प्रकरण  सातवें


पुढच्या  दोन  पायऱ्या


जिवंत प्रतिमेच़ें पुनः पुनः निरीक्षण करून जीवन्मुक्त गुरूंना खात्री वाटली कीं या उमेदवाराला पुढच्या पायरीवर आणावा, म्हणजे ते तशी व्यवस्था करतात. ही कसोटी पहाण्यासाठींच़ पहिल्या पायरीवरील उमेदवारी अवश्य असते. ही कसोटी पाहण्याची नेहमींची कालमर्यादा सात वर्षांची असते. पण कांहीं वेळां सात वर्षांच्या आंतच़ उमेदवाराला दुसऱ्या पायरीवर आणतात. अनेक वेळां कितीतरी जास्ती वर्षेंहि लागतात. किती वर्षें लागतील हें शिष्याच्या योग्यतेवर अवलंबून असतें. पहिल्या पायरीवर ज्या उमेदवाराला आणला त्याला त्याच़ जन्मांत पहिल्या महादीक्षेच्या द्वारांतून पुढें न्यावें अशी जीवन्मुक्त गुरूंची मनीषा असते. ही त्यांची अपेक्षा कधीं सफल होते, कधीं होत नाहीं. सतराव्या वर्षीं हायस्कुलांतला मुलगा मुंबई युनिव्हर्सिटीचा मॅट्रिक होतो अशी वयाची सरासरी एखाद्यानें सांगितली तर त्याच़ा अर्थ इतकाच़ कीं, मध्यम योग्यतेच़ा कर्तव्यदक्ष मुलगा सतराव्या वर्षीं मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होण्याच़ा साधारणतः संभव असतो. पण कित्येक मुलांच्या शिक्षणाच़ा प्रारंभच़ आधींपासून होत असतो, आणि तीं तीव्र बुद्धीचीं असलीं तर एका वर्षांत दोन यत्ता करून कधीं कधीं च़ौदाव्या वर्षींहि त्या परीक्षेंत पास होऊं शकतात; तर कांहीं मुलांच्या शिक्षणास उशीरां सुरुवात होते, तीं केव्हां केव्हां मंद बुद्धीचीं व आळशी असतात, आणि एकाच़ वर्गांत दोन दोन वर्षें काढून मॅट्रिक होईतों वीस वर्षांचीं होतात. कांहींस अभ्यास झेंपत नाहीं म्हणून तीं शाळा सोडतात व परीक्षेंत पास होत नाहींत; असे अनंत प्रकार होऊं शकतात. तसेंच़ या पायऱ्यांसंबंधाचें आहे. सात वर्षांनीं शिष्य पहिल्या पायरीवरून दुसरीवर ज़ातो हें म्हणणें म्हणजे विद्यार्थी वयाच्या सतराव्या वर्षीं मॅट्रिक होतो अशी सरासरी सांगण्यासारखें आहे. अर्थात् तो काळ पुष्कळच़ जास्ती अथवा कमी होणें शक्य असतें. तें सारें शिष्याच्या योग्यतेवर असतें. कधीं कधीं तें वयोमानावरहि असतें. एखादा माणूस वृद्ध असला, त्याच़ा देह निर्बल झ़ालेला असला, तर कित्येक वेळीं त्याची पात्रता असूनहि त्याला विशिष्ट पायरीवर सद्गुरु नेत नाहींत, व पुढील जन्मीं लवकरच़ त्याला त्या ठिकाणीं आणतात. या मार्गावरची सारी कालगणना अशा रीतीनें पुष्कळच़ कमी अधिक होण्याचा संभव असतो.  पहिल्या महादीक्षेपासून सात जन्मांत माणूस च़वथी महादीक्षा घेऊन अर्हत् होतो, त्यापुढें आणखी सात जन्मांनंतर पांच़वी महादीक्षा घेऊन मुक्त होतो, असेंहि कित्येक वेळां सांगण्यांत येतें. वर सांगितल्याप्रमाणें या हिशेबांतहि पुष्कळ कमी अधिक होण्यास वाव असतो हें वाचकांनीं ध्यानांत ठेवावें.

