदीं बरोबर दक्षिणाभिमुखी आहे. त्याला दक्षिणामूर्तीचें सिंहासन असें म्हणतात. त्या सिंहासनाच्या दोहों बाज़ूच्या हातांसरसे एका बाज़ूला भगवान् वैवस्वत मनु व दुसऱ्या बाज़ूला महाचोहण बसले होते. त्या प्रसंगानिमित्त ज़मलेले इतर जीवन्मुक्त ऋषि संगमरवरी बैठकीच्या दोन पायऱ्यांच्या खालीं तृणाच्छादित ओट्यावर ठेवलेल्या आसनांवर भगवान् मैत्रेयांच्या डाव्या व उजव्या अंगांस अर्धवर्तुलाकार रांगेनें बसले होते. ज्या शिष्याला या समारंभांत दीक्षा द्यावयाची होती तो उमेदवार व त्याच़ा पुरस्कार करणारे जीवन्मुक्त ऋषि हे त्या तृणाच्छादित ओट्याच्या एक पायरी खालीं बाज़ूस भगवान् मैत्रेयांच्या चरणांपाशीं उभे होते आणि त्यांच्या पाठीमागें व खालीं दीक्षा घेतलेले व न घेतलेले असे दुसरे शिष्य उपस्थित होते. विशेष अधिकाराच़े कांहीं भाग्यवान् प्रेक्षकहि त्यांत होते. या समारंभाच़ा बराच़सा भाग पाहण्याची त्यांना परवानगी होती. पण मधून मधून एक हिरण्मय पडदा त्यांच्यासमोर उत्पन्न होई व त्यामुळें मध्यभागीं च़ालूं असलेला कांहीं कार्यक्रम त्यांस दिसेनासा होई. नेहमींच्या शिरस्त्याप्रमाणें त्या उमेदवार शिष्याच्या अंगांत शुभ्रसुती असा पायघोळ पोषाख होता आणि बहुतेक ऋषींचीं वस्त्रें शुभ्र पण रेशमी होतीं.

ह्या मंडळींच्या वर हवेंत पुष्कळ देव उपस्थित झ़ालेले होते व ते एक तऱ्हेचा मंजुळ ध्वनि सारखा काढीत असून त्या ध्वनीनें वातावरण भरून गेलेलें होतें. हा मंजुळ ध्वनि एकसारखा चालूं होता. त्याच्या मृदु व मधुर नादलहरी त्या शिष्याच्या अंतर्यामांत शिरत व त्यांपासून त्याच्या अंगच्या विद्यमान व भविष्यकालीन गुणवैशिष्ट्यास प्रकट करणारें ज़णूं विविध धाग्यांचें एक सुंदर ध्वनिचित्र विणून तयार होत असे. हा समारंभ च़ालूं असतांना सतत त्या ध्वनिचित्रांतून एकसारखें मधुगुंजन बाहेर पडे आणि समारंभांतील भाषणाला त्याची उत्तम प्रकारची साथ होत असे. झ़ाडावर पक्षी आनंदानें गात असले म्हणजे शेजारीं झ़ुळझ़ुळ वाहणाऱ्या झ़ऱ्याच्या ध्वनिलहरी त्या गाण्याला ज़शा व्यत्यय तर आणीत नाहींतच़ पण उलटपक्षीं ज़शी सुंदर साथ देतात, तशी त्या मधुगुंजनाच्या सुरांची तेथें साथ होत होती, आणि कांहीं विशिष्ट प्रसंगीं तर तानांचा ज़णूं पाऊस पडून त्या त्या वेळीं मोठी बहार होत असे. समारंभांतील बोलणीं त्यानें अस्पष्ट न होतां उलट अधिक उठावदार दिसत. प्रत्येक दीक्षाप्रसंगीं शिष्याच्या जीवनसुरावर (chord) हें गाणें आधारलेलें असतें. [प्रत्येक जीवाचें अंतरंगदृष्ट्या जें वैशिष्ट्य असतें त्याला chord म्हणतात.]  त्याच्या भोंवतीं निरनिराळ्या प्रकारच़े ध्वनिचित्रांच़े नमुने विणले ज़ातात व त्या शिष्याच़ें वर्तमान व भावी स्वभाववैशिष्ट्य अकल्पित रीतीनें व्यक्त होत असतें. खरोखरी उच्च भूमिकेवरील हा अद्भुत प्रकार वैखरी वाणीनें सांगून स्थूल मेंदूच्या आकलनशक्तींत आणणें कठीण आहे.


सभास्थानाच्या मध्यभागीं उमेदवार शिष्य उभा होता व त्याच्या दोहों बाज़ूंस त्याचे सूचक ऋषि कुठूमी व अनुमोदक ऋषि मास्टर जीझ़स् असे दोघे जीवन्मुक्त उभे होते. कुठूमी हे त्याच़े गुरु असून त्यांनींच़ त्याला पुढें केलेला होता, अर्थात् तेच़ सूचक होते. त्याची आणखी ग्वाही देणारे अनुमोदक म्हणून मास्टर जीझ़स् उपस्थित होते. सस्मित मुद्रेनें भगवान् मैत्रेयांनीं या विधीच्या संकल्पांतील सुरुवातीच़ा प्रश्न विचारला आणि विधीला प्रारंभ झ़ाला.

'आपण मज़समोर याप्रमाणें ज्याला आणून उभें केलें आहे तो कोण आहे ?'

