प्रकरण  पांचवें


पहिली  पायरी


मागील प्रकरणांत आम्हीं सांगितलें आहे कीं जीवन्मुक्त सद्गुरूंना एकदां माणूस ज़वळ करण्याइतका होतकरू वाटला कीं त्याच़ा व स्वतःच़ा ते एक ऋणानुबंध बांधतात. त्या ऋणानुबंधाला या ठिकाणीं 'पहिली पायरी' असें आम्हीं म्हणणार आहों. इंग्रजींत या पहिल्या पायरीला 'probation' म्हणतात. मराठींत 'परीक्षा' किंवा 'परीक्षण' ही संज्ञा प्रोबेशन् शब्दाला अन्वर्थक म्हणून उपयोगांत आणण्यास योग्य आहे. सरकारी नोकरींत कधीं कधीं कांहीं ज़ागांवर जीं माणसें नेमलेलीं असतात तीं प्रारंभीं कायमचीं नेमलेलीं नसतात. कांहीं दिवस तें काम त्यांस दिलेलें असतें. ते त्या कामास लायक आहेत कीं नाहीं हें पहिल्या प्रथम कांहीं काळ पाहण्यांत येतें; आणि मगच़ त्या माणसांस त्या ज़ागांवर कायम करण्यांत येतें. अध्यात्ममार्गावरील पहिल्या पायरीवर हाच़ प्रकार असतो.  जीवन्मुक्त सद्गुरु अमुक अमुक माणूस होतकरू आहे असें पाहून त्याच्याशीं आपला प्रथमच़ा ऋणानुबंध ज़ोडतात. त्यानंतर सद्गुरु त्याच़ें निरीक्षण करीत असतात आणि त्या निरीक्षणानंतर तो जास्त ज़वळ ओढण्यालायक आहे असा ज़र त्यांस अनुभव आला, तर ते त्याला दुसऱ्या पायरीवर आणतात. अर्थात् पहिल्या पायरीवर तो ज़णूं उमेदवारासारखा असतो, आणि त्यावेळीं त्यानें आपली लायकी सिद्ध करून दाखविली तरच़ सद्गुरु त्याला वरच्या पायरीवर ओढून कायमच़ा शिष्य म्हणून अंगीकारतात. य़ा वरच्या पायरीवर असतांना त्या माणसाला स्वीकारलेला शिष्य किंवा 'अनुगृहीत शिष्य' असें म्हणतां येईल. इंग्रजींत या पायरीला 'acceptance' म्हणतात व शिष्याला 'accepted disciple' म्हणतात. या पायरीवर ज़रूर तितकी वाढ झ़ाल्यावर सद्गुरु त्याला आणखी ज़वळ करितात. ही तिसरी पायरी होय. त्या पायरीवरील शिष्याला 'गुरुपुत्र' किंवा इंग्रजींत 'son of the Master' म्हणतात. या तिन्हीं पायऱ्या शिष्य व त्याच़े गुरु यांच्यामधील वैयक्तिक संबंधाच्या द्योतक आहेत. त्या पायऱ्यांवर सबंध ऋषिसंघ व तो शिष्य यांच़ा कांहींच़ ऋणानुबंध नसतो. सबंध ऋषिसंघाच़ा व शिष्याच़ा ऋणानुबंध ज्या पायरीनें ज़ोडला ज़ातो तिला पहिली महादीक्षा असें म्हणतात. इंग्रजींत 'first initiation' किंवा 'first great initiation' म्हणतात. ही पायरी व वर सांगितलेली गुरुपुत्राची तिसरी पायरी ह्या अगदीं एकमेकींशेज़ारच्या पायऱ्या आहेत. कधीं गुरुपुत्राची पायरी पहिल्या महादीक्षेच्या ज़रा अगोदर येते किंवा ज़रा नंतर येते. एखाद्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल विद्यार्थ्यांस शिकवीत असतांना कांहीं विद्यार्थ्यांस तो पहिल्या वर्गांत बसवील तर कांहींस दुसऱ्या वर्गांत बसवील. ज़ोंवर युनिव्हर्सिटीच्या परीक्षेच़ा संबंध आला नाहीं तोंवर कोणत्या विद्यार्थ्याच़ा प्रवेश कोणत्या वर्षाच्या वर्गांत व्हावा हें कॉलेजच़ा प्रिन्सिपॉल ठरवितो. तद्वत् वर ज्या पहिल्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत त्यांची स्थिति असते. कोणत्या शिष्यास केव्हां कोणत्या पायरीवर न्यावें हें जीवन्मुक्त सद्गुरु ठरवीत असतात. इतर जीवन्मुक्तांच़ा त्या पायऱ्यांशीं व त्या ऋणानुबंधाशीं कांहींच़ संबंध असत नाहीं; पण पहिल्या महादीक्षेची पायरी वेगळ्या प्रकारची आहे. त्या पायरीवर शिष्याच़ा नवा ऋणानुबंध त्याच्या सद्गुरूशीं व्यक्तिशः ज़ोडला ज़ात नाहीं, तर सर्व जीवन्मुक्तांच़ा ज़ो पृथ्वीवर एक संघ आहे त्याशीं तो ज़ोडला ज़ातो; आणि त्या संस्थेच़ा तो सर्वांत खालच़ा सदस्य होतो.


प्रारंभींच्या  पायऱ्या

शिष्याला पहिल्या महादीक्षेच्या पायरीवर न्यावें हा मुख्य हेतु सद्गुरूंच्या मनांत असतो आणि त्यासाठींच़ पहिल्या तीन पायऱ्या ठेवलेल्या असतात. पहिली महादीक्षा ही च़वथी पायरी होय असें मानलें तर त्याची पूर्वतयारी म्हणून पहिल्या तीन पायऱ्यांवर सद्गुरूंनीं शिष्याशीं वैयक्तिक ऋणानुबंध ज़ुळविलेले असतात असें म्हणावें लागेल. व्यक्तिशः स्वतःशीं शिष्याच़ा ऋणानुबंध ज़ुळवून शिष्याच्या योग्यतेबद्दल स्वानुभवानें त्यांची खात्री झ़ाली म्हणजे ते जीवन्मुक्त च़वथ्या पायरीवर शिष्याला नेऊन ऋषिसंघामध्यें त्याच़ा प्रवेश करवितात. एका देवळाला तीन पायऱ्या आहेत, तिसऱ्या पायरीपाशीं देवळाच़ा दरवाज़ा आहे, आणि आंत सर्व जीवन्मुक्त पुरुषांचें वसतिस्थान आहे, अशी कल्पना केली तर सामान्य जनसमूह या पायऱ्यांपासून बराच़ दूर आहे, कांहीं होतकरू माणसें ह्या पायऱ्यांच्या ज़रा ज़वळ आलीं आहेत, त्यांपेंकीं देवळांतल्या एका जीवन्मुक्तानें एका होतकरू माणसाच़ा हात धरून त्यास 'प्रोबेशन्'च्या अथवा उमेदवाराच्या पहिल्या पायरीवर आणिलें, कांहीं काळानें अनुगृहीत शिष्याच्या दुसऱ्या पायरीवर नेलें आणि तेथें शिष्यानें कांहीं अनुभव घेतल्यावर गुरुपुत्राच्या तृतीय पायरीवर शिष्य चढणार तों लगेच़ 'पहिली महादीक्षा' नांवाच़ा देवळाच़ा दरवाज़ा उघडून सर्व जीवन्मुक्तांनीं स्वतःच्या अधिपतीच्या संमतीनें त्या शिष्याला आंत घेतलें आहे असें दृश्य मनश्चक्षूंसमोर कल्पावें लागेल. यावरून लक्षांत येईल कीं पहिली 'महादीक्षा' ही एका अर्थानें तत्पूर्वींच्या पायऱ्यांच्या मानानें पुष्कळच़ महत्त्वाची पायरी असते. पुष्कळ लोक मुमुक्षुमार्गाचें प्रारंभस्थान पहिल्या महादीक्षेपासूनच़ गणतात आणि अगोदरच्या पायऱ्यांच़ा पूर्वतयारींत समावेश करतात.