शिष्यस्वीकार

उमेदवाराच्या प्रतिमेमध्यें फार दिवसपर्यंत अनिष्ट विकार प्रतिबिंबित झ़ाले नाहींत असा अनुभव सद्गुरूंना आला कीं ते त्याला दुसऱ्या पायरीवर आणतात. या पायरीच़ा विधिहि सामान्यतः भुवर्लोकांत होतो. शिष्याला वासनादेहांत त्या भूमिकेवर बोलावून गुरु आणतात, त्याला दोन शब्द सांगतात आणि त्याच़ें व आपलें मन ज़णूं एकरूप करतात. तसें झ़ालें म्हणजे शिष्याच्या मनांतल्या साऱ्या ऊर्मि गुरूंच्या अंतरंगांत उमटतात आणि त्याच़ें कसें चाललें आहे तें गुरूंना आपोआप समज़ूं लागतें.  यामुळें या पायरीवर असतांना जिवंत प्रतिमा तपासण्याची गरज़ उरत नाहीं. अर्थात् सद्गुरु पूर्वींची ती प्रतिमा विसर्जन करून टाकतात.  शिष्याच्या मनावर यापुढें गुरूची छाया सतत पडते, व हळूंहळूं शिष्याच़ें अंतरंग अधिकाधिक प्रमाणांत गुरूच्या अंतरंगासारखें होऊं लागतें. ही क्रिया अनेक वर्षें चालूं असते. एका पाण्यानें भरलेल्या हौदांत केशर टाकलें आणि त्या हौदाज़वळ त्याच़ उंचीवर एक पाण्याची बादली ठेवून रबरी नळीनें दोन्हीं भांड्यांचा संबंध ज़ोडला तर हळूंहळूं तो केशरी रंग बादलींत येऊं लागेल. त्याप्रमाणें गुरूंच्या अंगच़े गुण शिष्याच्या अंगीं उतरूं लागतात. गुरूच्या ज़ाणिवेच्या लाटा शिष्याच्या मनावर सदा आदळत असतात आणि कालगत्या शिष्याच्या मनावर त्याच़ें अधिकाधिक दडपण पडून शिष्याच़ें मन गुरूच्या मनांतले गुण प्रकट करूं लागतें. आपल्या तेजाचा मारा करून सहस्ररश्मि ज्याप्रमाणें झ़ाडाच्या कळीला फुलवितो; तद्वत् ही क्रिया होत असते अशी कल्पना केली तरी च़ालेल. अर्थात् या क्रियेला पुष्कळ वेळ लागतो.  कळीच्या पांकळ्या हातानें मुद्दाम ओढून फुलविल्या तर त्या फाटतील, फूल निष्प्राण होईल व त्याच़ा सुवास नष्ट होईल. तसें होऊं नये म्हणून ज़सा सूर्य आपली क्रिया अगदीं हळूंहळूं करतो तद्वत् शिष्याच्या मनाला फुलविण्याची क्रियाहि धीरे धीरेच़ व्हावी लागते. जीवन्मुक्त पुरुषाच़ें मन इतकें मोठें व सामर्थ्यवान् असतें कीं ते आपले इतर मोठमोठे उद्योग सांभाळून पुष्कळ शिष्यांच्या मनांशीं आपली ज़ाणीव अशा प्रकारें एकाच़ वेळीं ज़ोडून ठेवूं शकतात आणि त्या सर्वांच्या मनाला एकसारखें फुलवीत राहतात. शिष्याला या प्रक्रिया आपल्या अंतरंगांत नेहमींच़ ज़ाणवतील असें नाहीं; कधीं त्याला त्या क्रियांच़ें सामर्थ्य ज़ाणवेल, कधीं त्यांची किंचित् चाहूल वाटेल, व कधीं कांहींच़ लक्षांत येणार नाहीं. या दुसऱ्या पायरीवरच़ा ज़ो अनुगृहीत शिष्य आहे त्याच्यासमोर कोणतीहि गोष्ट झ़ाली, त्यानें कोणतीहि गोष्ट ऐकली किंवा पाहिली, कीं ती गुरूंच्या मनांत प्रवेश करूं शकते. गुरूंचें लक्ष दुसऱ्या कामांत गुंतलेलें नसलें तर त्या गोष्टी तत्काळ त्यांच्या मनांत प्रतिबिंबित होतात. त्या वेळीं ज़र ते दुसऱ्या उद्योगांत असले तर तत्क्षणीं त्यांना त्या गोष्टी कदाचित् ज़ाणवणार नाहींत, पण ज़णूं त्या त्यांच्या मनाच्या पार्श्वभागांत राहिलेल्या असतात, आणि नंतर ज़रूर तेव्हां त्या त्यांना आठवतात. त्या शिष्यासंबंधाच़ा विचार जेव्हां ते आपल्या मनांत आणतील, तेव्हां त्या शिष्यासमोर घडलेल्या साऱ्या गोष्टी स्मृतिरूपानें त्यांच्या मनावर उमटलेल्या त्यांना आढळतात, मग त्या त्या गोष्टी घडतां वेळीं त्यांची छाप गुरूच्या ज़ाणिवेवर उमटलेली असो वा नसो. शिष्याच्या मनांत घाणेरडे विचार आले कीं त्याच़ाहि निनाद सद्गुरूंच्या अंतर्यामांत उमटतो. तसें झ़ालें तर सद्गुरूंच़ें अंतरंग मलिन होतें आणि उच्च भूमिकांवर जें कार्य ते करीत असतील त्यास अडथळा होतो. अर्थात् शिष्याच्या मनांत अशी कोणत्याहि प्रकारची अनिष्ट खळबळ झ़ाली कीं तिच़ा उपद्रव आपल्या कार्याला बाधूं नये यासाठीं सद्गुरु आपला व शिष्याच़ा मनोमन संबंध तत्काल तोडून टाकतात आणि त्याच़ें मन पुनः शांत व निर्मळ झ़ालें म्हणजे पुनः हा संबंध ज़ोडून घेतात. त्यांना पुनः पुनः असें करावें लागेल तर त्यांच्या उद्योगांत एकसारखा व्यत्यय येण्याच़ा संभव असतो. यासाठीं ज्याच्या मनांत अशी खळबळ वारंवार होण्याच़ा संभव असेल त्याला ते या दुसऱ्या पायरीवर घेतच़ नाहींत. या पायरीवर घेण्याइतकी शिष्याची तयारी आहे कीं नाहीं हें तो पहिल्या पायरीवर असतांना त्याच्या जिवंत प्रतिमेवरून त्यांना समज़तें. इतकी सावधगिरी ज़री सद्गुरूंनीं घेतली असली तरी मधून मधून शिष्याच़ें मन भलत्या विचारविकारांस थारा देतें आणि शिष्याला तोडणें गुरूंना अवश्य होतें. पण याची सारी ज़बाबदारी शिष्यावरच़ असते हें विसरतां कामां नये. पुनः त्यानें आपलें मन निर्मळ व निवांत केलें, कीं गुरु पुनः पूर्वसंबंध ज़ोडतात. अशी एखादी ज़ोराची खळबळ शिष्याच्या मनांत आल्यास प्रायः दोन दिवस (अठ्ठेचाळीस तास) हा संबंध तुटूं शकेल व मग बहुधा ज़डेल. कधीं कधीं कित्येक महिने वा वर्षेंहि हा ऋणानुबंध तोडला ज़ाण्याच़ा संभव आपल्या मनाच्या उच्छृंखलपणानें शिष्य उत्पन्न करतो. पण असे प्रसंग अपवादात्मक समज़ले पाहिजेत. असल्या अपात्र शिष्यांना सद्गुरु ह्या दुसऱ्या पायरीवर आणून ठेवण्याच़ा फारसा संभव असत नाहीं.