देवापि (कुठूमी) ऋषींनीं नित्याप्रमाणें प्रत्युत्तर दिलें --

'ऋषिसंघांत प्रवेश करूं इच्छिणारा हा एक उमेदवार आहे.'

मग पुढील प्रश्न विचारण्यांत आला --

'तो प्रवेशास योग्य आहे अशी तुम्हीं ग्वाही देतां काय  ?'

त्यावर देवापींनीं नेहमींचें उत्तर दिलें --

'होय, मीं ग्वाही देत आहे.'

'ज्या मार्गांत प्रवेश करण्याची ह्या उमेदवाराची मनीषा आहे त्या मार्गावर त्याच्या पावलांस वाट दाखविण्याची ज़बाबदारी तुम्हीं आपल्या शिरावर घ्याल कां ?'

देवापि म्हणाले -- 'होय. मीं घेईन.'

'वरिष्ठ प्रतीच्या दोन बंधूंनीं प्रत्येक उमेदवाराबद्दल ग्वाही दिली पाहिजे असा आमच़ा नियम आहे. या उमेदवाराच्या विनंतीला दुज़ोरा देण्याला दुसरे असे कोण बंधु तयार आहेत ?'

यापूर्वीं ऋषि जीझ़स् कांहींच़ बोलले नव्हते. ते प्रथमच़ या वेळीं म्हणाले --

'मीं तयार आहे.'

मग दीक्षा देणारे जे भगवान् मैत्रेय त्यांनीं आणखी प्रश्न केला.

'ज़र या उमेदवाराच्या स्वाधीन जास्त शक्ति करण्यांत आली तर त्या शक्तीचा विनियोग आमच्या महत्कार्याच्या प्रगतीकडेसच़ तो करील या विषयीं तुमची खात्री झ़ाली आहे काय ?'

देवापि ऋषींनीं उत्तर दिलें --

'हल्लींच्या जन्मींचीं या उमेदवाराचीं थोडींच़ वर्षें व्यतीत झ़ालीं आहेत. तरी देखील इतक्या अल्पावधींत त्यानें पुष्कळ सत्कृत्यें केलीं आहेत आणि आपलें जगांतील कार्य करण्याला तो सुरुवात करीत आहे. ग्रीस देशांतल्या एका जन्मांत माझ़े तत्त्वविचार प्रसृत करण्याच्या कामीं, तसेंच़ आपली मातृभूमि सुधारण्याच्या कामीं या उमेदवारानें पुष्कळ खटपट केलेली होती.'

ऋषि जीझ़स् ही म्हणाले --

'पूर्वींच्या दोन जन्मांत या उमेदवाराच़ें लोकांवर फारच़ वज़न होतें. त्या दोन जन्मांत त्यानें एकसारखें माझ़ें कार्य केलेलें आहे. एका जन्मांत अन्यायाच़ा प्रतिकार करणें, राजा या नात्यानें आपल्या चरित्रांत थोर ध्येय समोर ठेवणें आणि महंत या नात्यानें दुसऱ्या जन्मांत प्रेमळपणा, शुचित्व, वैराग्य हे गुण वर्तनांत आणण्याची शिकवण लोकांत प्रसृत करणें या गोष्टी त्यानें केलेल्या आहेत. या कारणांमुळेंच़ मीं अनुमोदन देण्यासाठीं ह्या ठिकाणीं उभा आहे.'

भगवान् मैत्रेय हास्यमुद्रेनें म्हणाले --

'ऋषिसंघांत प्रवेश होण्याचा मान मिळविण्यासाठीं जे उमेदवार आम्हांपुढें आज़पर्यंत आले त्या सर्वांमध्यें या उमेदवाराच़ा देह वयानें लहान आहे. बाह्य जगांत राहणारा आमच्या ऋषिसंघांतला असा कोणीं सभासद येथें आहे कां, कीं ज़ो आमच्या वतीनें या उमेदवाराला या लहान वयांत ज़रूर लागणारें साहाय्य आणि उपदेश देण्यास तयार आहे ?'

मागें जी शिष्यमंडळी उभी होती त्यांमधून शीर्ष पुढें झ़ाले [हें सांकेतिक नांव आहे. इंग्रजी ग्रंथांत Sirius असें नांव आहे. त्याचें येथें मराठींत 'शीर्ष' केलें आहे. हें श्री.लेडबीटर् यांच़ें स्वतःच़ें सांकेतिक नांव होय.]  आणि म्हणाले --

'ज़ोंवर मीं या देहाच्या संनिध असेन तोंवर शक्त्यनुसार ह्याच्यासाठीं मला जें जें करतां येण्यासारखें असेल तें तें सारें मोठ्या आनंदानें मीं करीन.'

भगवान् मैत्रेय म्हणाले --

'या तरुण उमेदवाराबद्दल तुमच्या हृदयांत बंधुभावना व प्रेम हे गुण इतके तुडुंब भरलेले आहेत कां, कीं योग्य असलेली सल्लामसलत देऊन तुम्हांला त्याच़ें मार्गदर्शित्व पत्करतां येईल ?'

शीर्ष उत्तरले -- 'माझ़ें हृदय तसें भरलेलें आहे.'

येथवर भगवान् मैत्रेय उमेदवाराला अनुलक्षून कांहींच बोलले नव्हते; ते आतां त्याला म्हणाले --

'तुझ़ेंहि या बंधूवर इतकें प्रेम आहे कां, कीं जेव्हां ज़रूर पडेल तेव्हां त्याच़ें साहाय्य तूं खुशीनें स्वीकारशील ?'