या पायऱ्यांपैंकीं पहिलीच़ें कांहीं वर्णन आम्हीं या प्रकरणांत देणार आहोंत. दुसऱ्या पायऱ्यांची माहिती पुढें देऊं. या तिन्हीं पायऱ्यांचें रहस्य नीट ध्यानांत येण्यासाठीं पहिल्या महादीक्षेला काय काय गुण लागतात त्याची वाचकांस थोडी ओळख करून देणें अवश्य आहे. अध्यात्ममार्ग व त्यावरील सर्व पायऱ्या या कल्पनासृष्टींतील भराऱ्या आहेत असें कोणास वाटेल, पण तसें बिलकुल नाहीं. शाळेंतल्या वर्गांइतक्या त्या खऱ्याखुऱ्या पायऱ्या असतात. फार प्राचीन काळापासून त्या सांगितल्या आहेत. आज़हि त्या अस्तित्वांत आहेत आणि त्यांवर सध्यांहि कांहीं होतकरू माणसें उभीं आहेत. या पायऱ्यांवर ज़ाऊन पोहोंच़ण्यास माणसाच्या अंगीं कांहीं विशिष्ट गुण असावे लागतात. ते गुण शुष्क वादविवादासाठीं नसून प्रत्यक्ष आचरणांत आणण्यासाठीं असतात. पहिल्या महादीक्षेला विवेक, वैराग्य, षट्संपत्ति व मुमुक्षा हे गुण अवश्य असतात. जो माणूस विवक्षित प्रमाणांत ते गुण आपल्या रोज़च्या कृतींत उतरवील त्याला ऋषिसंघ आपला दरवाज़ा आज़हि खुला करण्यास तयार आहे. हे गुण वेदान्ताच्या ग्रंथांत दिलेले आहेत. पण सध्यां प्रायः त्यांचा वादविवादाकरतांच़ उपयोग करण्यांत येत असतो हें आपलें दुर्दैव आहे. हे गुण आज़ आचरणांत आणावयाच़े म्हणजे काय करावयाच़ें हा प्रश्न पुष्कळांच्या मनासमोर येत असतो. ज्या ज़ुन्या ग्रंथांतून हे गुण सांगितलेले आहेत त्या ग्रंथांच्या रचनेचा काळ व आज़चा काळ हे फार वेगळे आहेत. हल्लींची परिस्थिति फार बदललेली आहे. म्हणून आज़ माणसानें काय केलें पाहिजे तें त्या ग्रंथांवरून स्पष्ट होत नाहीं. त्या ग्रंथांवरील टीकाहि पांडित्याच्या दृष्टीनेंच़ प्रायः लिहिलेल्या असल्यामुळें ज्यास ते गुण प्रत्यक्ष संपादन करावयाच़े असतील त्याला त्या टीकांच़ाहि तादृश उपयोग होऊं शकत नाहीं. आज़ची लोकांची राहणी, आज़च़े चरितार्थाच़े उद्योग, आज़ची समाजव्यवस्था, आज़च्या गरज़ा व साधनें हीं पूर्वींच्या काळापासून इतकीं भिन्न आहेत कीं 'विवेक' या शब्दाचा अर्थ 'नित्य व अनित्य या गोष्टींचें तारतम्य' असें सांगितल्यानें माणसाच्या मनांत फारसा प्रकाश पडत नाहीं व आपल्या रोज़च्या आयुष्यक्रमांत  कोणता फरक केला पाहिजे तें त्याला समज़त नाहीं. ही अडच़ण दूर व्हावी म्हणून साधन-चतुष्टय या नांवाच़ें एक पुस्तक अलीकडे प्रसिद्ध करण्यांत आलें आहे व त्या पुस्तकामध्यें पहिल्या महादीक्षेस काय गुण लागतात त्याच़ें सुबोध, पांडित्यरहित व आज़च्या लोकांस आचरतां येईल, असें वर्णन केलेलें आहे. त्या पुस्तकाची पूर्वपीठिका येथें वाचकांसमोर ठेवणें ज़रूर आहे.

