प्रकरण  चौथें


सद्गुरुप्राप्तीचा  मार्ग


गुरुप्राप्तीच्या मार्गाविषयीं अशिक्षित व सुशिक्षित अशा दोन्हींहि मंडळींत फार गैरसमज़ असलेले दिसून येतात. अज्ञानी माणसानें गुरु करावा, बुद्धिमान् माणसाला गुरूची ज़रूर नाहीं, असें पुष्कळांस वाटतें, पण तें खरें नाहीं. गुरूची ज़रूरी मंद बुद्धीच्या माणसाला असेल, पण तरतरीत बुद्धि असणाऱ्याला गुरूची ज़रूरी नाहीं, असें म्हणणें म्हणजे इंग्रजी शाळेंतल्या पहिल्या इयत्तेंतील अज्ञ मुलानें 'माझ्यासारख्या हुशार मुलाला कॉलेजची ज़रूरी नाहीं' अशी बढाई मारण्यासारखेंच़ आहे. मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यालाच़ ज़सें कॉलेजच़ें शिक्षण उपयुक्त असतें, तद्वत् खरोखरी हुशार व ज़ाणत्या माणसालाच़ गुरूचा उपयोग असतो. अमुक एका मर्यादेपर्यंत शिकून शहाणा झाल्याशिवाय ज़सा कॉलेजमधील प्रोफ़ेसर विद्यार्थ्याला आपल्या कॉलेजांत घेणार नाहीं, तद्वत् अमुक एका टप्प्यापर्यंत वाढ झाल्याशिवाय सद्गुरूच़ा उपयोग करून घेण्याची पात्रता माणसांच्या अंगीं येत नाहीं. 'म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे ।'  म्हणजे ज़ाणत्या माणसानें गुरूचा आश्रय करावा असें ज्ञानेश्वरांनीं उपदेशिलें आहे आणि 'ज़ैसे मूळ सिंचनें सहजें । शाखा-पल्लव संतोषती ।।' अशी उपमा देऊन गुरूची भेंट झाली म्हणजे झ़ाडाच्या जणूं मुळांस पाणी मिळाल्यासारखें होऊन झ़ाडाच्या साऱ्या शाखा आपोआप टवटवीत होतात असें म्हटलें आहे. लौकिक रीत्या शिकून शहाणे होणें म्हणजे झाडाच्या मुळांस पाणी न घालतां नुसत्या फांद्यांवर पाणी ओतण्यासारखें आहे, असें ज्ञानेश्वरांनीं त्या दृष्टान्तानें ध्वनित केलें आहे. [पहा ज्ञानेश्वरी अध्याय १ ओंवी २५ व अध्याय १८ श्लोक ४९ ओंवी ९६६.]  ज़शी बुद्धिमान् लोकांमध्यें ही गैरसमज़ूत आढळते, तशी भाविक लोकांमध्यें दुसरी एक गैरसमज़ूत प्रचलित दिसते. त्यांना वाटतें कीं, आपण मुद्दाम खटपट करून किंबहुना गांवोगांव शोध करून कोणीं तरी गुरु केलाच़ पाहिजे, नाहीं तर आपणांस मोक्ष मिळणार नाहीं. ही समज़ूतहि च़ुकीची आहे. खरे सद्गुरु अनधिकारी माणसाला शोधून सांपडत नसतात. पण योग्य ती तयारी झाली म्हणजे ते शिष्याला आपोआप भेंटतात. 'मग श्रीगुरु आपैसा । भेंटेचिगा ।।' असें सांगून गुरु शोधण्यासाठीं शिष्याला धांवाधांव करावी लागत नाहीं, असा अभिप्राय ज्ञानेश्वरांनीं दर्शविला आहे. जे जीवन्मुक्त पुरुष शिष्यांच़ा अंगीकार करून त्यांची आध्यात्मिक ज़बाबदारी अंगावर घेण्यास तयार असतात, त्यांसच़ या प्रकरणांत आम्हीं 'सद्गुरु' म्हणत आहों हें वाचकांनीं विसरूं नये. हल्लीं मराठी भाषेंत गुरु व सद्गुरु हे शब्द अगदीं सामान्य प्रतीच्या माणसांसहि लावण्यांत येतात; हा त्या शब्दांच़ा अगदीं अक्षम्य असा दुरुपयोग होय. महाराष्ट्र संतांनीं गुरूची पुष्कळच़ स्तुति केली आहे आणि रामदासांनीं तर 'सद्गुरूहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा ।।' असें म्हणून गुरूला ईश्वराच्या ज़ोडीस बसविलें आहे. [पहा दासबोध ५, ३, ४०.]  