तो तरुण उद्गारला --

'खरोखरीच़ माझ़ें त्यांच्यावर अगदीं मनापासून प्रेम आहे. तें नसतें तर मीं येथें आज़ या स्थानीं उभा राहणें शक्य नव्हतें.'

मग भगवान् मैत्रेय यांनीं आपलें मस्तक मोठ्या गंभीर मुद्रेनें विनम्र केलें आणि लगेच़ त्या दोघां जीवन्मुक्तांनीं उमेदवाराला पुढें नेलें व अशा रीतीनें तो त्यांच्यासमोर उभा राहिला. मैत्रेयांनीं आपली एकाग्रदृष्टि त्याच़ेवर लावली आणि विचारलें --

'यावच्चंद्रदिवाकरौ अस्तित्वांत राहणारा ज़ो ऋषिसंघ त्यांत येण्याची तुझी इच्छा आहे काय ?'

तरुणानें उत्तर दिलें --

'भगवन्, माझ़ा देह इतका अल्पवयी असूनहि ज़र ती पात्रता माझ्या अंगीं आहे असें आपणांला वाटत असेल तर माझी येण्याची इच्छा आहे.'

दीक्षाधिकारी मैत्रेय म्हणाले --

'या सिद्धसंघाच़ा हेतु काय आहे तें तुला माहीत आहे काय ?'

शिष्य बोलला --

'उत्क्रांति ही ईश्वराची योजना आहे. ती योजना अंमलांत आणून ईश्वराची इच्छा पूर्ण करणें हा सिद्धसंघाच़ा हेतु आहे.'

त्यावर भगवान् मैत्रेय म्हणाले --

'यापुढें
आपलें सारें जीवन व आपलें सारें सामर्थ्य मीं त्या कामास लावीन, जगाच्या हितासाठीं स्वतःला साफ़ विसरून ज़ाईन आणि ईश्वर ज़सा संपूर्णपणें प्रेममय आहे तसा मीं होईन अशी तूं प्रतिज्ञा करशील काय ?'

शिष्यानें उत्तर केलें --

'माझ्या गुरुदेवांच्या साहाय्यानें तसें करण्यासाठीं मीं माझ़ें शक्तिसर्वस्व खर्चीं घालण्याचा प्रयत्न करीन.'

पुन्हां एक प्रश्न विचारण्यांत आला.

'ज्या गोष्टी गुप्त ठेवण्याचें तुला सांगण्यांत येईल त्या गुप्त ठेवीन असें तूं वचन देतोस काय ?'

त्यावर उत्तर आलें --

'होय, मीं वचन देतों.'

मग भुवर्लोकांतील माहितीसंबंधाच़े व उद्योगांविषयींच़े प्रश्न त्याला विचारण्यांत आले. त्या लोकांतल्या पुष्कळ वस्तु त्याच्यासमोर ठेवण्यांत आल्या व दीक्षाधिकाऱ्यासमोर त्या काय काय आहेत तें शिष्याला ओळखून सांगावें लागलें. जिवंत माणसाचा वासनादेह व मृत माणसाचा वासनादेह, खरी व्यक्ति व त्या व्यक्तीच़ें विचारचित्र, गुरुदेव व त्यांची हुबेहूब केलेली खोटी प्रतिमा हीं त्याला ओळखावीं लागलीं. मग दीक्षाधिकाऱ्यांनीं भुवर्लोकांतील अनेक प्रसंगांतील व्यक्तींचीं उदाहरणें प्रतिमारूपानें त्याच्यासमोर ठेविलीं आणि त्या त्या माणसांना तूं कोणत्या प्रकारें साहाय्य करशील हें त्याला विचारलें. त्यानें आपल्या बुद्धीप्रमाणें च़ांगलीं उत्तरें दिलीं.

[ सर्वांना तेच़ प्रश्न विचारण्यांत येतात असें नाहीं. या दीक्षेच्या वेळीं ज़ो उपदेश दिला ज़ातो त्यांतला कांहीं भाग सर्वसामान्य असतो व तो दीक्षा घेणाऱ्या सर्व शिष्यांस देण्यांत येतो, पण कांहीं भाग त्या त्या शिष्याच्या वैशिष्ट्यानुसार वेगळा असतो. विचारलेल्या प्रश्नांच़ेंहि तसेंच़ असतें. कांहीं प्रश्न त्या त्या शिष्याला विशेष म्हणून विचारण्यांत येतात. शिष्यानें जगांत काय कार्य केलें आहे, असाहि प्रश्न कधीं कधीं विचारण्यांत येतो. ज्यांस त्यानें साहाय्य केलें असेल त्यांस सूक्ष्म देहांत बोलावून आणून कधीं कधीं त्यांच़े तोंडून तें वदविलें ज़ातें. कधीं कधीं शिष्याच़ा ज़ो अगदीं कट्टा शत्रु असेल त्याची प्रतिमा त्याच्यासमोर उभी करतात, तो तुझ्या ताब्यांत आला तर तूं त्याशीं कशा रीतीनें वागशील, त्याला संपूर्णपणें क्षमा करशील कीं नाहीं, असाहि प्रश्न विचारण्यांत येतो. ]

शेवटीं भगवान् मैत्रेयांच्या चेहऱ्यावर मंदस्मित दिसूं लागलें आणि सर्व उत्तरें उत्कृष्ट आहेत असा अभिप्राय त्यांनीं बोलून दाखविला.