एक  छोटें  पुस्तक

हें पुस्तक १९१० सालीं प्रथम इंग्रजींत प्रसिद्ध झ़ालें. पुस्तक अगदीं छोटें असून पहिल्या महादीक्षेला जे चार गुण आवश्यक असतात त्यांची माहिती देणारीं चार अगदीं लहान प्रकरणें या पुस्तकांत आहेत. या पुस्तकाचें इंग्रजी नांव 'At the Feet of the Master' असें आहे. त्याचें मराठी भाषांतर १९१० सालीं महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती काशीबाई कानिटकर यांनीं केलें व त्यास त्यांनीं 'साधन-चतुष्टय' हें नांव दिलें. या पुस्तकाचीं सत्तावीस भाषांमध्यें भाषांतरें झ़ालीं आहेत आणि लक्षावधि प्रति छापण्यांत आल्या आहेत. श्री.जे.कृष्णमूर्ति नांवाचे जे आज़ एक जगप्रसिद्ध पुरुष आहेत त्यांच्या नांवानें हें पुस्तक छापलेलें आहे. ते तेरा वर्षांच़े असतांना त्यांनीं हें पुस्तक लिहिलें. महर्षि कुठूमी नांवाचे एक जीवन्मुक्त सध्यां हिमालयांत राहात असतात. त्यांची माहिती या पुस्तकांत पूर्वीं येऊन गेलेली आहे. ते कृष्णमूर्ति यांच़े गुरु होत. त्यांनीं त्यांना प्रथम पहिल्या तीन पायऱ्यांवरून क्रमानें नेलें आणि मग त्यांच़ा पहिल्या महादीक्षेच्या द्वारांतून प्रवेश करून देवविला. त्या पहिल्या महादीक्षेकरितां कोणते गुण आवश्यक आहेत, कोणती तयारी केली पाहिजे हें कृष्णमूर्तींना नीट समज़णें आवश्यक होतें, व ते वयानें अगदीं लहान -- तेरा वर्षांचे -- असल्यामुळें तें त्यांना अगदीं सुबोध व साध्या भाषेंत सांगणें ज़रूर होतें. त्या वेळीं कृष्णमूर्ति हे अड्यार येथें राहात असत, व थिओसॉफ़िकल् सोसायटींतील एक सर्वमान्य पुढारी श्री.लेडबीटर् हेहि अड्यारलाच़ असत. मास्टर कुठूमी हे लेडबीटर् यांच़ेहि गुरु आहेत. कृष्णमूर्ति वयानें लहान असल्यामुळें लेडबीटरसाहेब त्यांना त्या वेळीं हरएक प्रकारची मदत करीत असत. निद्रेमध्यें स्थूल देह शय्येवर विश्रांति घेत असतां प्रत्येक सुसंस्कृत माणूस आपल्या सूक्ष्म देहानें आपल्या उत्क्रांतीच्या मानानें कमी अधिक व्यवहार करूं शकतो. तदनुसार कांहीं दिवस रोज़ रात्रीं श्री.लेडबीटर् हे कृष्णमूर्तींना सूक्ष्म देहानें तिबेटांत कुठूमी ऋषींच्या निवासस्थानीं घेऊन ज़ात आणि त्या वेळीं पहिल्या महादीक्षेला काय तयारी लागते व कोणते गुण अंगीं आणावे लागतात यांविषयीं उपदेशपर माहिती ते महर्षि कृष्णमूर्तींना रोज़ सांगत. दर वेळीं ते सुमारें पंधरा मिनिटें हा उपदेश करीत आणि सरतेशेवटीं आपण सांगितलेल्या उपदेशाच़ा एक दोन सोप्या वाक्यांत सारांश काढून त्यांना तो पुन्हां ऐकवीत व कृष्णमूर्ति तीं वाक्यें पाठ करीत. रोज़ सकाळीं उठल्यावर त्यांना त्या वाक्यांच़ें स्मरण असे व ते तीं क्रमानें लिहून काढीत. हें त्यांचें लिखाण अड्यार येथें होत असे. पुढें त्यांची नक्कल करण्यांत येऊन ती मास्टर कुठूमी यांना दाखविण्यांत आली आणि त्यांनीं त्यांत कांहीं दुरुस्ती केल्यावर त्या उपदेशाच़ें म्हणून वरील छोटें पुस्तक छापण्यांत आलें.

या पुस्तकाच्या प्रारंभींच़ कृष्णमूर्तींनीं लिहिलें आहे कीं, 'हे शब्द माझ़े नाहींत. ज्या गुरुदेवांनीं मला शिकविलें त्यांच़े हे शब्द आहेत.'  त्यांनीं असेंहि म्हटलें आहे कीं, हे शब्द खरे आहेत, सुंदर आहेत, असें म्हणून भागणार नाहीं, उपाशी माणसानें अन्नाकडे नुसतें पाहून तें च़ांगलें आहे असें म्हटल्यानें भागत नाहीं, तर हात पुढें करून तें अन्न खाल्लें पाहिजे. या पुस्तकास डॉ.बेझंट् यांनीं प्रस्तावना लिहिली आहे आणि या पुस्तकांतील उपदेशानुसार माणसाच़ें

ज़र  आचरण  घडेल

तर पहिल्या महादीक्षेच़ें द्वार त्याच्यासमोर अवश्यमेव उघडेल, असें त्यांनीं प्रस्तावनेंत लिहिलें आहे. या पुस्तकाच़ा सर्वांत मोठा गुण असा आहे कीं तें एखाद्या भाषापंडितानें पांडित्यचर्चेसाठीं लिहिलेलें नसून ज्यांना ह्या मार्गाची पूर्ण माहिती आहे अशा जीवन्मुक्त ऋषींनीं त्यांतील मज़कूर सांगितलेला आहे. आणि पुस्तक अगदीं सोप्या भाषेंत आणि वाक्यांतील शब्दांची ओढाताण करून त्यांतून अनेक अर्थ काढतां येणार नाहींत अशा खबरदारीनें लिहिलें आहे. पुस्तकांत काव्य, उपमा, अलंकार वगैरेंची आरास नाहीं. नक्की काय केलें पाहिजे तें अगदीं स्पष्ट रीतीनें आणि सोप्या शब्दांनीं सांगितलेलें आहे. या उपदेशाप्रमाणें वागणें सोपें आहे असें कोणाच़ेंहि म्हणणें नाहीं. इतर ग्रंथ वाचले असतां आपण नक्की कोणते गुण अंगीं आणले पाहिजेत, कसें वागलें पाहिजे हें तपशीलवार समज़णें कठीण ज़ातें. त्या ग्रंथांतील काव्यालंकारांचे अनेक लोक अनेक अर्थ करतात आणि आचरणाच्या अडच़णीबरोबर खरा अर्थ निश्चित करण्याची आणखी एक अडच़ण सोसावी लागते. प्रस्तुत पुस्तक स्पष्टार्थात्मक असल्यामुळें त्यासंबंधानें असली अडच़ण संभवत नाहीं. तेव्हां ज्यांस या मार्गानें प्रगति करावयाची असेल त्यांना या पुस्तकाच़ा अत्यंत उपयोग होण्याज़ोगा आहे, हें सांगणें नकोच़.

पहिल्या पायरीवर ज़ो होतकरू माणूस ज़ाईल त्याची पुढची दृष्टि पहिल्या महादीक्षेच्या दरवाज्यावर असली पाहिजे हें यावरून उघड आहे. त्या दरवाज्यांतून पुढें ज़ाण्याकरितांच़ शिष्य पहिल्या पायरीवर येत असतो. अर्थात् पहिल्या महादीक्षेकरितां जे गुण अंगीं असणें ज़रूर आहे ते आणण्याची खटपट करणें हें त्याचें सर्वांत महत्त्वाचें काम असतें. मुमुक्षुमार्गावरच्या ह्या व ह्यापुढच्या ज्या अनेक पायऱ्या आहेत त्यांवर पाऊल पडण्यास माणसाच्या अंगीं कांहीं विशिष्ट गुण लागत असतात. ते गुण त्यानें अंगीं आणल्याशिवाय त्याला त्या पायरीवर नेण्यांत येत नाहीं. प्रत्येक पायरीवर आल्यानंतर माणसाच्या ज्ञानांत भर पडून त्याच्या शक्तीच़ा विकास होत असतो आणि कांहीं अधिकार त्याला देण्यांत येतात. तसेंच़ प्रत्येक पायरीवर ज़ाण्याच़ा काहीं विधि किंवा समारंभ असतो.

