प्रकरण  सहावें


पहिल्या  ऋणानुबंधाचा  विधि


पहिल्या पायरीविषयीं बरीच़ माहिती मागील प्रकरणांत दिली आहे. तो ऋणानुबंध ज़ोडतांना ज़ो विधि करतात त्याची हकीकत या प्रकरणांत प्रथम देऊन त्याशीं संलग्न असणारा कांहीं उपदेश नंतर आम्हीं देणार आहों. मुमुक्षुमार्गावरच़े जे पुढील टप्पे आहेत ते उत्तरोत्तर जास्त महत्त्वाच़े असतात. त्या मानानें अलीकडच्या पायऱ्या कमी महत्त्वाच्या असणार हें खरें आहे. पण आमच्या वाचकांना पुढच्या पायऱ्यांपेक्षां या अलीकडच्या पायऱ्यांच़ेंच़ महत्त्व जास्त असलें पाहिजे. आमच्या वाचकवर्गामध्यें या मार्गानें पुष्कळच़ पुढें ज़ाऊन पुढील टप्प्यांज़वळ आलेले लोक अगदींच़ कमी असणार किंबहुना तितका पुढें गेलेला मुमुक्षु आमच्या वाचक मंडळींत सांपडणारहि नाहीं. पण हें पुस्तक वाच़ून या मार्गानें ज़ाण्याची उत्कंठा कांहीं मंडळींस तरी वाटण्याच़ा थोडाफार संभव आहे. असल्या मंडळींना आरंभींच्या पायऱ्यांच़ें वर्णन जास्त उपयुक्त होईल हें उघड आहे. हें पुस्तक वेदान्तविषयक कोट्या लढविण्याकरितां नसून या मार्गांत ज़ाण्याची हौस उत्पन्न करण्यासाठीं लिहिण्यांत येत आहे, हें वाचकांनीं विसरूं नये. हें पुस्तक लिहितांना अशी व्यवहारी दृष्टि आम्हीं ठेवली असल्यामुळें या मार्गावरील पुढच्या पुढच्या टप्प्यांचें वर्णन आम्हीं अगदीं संक्षेपानें करूं, कारण त्याच़ा व्यावहारिक उपयोग आमच्या वाचकांना होण्याच़ा संभव अगदीं कमी आहे; आणि त्याच़ कारणास्तव आरंभींच्या पायऱ्यांच़ें वर्णन येथें अधिक विस्तारानें देणें अवश्य आहे. म्हणूनच़ मागील प्रकरणांत आरंभिलेला विषय त्यांतच़ पुरा न करतां त्याच़ा कांहीं भाग या प्रकरणांत वर्णीत आहों.

श्री.लेडबीटर् यांनीं एके ठिकाणीं या पहिल्या ऋणानुबंधाची हकीकत दिलेली आहे. महर्षि कुठूमी ऊर्फ मास्टर के.एच्. यांनीं बऱ्याच़ वर्षांमागें तीन तरुण मुलांना पहिल्या पायरीवर घेतलें होतें, त्या वेळची ही हकीकत आहे. महर्षि कुठूमी हे एक आदर्श शिक्षक आहेत. लहानपणीं ज्यांना पहिल्या पायरीवर घेतलें ज़ातें त्यांची मनोरचना कोणतीहि असली आणि पुढें दुसरे कोणींहि जीवन्मुक्त त्यांच़े गुरु होणार असले, तरी महर्षि कुठूमी हे आदर्श शिक्षक असल्यामुळें प्रायः त्या सर्वांच़ा प्रारंभ त्यांच्या हाताखालीं होतो व तेच़ त्यांना पहिल्या पायरीवर घेत असतात. (शिष्य वयानें मोठा असला तर कोणते ऋषि त्याशीं पहिला ऋणानुबंध ज़ोडतील हें त्याच्या मनोरचनेवर अवलंबून असतें.)  खालील हकीकत ज्या अल्पवयी तरुणांविषयींची आहे त्यांची काळजी घेऊन त्यांना मार्गदर्शक होण्याचें काम श्री.लेडबीटर् यांच़ेकडे सोंपविलेलें होतें. 