उपदेश


मग दीक्षागुरूंनीं उपदेश दिला. तो उपदेश म्हणजे एक धीरगंभीर असें सुंदर भाषण होतें. या भाषणांतला कांहीं भाग दर दीक्षेच्या वेळीं सांगण्यांत येतो व एकाच़ मतलबाचा असतो; पण कांहीं भाग दर वेळीं वेगळा असून त्यांत त्या उमेदवाराल व्यक्तिशः उपयोगी पडेल असा विशेष भागहि असतो. ऋषिसंघाच़ें जगांतलें काम व प्रत्येक सदस्यावर त्या कामाची व्यक्तिशः येणारी ज़बाबदारी या गोष्टी त्या भाषणांत स्पष्ट केलेल्या असतात. कारण, जगताच्या दुःखाचा प्रचंड भार शिरावर घेण्याची जी ज़बाबदारी सिद्धसंघावर असते तींतील कांहीं वांटा प्रत्येक सभासदाला स्वतः उच़लावा लागतो. ऋषिसंघ ही एकाच़ नियमानें चालणारी व एकाच़ अधिपतीच्या हाताखालीं असणारी संघटित संस्था आहे; अर्थात् प्रत्येक सभासदानें त्या संस्थेला सल्ला देऊन आणि सेवा करून साहाय्य करावें लागतें. मनुष्यज़ातीची प्रगति करणें हें या संस्थेचें एक मोठें काम आहे आणि त्या कार्याच्या निरनिराळ्या क्षेत्रांत उपयोगी पडणें, कोणा सभासदाला कांहीं स्थानिक माहिती असली किंवा एखादी विशिष्ट शक्ति असली तर ती त्या संस्थेच्या कार्यास लावणें हें त्याच़ें कर्तव्य असतें. या संस्थेच्या मूर्धस्थानीं असलेले जे राजाधिराज सनत्कुमार, त्यांच़ा अम्मल अनियंत्रित असतो; पण मौज़ ही कीं त्यांत अशी एकहि महत्त्वाची गोष्ट निर्णित करण्यांत येत नाहीं कीं, जिला या संस्थेंतील अगदीं नव्या सभासदाचीहि संमति मिळालेली नाहीं. सभासद जगांत कोठेंहि रहात असो, तो त्या ऋषिसंघाच़ा प्रतिनिधि असतो, ऋषिसंघाच्या सेवेस सादर राहीन अशी त्याची ग्वाही असते, तो संघ त्याला जेथें पाठवील तेथें ज़ाणें, व तो ज्या तऱ्हेचें काम देईल तें करणें हें त्याच़ें कर्तव्य असतें. नवे सभासद आपापल्या खात्यांतील अधिकाऱ्यांची आज्ञा साहजिकपणें अनन्यभावानें पाळतात, पण त्यांनीं आपापलें स्थानिक ज्ञान संस्थेसमोर ठेवणें व ज्या गोष्टी उपयोगी पडण्याची शक्यता असेल त्या सुच़विणें आणि अशा प्रकारें कार्यास मदत करणें हें त्यांच़ेंहि काम असतें.

जगांत वावरणाऱ्या प्रत्येक सभासदानें असें ध्यानांत ठेवणें ज़रूर आहे कीं मीं या संस्थेच्या कार्याच़ा जणूं एक केंद्र आहे, ज्यांना साहाय्य ज़रूर असेल त्यांच्याकडे राजाधिराजांच्या (ऋषिसंघाचे अधिपति जे सनत्कुमार त्यांच्या) दैवी शक्तीच़ा प्रवाह नेऊन पोहोंच़विण्याच़ें कार्य माझ्या द्वारानें होण्याच़ा संभव आहे. तसेंच़ ह्या संघाच्या एखाद्या वरिष्ठ सभासदास वाटेल त्या क्षणीं माझ़ा उपयोग करण्याची व माझ्या देहामधून आपल्या शक्तीची प्रेरणा पाठविण्याची गरज़ लागण्याच़ाहि संभव आहे व असले प्रसंग केव्हां येतील तें ज्या अर्थीं अगोदर सांगणें शक्य नसतें, त्या अर्थीं अशा तऱ्हेनें आपला उपयोग केला ज़ाण्यासाठीं आपण सदा एका पायावर तयार असलें पाहिजे. ही गोष्ट प्रत्येक नव्या सभासदानें ध्यानांत ठेवणें अवश्य असतें. परकार्याविषयीं प्रत्येक नव्या सभासदाला एकसारखी कळकळ वाटली पाहिजे. दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्याची संधि मला केव्हां येईल याची त्यानें सतत व उत्साहानें वाट पाहिली पाहिजे आणि अशी सेवा करण्यांत त्याला अत्यानंद वाटला पाहिजे. ऋषिसंघाच़ा जगांतला लौकिक च़ांगला ठेवण्याची ज़बाबदारी मज़वर आहे आणि म्हणून आपल्या तोंडून असा एकहि शब्द बाहेर पडतां उपयोगी नाहीं किंवा अशी एकहि गोष्ट घडतां  कामां नये, कीं त्यामुळें ऋषिसंघाच्या नांवास कलंक लागलासें जनतेच्या नज़रेस वाटेल अथवा तिच्या मनांतील त्या संघाविषयींचा आदर रतिभरहि कमी होईल. त्याच़ें हें धोरण पाहिजे.