विधीची  पद्धत

या दुसऱ्या पायरीवरील विधीच़ें वर्णन श्री.लेडबीटर् यांनीं आपल्या एका पुस्तकांत दिलें आहे. तें आपण पाहूं या. श्री.लेडबीटर् हे कांहीं तरुण युवकांस ऋषि कुठूमी  यांच्याकडे त्यांच्या आज्ञेनुसार घेऊन गेले होते. ते लिहितात [पहा: The Masters and the Path, पृ. १४५]  : --

" ह्या वेळीं पहिल्या उमेदवाराकडे ऋषि कुठूमी यांनीं हास्यपूर्ण मुद्रेनें पाहिलें व ते त्याला म्हणाले, 'माझ्या हाताखालीं उद्योग करण्याचें आणि मानवज़ातीच्या सेवेस वाहून घेण्याच़ें तूं कायमच़ें ठरविलें आहेस काय?'  मुलानें मनापासून उत्तर दिलें कीं, 'तसें करण्याची माझी मनीषा आहे.'  तेव्हां ऋषि म्हणाले, 'तूं जे प्रयत्न करीत आला आहेस ते पाहून माझ्या मनास पुष्कळ समाधान वाटलेलें आहे व ते प्रयत्न तूं यापुढें शिथिल होऊं देणार नाहींस अशी मला आशा आहे. कांहीं महिन्यांपूर्वीं मीं जें तुला सांगितलें तें या नव्या परिस्थितींत तूं विसरूं नको. तुझ़ा उद्योग आणि तुझ़ा निर्धार ह्या दोन गोष्टींकडे पाहून तुझ़ा उमेदवारीच़ा काळ मीं कमी केला आहे. दुसऱ्या माणसांस या मार्गानें स्वतःबरोबर आणणें ही जी या मार्गावर अत्यंत जलदीनें प्रगति करण्याची युक्ति आहे, तिच़ा तूं अवलंब केला आहेस हें पाहून मला आनंद होत आहे. स्वार्थबुद्धीच़ा लेशहि नाहीं असें प्रेम म्हणजे जगांतील सर्वांत मोठी शक्ति होय. हें प्रेम ज़री एका व्यक्तीबद्दल वाटत असलें तरी ज्यांना तें अगदीं निर्मळ ठेवतां येतें, मत्सर, असहिष्णुता, हांव यांचा लेशहि जे त्याला लागूं देत नाहींत अशीं माणसें अगदींच़ थोडीं असतात. अनेक माणसांसंबंधाच्या आपल्या प्रेमळपणाच्या ज्योति एकदम तेवत ठेवण्याच्या कामीं तूं यश मिळविलें आहेस; म्हणूनच़ मीं तुला पुढच्या पायरीवर आणलें आहे. स्वतःच़ें सामर्थ्य वाढविण्याची तूं बरीच़ खटपट केली आहेस, पण अद्याप तुला पुष्कळ सामर्थ्य अंगीं आणणें ज़रूर आहे. विवेक व तत्परता हे गुण तूं संपादन केले पाहिजेस, म्हणजे कोणत्या क्षणीं कोणती गोष्ट ज़रूर आहे तें दहा मिनिटांनंतर तुझ्या ध्यानांत न येतां तत्क्षणींच़ ध्यानांत येईल. कांहीं करण्यापूर्वीं अगर बोलण्यापूर्वीं त्याच़ा परिणाम काय होईल त्याच़ा अगोदर नीट विचार करीत ज़ा. पण एकंदरींत तूं आपलें काम च़ांगलें केलें आहेस आणि तें पाहून मला फार आनंद होत आहे.'