विधीचें  वर्णन

श्री.लेडबीटर् लिहितात -- " मीं या तिघां तरुणांसह सूक्ष्मदेहानें कुठूमी ऋषींच्या आश्रमांत गेलों, तों आश्रमाच्या ओटीवर ते बसलेले आहेत असें माझ्या दृष्टीस पडलें. त्यांच्याकडे मीं त्या त्रिवर्गास नेलें. तेव्हां त्यांनीं हात पुढें करून त्यांना ज़वळ घेतलें. त्या तिघांचें जीवनसर्वस्व ज़णूं डोळ्यांत एकवटून ते तिघेहि त्यांच्याकडे आनंदी वृत्तीनें पाहूं लागले.  त्यांना पाहून ऋषि कुठूमी यांच्या मुद्रेवर हास्यानंदाची मधुर छटा प्रकट झ़ाली व ते म्हणाले --

'तुम्हांस येथें बोलावण्यांत मला विशेष आनंद वाटत आहे. पूर्वींच्या काळीं तुम्हां सर्वांनीं माझ्याबरोबर सहकार्य केलेलें आहे व पुन्हां आतांहि तुम्हीं तसेंच़ कराल अशी मला आशा आहे. बोधिसत्त्व येण्यापूर्वीं तुम्हीं आम्हांमध्यें यावें असें मला वाटत आहे आणि म्हणून मीं इतक्या अगोदर तुमची ही सुरुवात करीत आहे. ज्याच़ा अंगीकार करण्याची तुमची इच्छा आहे तें कार्य सर्व उद्योगांत अत्यंत उदात्त व थोर आहे. मात्र तें सोपें नाहीं. कारण त्यासाठीं या तुमच्या कोंवळ्या देहांवर तुम्हांला संपूर्ण स्वामित्व मिळविणें अवश्य आहे. स्वतःला तुम्हीं संपूर्णपणें विसरलें पाहिजे. आणि दिलेलें काम पार पाडावें आणि लोकांस सुखी करावें, एवढाच़ तुमच़ा जीवनहेतु असला पाहिजे.'

पहिल्या मुलाच्या हनुवटीला त्यांनीं हस्तस्पर्श केला आणि आनंदित मुद्रेनें हंसून ते त्याला म्हणाले, 'तुला हें साधेल कां?'

'आम्हीं तें करण्यास झ़टूं' असें त्या सर्वांनीं उत्तर दिलें. नंतर ऋषींनीं प्रत्येकाला ओळीनें व्यक्तिशः उपदेशाचे दोन शब्द सांगितले आणि प्रत्येकाला वेगवेगळा प्रश्न केला कीं, 'माझ्या मार्गदर्शित्वाखालीं जगांत उद्योग करण्याच़ा प्रयत्न तूं करशील कां?'  'होय मीं करीन' असें प्रत्येकानें उत्तर दिलें.

नंतर त्यांनीं पहिल्या मुलाला स्वतःसमोर घेंतलें, तो गुडघे टेंकून बसला आणि त्याच्या मस्तकावर त्यांनीं आपले दोन्हीं हात ठेवले व ते म्हणाले --

'तर मग उमेदवार शिष्य म्हणून मीं तुझ़ा स्वीकार करतों. माझी आशा आहे की, तूं लवकर माझ्याशीं जास्त निकटच़ा ऋणानुबंध ज़ोडूं शकशील, म्हणून मीं तुला माझ़ा आशीर्वाद देतों आणि तो तूं इतर मंडळींस द्यावा.'

वरील शब्द बोलत असतांना त्या मुलाच़े सूक्ष्मकोष एकदम विशाल झ़ाले आणि त्यांतले प्रेम व भक्ति दर्शविणारे रंग दिव्य तेजानें चमकूं लागले. मुलगा म्हणाला, 'सद्गुरो! तुम्हीं मला खरोखरच़ सद्गुणी बनवा; तुमची सेवा करण्यास लायक करा.'

ऋषि हंसून म्हणाले, 'मुला, तुलाच़ स्वतःला तें करणें शक्य आहे; मात्र माझ़ें साहाय्य आणि आशीर्वाद हीं तुझ्यापाशीं सदा उपस्थित राहतील.'

मग दुसऱ्या मुलांना त्यांनीं ज़वळ घेतलें व तोच़ छोटा विधि प्रत्येक वेळीं त्यांनीं केला. त्यांच़ेहि सूक्ष्मकोष मोठ्या अद्भुत प्रकारानें प्रकाशमान झ़ाले आणि आकारमानानें वाढून अधिक खंबीर व स्थिरवृत्तीच़े झ़ाले.