ज्या अर्थीं आपण या प्रवाहांत शिरलों आहों त्याअर्थीं दुःखें व अडचणी आतां संपल्या, आतां यापुढें खटपट करण्याची आपणांला ज़रूरी नाहीं असें त्यानें समज़तां कामां नये. उलटपक्षीं आपणांला पूर्वींपेक्षां अधिक मोठे खटाटोप पडतील, मात्र ते श्रम करण्यास आपल्या अंगीं जास्त सामर्थ्यहि येईल हें त्यानें ध्यानांत बाळगलें पाहिजे. पूर्वींपेक्षां पुष्कळ अधिक शक्ति आपल्या अंगीं येईल, पण तितक्याच़ मानानें आपल्या शिरावरील ज़बाबदारीहि वाढेल; दीक्षेच्या वरिष्ठ पायरीवर च़ढून आपण जे इतर जनांच्या मानानें उच्च झ़ालों, ते एक व्यक्ति म्हणून झ़ालों नाहीं; तर आपल्या द्वारें सर्व मानवज़ातच़ थोडीशी वर चढली आहे, तिच्या शृंखला थोड्याशा सैल झ़ाल्या आहेत, आपल्या द्वारें ती किंचित्शी आपल्या माहेरघराज़वळ आली आहे, त्याच़ा आपणांला आनंद वाटला पाहिजे; सिद्धसंघाच़ा वरदहस्त सदा आपल्या डोक्यावर आहे; पण ज्या मानानें आपण त्या संघाच़ा प्रसाद लोकांना पोंच़वूं त्या मानानेंच़ तो प्रसाद आपल्या अंतरंगांत जास्त उतरेल, असा निसर्गाच़ा शाश्वत नियम ठरलेला आहे; या साऱ्या गोष्टी त्यानें ध्यानांत ठेवल्या पाहिजेत.

वरील प्रवचनांत हे मुद्दे नेहमींच़ सांगण्यांत येत असतात व ते तसे या वेळीं सांगण्यांत आले. नंतर कांहीं वैयक्तिक उपदेश करण्यांत आला. [हा उपदेश मूळ पुस्तकांत जिज्ञासूंनीं पहावा. स्थलाभावास्तव तो येथें गाळला आहे.]

पुढें इतर जीवन्मुक्तांकडे पाहून भगवान् मैत्रेय म्हणाले, मला हा उमेदवार पसंत आहे. आपल्या संघामध्यें त्याला घ्यावा ही गोष्ट येथें ज़मलेल्या सर्वांना मान्य आहे काय ?

ते सर्व म्हणाले -- आमची मान्यता आहे.

लगेच भगवान् मैत्रेय आपल्या आसनावरून उठले आणि शंभलाभिमुख होऊन उच्च स्वरानें बोलले --

'भगवन् ! तेजोभास्करा, चैतन्यनाथा, ऐश्वर्यप्रभो ! आपल्या नांवानें आणि आपल्या प्रीत्यर्थ मीं हा संस्कार करीत आहे.'

इतक्यांत सनत्कुमारांची या दीक्षेस संमति दर्शविणारा तारा लख्खकन् दीक्षागुरूंच्या मस्तकावर प्रकाशला; आणि त्यासरशीं सर्वांनीं प्रणामपूर्वक आपलीं मस्तकें विनम्र केलीं. राजाची स्वारी आली म्हणजे ज़शीं उच्च स्वरांत एकदम वाद्यें वाज़ूं लागतात तशासारखें होऊन देवदेवतांच़ें गायन उच्च ताना घेऊं लागलें. हें गायन च़ालूं असतांना त्या दोन जीवन्मुक्तांनीं धरलेला तो उमेदवार पुढें झ़ाला व ज्या भगवान् सनत्कुमारांच्या आज्ञेशिवाय कोणत्याहि उमेदवाराला ऋषिसंघांत प्रवेश मिळूं शकत नाहीं, त्यांच्या प्रतिनिधीसमोर - त्या दीक्षागुरूंसमोर - त्या भगवान् मैत्रेयांसमोर - तो गुडघे टेंकून उभा राहिला, त्यासरशीं डोळे दिपविणारी एक ज़णूं विद्युल्लतेसारखी तेजोमय पण निश्चल शलाका त्या ताऱ्यांतून निघून दीक्षागुरूंच्या हृदयांत शिरली आणि त्यांच्या अंगांतून बाहेर पडून त्या उमेदवार शिष्याच्या हृदयांत प्रविष्ट झ़ाली. त्या विद्युच्छलाकेच्या अमोघ शक्तीनें त्या उमेदवाराच्या कारणदेहांत वसत असलेली शिवात्म्याची अंशभूत व प्रतीकभूत बारीक चांदणी (ज्योत) फुगून मोठी व तेजस्वी झ़ाली, तिनें त्याच़ा सबंध कारणदेह व्यापला व मोक्षस्थिति मिळाल्यावर जीवात्मा व शिवात्मा हे ज़से कायमच़े एकरूप होतात तशी अवस्था मुहूर्तमात्र या वेळीं उत्पन्न झ़ाली. मग भगवान् मैत्रेयांनीं शिष्याच्या मस्तकावर हात ठेविला आणि त्याच्या खऱ्या नांवानें संबोधून ते त्यास म्हणाले --

'ज्यांच़ा तारा आतां आपल्या मस्तकांवर प्रकाशत आहे त्या राजराजेश्वरांच्या नांवानें मीं तुला आमच्या शाश्वत जीवनाच्या ऋषिसंघांत प्रविष्ट करून घेत आहे. त्या संघाच़ा सत्पात्र व उपयुक्त असा सदस्य मीं होईन याबद्दलची तूं सावधगिरी ठेव. आतां तूं कायमच़ा निर्भय झ़ालास. तूं प्रवाहांत प्रविष्ट झ़ाला आहेस. पैलतीर तुला गांठतां येवो असा माझ़ा तुला आशीर्वाद आहे.'