पहिल्या  पायरीचा  हेतु
 
पहिल्या पायरीवर माणसास आणण्याच़ा हेतु असा असतो कीं शिष्य योग्य प्रकारच़ा आहे कीं नाहीं हें सद्गुरूंना प्रत्यक्ष अवलोकनानें ठरवितां यावें. कांहीं माणसें होतकरू दिसतात पण त्यांच़ा उत्साह कायम टिकत नाहीं. तेव्हां परीक्षा पाहूनच़ नवीन उमेदवारास कायमच़ें स्वीकारणें अवश्य असतें. पहिल्या पायरीवर ही परीक्षा घेतली ज़ाऊन तो जास्त ज़वळ करण्यालायक आहे कीं नाहीं
हें त्याच़े सद्गुरु ठरवितात. त्यांना अंतर्दृष्टीनें जीं जगांतील माणसें होतकरूशीं वाटत असतात त्यांच्याकडें त्यांचें सदा लक्ष असतें व ते त्यांच्याकडे निरनिराळ्या प्रकारच्या प्रेरणा पाठवून किंवा अन्य त-हेनें त्यांच्या प्रगतीस साहाय्य करीत असतात, हें आमच्या वाचकांनीं पूर्वीं पाहिलें आहेच़. या होतकरू माणसांपैंकीं एखाद्या माणसास उमेदवार किंवा 'प्रोबेशनर्' म्हणून पहिल्या पायरीवर आणणें योग्य आहे असें जीवन्मुक्त गुरूंना वाटलें म्हणजे ते आपल्या एखाद्या वरिष्ठ शिष्याला भुवर्लोकांतील भूमिकेवर 'त्याला आमच्याकडे घेऊन या' अशी आज्ञा करितात, तो समोर आला कीं त्याला दोन शब्द सांगतात, त्यानें एखादी बरी गोष्ट केलेली असली तर त्याच़ें अभिनंदन करतात व त्याच्या संबंधानें आपली अपेक्षा काय आहे, त्यानें पुढें काय केलें पाहिजे याची त्याला कल्पना करून देतात.  तसेंच़ ते त्याची एक जिवंत प्रतिमा योगसामर्थ्यानें निर्माण करितात व ती प्रतिमा आपल्या आश्रमाज़वळ कोठेंतरी ठेवतात. त्या शिष्याचा कारणदेह, मनोदेह, वासनादेह व प्राणमय कोष यांमधील सारीं द्रव्यें ह्या प्रतिमेंत असतात आणि प्रत्येक देहांत त्याच्या विचारांनीं व वृत्तींनीं जी चलबिचल प्रतिक्षणीं होईल तिच़ें प्रतिबिंब त्या प्रतिमेंत आपोआप व यथातथ्य उमटावें अशी योजना केलेली असते. शिष्य जगांत कोठेंहि असो, कांहींहि कार्य करीत असो, त्याच्या मनांत येणारे विचार, विकार, भावना वगैरे सर्व गोष्टींचें तंतोतंत प्रतिबिंब ह्या प्रतिमेंत उठावें अशा रीतीच़ा त्या शिष्याच़ा व प्रतिमेच़ा त्यांनीं संबंध ज़ोडलेला असतो. त्या प्रतिमेकडे सद्गुरु मधून मधून पाहतात. या निरीक्षणावरून शिष्याच्या मनांत कोणते विकार-विचार येऊन गेले, चिडखोरपणा, स्वार्थीपणा, निराशा, काळजी, विषयवासना, उदारपणा, आनंद, शांति वगैरेंपैंकीं कोणकोणत्या गोष्टींना त्यानें मनांत थारा दिला होता हें त्यांना दर वेळीं समज़ून येतें. त्यांच़ें हें निरीक्षण त्यांस ज़रूर वाटेल त्या मुदतीपर्यंत सुरूं असतें.  शिष्याच्या मनांत बराच़ काळपर्यंत भलत्या ऊर्मि आलेल्या नाहींत, संयमशक्ति व चित्तशुद्धि हीं ज़रूर त्या प्रमाणांत त्याच्या ठायीं आलीं आहेत असा जेव्हां त्यांना अनुभव येईल तेव्हांच़ ते त्याला पुढच्या पायरीवर नेतात.

सजीव  प्रतिमा
 
कारण ह्या पुढच्या पायरीवर शिष्याच्या ज़ाणिवेशीं गुरूच्या मनाचा असा कांहीं संबंध ज़ोडण्यांत यावयाच़ा असतो कीं गुरूच्या मनांत जे सदा उच्च प्रकारच़े स्पंद च़ालत असतात ते सर्व शिष्याच्या मनांत आपोआप उतरावे. अशा रीतीनें गुरूंच्या मनांतल्या ऊर्मि शिष्याच्या मनापाशीं येऊन पोहोंच़तात आणि शिष्याच्या मनांतली हालचाल हळूंहळूं त्या धोरणानें व्हावयास सुरुवात होते व क्रमशः शिष्याच़ें अंतरंग गुरूच्यासारखें निर्मळ, निःस्वार्थी व ज़ोरकस होऊं लागतें. ज्याप्रमाणें शिष्याच्या मनांत गुरूंच्या मनांतल्या लाटा येऊन पोहोंच़तात त्याप्रमाणेंच़ शिष्याच्या मनांतल्या लाटाहि गुरूकडे ज़ाऊन पोहोंच़तात. ज़र शिष्याच्या मनांत वाईट विकार व वासना आल्या तर त्याच्या ऊर्मि गुरूच्या हृदयांत ज़ाऊन धडकतात व त्यांच़ा त्यांना उपसर्ग होऊन त्यांच्या उद्योगांत व्यत्यय येतो. हे जीवन्मुक्त पुरुष अत्यंत उद्योगी असतात. त्यांच्या अंतरंगांत वाईट प्रकारच्या ऊर्मि अशा रीतीनें उत्पन्न झ़ाल्या तर त्यांना आपल्या शिष्याशीं ज़ोडलेला ज़ाणिवेचा संबंध कांहीं काळ तोडावा लागतो; आणि असें वारंवार करण्याच़ा प्रसंग आला तर त्यांना त्याची मोठी अडचण होते. यासाठीं ते पहिल्या पायरीवर शिष्याची कसोटी बराच़ काळ पाहतात आणि ज्या शिष्याच्या मनांत असल्या घाणेरड्या व वाईट ऊर्मि उठण्याच़ा संभव असेल त्याला दुसऱ्या पायरीवर घेतच़ नाहींत. यासाठीं पुष्कळ दिवस त्या जिवंत प्रतिमेच़ें अवलोकन करून स्वतःची खात्री करून घेणें त्यांना अवश्य होतें.