मग ऋषि उठले आणि मुलांना बरोबर घेऊन म्हणाले, 'च़ला माझ्याबरोबर, आणि मीं काय करतों तें पहा.'

लगेच़ आम्हीं सर्व त्यांच्या आश्रमाखालच्या उतरणीवरच्या रस्त्यानें पुलावरून  नदीपार गेलों. आम्हांला त्यांनीं तेथील गुहेंत नेलें आणि प्रोबेशनच्या पायरीवर असलेल्या साऱ्या शिष्यांच्या जिवंत प्रतिमा त्यांनीं तेथें ठेवलेल्या होत्या त्या आम्हांला दाखविल्या. मग ऋषि म्हणाले, 'आतां मीं तुमच्याहि अशाच प्रतिमा करणार आहे, बघा.' आणि सर्वांच्या डोळ्यांदेखत त्यांनीं त्या निर्माण केल्या. सहज़च त्याची त्या मुलांना मौज़ वाटल्यामुळें ते ती क्रिया लक्षपूर्वक पहात होते. एक मुलगा ज़रा भयभीत स्वरांत उद्गारला, 'असा कां मीं आहे !'

एका प्रतिमेंत तांबड्या रंगाचा (हा रंग क्रोधदर्शक आहे) एक पट्टा दिसत होता. त्याकडे बोट दाखवून विनोदी नज़रेनें ऋषींनीं त्या मुलाला विचारिलें, 'हें काय आहे ?'

मुलगा म्हणाला, 'मला माहीत नाहीं.'  पण ज्या अर्थीं आदल्याच़ रात्रीं भावनांच़ा ताण पडल्यामुळें तो परिणाम झ़ाला होता त्या अर्थीं त्या मुलाला त्याची अटकळ झ़ाली असली पाहिजे असें मला वाटतें. ऋषींनीं सर्व मुलांना सूक्ष्मकोषांतील रचना व त्यांतले निरनिराळे रंग दाखवून दिले, त्यांच़ा अर्थ काय तें समज़ावून सांगितलें आणि कोणत्या बाबतींत सुधारणा झ़ाली पाहिजे त्याच़ा खुलासा केला. ते असेंहि म्हणाले कीं, तुमचें कसें च़ाललें आहे तें समज़ण्यासाठीं मीं रोज़ या प्रतिमा पाहात ज़ाईन आणि या प्रतिमा पाहण्यांत मला आनंद वाटेल अशी तुम्हीं त्यांची रचना कराल अशी माझी आशा आहे.  सरतेशेवटीं त्यांनीं पुनः त्यांना आशीर्वाद दिला व आम्हीं सारे तेथून परतलों."

वरील वर्णनावरून ह्या पायरीवरच्या विधीची कांहीं कल्पना आमच्या वाचकांस येईल. वरील प्रसंगीं प्रत्येक मुलाला सद्गुरूंनीं वेगवेगळा उपदेश व्यक्तिशः केला असें वर लिहिलेंच़ आहे. दर वेळीं असा उपदेश नव्या उमेदवाराला करण्याची जीवन्मुक्तांची प्रथा आहे. ह्या मार्गानें ज्या मंडळींना ज़ाण्याची हौस असेल त्यांना असला उपदेश उपयुक्त होण्याज़ोगा आहे; म्हणून निरनिराळ्या प्रसंगीं निरनिराळ्या तरुण वयाच्या उमेदवारांना सद्गुरूंनीं केलेला उपदेश वेगळे क्रमांक घालून आम्हीं पुढें देत आहोंत --

( १ )

' ऋषिसंघाची सेवा करीन, हें एकच़ ध्येय तूं स्वतःसमोर ठेविलें आहेस हें मला माहीत आहे; पण तूं ध्यानांत ठेव कीं तुला अज़ून अनेक वरच्या पायऱ्या च़ढून ज़ावयाच्या  आहेत, आणि या मार्गानें प्रगति करावयाची असेल तर माणसाला अष्टौ प्रहर जागरूक राहाणें अवश्य आहे. तूं कार्य (सेवा) करण्यास सदा तयार असलें पाहिजे;  इतकेंच़ नव्हे तर सेवा करण्याची संधि मिळण्यासाठीं तूं टपून बसलें पाहिजे. किंबहुना लहानसहान गोष्टींत सेवा करण्याच़े प्रसंग तूं उत्पन्नहि केले पाहिजेस, म्हणजे मोठें काम पुढें आलें असतां ती संधि तुझ्या हातूंन वांया ज़ाणार नाहीं.