अशा प्रकारच़ा त्या त्या शिष्यास उपयुक्त असलेला उपदेश त्यांनीं प्रत्येकास केला. मग प्रत्येक उमेदवाराच्या मस्तकावर त्यांनीं हात ठेविला आणि म्हणाले, 'प्राचीन विधीप्रमाणें मीं शिष्य म्हणून तुझ़ा स्वीकार करतों.'  पुढें प्रत्येकाला त्यांनीं आपल्या पोटाशीं धरून स्वतःच्या सूक्ष्मदेहांत त्यांचे सूक्ष्मदेह मिळवून घेतले. अर्थात् कांहीं क्षण तो शिष्य त्यांच्याशीं एकजीव होऊन अदृश्य झ़ाला आणि पुनः वेगळा निघाल्यावर इतका आनंदपूर्ण, थोर वृत्तीच़ा व श्रेष्ठ दिसूं लागला कीं त्याच़ें वर्णन शब्दांनीं करणें कठीण आहे. पूर्वीं कधींहि न दिसल्या प्रकारानें त्या सद्गुरूच़े विशेष गुण त्याच्यामध्यें त्या वेळीं प्रकट होऊं लागले. ही प्रक्रिया संपल्यावर सद्गुरु प्रत्येकाला म्हणाले, 'तुला माझ़ा आशीर्वाद असो.'  नंतर ते सर्वांना उद्देशून म्हणाले, 'मज़बरोबर चला, तुमच्या या नव्या पायरीची शास्त्रोक्त मान्यता व नोंद होण्यासाठीं तुम्हांला मीं महाचोहणांसमोर सादर करणार आहे.'  तदनुसार त्यांनीं त्या तरुणांना महाचोहणांसमोर नेलें. महाचोहणांनीं कुशाग्र दृष्टीनें त्या सर्वांकडे पाहिलें आणि ते म्हणाले, 'तुम्हीं फार लहान आहां. इतक्या लवकर तुम्हीं या पायरीवर आलांत याबद्दल मीं तुमच़ें अभिनंदन करतों. जी पदवी तुम्हीं प्राप्त करून घेतली आहे तिला अनुरूप अशी वर्तणूक ठेवीत च़ला.'  मग त्यांनीं आपल्या वज्रनोंदींत त्यांचीं नांवें घातलीं, आणि त्यांच्या नांवांसमोरचीं पुढें भरावयाचीं सदरें त्यांना दाखवून ते त्यांना म्हणाले, 'लवकरच़ या सदरांत नोंद करण्याच़े प्रसंग तुम्हीं घडवून आणाल अशी मला आशा आहे.'

महाचोहणांस भेंटून परत येतेवेळीं ऋषि कुठूमी यांनीं या नवीन शिष्यांस आपल्या आश्रमाज़वळच्या गुहेंत पुनः एकवार नेलें, आणि पूर्वीं केलेल्या त्यांच्या जिवंत प्रतिमा त्यांच्या डोळ्यांदेखत वितळून विसर्जन करून टाकल्या. त्या वेळीं ते म्हणाले कीं, 'यापुढें सर्वकाळ तुम्हीं माझ्याशीं ज़णूं एकजीव झ़ालेले -- माझ़ें अंगच़ झ़ालेले -- असे राहणार आहां, अर्थात् या प्रतिमांची आतां यापुढें ज़रूरी नाहीं.'  "

ज्ञानेश्वरांचें  वर्णन

कारणदेहाच्या ज़ाणिवेनें पाहिलें तर जीवन्मुक्तांच्या स्थूलदेहाभोंवतीं कितीतरी अंतरापर्यंत त्यांच्या सूक्ष्मदेहांचा तेजोगोल पसरलेला असतो. एकाबाहेर एक अशीं धगधगीत ज्वालांचीं रंगीत वर्तुळें त्या गोलांत
ज़णूं दिसत असतात आणि त्या सर्वांच्या मध्यभागीं जीवन्मुक्तांच़ा पार्थिव देह असतो. शिष्य त्यांच्या चरणांज़वळ आला म्हणजे या तेजोगोलाच्या केंद्रस्थानीं, त्या तेजोगोलाच्या ज़णूं गाभ्यांत तो आलेला असतो. शिष्याला गुरूंनीं पोटाशीं धरलें म्हणजे ते आपल्या तेजोगोलांत शिष्याला ओढून ज़णूं बुडवितात किंवा ज़णूं जलसमाधि देतात.  त्या वेळीं कांहीं काळ गुरुशिष्य एक होतात आणि गुरूंच़ा शिष्यावर फार मोठा परिणाम घडतो. या वेळीं शिष्य वासनादेहांत असतो हें लक्षांत ठेवावें. ज्ञानेश्वरांनीं या प्रक्रियेच़ें सुंदर वर्णन केलें आहे. ज्ञानेश्वर म्हणतात: 'मग सांवळा सकंकणु। बाहु पसरोनि दक्षिणु। आलिंगिला स्वशरणु। भक्तराजु तो।।'  म्हणजे श्यामसुंदर श्रीकृष्णांनीं सुवर्णकंकणानें शोभत असलेला आपला उजवा हात पुढें केला आणि शरण आलेल्या अर्जुनाला पोटाशीं धरलें. कशाकरितां धरिलें ?  ज्ञानेश्वर म्हणतात, 'न पवतां जयातें। कांखेसून बुद्धीतें। बोलणें मागौतें। वोसरलें।। ऐसें जें कांहीं एक। बोला बुद्धीसहि अटक। तें द्यावया मिष। खेंवाचें केलें।।'  म्हणजे ज्या गोष्टीला भाषेच़े शब्द जाऊन पोहोंच़त नाहींत, बुद्धीला कांखोटीस मारून जेथून वाणी माघारी फिरते, अशी जी कांहीं गोष्ट आहे, जी बोलूं नये असा वाचेवर व बुद्धीवर प्रतिबंध आहे, ती अर्जुनाला देण्याच़ें मिष म्हणून श्रीकृष्णांनीं त्याला आलिंगन दिलें. त्याच़ा परिणाम काय झ़ाला तो पहाः 'हृदया हृदय एक झ़ालें। ये हृदयींचें तें हृदयीं घातलें। द्वैत न मोडतां केलें। आपणां ऐसें अर्जुना।। दीपें दीपु लाविला। तैसा परिष्वंग तो झ़ाला। द्वैत न मोडतां केला। आपणपें पार्थु।।' (अध्याय १८ श्लोक ६६ ओंवी १४२२.)  म्हणजे ज्ञानेश्वर सांगतात, श्रीकृष्णांच़ें हृदय व अर्जुनाच़ें हृदय हीं एक झ़ालीं. श्रीकृष्णांनीं आपल्या हृदयांतील स्पंद अर्जुनाच्या हृदयांत घातले आणि आपलें व त्याच़ें द्वैत न मोडतां अर्जुनाला स्वतःसारखें केलें. दिव्यानें दिवा लावावा असा हा पोटाशीं धरण्याचा परिणाम झ़ाला. द्वैताच़ा नाश न करतां पार्थाला त्यांनीं आपलेपणा दिला. [हल्लींच़े ज्ञानेश्वरीच़े अभ्यासक व जिज्ञासू हे प्रामुख्यानें भाषापंडित असतात. जीवन्मुक्त गुरूंची व त्यांची भेंट होऊन असले प्रसंग त्यांनीं पाहिलेले नसतात; त्यामुळें ज्ञानेश्वरी वाच़तांना प्रायः असल्या वर्णनांच़ें मर्म त्यांना समज़त नाहीं. ह्या विधीची ज्ञानेश्वरांना प्रत्यक्ष माहिती असणार व त्या विधीची जास्त परिस्फुटता करण्याची मुभा त्यांना नसणार. म्हणून वरील प्रसंग कल्पून त्यांत त्यांनीं हें वर्णन गोंवलें आहे. असें कांहीं तरी योग्य कारण असल्याशिवाय भगवद्गीतेंत नसलेला हा प्रसंग उगीच़च्या उगीच़ ज्ञानेश्वर कल्पितील व येथें घुसडतील असें मानणें सयुक्तिक नाहीं.  योग्य कारणाच्या अभावीं हें असलें वर्णन वेडगळपणाच़ें ठरल्यावांच़ून राहणार नाहीं.]