या क्षणीं आकाशांतील देवांच्या गायनलहरी एकदम उसळल्या आणि प्रसादमधुर ताना च़हूंकडे पसरून सर्वत्र आनंदीआनंद भरून गेला. ते दीक्षागुरु, त्यांच्यासमोर विनम्र असलेला तो शिष्य आणि त्याच़ा पुरस्कार करणारे ते जीवन्मुक्त ऋषि हे सर्वज़ण प्रेमाच्या नानारंगी तेजःसागरांत बुडून गेल्यासारखे दिसले. त्यांतच़ भगवान् मनु व महाचोहण यांच्या आशिर्वादप्रसादाच़े प्रवाह मिसळून गेले आणि सर्वांवर ताण म्हणजे आपल्या मानववंशवृक्षाच्या अत्युच्च शाखेवरील जें गगनचुंबित फूल -- त्या गौतमबुद्धांच्या आशीर्वादाच्या सुवर्णरजवर्षावाची त्यांत भर पडली. कारण हा क्षण म्हणजे आणखी एका मानव-मुमुक्षूचा त्या शाश्वत व पुराण अशा मोक्षमार्गावर पाऊल पडण्याच़ा दिव्य प्रसंग होता. या वेळीं तो तेजस्वी तारा मोठा विशाल झ़ाला व त्यानें ते दीक्षागुरु व तो शिष्य यांना क्षणमात्र आपल्या विद्युद्गर्भ पोटांत गडप केलें. किंचित् कालानें तेजाच्या ह्या हेलावणाऱ्या लाटा स्थिर होऊन शिष्य पुनः दृश्यमान झ़ाला तो त्याच्या अंगावर पूर्वींचें कार्पास वस्त्र नसून त्याऐवजीं इतर दीक्षा मिळविलेल्या मंडळींसारखें शुभ्र रेशमी वस्त्र प्रकट झ़ालें.

हें सारें झ़ाल्यावर या नवीन बंधूला - शिष्याला - दीक्षागुरूंनीं गुरुकिल्ली दिली व ऋषिसंघाच्या प्रत्येक सभासदाला (ज़री तो आपल्या माहितीच़ा नसला तरी) भुवर्लोकाच्या भूमिकेवर बिनचूक कसा ओळखावा हें दीक्षागुरूंनीं त्याला शिकविलें. [असल्या समारंभांत कांहीं ज्ञान देण्यांत येत असतें व तें गुप्त ठेवलें पाहिजे असा निर्बंध असतो. त्या ज्ञानास येथें गुरुकिल्ली असें म्हटलें आहे. इंग्रजींत Key of Knowledge (ज्ञान-किल्ली) असें म्हणतात. आपल्या ग्रंथांत त्यासच़ गुरुमंत्र म्हणतात असें वाटतें.]  नंतर त्यांनीं या नवीन शिष्याला बुद्धीच्या भूमिकेवरील क्रिया शक्य तितक्या लवकर शिकवा असें जीवन्मुक्तांच्या तेथील कांहीं वडील शिष्यांना सांगितलें, आणि उपस्थित असलेल्या सर्व बंधूंनीं या नवशिष्यास आशीर्वाद दिल्यावर हा दिव्य समारंभ संपला. लगेच़ त्या नवशिष्यानेंहि आपल्या परीनें ऋषिसंघाच़ा आशीर्वाद जगाला दिला आणि तो देतेवेळीं या समारंभांत नुकतीच़ एक जी नवीन व थोर शक्ति त्याला मिळालेली होती ती त्यानें पहिल्यानेंच़ उपयोगांत आणिली. समारंभ आटोपल्यावर ती जीवन्मुक्त मंडळी या शिष्यासभोंवार गोळा झ़ाली व त्यांनीं त्याच़ें गोड शब्दांनीं मनःपूर्वक अभिनंदन केलें आणि इकडे तो च़काकणारा ताराहि अंतर्धान पावला.