माझ्याशीं ज़ोडलेल्या ऋणानुबंधाची आठवण तूं क्षणभरहि विसरूं नकोस. त्या ज़ाणिवेमुळें तुझ्या हृदयांत स्फूर्तीचा झ़रा अखंड वाहात राहिला पाहिजे, त्या ज़ाणिवेमुळें सभोंवतालच्या वातावरणांतील वेडगळ विचारांच़ा शिरकाव तुझ्या मनांत होण्यास प्रतिबंध झ़ाला पाहिजे, इतकेंच़ नव्हे तर अध्यात्मबुद्धीनें काम करण्यास तुला प्रोत्साहन मिळालें पाहिजे. सामान्यजनांच्या आयुष्यक्रमांत पोकळपणा आणि क्षुल्लकपणा हे दोष असतात. त्या दोषांबद्दल तुला त्यांची अनुकंपा वाटणें ज़री अवश्य असलें, तरी तुझ्या ठायीं ते दोष राहणें अशक्य झ़ालें पाहिजे. जीवन्मुक्तीच़ा ज़ो अवर्णनीय आनंद आहे तो अद्यापि ज़री तुझ्या वांट्यास आलेला नसला, तरी त्या उच्च पायरीवरच्या पुरुषांशीं तूं एकत्र निगडित झ़ाला आहेस हें लक्षांत असूं दे. सर्वांना या कनिष्ठ जगतांत त्यांच़ा ज्ञानप्रकाश वांटणाऱ्यांमध्यें तुझी गणना आहे. तेव्हां तूंहि आपल्या परीनें आनंद व प्रेम सर्वत्र फांकविणाऱ्या सूर्यासारखें होणें ज़रूर आहे. जगाला तुझ़ें कार्य न ओळखो, त्याचें स्वारस्य न कळो, तत्रापि जगाला प्रकाश देत राहणें हें तुझ़ें काम आहे.

उद्योग थांबवून ढिला होऊं नकोस. तुला अज़ून पुढचीं उच्च शिखरें च़ढावयाचीं आहेत. तुझ्या बुद्धीच़ा विकास होणें ज़रूर आहे हें विसरूं नकोस. सहानुभूति, प्रेम, उदारपणा हे गुण तूं स्वतःमध्यें विकसित केले पाहिजेस. प्रत्येकानें ध्यानांत आणलें पाहिजे कीं, आपल्या दृष्टिकोणाप्रमाणें दुसरेहि दृष्टिकोण अस्तित्वांत असतात आणि तेहि तितकेच़ विचारार्ह असूं शकतात. बोलण्यांतला अशिष्टपणा व उर्मटपणा आणि वादविवादाची प्रवृत्ति हीं अगदीं नामशेष झ़ालीं पाहिजेत. हे दोष ज्याच्या स्वभावांत असतील, त्यानें मनांत तसली प्रेरणा उत्पन्न होण्याबरोबर स्वतःचें मन मागें ओढलें पाहिजे. थोडें बोलावें आणि बोलणें सदा सभ्यतेचें आणि सौजन्यपूर्ण असावें. आपण जें बोलणार, तें प्रेमळ आणि समंजस आहे कीं नाहीं याचा विचार केल्याखेरीज़ कधींहि तोंड उघडूं नये. ज़ो स्वतःच्या हृदयांत प्रेमळपणाची वाढ करील त्याच्यापासून पुष्कळ प्रमाद दूर राहतील. प्रेमळपणा हा सर्व गुणांचा मुकुटमणि आहे. त्या गुणाशिवाय इतर साऱ्या गोष्टी म्हणजे वाळूंत पाणी ओतण्यासारख्या अगदीं फुकट होत.

अनिष्ट प्रकारच्या वासना व विचार यांना तूं सक्त मज्जाव केला पाहिजेस आणि हे प्रकार मनांत येणें अशक्य होईपर्यंत तूं सारखा नेटाच़ा प्रयत्न करीत राहिलें पाहिजेस. चिडखोरपणाच़ा तुझ्या मनाला स्पर्श झ़ाला कीं ऋषिसंघाच्या ज़ाणिवेच्या प्रशान्त सागरामध्यें खळबळ होते. गर्वालाहि नामशेष केलें पाहिजे. कारण प्रगतीच्या मार्गांत त्याच़ा मोठा अडथळा उत्पन्न होत असतो. उच्चारविचारांत उत्कृष्ट माधुर्य असलें पाहिजे. ज़ो चतुरस्रपणा कोणाला कदापि दुखवीत नाहीं, कीं कोणाला उग्र वाटत नाहीं, त्याच़ा परिमळ तुझ्याभोंवतीं पसरलेला असला पाहिजे. हें साधणें कठीण आहे. पण तूं नेटानें खटपट केलीस तर तें साधेल.