या सजीव प्रतिमेंत शिष्याच्या मनांतले गुण व दोष हे दोन्हीं प्रतिबिंबित होत असतात. नुसते दोष नसणें ही अभावात्मक स्थिति आहे. ती पुरी पडत नाहीं. अंगीं प्रत्यक्ष  सद्गुण मुसमुसत असणें, सर्वांसंबंधानें प्रेमाची उत्कट भावना असणें आणि हातूंन सदा सत्क्रिया होणें हें शिष्याला अत्यवश्य असतें. शिष्यानें एखादी विशेष च़ांगली गोष्ट केली तर तिच़ेंहि प्रतिबिंब त्या प्रतिमेंत उमटतें व त्या प्रतिमेकडे पाहतांना सद्गुरु त्या प्रतिमेच्या द्वारानें शिष्याच्या अंतरंगांत उत्तेजक प्रेरणाहि पाठवितात.

याखेरीज़हि त्यांच़ें त्या उमेदवाराकडे लक्ष असतें. एखादें च़ांगलें काम त्याच्या नज़रेसमोर आणावें आणि तो तें करतो कीं नाहीं, केल्यास तो कसें करतो तें पहावें असेंहि ते मधून मधून करतात. पुष्कळदां आपल्या एखाद्या वडील शिष्याला सांगून त्याच्या द्वारानें त्याच्यासमोर ते कांहीं कामें ठेवितात. नवीन उमेदवाराला च़ांगल्या च़ांगल्या गोष्टी करण्याची संधि देणें, हें काम सद्गुरूंनीं बहुशः आपल्या वडील शिष्याकडे सोंपविलेलें असतें. उमेदवारावर आणीबाणीच़े व भयंकर प्रसंग मुद्दाम आणून त्याच़ें सत्त्व पहावें किंवा त्याची त्रेधा उडविण्यासारखें दिव्य त्याच्याकडून बुद्ध्या करवावें, असें गुरूंच़ें धोरण नसतें. या पहिल्या पायरीवरच़ा शिष्य ज़र वयानें प्रौढ असेल तर त्याच़ा रोज़च़ा व्यवहार ते त्याला बिनबोभाट करूं देतात आणि तो च़ालूं असतांना रोज़च्या अडच़णींत व प्रसंगांत त्याच़ें वागणें कसें असतें यावरून ते त्याची परीक्षा करतात. तो वयानें लहान असेल तर त्यानें काय काम करावें, त्याच़ें शिक्षण काय असावें, वगैरेंसंबंधानें ते त्याला सूचना करतात व कधीं कधीं उत्तेजनपर संदेशहि पाठवितात. 

ह्या पहिल्या पायरीवर शिष्याला घेण्याची क्रिया भुवर्लोकाच्या भूमिकेवर होत असते. शिष्य आपल्या वासनादेहानें सद्गुरूच्या ज़वळ गेलेला असतो. स्थूलदेहांतून वासनादेह बाहेर काढणें व त्या देहानें दूर ज़ाणें ही क्रिया शिष्याच्या सरावाची पूर्वींच़ झ़ालेली असते. त्याच्या वासनादेहाच़ा विकासहि साधारण बरा असा झ़ालेला असतो. माणसाच़े नेहमींच़े उद्योग, शिक्षण, संसारांतल्या भावनांच्या ऊर्मि वगैरेंनीं प्रत्येक माणसाच्या वासनादेहाच़ा विकास थोडाफार होत असतो. जितकें माणसाच़ें वर्तन शुद्ध असेल, जीवन श्रेष्ठ भावनांनीं जितकें परिपूर्ण असेल, त्या मानानें तो देह अधिकाधिक विकसित व कार्यक्षम होत असतो आणि झ़ोंपेच्या वेळीं स्थूलदेहापासून दूर अंतरावर ज़ाऊन माहिती मिळविणें, भुवर्लोकांत निरनिराळे उद्योग करणें वगैरे गोष्टी त्याला साधूं लागतात. पहिल्या पायरीवर येण्याच्या अगोदरच़ शिष्याच़ा हा विकास बऱ्या प्रमाणांत झ़ालेला असतो. पण आपण वासनादेहानें काय काय उद्योग केले त्याची प्रायः त्याला जागृत स्थितींत आठवण राहात नाहीं. एखादे वेळीं अंधुक अंधुक आठवण त्याला येते आणि आपण स्वप्न पाहिलें, असें त्याला वाटतें. तो उच्च प्रकारच़ा अनुभव असला तर 'दृष्टान्त' झ़ाला असेंहि तो म्हणतो; कधींकधीं तपशील कांहीं आठवत नाहीं, नुसता मनाला झ़ालेला आनंद आठवतो. ज़ो माणूस या पहिल्या पायरीच्या ज़वळ आलेला असेल त्याला जीवन्मुक्त ऋषि आज़ अस्तित्वांत आहेत, ते होतकरू माणसांना हातीं धरतात, त्या मार्गावर अनेक पायऱ्या आहेत, ऋषि आपल्या शिष्यांशीं जे संबंध ज़ोडतात त्यांच्या आठवणीला लोक दृष्टान्त म्हणतात, वगैरे गोष्टींची पुस्तकांतून म्हणा किंवा दुसऱ्या माणसांच्या सहवासानें म्हणा थोडीतरी माहिती झ़ालेली असते. त्या माणसाला सद्गुरु जेव्हां पहिल्या पायरीवर नेतात तेव्हां कधीं त्याची जागृतींत त्याला आठवण राहते, तर कधीं राहात नाहीं. आठवण असण्याच़ा उपयोग असतो आणि तोटाहि असतो. आठवण असली तर मनाला समाधान वाटतें, उत्तेजन मिळतें आणि जागृतींतल्या त्याच्या साऱ्या उद्योगांना विवक्षित अशी दिशा आपोआप लावून तो ते उद्योग नेटानें करीत राहतो. उलट पक्षीं मलाच एकट्याला 'दृष्टान्त' झ़ाला, तेव्हां मीं विशेष योग्यतेच़ा आहें असें त्याला वाटून त्याच्या अंगीं ताठाहि येण्याच़ा संभव असतो; आणि तपशीलवार आठवण नसती तर अस्पष्ट अंतःस्फूर्तीनें जितकें सत्कार्य त्याच्या हातूंन घडलें असतें त्या मानानें अंगीं अभिमान चढल्यामुळें कमी सत्कार्य त्याच्या हातूंन व्हावें असाहि उफराटा संभव उत्पन्न होतो. कधीं कधीं या प्रसंगाची त्याला ज़ागेपणीं आठवण होत नाहीं. पण ज्या वडील शिष्यानें त्याला सद्गुरूसमोर नेलें असेल तो शिष्य किंवा दुसरा कोणीं जास्त अधिकाराच़ा शिष्य त्याला भेंटून त्याला ती गोष्ट सांगतो. असल्या आंतर अनुभवाची आठवण असते कीं नाहीं, असली तर कितपत असते, दुसरे त्याला ती आठवण देतात कीं नाहीं, यांविषयीं सर्वत्र एक नियम असलेला आढळून येत नाहीं. ही गोष्ट या मार्गावरील पुढच्या कित्येक पायऱ्यांसंबंधानेंहि खरी आहे. प्राणमय कोषांतील चक्रें कुंडलिनीच्या शक्तीनें फुलवून किंवा विशिष्ट प्रकारें ध्यानधारणादि साधन करून ही आठवण स्वतःच्या सामर्थ्यानें जागृतींत आणण्याची कला या मार्गावर तो पुढें यथाकाल शिकतो आणि त्यानंतर सूक्ष्म भूमिकांवर काय काय झ़ालें, त्याची संपूर्ण स्मृति त्याला दृश्य जगांत वावरत असतांना राहूं लागते. कांहीं शिष्यांना ही कला अगोदर शिकविली ज़ाते, कांहींना फार पुढें गेल्यावर शिकविली ज़ाते. अर्थात् जागृतींत आठवण आहे किंवा नाहीं यावरून शिष्याची प्रगति किती झ़ाली आहे याचें निश्चित अनुमान निघूं शकत नाहीं. शिष्यास दिलेलें काम, त्याची मनोरचना, जगाची गरज़, शिष्यास त्या आठवणीचा उपद्रव होऊन त्याच्या कामास व्यत्यय येईल कीं काय वगैरे अनेक गोष्टींवर आठवणीच़ा प्रश्न अवलंबून असतो.