हा गुरुशिष्य संबंध पुढें कायम राहतो. शिष्य व गुरु हे हज़ारों मैलांच्या अंतरावर असले तरी मनाच़ें जें हें ऐक्य झ़ालेलें असतें त्यांत विघ्न येत नाहीं. गुरूंच्या मनाच़े स्पंद शिष्याच्या सूक्ष्मकोषावर सारखे परिणाम करीत असतात आणि अशा रीतीनें शिष्य हळूंहळूं गुरूसारखा होऊं लागतो हें वर सांगितलेंच़ आहे. शिष्य आपल्या गुरूसंबंधीं मनांत वारंवार विचार करीत असतो. त्यांच्यावर ध्यानहि करीत असतो. त्यानें त्याच़े स्वतःच़े सूक्ष्मकोष जास्त जास्त संस्कारक्षम होत ज़ातात आणि वाईट गोष्टी मनांत येण्यास त्या कोषांकडून जास्त जास्त अडथळा होऊं लागतो. एखादें अभिषेक-पात्र ज़सें असावें तसा शिष्य होतो. त्या पात्रांत वरून पाणी ओततां येतें. कारण त्याच़ें तोंड वरून उघडें असतें; पण खालच्या छिद्रांतून आंत वर पाणी येऊं शकत नाहीं, त्याचप्रमाणें च़ोहीं बाज़ूंकडूनहि आंत येऊं शकत नाहीं. शिष्याच्या देहांत वरून खालीं येणाऱ्या गुरूंच्या उच्च प्रेरणा मात्र येऊं शकतात. कारण ध्यानादि साधनानें त्यानें आपल्या मनोदेहपात्राच़ें तोंड ज़णूं च़ांगल्या गोष्टींस उघडें व उन्मुख केलेलें असतें आणि चित्तशुद्धीच़ा सारखा प्रयत्न पूर्वीं केला असल्यामुळें शिष्यासभोंवतालच्या वातावरणांत सर्वत्र हिंडणारे वाईट वृत्तींचे स्पंद अभिषेक-पात्राच्या बाज़ूंमधून आंत येऊन त्याला स्पर्श करूं शकत नाहींत; अर्थात् उत्तम शिष्याची ही गोष्ट झ़ाली. ज़ो शिष्य उत्तम नाहीं तो कांहींसा फुटक्या अभिषेक-पात्रासारखा असतो. त्यांत उत्तम प्रेरणा वरून ओतल्या तरी त्या सर्व योग्य दिशेनें खालीं न येतां अंशतः बाज़ूस गळून फुकट ज़ातात; त्याचप्रमाणें बाज़ूची घाणहि त्या भोंकांवाटें ज़णूं आंत येऊं शकते.