निश्चित काम (नुसती करमणूक नव्हे) अंगावर घ्यावयाचें, हें ध्येय स्वतःसमोर ठेव. स्वतःला काय करणें आवडतें त्याच़ा विचार करूं नकोस, तर दुसऱ्याला उपयोगी असें कोणतें काम मज़कडून होऊं शकेल तें पाहात च़ल. शिष्याच़ें वर्तन सतत व एकसारखें प्रेमळपणाच़ें, परोपकाराच़ें आणि साहाय्यक वृत्तीच़ें असलें पाहिजे, नुसतें कधींमधीं तसें वागून भागणार नाहीं. सतत तसें वागलें पाहिजे. हें ध्यानांत ठेव कीं, ज़ो वेळ सेवेंत गेला नाहीं किंवा सेवेची पात्रता अंगीं आणण्याकडे खर्चीं पडलेला नाहीं तो सारा अगदीं फुकट गेला असें आम्हीं समज़तों.

स्वतःमध्यें विशिष्ट दोष दिसले कीं त्यांच्यामागें नेटानें व धैर्यानें लाग आणि त्यांच़ा निकाल कर. चिकाटी सोडूं नको, म्हणजे यश पदरांत पडेल. हा निर्धारशक्तीच़ा प्रश्न आहे. कामाची संधि पदरांत पाडण्याबाबत उत्सुक रहा. कार्यक्षम हो. तुला साहाय्य करण्यास मीं सदा तयार आहे, पण तुझ्या वांटच़ा उद्योग मीं करून च़ालणार नाहीं. ती खटपट तुझी तूंच़ केली पाहिजेस. च़हूं बाज़ूंनीं स्वतःच़ें अंतर्याम खोल कर, आणि भक्तिभावानें सेवेच्या ध्येयाला सर्वस्वी वाहून घे. '

( २ )

' तुझी प्रगति ठीक आहे, पण ती याहीपेक्षां जास्त व्हावयाला पाहिजे आहे. लोकांना साहाय्य करण्याच़े प्रसंग तुज़समोर ठेवून मीं तुझी परीक्षा पाहिलेली आहे आणि आज़वर थोरपणानें त्या संधीच़ा उपयोग तूं करून घेतलेला आहेस. तेव्हां मीं तुझ्यासमोर आणखी मोठे व जास्त प्रसंग आणून ठेवीन आणि ज्या मानानें त्या संधि ओळखून त्यांच़ा तूं उपयोग करशील त्यावर तुझी भावी प्रगति अवलंबून राहील. लक्षांत असूं दे कीं, यशस्वी रीतीनें उद्योग केल्याच़ें बक्षीस म्हणजे जास्त काम करण्याची संधि व शक्ति मिळणें हेंच़ सदा असतें, आणि ज्या गोष्टी तुझ्या नज़रेला लहान दिसतात त्या तूं निष्ठेनें केल्यास तर त्यांच़ा परिणाम म्हणून जास्त महत्त्वाच्या गोष्टींत तुझ़ा उपयोग केला ज़ाईल. मला माहीत आहे कीं, लौकरच़ तूं माझ्याशीं जास्त निकट ऋणानुबंध ज़ोडशील आणि तसें झ़ाल्यानें सनत्कुमारांच्या पायापर्यंत पोहोंचणाऱ्या मार्गानें ज़ाण्यास तुझ़ें इतरांना साहाय्य होईल. प्रेमाच़ें मोठें सामर्थ्य तुझ्या ठायीं आहे. आपल्या जगतांत त्या प्रेमसूर्याच़ा प्रकाश कसा भरून टाकावा, स्वतःच़ें चैतन्य राजासारखें अनंत हस्तानें कसें ओतावें, त्याच्यासारखी बक्षिसांची खैरात कशी करावी, ह्या गोष्टी तुला माहीत आहेत, ह्याच़ा तूं आनंद मान. हें सारें ठीक आहे. पण प्रेमळपणाच्या ह्या प्रफुल्लित फुलाच्या देठाशीं अभिमानाच़ा डाग राहणार नाहीं याविषयीं सावध रहा. कारण एखादी अगदीं लहान ज़ागा प्रारंभीं कुज़लेली असावी, आणि तो भाग पसरत ज़ाऊन सरतेशेवटीं सर्व फुलांना त्याच़ा दोष लागावा आणि फुलांच़ा सगळा नाश व्हावा अशी स्थिति त्या डागापासून उत्पन्न होण्याचा संभव असतो. आमच्या एका थोर बंधूंनीं लिहिलें आहे कीं, शहाणपण हवें असेल तर माणसानें नम्र व्हावें आणि शहाणपण संपादन केल्यावर तर आणखी नम्र व्हावें. तें लक्षांत ठेव. विनयाच्या सुवासिक रोपाला खत घालून वाढीस लाव आणि त्याच़ा सुंदर सुगंध तुझ्या अणुरेणूंत भरून राहीलसें कर.