शिष्याला पहिल्या पायरीवर नेण्याच्या बाबतींत किंवा त्या मार्गावरील इतर कोणत्याहि पायरीसंबंधानें पक्षपात होण्याचा यत्किंचितहि संभव असत नाहीं, हें आम्हीं पूर्वीं सांगितलेंच़ आहे, आणि पुनः एकवार त्याची येथें पुनरुक्ति होणें ज़रूर आहे. जीवन्मुक्त ऋषींना भोंवतालच्या माणसांबद्दल कमीअधिक प्रेम वाटत नाहीं असें नाहीं. कांहीं ऋणानुबंधांमुळें एकावर त्यांच़ें जास्त प्रेम असावें, दुसऱ्यावर कमी असावें असेंहि त्यांच्या संबंधानें होऊं शकतें. गीतेंत अर्जुनाला श्रीकृष्णांनीं सांगितलें आहे कीं, 'तूं मला अत्यंत प्रिय आहेस' ('इष्टोसि मे दृढमिति' अ.१८ श्लोक ६४). उद्धवावर त्यांच़ा फार लोभ होता, हें प्रसिद्ध आहे. बुद्धांचा 'आनंद' नांवाचा शिष्य विशेष आवडता होता हेंहि सर्वविश्रुत आहे. पण ज़री जीवन्मुक्त ऋषींचें वैयक्तिक प्रेम एकावर जास्त व दुसऱ्यावर कमी असलें तरी शिष्याची निवड करतांना ते आपली आवड साफ़ बाज़ूस सारून योग्य त्या माणसाला निर्विकार मनानें निवडूं शकतात. सिद्धसंघाच्या कामाच़ा हा प्रश्न असतो आणि ते कार्यार्थी असल्यामुळें ज्याला योग्यता असेल त्यालाच़ निवडतात. एखादा माणूस दिसण्यांत तितका लायक न वाटला तरी ज़र भावी थोरपणाचीं उत्कृष्ट बीजें त्याच्यामध्यें असतील, तर जीवन्मुक्त पुरुष त्याला साहाय्य करण्याची व ज़वळ करण्याची विशेष खटपट करतील. शिष्याला ज़वळ करतांना ते कशा प्रकारच़ा हिशेब करतात तें आम्हीं  पूर्वीं दिलेंच़ आहे. आपणांला तो हिशेब नीट समज़त नाहीं आणि म्हणून ह्या माणसाला कां ज़वळ ओढला व त्या माणसाला कां ओढला नाहीं, अशा शंका आपल्या मनांत येणें शक्य आहे. याच़ें कारण आपलें मन वैयक्तिक आवडीनिवडींच्या चष्म्यांतून या प्रश्नाकडे पाहत असतें हेंच़ होय. एखाद्या माणसांत एखादा दोष उघड दिसत असतो; पण त्या दोषामुळें कामांत जितकें विघ्न येण्यासारखें असेल त्यापेक्षां त्या माणसाच्या अंतरंगांत असलेल्या गुणांनीं जीवन्मुक्तांनीं योजलेल्या कामाची जास्त प्रगति होण्यासारखी असली तर सद्गुरु त्या माणसाला ज़वळ ओढतील. त्यावरून त्यांना तो दोष दिसत नाहीं असें कोणीं समज़ूं नये. कोणत्या दोषानें कार्याचें किती नुकसान होईल हें त्यांस जास्त च़ांगलें समज़तें. त्यांच्या हिशेबांत पूर्वजन्मींच्या तयारीच़ा व कर्माच़ाहि संबंध येत असतो. एका माणसाला पहिल्या पायरीवर ओढलेलें असलें आणि दुसऱ्याला ओढलेलें नसलें, तर पहिला माणूस दुसऱ्यापेक्षां सर्व बाबतींत श्रेष्ठ असेलच़ असा त्याच़ा अर्थ नाहीं. पहिल्यांत दोष असतील व दुसऱ्यांतहि दोष असतील. जगाच्या दृष्टीनें पहिल्या माणसाला कमी मार्क पडावे व दुसऱ्या माणसाला अधिक पडावे, असेंहि होऊं शकेल. पण पहिल्याच़े दोष असे असणार कीं सद्गुरूंच्या योजनांवर व त्यांच्या कार्यावर त्या दोषांपासून त्या दुसऱ्या माणसाच्या दोषांइतका दुष्परिणाम होणार नाहीं.