अभिषेक-पात्र

शिष्यरूपी या अभिषेक-पात्राच़ा पुष्कळ उपयोग सद्गुरु करतात. शिष्य करून घेण्यांत शिष्याच़ा असा उपयोग करावा हा त्यांचा एक प्रमुख हेतु असतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरांत रबरी नळ्यांनीं रस्त्यांवर पाणी शिंपडण्यांत येतें; तद्वत् दिव्य जीवनाचे झ़रे ऋषिसंघाकडून सर्व जगभर सोडण्यांत येत असतात. जगांतील जीवन्मुक्त पुरुष असली शक्ति जगांत सर्वत्र खेळवितात व त्यांचे शिष्य त्यांना नळ्यांसारखे उपयोगी पडतात. शिष्य स्वतः होऊन जगांत जें सत्कार्य करीत असतो तें, व शिष्याच़ा नळीप्रमाणें उपयोग करून त्याच्या द्वारानें त्याच्या गुरूंनीं केलेलें कार्य हीं अगदीं वेगळीं असतात. हें उपरोक्त कार्य चालूं असतांना शिष्याला स्वतःच़ा प्रयत्न करावा लागत नाहीं. शिष्याच़ें अंतरंग निर्मल असलें, त्याची वृत्ति लोकसंग्रहोन्मुख असली, आणि जीवन्मुक्त गुरूंनीं आपलें मन त्याच्या मनाशीं ज़ोडून घेतलेलें असलें म्हणजे शिष्याला नकळतहि गुरु हें कार्य त्याच्या द्वारां करूं शकतात. लोकांना शिकविणें, त्यांना निरनिराळ्या प्रकारच़ें साहाय्य देणें, जगांतले लौकिक उद्योग करणें वगैरे जीं कामें शिष्य आपल्या स्वतःच्या ज़बाबदारीवर करतो त्यांची त्याला स्वतःला खटपट करावी लागते; पण त्याच्या द्वारानें गुरु जें कार्य करतात तें वेगळ्या प्रकारच़ें असतें आणि शिष्याच्या स्वतःच्या उद्योगाच्या मानानें हें कार्य फारच़ मोठ्या प्रमाणावर गुरूंना त्याच्या द्वारानें करतां येतें. जीवन्मुक्तांची स्वतःची शक्ति फार प्रखर असते, ज़णूं उच्चतम सप्तकांतल्या सुरांसारखी असते. ती लोकांत फिरविण्याच्या अगोदर सौम्य करावी लागते, खालच्या सप्तकांत आणावी लागते. शिष्याच़े स्थूल-सूक्ष्म देह त्या शक्तीला खालच्या पायरीवर आणून मग जगांत पसरवूं शकतात आणि म्हणून जीवन्मुक्त गुरु त्यांच़ा तसा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. ज्या ठिकाणीं पाण्याच्या धबधब्याच्या शक्तीपासून वीज़ तयार करतात, तेथें तिच़ा दाब फार मोठा (लाखों व्होल्टच़ा) असतो. ती तेथून निरनिराळ्या शहरांनजीकच्या ठाण्यांत आणतात. तेथें ट्रॅन्स्फॉर्मर्स् नांवाचीं यंत्रें असतात, त्यांत ती वीज़ घातली कीं विज़ेच्या दाबाचें रूपान्तर होऊन लाखों व्होल्टच्या ऐवजीं शेंकड्यांनीं मोज़तां येणारा अर्थात् कमी व्होल्टच़ा विज़ेच़ा प्रवाह त्या ट्रॅन्स्फॉर्मर्स् मधून बाहेर पडूं लागतो व शहरांतले दिवे लावणें, पंखे फिरविणें, ट्रामगाड्या-आगगाड्या चालविणें वगैरे कामांस तो कमी दाबाच़ा प्रवाह उपयोगी पडतो. जगाची सेवा करण्याचें जें काम जीवन्मुक्त लोकांनीं अंगावर घेतलेलें असतें त्याच्या अनेक दिशांपैंकीं ही त्यांच्या उद्योगाची एक दिशा असते. हिंदुस्थान देशांतल्या लोकांची शरीरप्रकृति चांगली राखण्यासाठीं देशांत सर्वत्र व्यायामशाळा काढणें, मर्दानी खेळांस जिकडे तिकडे उत्तेजन देऊन शाळांतील शिक्षणक्रमांत त्याच़ा समावेश करणें, शरीरशास्त्राची आणि रोगनिवारणाची माहिती लोकांत प्रसृत करणें व दवाखाने, इस्पितळें, सूतिकागृहें वगैरे ठिकठिकाणीं उघडणें हा एका तऱ्हेचा उद्योग होऊं शकेल, व त्या उद्योगांत निरनिराळ्या प्रकारचीं माणसें भाग घेऊं शकतील. जगांतील लोकांचे उद्योग ह्या प्रकारच़े असतात. शिष्य जे उद्योग स्वतःच्या ज़बाबदारीवर करतो, त्यांच़ाहि प्रकार हाच़ असतो. पण एखाद्या महाप्रतापी शास्त्रज्ञानें हा मार्ग न स्वीकारतां हिमालयाच्या एका शिखरावर, समज़ा एक अद्भुत कारखाना काढला व त्या कारखान्यांत ऑक्सिजन् व दुसरे अनेक जंतुनाशक वायु मोठ्या प्रमाणावर तयार करून तीं द्रव्यें रात्रंदिवस यांत्रिक शक्तीनें हिंदुस्थान देशाच्या वातावरणांत पसरविण्याचा वर्षानुवर्ष उद्योग च़ालविला तर त्या उद्योगानेंहि लोकांची प्रकृति सशक्त व निरोगी होईल. त्या यंत्रांतून अखिल देशभर सर्वत्र उडविलीं ज़ाणारीं द्रव्यें हवेंत सकसपणा उत्पन्न करतील, हवेंत माणसांनीं उत्पन्न केलेली घाण व रोगजनक जंतु यांच़ा नाश करतील व त्याच़ा परिणाम देशांतील लोकांच्या शरीरयष्टीवर पुष्कळ होऊं शकेल. एखादा माणूस एखाद्या घरांत फार आज़ारी पडला असला तर तो या क्रियेनें नक्की बरा होईलच़ असें नाहीं, किंवा एखादा माणूस व्यसनांत बुडून गलितांग झ़ालेला असला तर तो खुटखुटीत होईलच़ असेंहि नाहीं. पण एकंदरींत देशांतील रोगांचें प्रमाण व तीव्रता हीं कमी होतील, लोकांच़ें प्रकृतिमान सुधारेल आणि त्यांची आयुर्मर्यादा वाढेल. जग सुधारण्याच़े जे अनेक उद्योग जीवन्मुक्त करतात, त्यांत जगाची च़ोहों बाज़ूंनीं प्रगति करण्याची त्यांची एक कार्यदिशा ह्या आपल्या हिमालयस्थ शास्त्रज्ञासारखी असते. ते सृष्टीच्या वातावरणांत अनेक अद्भुत शक्ति अशा प्रकारें सोडीत असतात आणि माणसांच्या मनांस शुद्ध व सबळ करणें, त्यांतली घाण काढून टाकून त्यांत नाना शक्तींचीं नवीन बीजें रुज़त घालणें, हा उद्योग ते सतत करीत असतात. भागीरथीला स्वर्गांतून आपल्या तपोबलानें पृथ्वीवर आणून व तिच़ें पाणी पृथ्वीच्या बागेंत सर्वत्र सोडवून पृथ्वीवर हळूंहळू नंदनवन करण्याच़ा हा प्रयत्न भगीरथ राजाप्रमाणें जीवन्मुक्तांच़ा संघ सदा करीत असतो. किंबहुना भगीरथ राजाची गोष्ट म्हणजे या क्रियेच़ेंच़ अलंकारिक वर्णन होय. हें कार्य सामान्यतः बहुजनसमाजासंबंधाचें असतें. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला साहाय्य करण्याचा त्यांच़ा प्रयत्न यांत एखादे वेळीं असूं शकेल, पण प्रायः ते तसा उद्योग करीत नाहींत. या कामांत त्यांना शिष्यांच्या स्थूल-सूक्ष्म देहांच़ा फार उपयोग होत असतो. जे 'अनुगृहीत शिष्य' या पायरीवर आलेले असतील ते व त्या पायरीच्या पुढें गेलेली मंडळी हींच़ माणसें ह्या कार्यास विशेष लायक होऊं शकतात.