जेव्हां तूं एकत्वाच़ा यत्न करशील तेव्हां लोकांना स्वतःच्या हृदयांत ओढणें, स्वतःच्या तेजोवलयाच्या पांघरुणाखालीं त्यांना घेणें, त्यांना स्वतःशीं एक करणें, इतक्यानेंच़ भागणार नाहीं. तेवढें साधणें म्हणजेहि मोठाच़ पल्ला गाठण्यासारखें आहे; पण त्यांच्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यांत ज़णूं तूं शिरलें पाहिजेस, आणि त्यांच्याविषयीं उमज़ पाडून घेतला पाहिजेस. रिकाम्या च़वकशांचा त्यांत बिलकुल भाग असतां कामां नये. कारण आपल्या बंधूंच़ें हृदय म्हणजे एक पवित्र व एकांताच़ें स्थान होय. त्यांत च़ोरून डोकावणें व त्याच्या चर्चा च़ालविणें यांत बिलकुल न पडतां आदरानें त्याच़ा उमज़ पाडून घेणें, त्याशीं सहानुभूति ठेवणें व साहाय्य देणें या गोष्टी केल्या पाहिजेत. स्वतःच्या दृष्टीनें लोकांवर टीका करणें सोपें असतें; पण त्यांच्या मनाची ओळख करून घेणें आणि त्यांवर प्रेम करणें या गोष्टी कठीण आहेत. ज़र लोकांना स्वतःबरोबर न्यावयाचें असेल तर ह्याच़ एका रीतीनें तें साधूं शकेल. तुझ़ा विकास लवकर व्हावा आणि आमच्या महत्कार्यांत मला तुझ़ा उपयोग करतां यावा अशी माझी मनीषा आहे.  त्याबाबत तुला साहाय्य होण्यासाठीं मीं तुला माझ़ा आशीर्वाद देत आहे. '

( ३ )

' मुली, तूं स्वतःसभोंवारच्या परिस्थितींतला कठोरपणा घालवून ती यावत्शक्य सुसंस्कृत करण्याकडे आपली शक्ति खर्च केलीस; तसेंच़ दुसऱ्या एका सत्त्वशील जीवाला माझ्याकडे येण्याच्या मार्गांत तूं साहाय्य केलेंस, हें फार च़ांगलें झ़ालें. ही गोष्ट म्हणजे तुझ्या पुण्यकार्यांतला एक सदा च़काकणारा हिराच़ होय. त्या जीवाला तसेंच़ आणखी साहाय्य करीत रहा आणि तसले दुसरे च़काकणारे हिरे तुझ्या सत्कार्यांत तुला बसवितां येतील कीं काय तें पाहात च़ल. ह्या तुझ्या च़ांगल्या कृत्यांमुळेंच़ मला तुझ्याशीं इतक्या अगोदर ऋणानुबंध ज़ोडतां आला. नाहीं तर त्याला फारच़ कालावधि लागला असता. स्वतःची जलदीनें प्रगति करण्याच़ा रामबाण उपाय कोणता असेल, तर तो इतर लोकांना या मार्गावरून पुढें ज़ाण्यास साहाय्य करणें हाच़ होय. पूर्वकालच्या मित्रांपैंकीं एक जीव तुला भेंटला आहे, हें तुझ़ें भाग्य आहे; कारण एकेकानें आपलें सामर्थ्य वेगवेगळें खर्च़ करण्यापेक्षां त्या दोघांनीं खरोखरच़ें सहकार्य करून तेंच़ सामर्थ्य ज़ोडीनें खर्च़ केलें तर तें अधिक फलदायी होतें. तुझ़ा प्रारंभ ठीक झ़ाला आहे. त्याच़ दिशेनें जलदीनें आणि निश्चितपणानें पुढें ज़ात रहा. '