या त्याच्या पुढच्या पायरीवरच्या शिष्यानें अष्टौ प्रहर आपल्या गुरूविषयीं विचार करीत राहिलें पाहिजे असें बिलकुल अवश्य नाहीं. पण गुरूंच़ा विचार त्याच्या मनाच्या पार्श्वभागीं सतत असला पाहिजे; म्हणजे ज़रूर तेव्हां तो आपल्या मनासमोर त्याला सहज़ आणतां येईल. मनाची करमणूक करणें, त्यासाठीं योग्य प्रमाणांत खेळणें, कादंबऱ्या वाच़णें वगैरे गोष्टींना हरकत नाही. कारण मनाच्या तंबोऱ्याची तार सदा खुंटी पिरगळून ज़ोरानें ताणणें योग्य नसतें. पण शिष्याच्या करमणुकींत अश्लीलतेच़ा किंवा मलिनपणाच़ा कोणताहि भाग असतां कामां नये; तसेंच दुष्टपणा, क्रूरपणा हींहि उपयोगाचीं नाहींत. असा विचार शिष्याच्या मनांत कदापि येतां कामां नये, कीं ज़ो सद्गुरूंनीं पाहिल्यास शिष्याला मान खालीं घालावी लागेल. शिष्याच्या वाचनांतलीं नाटकें व कादंबऱ्या नीट निवडलेल्या असाव्यात. असद्वृत्ति व घाणेरडे विचार उत्पन्न करणाऱ्या कादंबऱ्या, दुष्कृत्यांस गौरविणारीं पुस्तकें, क्रूरपणाचीं व दुष्टपणाचीं हिडिस कृत्यें रंगवून सांगणारीं वर्णनें, जीवनांतल्या वाईट गोष्टींकडे लक्ष वेधणाऱ्या सत्यकथा, या त्यानें आपल्या वाचनांतून अजिबात गाळून टाकल्या पाहिजेत. मनाला विश्रांति देण्यासाठीं एखादा खेळ खेळणें किंवा पाहणें यांत कांहीं वावगें नाहीं; पण ज्या खेळांत क्रूरपणा असेल, माणसाला किंवा मुक्या ज़नावराला इज़ा पोहोंच़ण्याचा संभव असेल, ज्यांत लुच्चेगिरी, फटफजिती, आरडाओरडा, मारामारी वगैरे असंस्कृत प्रकार असतील ते त्याला हानिकारक होत. पुष्कळ शिष्य वयानें तरुण असतात. गंमत करणें, मजा मारणें, मौज़ेच्या गोष्टी ऐकणें-वाचणें-पाहणें आणि आनंदित मनानें हंसणें, ह्याला ह्या अध्यात्ममार्गावर बिलकुल हरकत नाहीं; त्याच़ा तरुणांना फायदा होतो. पण त्यांत अभद्रपणा, मलिनपणा, वात्रटपणा, असभ्यपणा, खुळेपणा यांच़ा कांहींच़ भाग असतां कामां नये, हें तरुणांनीं लक्षांत ठेविलें पाहिजे. दुसऱ्याची टवाळी करण्याची वृत्तीहि त्यांच्या करमणुकींत असतां कामां नये. ज्या मौज़ेंत सौजन्य, सदभिरुचि व सुसंस्कृतपणा यांची पायमल्ली होत असेल तिच्यापासून त्यानें सदा दूर राहणें अवश्य आहे.

या मार्गाला लागलेला शिष्य ज़र अनुकूल वातावरणांत राहत असेल, तर त्याच़ा फायदा होतो व त्यानें त्याची प्रगति जलदीनें होते. गाणाऱ्याच्या संनिध वारंवार आलाप ऐकत बसल्यानें देहावर व मनावर परिणाम होऊन गाण्याची क्रिया ज़शी थोडीबहुत सोपी होते तसाच़ हा प्रकार आहे. जीवन्मुक्त पुरुष म्हणजे सर्व बाज़ूंनीं परिपूर्ण झ़ालेले पुरुष. त्यांचे स्थूल-सूक्ष्म सारे देह निर्मल असून त्यांतून सभोंवार सदा चैतन्याच्या ऊर्मि ज़ोरानें वाहत असतात. शिष्याच़े देह अद्यापि निर्मल झ़ालेले नसतात. ते निर्मल व ज़ोरकस व्हावे असा त्यांच़ा प्रयत्न असतो. सद्विचार व सद्वासना या त्याच्या मनांत आल्या कीं एका विशिष्ट तऱ्हेचीं आंदोलनें त्याच्या सूक्ष्म-देहांत सुरूं होतात; त्यामुळें एक विशिष्ट प्रकारच़ें द्रव्य त्या देहांत उत्तेजित होतें. तें द्रव्य बाहेरच़ें तशाच़ प्रकारच़ें द्रव्य देहांत आकर्षित करतें आणि ज़र त्या माणसानें सद्विचार-सद्वासना एकसारख्या ज़ोरानें मनांत आणण्याचा मुद्दाम प्रयत्न ठेवला, तर इष्ट प्रकारच़ें द्रव्य देहांत जास्त जास्त प्रमाणांत  ज़मतें आणि त्या आंदोलनांनीं तद्विरुद्ध द्रव्य खिळखिळें होऊन हळूंहळूं देहाबाहेर झ़टकलें ज़ातें. अशा रीतीनें सर्व देह पूर्णपणें शुद्ध करणें शक्य आहे. पण ही क्रिया एकसारखी च़ालूं ठेवणें फार कठीण असतें.  माणसाच्या मनांत वाईट वासना व विचार न बोलावतां पुनः पुनः येत असतात. त्या साऱ्या बंद करणें अतिशय कठीण ज़ातें, आणि तें करतां करतां माणसाचा जीव मट्ट्यास येतो.  वाईट विचार मनांत आले म्हणजे सूक्ष्म देहांतलें च़ांगलें द्रव्य खिळखिळें होऊन वाईट द्रव्य दृढमूल होऊं पाहतें व तें जास्त जास्त वाढतें; म्हणूनच़ चित्त शुद्ध करण्याची क्रिया एकसारखी च़ालूं राहत नाहीं; शिवावें व पुनः उसवावें, पुनः शिवावें व पुनः उसवावें अशासारखा प्रकार सुरूं होतो आणि प्रगतीला व्यत्यय येतो. ज़र एखादा जीवन्मुक्त ऋषि शिष्याच्या संनिध असला तर या प्रगतीच्या बाबतींत शिष्याला फार फ़ायदा होईल. त्याच्या सूष्म देहांतील आंदोलनें ज़ोरानें चालूं असतात व तीं शिष्याच्या सूक्ष्म देहावर आदळून त्यांवर आपली छाप बसवितात व अशा रीतीनें शिष्याच्या स्वतःच्या प्रयत्नास दुज़ोरा मिळून असद्वृत्तीची एकसारखी पिछेहाट होते; म्हणूनच़ सत्संगाच़ा एवढा महिमा संतांनीं गाइला आहे. पण अशा प्रकारें ज़री जीवन्मुक्त ऋषींच्या सहवासापासून माणसाला फायदा होत असला, तरी जीवन्मुक्त ऋषींना दुसरीं जास्त महत्त्वाचीं कामें असल्यानें ते शिष्यसमुदायामध्यें येऊन राहूं शकत नाहींत. मात्र कधीं कधीं एखाद्या वडील शिष्याच्या सहवासांत नवीन शिष्यांनीं राहावें अशी व्यवस्था ते करूं शकतात व त्याच़ा त्या नव्या शिष्यांना फार फ़ायदा होतो. तोहि अर्थात् सदरीलप्रमाणेंच़ होतो. हा फ़ायदा ज़र माणसाला पदरांत पाडावयाचा असेल तर तशा दिशेच़ा त्याच़ा स्वतःच़ा प्रयत्न पाहिजे; तो चित्तशुद्धीच़ा तसा प्रयत्न स्वतः करीत नसेल तर 'पालथ्या घागरीवर पाणी' असें मात्र होईल.