अनुगृहीत शिष्याला आपले विचार बरोबर आहेत कीं नाहींत याविषयीं निर्णय करण्याचें एक नवीन साधन गुरुशिष्यांच्या ज़ाणिवेंतील ह्या निकट संबंधानें मिळूं शकतें. या पायरीवरच़ा हा एक विशेष फायदा होय. आपल्या सतारीच्या तारेच़े सूर बरोबर आहेत कीं नाहींत हें पाहण्यासाठीं ज्याप्रमाणें एखादा नवशिक्या माणूस उत्तम गवयानें लावलेल्या सतारीच़ा उपयोग करतो आणि त्या दोन्हीं सतारींच्या तारा एकदम वाज़वून त्या परस्परांस मिळत्या आहेत कीं नाहींत हें पहातो. त्या मिळत्या असल्या तर आपल्या सतारीची तार बरोबर आहे असें समज़तो आणि त्या मिळत्या नसल्या तर आपली तार बरोबर लागली नाहीं, असें समज़ून त्या सतारीशीं मिळेपर्यंत आपल्या तारेची खुंटी पिरगळतो, तसाच़ कांहींसा हा प्रकार आहे. शिष्य व गुरु यांचीं मनें एक झ़ालेलीं असल्यामुळें शिष्य आपल्या मनाच्या आंत ज़ाईल तर गुरूच्या मनाच्या सागरांत तो येऊं शकतो आणि त्या ठिकाणीं आपला विचार आपल्या सद्गुरूंच्या विचाराशीं ज़ुळतो कीं नाहीं हें त्याला पाहतां येतें. ज़र तो ज़ुळला नाहीं तर आपला विचार चूक आहे, तो बदलला पाहिजे हें त्याच्या ध्यानांत येतें. स्वतःच्या समज़ुतींत कोतेपणा असला, किंवा भलता आग्रह असला, किंवा विचाराची दिशा चुकलेली असली, तर या क्रियेनें शिष्य आपलें वैगुण्य ओळखूं शकतो आणि स्वतःच्या वृत्तींत तदनुसार बदल करून तें त्याला सुधारतां येतें. ज्या गोष्टींच़ा निर्णय शिष्याला स्वतःच्या अकलेनें करणें शक्य असतें त्या गोष्टी त्यानें स्वतःच़ ठरविणें ज़रूर असतें. आपल्या आटोक्यांत असणाऱ्या गोष्टी ठरवितांना वरील क्रियेच़ा उठल्या सुटल्या अवलंब करावयाच़ा नसतो. तो दुरुपयोग होईल. पुरेशीं साधनें उपलब्ध नसतांनाहि शिष्याला कांहीं गोष्टींच़ा निर्णय ठरविणें कधीं कधीं अवश्य होतें. असल्या प्रसंगीं साहाय्यक होण्यासाठीं ही शक्ति त्याला दिलेली असते, आपणांस आकलन होणाऱ्या रोज़च्या प्रश्नांचीं उत्तरें शोधण्यासाठीं ती दिलेली नसते, हें त्यानें ध्यानांत ठेवावयाच़ें असतें.