( ४ )

' आमच्या ह्या दिव्य संघांत अगदीं अलीकडे आलेला उमेदवार तूं आहेस. मीं तुझ़ें स्वागत करतों. स्वतःला साफ़ विसरून ज़ाणें आणि मनांत मागें कांहींच़ न ठेवतां जगाच्या सेवेला वाहून घेणें या गोष्टी तुला सोप्या ज़ात नाहींत; पण त्याच़ करणें अवश्य आहे. लोकांवर कृपाछत्र धरण्यासाठींच़ फक्त ज़गावें आणि नेमून दिलेलें काम पार पाडावें हें ज़रूर आहे. स्वतःच्या विकासाच्या मार्गावर तुझी सुरुवात नीटपणें झ़ालेली आहे. पण अद्यापि कितीतरी काम व्हावयाचें आहे. चिरचिरेपणाची अगदीं सूक्ष्म छटा उत्पन्न झ़ाली तरी तिला थारा देऊं नकोस, आणि शिकवण व उपदेश ऐकण्याला सदा तत्पर रहा. नम्रपणा आणि स्वार्थत्याग ह्या गोष्टींची स्वतःमध्यें वाढ कर आणि सेवेविषयींच्या जिवंत उत्साहानें स्वतःचें हृदय भरून टाक. म्हणजे आपल्या या महान् गुरुदेवांच्या हातीं तूं उत्तम साधन होशील, जगाचा उद्धार करणाऱ्या सैन्यांतील एक शिपाई होशील. त्या कामीं तुला साहाय्य व्हावें म्हणून मीं तुला सांप्रत उमेदवारीच्या पायरीवर आणिलेलें आहे. '

( ५ )

' तुला पाहून माझ़ें मन संतुष्ट आहे. पण याहीपेक्षां तुझ्या हातूंन अधिक कार्य झ़ालें पाहिजे. माझ्या मुला, शीघ्रगतीनें प्रगति करण्याची योग्यता तुझ्या अंगीं आहे. असल्या प्रगतीच़ें ध्येय तूं स्वतःसमोर ठेव; आणि कांहींहि झ़ालें तरी मीं तें निश्चयानें हस्तगत करीन असा निर्धार कर. तुझ्या मार्गावरच़े जे अडथळे दूर करण्याविषयीं तुला सांगण्यांत आलें आहे, त्यांतले कित्येक तुला महत्त्वाच़े असे वाटणार नाहींत. पण खरोखरी ते कमी महत्त्वाच़े नाहींत हें लक्षांत ठेव. कारण ते अडथळे म्हणजे तुझ्या अंतरंगांतल्या दुःस्थितीच्या त्या बाह्य खुणा आहेत आणि बोधिसत्त्व भूतलावर आल्यावर ज़र तुझ़ा उपयोग व्हावयाचा असेल तर ती अंतर्यामींची स्थिति बदलणें अवश्य आहे. याच़ा अर्थ असा कीं, तुला स्वतःमध्यें मुळापासूनच़ बदल करावा लागेल; व ज़री तो करणें तुला सोपें न वाटलें तरी तो प्रयत्न तुला च़ांगलाच़ फायदेशीर होईल. माझी इच्छा अशी आहे कीं, तूं स्वतःसाठीं पुढील नियम करावे : --

(१)  स्वतःला आणि स्वतःच्या देह-बुद्धीच्या वासनांना तूं विसर. फक्त सेवेची आठवण असूं दे, आणि स्वतःच़ें सामर्थ्य, स्वतःच़ा विचार आणि स्वतःच़ा उत्साह हीं सर्वस्वी या कामीं लाव.

(२)  दुसऱ्यानें प्रत्यक्ष विचारल्याविना कोणत्याहि गोष्टीवर आपलें मत देऊं नको.

(३)  आपल्या बोलण्याच़ा दुसऱ्यावर काय परिणाम होईल याच़ा नेहमीं अगोदर विचार कर आणि मग बोल.