अंतरंगांतील  परिणाम

दीक्षागुरूंनीं स्वतःच़ा देह ज्वलत् ज्योतीसारखा प्रकाशमान केला आणि त्याची प्रतिक्रिया होऊन या नवीन दीक्षा मिळविलेल्या शिष्याच़ाहि कारणदेह प्रकाशूं लागला, म्हणून वर लिहिलें आहे. त्या वेळच़ें दृश्य अत्यंत सुंदर व मोहक होतें. शिष्याच्या कारणदेहांत सोनेरी व हिरवें तेज झ़ळकत होतें. माणसाच़ा शिवात्मा त्याच्या कारणशरीरांतील ध्रुवपरमाणूमध्यें बारीक च़ांदणीवज़ा किंवा तेजस्वी कणाप्रमाणें नेहमीं च़काकतांना दिसतो. तो या वेळीं अतिशय फुलून जणूं तेज उधळूं लागला होता. तो केंद्र इतका विशाल झ़ाला होता कीं त्यानें कारणदेहाच़ा सारा गोल व्यापून टाकला होता. शिवात्म्याच़ें नेहमींच़ें स्थान एका उच्च भूमिकेवर असतें आणि जीवात्मा हा त्याच्याच़ कारणदेहांत वसणारा अंश किंवा प्रतिनिधि असतो. पण दीक्षेच्या प्रसंगीं हा जीवात्म्याचा स्फुल्लिंग प्रसरण पावून विशाल होतो आणि उच्च भूमिकेवरच़ा शिवात्मा त्या विशाल झ़ालेल्या जीवात्मभूत अंशाशीं क्षणभर एकरूप होत असतो. अर्थात् या वेळच़ा शपथविधि तो शिवात्माच़ करीत असतो. दीक्षाप्रसंगीं वासनादेहावरहि मोठा परिणाम घडतो. त्याची संवेदनक्षमता व समरसता वाढते.  शिष्याच्या वासनादेहाच़ें स्थैर्य आणि समत्व यांत विघ्न न आणतां एक ज़ोराच़ें पण सुयंत्र आंदोलन त्या देहामध्यें उत्पन्न करण्यांत येतें. त्याच़ा परिणाम असा होतो कीं वासनादेहाची बैठक न डळमळतां, व तो देह जीवात्म्याच्या कह्यांतून न सुटतां जास्त तीव्रतेनें भावना ज़ाणण्याचें सामर्थ्य त्याला येतें. हें आंदोलन दीक्षागुरु उत्पन्न करतात. स्वतःच्या वासनादेहांतून ते तें शिष्याच्या वासनादेहांत घालतात आणि त्या वेळीं त्याची बैठकहि स्थिर करतात. त्यामुळें शिष्याच्या वासनादेहांत केव्हांहि धक्के उत्पन्न न होतां किंवा तो क्षुब्ध न होतां त्याच़ें आंदोलनसामर्थ्य मात्र फार जास्त होत असतें.

वरील वर्णनावरून पहिल्या महादीक्षेच्या समारंभाची कल्पना वाचकांस येईल. ज्यांनीं हिंदुधर्माच़ा खोल विचार केला असेल त्यांच्या ध्यानांत येईल कीं आपल्या धर्मग्रंथांतहि असल्या दीक्षासमारंभांचीं सूचक वर्णनें उपलब्ध आहेत. ऋषिसंघ ही एक गुप्त संस्था आहे. त्या संघांत प्रविष्ट झ़ालेल्या माणसाला आंतील माहिती परिस्फुट करण्याची परवानगी नसते. कांहीं माहिती प्रसिद्ध करण्याचें या संघानें अलीकडे धोरण ठेविलें असल्यामुळेंच़ अल्पशी माहिती थिऑसफ़ीच्या वाङ्मयांत, तसेंच़ या पुस्तकांत देतां आली आहे. पूर्वींच्या काळीं जास्त बंधनें होतीं. त्यामुळें पूर्वींच्या वाङ्मयांत दीक्षेसारख्या समारंभांचीं स्पष्ट वर्णनें सांपडणें संभवनीय नाहीं; पण ज़री अशीं सविस्तर व स्पष्ट वर्णनें न सांपडलीं तरी ऋषिसंघांतील कांहीं गोष्टी ध्वनित करणारीं वर्णनें आपल्या ग्रंथांतहि आढळतात. त्यांपैंकीं कांहींच़ा उल्लेख पुढील प्रकरणांत आम्हीं करणार आहों. [हिंदुधर्मांत ज़ो उपनयन संस्कार आहे त्याच़ें व पहिल्या महादीक्षेच़ें बरेंच़ साम्य आहे. उपनयन संस्कारांत कांहींतरी खोल भाग आहे. त्याची जिज्ञासू हिंदूंनीं चौकशी करावी व अशा रीतीनें त्यांना पहिल्या महादीक्षेच़ा सुगावा लागावा असा एक हेतु उपनयनसंस्काराच्या मुळाशीं आहे. या मुद्द्याचें विवेचन 'मौंजीबंधन व त्याचें अंतरंग' या नांवाच्या परिशिष्टांत ह्या पुस्तकाच्या शेवटीं केलें आहे तें पहा.]