तेव्हां असले संत सामान्य प्रतीच्या माणसाला गुरु म्हणतील हें केवळ अशक्य होय. ज़ो स्वतः जीवन्मुक्त नाहीं त्याला शिष्याची संपूर्ण ज़बाबदारी घेण्याच़ा अधिकार नाहीं, असा मोक्षमार्गावरच़ा नियम आहे. एखाद्या जीवन्मुक्ताच़े जे विशेष योग्यतेच़े शिष्य असतील ते नवशिक्या माणसाला पुष्कळसे मार्गदर्शक होऊं शकतात हें खरें आहे; पण त्यांच़ा उपयोग स्वतंत्रपणें होत नसून फक्त त्या जीवन्मुक्ताच़ा व त्या नव्या माणसाच़ा संबंध ज़ोडण्याच्या कामीं ते शिष्य साहाय्य करतात, हें विसरतां येणार नाहीं. अगोदर मॅट्रिक झालेला विद्यार्थी त्या परीक्षेंतून नुकत्याच़ उत्तीर्ण झालेल्या तरुणाला उपयोगी पडेल, पण तो प्रोफ़ेसराची ज़ागा घेऊं शकणार नाहीं; तद्वत् शिष्याची संपूर्ण ज़बाबदारी घेण्याच़ा अधिकार फक्त जीवन्मुक्त पुरुषाला असतो. अर्थात् खऱ्या अर्थानें तोच़ सद्गुरु होय. त्याशीं ऋणानुबंध ज़ोडण्यासाठीं बरीच़ तयारी उमेदवाराला करावी लागते. ती तयारी करण्याच्या कामीं त्या जीवन्मुक्त पुरुषाच़े विशेष अधिकाराच़े शिष्य त्याला मार्गदर्शक म्हणून पुष्कळ उपयोगी पडत असतात. अर्थात् तेहि त्या नव्या माणसाला वंदनीय होतात. पण ते त्या जीवन्मुक्ताची ज़ागा कधींच़ घेऊं शकत नाहींत, व तसें करण्याची त्यांची इच्छाहि असत नाहीं. ह्या दोन सदरांत जीं माणसें पडणार नाहींत त्यांना लौकिकदृष्ट्या आपण तारतम्य पाहून हवा तर मान द्यावा. पण अध्यात्मदृष्ट्या त्यांस गुरु म्हणून अनुसरणें कधींहि योग्य होणार नाहीं. ह्या मंडळींत अज्ञ-सुज्ञ, साधु-भोंदू, सुष्ट-दुष्ट, कठोर-सहृदय, व्यसनी-निर्व्यसनी, स्वार्थी-परार्थी, भोळसट-चिकित्सक अशीं अनंत प्रकारचीं भलींबुरीं माणसें सांपडतील, हें उघड आहे. त्यांच्याशीं माणसानें कोणत्या प्रकारच़ा संबंध ठेवावा, त्यांच्यापासून काय व किती शिकावें, त्यांस ज़वळ ओढावें कीं दूर लोटावें हें ज्याच़ें त्यानें सारासार विचार करून ठरविणें ज़रूर आहे. हल्लीं या सर्व भल्याबुऱ्या व लहानथोर माणसांची एकच़ गल्लत झाली आहे. कवड्या, पैसे, आणेल्या, अधेल्या व रुपये यांच्या या सरमिसळींत गुरुमार्गाविषयीं भोळ्या माणसांत अंधळेपणा व चिकित्सक मंडळींत तिरस्कार उत्पन्न झाला आहे. या दृष्टीनें विचार केल्यास बुद्धिमान् लोकांना गुरूविषयीं जी अवहेलना बुद्धि वाटत आहे ती सकारण आहे असें म्हणावें लागतें. पण या पुस्तकांत जीवन्मुक्त पुरुषांशिवाय दुसऱ्या कोणत्याहि पुरुषाचा 'गुरु' या नामानें निर्देश केलेला नाहीं हें चिकित्सकांनीं ध्यानांत घ्यावें. असल्या जीवन्मुक्त पुरुषास शोधावें लागत नाहीं. तो अंतर्ज्ञानी असतो. शिष्याला त्याची कल्पना नसली तरी त्या जीवनमुक्ताला त्या भावी शिष्याची पूर्ण कल्पना असते. तो त्याच्या सतत नज़रेखालीं असतो आणि म्हणूनच़ शिष्याची पुरेशी तयारी झाल्याबरोबर जीवन्मुक्त सद्गुरु त्याच्याशीं आपला ऋणानुबंध 'आपैसा' ज़ोडतात.