प्रारंभींच्या  अडचणी
 
मीं अध्यात्ममार्गानें पुढें ज़ाऊन स्वतः मुक्तिपद गांठणार, असा संकल्प माणसानें केला आणि तदनुसार तो वागूं लागला, कीं त्याच्या अडच़णी जास्त होतात हें येथें नमूद करणें अवश्य आहे. माणूस उत्क्रांतिमार्गावर प्रारंभीं वाईट कर्मच़ फार जास्ती प्रमाणांत करतो. दुःख भोगणें हा वाईट कर्माच़ा निसर्गसिद्ध परिणाम आहे. प्रारंभीं जीव तितका ज़ोरदार नसतो, पण वाईट कर्म मात्र तो जास्त प्रमाणांत करीत असतो. त्या साऱ्या वाईट कर्मांचे परिणाम त्याला लगेच़ त्याच्या पुढच्या जन्मांत भोगावयास लावले तर इतक्या मोठमोठ्या आपत्ति त्याच्यावर कोसळतील कीं, त्या त्याच्यानें सहन करवणार नाहींत; आणि त्या भाराखालीं तो चिरडून ज़ाईल. तसें करणें म्हणजे ज्या अर्भकाला अद्याप च़ालावयासहि येत नाहीं त्याच्या डोक्यावर प्रचंड दगड ठेवून त्या भाराखालीं त्याला चिरडण्यासारखें होय. असे दुष्परिणाम होऊं नयेत म्हणून माणसास दर नवीन जन्मीं जें 'प्रारब्ध' कर्म भोगण्यासाठीं द्यावयाच़ें असतें, त्यांतल्या च़ांगल्या-वाईट भागांतील प्रमाणांत कर्मदेवता कमी अधिक करीत असतात. एकंदर कर्मांत कोणाला कांहीं कमी वा जास्ती करतां येत नाहीं. पण त्या एकंदर कर्माच्या 'संचित'रूपी सांठ्यांतून दर जन्मीं कोणता व किती भाग माणसास भोगावयास द्यावा, याची व्यवस्था कर्मदेवता करीत असतात. प्रारंभींच्या अनेक जन्मांत माणूस वाईट कर्म जास्त प्रमाणांत करीत असतो, व त्याचें सामर्थ्य अगदीं बेताच़ेंच़ असल्यामुळें फार दुःख त्याला भोगण्यास दिलें तर तो चिरडून ज़ाईल अशी त्याची स्थिति असते. म्हणून कर्मदेवता त्या वेळच्या त्याच्या दर जन्मींच्या प्रारब्ध-कर्मांत दुःखाच़ा भाग त्या मानानें कमी घालतात आणि सुखाच़ा अधिक घालतात. पण असें केल्यानें त्याच्या एकंदर 'संचित' कर्मांत वाईट कर्म जास्त शिल्लक राहतें व च़ांगलें कमी राहतें. पुढें माणूस जास्त जास्त खंबीर व टणक बनूं लागतो, आणि निवृत्तिमार्गावर आल्यानंतर तर तो अत्यंत धैर्यशाली व कणखर झ़ालेला असतो. 'मऊ मेणाहूनि आम्हीं विष्णुदास। कठीण वज्रासि भेदूं ऐसे।' असें तुकाराम म्हणतात. अर्थात् अशा प्रकारें तो ज़ोरदार बनला कीं, शिल्लक राहिलेल्या वाईट कर्माच़ा जास्त भाग त्याच्या दर जन्मींच्या प्रारब्धांत कर्मदेवता घालूं लागतात. ज़ो माणूस गुरुमार्गावर, मुमुक्षुमार्गावर ज़ाऊं इच्छितो त्याला आपली प्रगति थोड्या जन्मांत संपवून टाकावयाची असते. अर्थात् अशा माणसाच्या प्रारब्धांत जास्त संकटें कर्मदेवतांना घातल्याविना गत्यंतर नसतें. जगांतील सर्व साधुसंतांना अनंत दुःखें भोगावीं लागतात अशी सर्व धर्मांची साक्ष आहे. हरिश्चंद्राची गोष्ट ही त्या स्थितीचें रूपकात्मक वर्णन आहे. हीं दुःखें कधीं पहिल्या महादीक्षेवर येण्याच्या अगोदर जास्त येतात, कधीं त्याच्या पुढें येतात. तीं नक्की अमुक वेळीं जास्त प्रमाणांत यावीं असें ठरलेलें नसतें. या दुःखांबरोबरच़ गुरूच्या सहवासाच़ें व अंतरंगांतील आनंदाच़ें सुखहि त्याला जास्त प्रमाणांत मिळूं लागतें. यावरून या मार्गांत बाहेरून माणसावर जास्त प्रमाणांत दुःख कोंसळतें आणि त्याबरोबरच़ अंतरंगांतून जास्त मोठे आनंदाच़े झ़रे सुरूं होतात, आणि ज़ाणीव फुलून व तीव्रतर होऊन तिच़ाहि अपूर्व आनंद त्याला भोगावयास मिळत असतो.

[ 'साधनचतुष्टय' या पुस्तकांत पुढील उद्गार आहेत -- 'आपल्या दुष्कर्मांचीं फळें भोगून टाकून त्यांपासून तूं मुक्त झ़ाल्याखेरीज़ सद्गुरूंना तुझ़ा फारसा उपयोग नाहीं हें ध्यानांत असूं दे.  त्यांच्या सेवेला वाहून घ्यावयास तयार होतांवेळींच़ आपल्या कर्माची लवकर फेड व्हावी अशी मागणी तूं केल्यासारखें होतें. आणि म्हणून शेंकडों जन्मांत ज्यांची वाटणी झ़ाली असती त्या कर्मांची सर्व झ़डती एकदोन जन्मांतच़ होऊन ज़ाते.']


यामुळें, 'चणे खावे लोखंडाचे। तेव्हां ब्रह्मपदीं नाचे।'  असे दुःखगर्भ शब्द या मार्गाला
कधीं लावण्यांत येतात, तर कधीं 'हा मार्ग जैं देखिजे। तैं तहानभूक विसरिजें।'  असें त्याच़ें आनंदमय वर्णन संत करीत असतात. [ज्ञानेश्वरी अध्याय ६ श्लोक १० ओंवी १५७]
 

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण ६ : पहिल्या ऋणानुबंधाच़ा विधि