(४)  आपल्या बंधूच़ें वैगुण्य उघड करणें किंवा त्याची चर्चा करणें यांत कधींहि पडूं नकोस.

(५)  मला अद्याप पुष्कळ शिकावयाच़ें आहे, अर्थात् पुष्कळदां मीं च़ुकलेला असावयाचा, हें लक्षांत असूं दे; आणि तदनुसार नम्रतेनें बोल.

(६)  दुसऱ्यानें हांक मारली कीं तत्क्षणीं ऊठ; जें वाचीत अगर करीत बसला असशील तें संपेपर्यंत थांबूं नकोस. ज़र तूं त्या वेळीं एकादें महत्त्वाचें कर्तव्य करीत असलास तर गोड शब्दांनीं तसें सांग.

तुला जास्त ज़वळ करण्याच़ें माझ्या मनांत आहे. हे नियम ज़र तूं पाळलेस, तर लवकरच़ मला तसें करतां येईल. तोंवर माझ़ा वरदहस्त तुझ्यावर राहील. '

______________

 
वरील उपदेशांत विशेष काय आहे, असें कित्येक वाचकांस वाटेल. ह्या अगदीं साध्या गोष्टी आहेत, त्यांत नवलपरीच़ें कांहीं नाहीं, हें पाहून कदाचित् त्यांची निराशाहि होईल. कांहीं मंडळींना हा उपदेश इतका बालबोध वाटेल कीं, ते त्याकडे तुच्छतेच्या नज़रेनें पाहूं लागतील. अध्यात्ममार्गावरच़ा उपदेश म्हणजे कांहीं सर्कशींतल्या कोलांट्यांसारखा निसर्गविरुद्ध असला पाहिजे असें नाहीं. जगांत लोकांनीं सर्वत्र इतक्या गुंतागुंती व भानगडी पसरलेल्या आहेत कीं, त्या भानगडींत  सतत पडणाऱ्या  माणसाला अध्यात्ममार्गावरच़ा उपदेश म्हणजे एक वांकडातिकडा चक्रव्यूह असला पाहिजे असें वाटण्याच़ा संभव आहे. पण ही समज़ूत अगदीं च़ुकीची आहे. साधेपणा, सरळपणा ही अध्यात्ममार्गाची मुहूर्तमेढ आहे. अध्यात्ममार्गानें ज़ाणें म्हणजे जगाच्या वातावरणांतून निघून जीवन्मुक्त ऋषींच्या वातावरणांत ज़ाणें होय. त्या वातावरणांतील विचार सीधा व सरळ असतो, तो सतत एका ध्येयाकडे जाणारा असतो, योग्य कोणतें आणि अयोग्य कोणतें हा भेदहि त्यांत स्पष्ट असतो, आणि सर्व प्रश्न सरळ असतात. शिष्याला या साध्या वातावरणांत साध्या वृत्तीनें रहावयाचें असतें. या साधेपणानेंच़ त्याला प्रगति करणें शक्य होत असतें. कांट्यांच्या कुंपणांत धोतर अडकलेला माणूस ज़सा चहूंबाज़ूंनीं अडकून राहिलेला असतो, तसें पुष्कळांचें जीवन नाना घोंटाळ्यांत गुंतून बसलेलें असतें. पण शिष्याला ती स्थिति घातक होय. शिष्याच़ें मन ज़ोरकस व विवेकी असावें लागतें. स्वतःच़ें जीवनसूत्र स्वतःच्याच़ हातीं घेणें आणि गुंतागुंती काढून तें सारें सीधें करणें हें त्याला अवश्य असतें, आणि धनुष्यापासून सुटलेला बाण ज़सा सरळ लक्ष्याकडे धांव घेत जातो, तसें त्याला जावयाच़ें असतें. तसें करणाराला व तशी वृत्ति ठेवणाराला वरील उपदेश उपयुक्त वाटेल व त्याच्यासाठींच़ तो आहे, हें वाचकांनीं विसरूं नये. त्याला वरील उपदेशांतील लहान गोष्टींच़ें अगत्य वाटल्याशिवाय राहणार नाहीं. कारण वर लिहिल्याप्रमाणें बारीक गोष्टी ह्या मनाच्या अंतःस्थितीच्या द्योतक असतात आणि म्हणून ती स्थिति सुधारून त्या बारीक गोष्टी बदलणें शिष्याला अत्यवश्य होत असतें.
 

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण ७ : पुढच्या दोन पायऱ्या