गुरुपुत्र

अनुगृहीत शिष्यत्वाच्या पुढची पायरी म्हणजे गुरुपुत्राची होय. [गुरुपुत्राची ही तिसरी पायरी पहिल्या महादीक्षेच्या अगदीं ज़वळची असते. त्या दोहोंपैंकीं कोणतीहि ज़रा अगोदर येऊं शकते.]  या पायरीवर शिष्य आला म्हणजे गुरुशिष्यांच्या ज़ाणिवेच़े पूर्वींच़े निकट संबंध निकटतर होतात. दुसऱ्या पायरीवर शिष्याचें कनिष्ठ मन (मनोदेहांतली ज़ाणीव) गुरूंशीं एकरूप झ़ालेलें असतें. या तिसऱ्या पायरीवर श्रेष्ठ-मन म्हणजे कारण-देहधारी जीवात्माहि गुरूंशीं एकरूप केला ज़ातो आणि शिष्याच्या ताब्यांत त्याच़ें मन न राहून अनिष्ट विचार कधीं त्यांत आले तरी गुरूला त्याला वेगळा करतां येत नाहीं. शिष्याला तोडण्याची किल्ली पूर्वीं गुरूंनीं आपल्या स्वाधीन ठेवलेली होती, ती त्यांनीं या पायरीवर आपण होऊन टाकून दिलेली असते; सद्गुरूंनीं शिष्यावर हा विश्वास टाकलेला असतो. एखाद्यानें आपला जीव ज़सा दुसऱ्याच्या हातीं द्यावा, त्याप्रमाणें सद्गुरूंनीं आपलें चारित्र्य शिष्याच्या हातीं दिलेलें असतें; मग तो तें शुद्ध ठेवो वा मलिन करो. ही ज़बाबदारी किती मोठी आहे त्याची कल्पना करणें आम्हीं आमच्या वाचकांवर सोंपवितों.

या प्रकरणांत (व इतरत्र) अध्यात्ममार्गावरच्या ज्या पायऱ्या आम्हीं वर्णिलेल्या आहेत त्या निवृत्तिमार्गावरच्या पायऱ्या आहेत हें उघड आहे; निवृत्तिमार्गावर माणसाला स्वतःच्या अंतरंगांत असलेली 'मीं'पणाची गांठ सैल करून संपूर्णपणें सोडवावी लागते हें पूर्वीं सांगण्यांत आलेंच़ आहे. प्रवृत्तिमार्गावर असतांना मीं ज्ञान मिळवीन, मीं सत्ताधारी होईन, मीं लोकप्रियता संपादन करीन, मीं पैसे कमावीन अशा महत्त्वाकांक्षा त्याच्या अंतरंगांत असतात व त्या महत्त्वाकांक्षा सफल करतांना त्याच़ा मींपणाच़ा केंद्र अधिकाधिक ज़ोरदार होत असतो. पण निवृत्तिमार्गावर तो नष्ट करावयाच़ा असतो. तेव्हां निवृत्तिमार्ग च़ालत असतांना मीं अमुक एक पायरी चढेन, मीं अमुक एक सद्गुण संपादन करीन असें ज़री त्याला वाटत असलें, तरी ती मनीषा प्रवृत्तिमार्गावरील महत्त्वाकांक्षेसारखी असून च़ालत नाहीं. तशी ती असेल तर त्याची मीपणाची गांठ न सुटतां ती अधिकाधिक घट्ट होत ज़ाईल. या 'मी'पणाच्या केंद्रामुळें माणसास अभिमान वाटतो, व मीं इतरांपेक्षां वेगळा आहें अशी त्याची भावना होते. निवृत्तिमार्गावरच्या पायऱ्या चढतांना ही भावना त्याला हळूंहळूं सोडावी लागते.  ती न सोडतां ज़र तो निवृत्तिमार्गानें पुढें ज़ाऊं पाहील तर त्याचा पाय घसरेल. मीं पुष्कळ पैसे मिळवीन ही प्रवृत्तिमार्गावरील महत्त्वाकां
क्षा, व मीं पूर्णपणें वैराग्य मिळवीन वा मीं सर्वतोपरी नम्र होईन, मीं निष्काम कर्म करीन, दुर्गुण टाकून मीं सद्गुणसंपन्न होईन या निवृत्तिमार्गावरील भावना अगदीं वेगळ्या प्रकारच्या असतात हें विसरून च़ालावयाच़ें नाहीं. तें विसरल्यास निवृत्तिमार्गावरील भावना व प्रवृत्तिमार्गावरील महत्त्वाकांक्षा यांत कांहींच़ फरक राहणार नाहीं व मीं पुष्कळ पैसे मिळवीन असें म्हणणारा मनुष्य व मीं पुष्कळ सद्गुण संपादन करीन असें म्हणणारा मनुष्य हे सारखेच़ लोभी ठरतील. फक्त एकाला पैशाच़ा लोभ असेल व दुसऱ्याला सद्गुणांच़ा लोभ असेल. मुमुक्षूनें असली च़ूक करतां कामां नये. अगदीं प्रारंभीं प्रारंभीं मीं माझ़े दुर्गुण टाकीन व सद्गुण अंगीं आणीन असें मुमुक्षु म्हणत असला तर त्याच़ें फारसें नुकसान होणार नाहीं व दुर्गुणांची पायरी टाकून तो सद्गुणी बनेल. पण ही वृत्ति अध्यात्ममार्गावर पुढें विघ्नकारक होते. कारण ती 'मीं'च़ा केंद्र ज़ोरदार करूं पाहते. तेव्हां अध्यात्ममार्ग च़ालत असतांना 'मीं'च़ा केंद्र हळूंहळूं वितळून टाकावयाच़ा असल्यामुळें मीं अमुक एक मुमुक्षु मार्गावरील पायरी च़ढेन या भावनेंतील 'मीं'पणाच़ा भाग, त्यांतील अभिमानाच़ा भाग, स्वतःसाठीं अमुक एक गोष्ट मिळविण्याच़ा भाग या सर्वांस त्यानें तिलांजलि देणें अवश्य असतें.

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण ८ : पहिली महादीक्षा