मानवकोटींतील उत्क्रांतिक्रमांत तीन स्थळें फार महत्त्वाचीं आहेत. प्राणिकोटींतून मनुष्यकोटींत येणें ही अत्यंत महत्त्वाची पहिली पायरी होय. मनुष्यकोटींतलें सर्व ज्ञान मिळवून आणि तेथील विकास संपवून मुक्त होणें व मानवकोटी सोडणें ही शेवटली महत्त्वाची पायरी होय. या दोहोंच्या मध्यें एका विशिष्ट स्थळीं ज़ो पहिल्या महादीक्षेच़ा टप्पा आहे तोहि ज़वळज़वळ इतक्याच़ महत्त्वाचा आहे. कारण पहिली महादीक्षा ज्यानें घेतली तो जगावर खरी सत्ता च़ालविणाऱ्या आंतरसंस्थेच़ा सभासद होत असतो. पहिली महादीक्षा घेतल्यावर ऋषिसंघाच्या प्रचंड ज़ाणिवेच़ा तो अंशभाक् होत असतो. अनुगृहीत शिष्य ज़सा आपल्या गुरूच्या ज़ाणिवेशीं एकरूप असा होतो तसा पहिली दीक्षा घेतलेला पुरुष ऋषिसंघाच्या सबंध ज़ाणिवेशीं एकरूप झ़ालेला असतो. एखाद्या भानगडीच्या व कठीण प्रश्नावर प्रकाश पाडण्यासाठीं अनुगृहीत शिष्य ज्याप्रमाणें आपल्या गुरूच्या मनाशीं आपलें मन मिळवूं शकतो, तद्वत् हा पुरुष आपलें मन सर्व ऋषिसंघाच्या अंतर्यामाशीं मिळवूं शकतो आणि अशा प्रकारें स्वतः तारतम्य शिकूं शकतो. अनुगृहीत शिष्यानें भलते विचार व विकार आपल्या मनांत येऊं दिल्यास त्याच़ा ज़सा गुरूंच्या कार्यास उपद्रव होतो त्याप्रमाणें पहिली महादीक्षा घेतल्यावर माणूस ज़र अनिष्ट मनोवृत्तींस आपल्या मनांत थारा देईल तर सर्व ऋषिसंघाच्या ज़ाणिवेला त्याच़ा त्रास पोहोंच़तो व त्यांच्या कार्यांत अडथळा होतो. सर्व जीवन्मुक्त मनानें एक असतात; अर्थात् सर्व ऋषिसंघाची एकच़ ज़ाणीव असते. ही खरोखरी एकरूप कशी असते त्याच़ें वर्णन वैखरी वाणीला करतां येणार नाहीं, इतकेंच़ नव्हे तर सामान्य दर्जाच्या माणसांमध्यें त्या वर्णनानें गैरसमज़ुती मात्र उत्पन्न होतील. प्रत्येक जीवन्मुक्ताच़ें स्वतःच़ें वैयक्तिक वैशिष्ट्य नाहींसें न होतां सर्वांच्या ज़ाणिवेच़ा मिळून एक महासागर झ़ालेला असतो. हें कसें होऊं शकतें त्याच़ें गूढ तर्काला उकलण्याज़ोगें नाहीं. हा ज़ाणिवेचा समुद्र किती खोल आहे त्याची कल्पना आत्म्याच्या किंवा निर्वाणाच्या भूमिकेवरच़ येऊं शकेल.  ज्या माणसाची ज़ाणीव तेथपर्यंत च़ढूं शकत नाहीं त्याला त्या महासागराची कल्पना होणें नाहीं. ज़र पहिली महादीक्षा घेतल्यावर माणूस स्वतःचे विचार, उच्चार व आचार घाणीनें भरील तर ती घाण त्या महासागरांत ज़ाते व सर्व संस्थेला ती मलिन करूं पहाते. अशा प्रकारच़े प्रसंग वारंवार घडत नसले तरी कधीं कधीं घडतात. हा मोक्षमार्ग इतका कठीण आहे कीं पांच़वी महादीक्षा घेऊन ज़ो पुढें गेला तोच़ एक कायमच़ा तरून गेला व निभावला असें निश्चितपणें म्हणतां येईल. त्या ठिकाणीं पोहोंच़ण्यापूर्वीं कोणींहि निभावल्याची निश्चित ग्वाही देतां येणार नाहीं.  या मार्गावरून पुढें जाणारीं माणसें उठल्यासुठल्या पाय घसरून पडतात असें म्हणणें नाहीं.  म्हणणें इतकेंच़ आहे कीं या मार्गावरून माणूस कितीहि पुढें गेलेला असो, ज़ोंवर तो जीवन्मुक्त झ़ालेला नाहीं तोंवर त्याच़ा पाय घसरणें हें शक्य कोटींत असतें. अर्थात् एखादा दीक्षा मिळविलेला पुरुष भलत्या रीतीनें वागेल तर त्याला ऋषिसंघांतून तोडून काढणें भाग होतें. तो ऋषिसंघाचें ज़णूं अंगच़ बनलेला असतो आणि म्हणून त्याला वेगळा करणें म्हणजे ज़णूं माणसाच़ा एखादा अवयव कापण्यासारखें होतें. पुढें त्या माणसानें आपली वृत्ति, आपलें मन सुधारलें म्हणजे तो पुनः त्या संघाच्या ज़ाणिवेंत मिळूं शकतो.

पहिली दीक्षा घेतलेला शिष्य ऋषिसंघाच्या सबंध ज़ाणिवेशीं एकरूप झ़ालेला असल्यामुळें त्या ज़ाणिवेच़ें सामर्थ्य प्रकट करण्याची शक्यता त्याच्यामध्यें आलेली असते. पण ज़री शक्यता असली तरी ती गोष्ट त्याला प्रारंभीं नीटशी साधत नाहीं. ती त्याला च़ांगली साधण्यास पुष्कळ काळ लागतो.

एखाद्या तलावांतून पाट बाहेर काढलेला असला तर तो पाट जितका जास्त रुंद असेल त्या मानानें जास्त पाणी त्या पाटावाटें बाहेर येतें; तद्वत् दीक्षा घेतलेला शिष्य पाटासारखा असल्यामुळें त्याला जितका अधिक आत्मविश्वास वाटेल, गुरु व ऋषिसंघ यांवर त्याची जितकी निष्ठा असेल त्या मानानें ऋषिसंघाच़ें जीवन जास्त प्रमाणांत त्याला स्वतःच्या द्वारां जगांत पसरवितां येतें. त्यानें कोणाला आशीर्वाद दिला तर त्याची स्वतःचीच़ शक्ति त्यांत असते असें नाहीं, तर सर्व ऋषिसंघाची शक्ति त्यांत येऊं शकते.

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण ९ : संतांची साक्ष