बुद्धीचें  स्वातंत्र्य

सद्गुरूंविषयीं आणि त्यांच्या शिकवणीविषयीं आणखी एक आक्षेप लोकांच्या मनांत वारंवार येत असतो. त्याच़ाहि येथें परामर्श घेणें अवश्य आहे. तो असा कीं, सद्गुरु आपल्या शिष्यास मतस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य बिलकुल देत नाहींत, ते शिष्याच्या बुद्धीला चिरडून टाकतात, आणि आपणांस योग्य वाटेल तें करावयास गुरूंनीं शिष्यास सांगावें व शिष्यानें आपली चिकित्सक सदसद्विवेकबुद्धि सारी एकीकडेच़ गुंडाळून ठेवून अंधळेपणानें तसें वागावें असा या मार्गावरच़ा व्यवहार आहे. हें म्हणणें अगदीं खोटें आहे. माणसाच्या बुद्धीची वाढ स्वातंत्र्याच्या वातावरणांतच़ होत असते हें जीवन्मुक्त पुरुषांनीं सदैव ओळखलेलें असतें. अर्थात् ते केव्हांहि शिष्याच्या स्वतंत्रबुद्धीला, त्याच्या विवेकशक्तीला आळा घालीत नाहींत. शिष्यानें आपल्या मनोदेवतेविरुद्ध कोणतीहि गोष्ट अंधळेपणानें करावी अशी त्यांची कदापि इच्छा असत नाहीं. कोणत्याहि प्रकारच़ा अंधळेपणा वा भोळेपणा ऋषींच्या संघाला केव्हांहि मान्य असत नाहीं. तेव्हां या मार्गावर शिष्यास आपली बुद्धि गुरूच्या घरीं गहाण ठेवावी लागते हा आरोप सर्वस्वी असत्य आहे. त्याच़ा अर्थ असा मात्र नव्हे कीं, या मार्गावर दुर्वर्तन करण्यास शिष्याला पूर्ण मुभा असते. कांहीं माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीची कळी इतकी कमी फुललेली असते कीं तिला योग्यायोग्य ओळखण्याचें सामर्थ्य आलेलें नसतें. असलीं उदाहरणें वारंवार दृष्टीस पडतात. अगदीं हीन दर्जाच्या माणसास दुसऱ्याशीं भांडत असतांना त्याचा खून करणें न्याय्य वाटतें. दुसऱ्याच़ा विश्वासघात करणें, उघडकीस येत नसेल तर च़ोरी करणें, युक्तीनें पैसे खाणें या गोष्टी कांहीं मंडळींस निंद्य वाटत नाहींत व ते त्या गोष्टी मधून मधून करतात. कांहीं माणसांस खोटें बोलणें अगदीं त्याज्य वाटतें व ते होतां होईल तों आपल्या तोंडून खोटा शब्द ज़ाऊं नये याविषयीं ज़पत असतात; तर कांहीं माणसांस खोटें बोलण्यांत अनीति वाटत नाहीं व स्वतःच्या फ़ायद्यासाठीं वारंवार व क्वचित् प्रसंगीं फ़ायदा नसतांहि तीं माणसें धडधडीत खोटें बोलतात. यावरून प्रत्येकाची मनोदेवता एकसारखीच़ नसते, सर्व माणसांमध्यें तिच़ा विकास सारख्याच़ प्रमाणांत झालेला नसतो, काहीं माणसांत ती कुशाग्र व सुसंस्कृत असते, तर कांहीकांत ती अगदीं भरड व बोथट असते हें उघड आहे. जीवन्मुक्त गुरु शिष्याच्या सदसद्विवेकबुद्धीस पूर्ण स्वातंत्र्य देतात असें जें आम्हीं वर म्हटलें आहे त्याच़ा अर्थ त्या शिष्यास नीति-अनीतीच़े निर्बंध नसतात असा नाहीं. सुबुद्ध, सुसंस्कृत व नीतिमान् माणसांना ज्या गोष्टी वाईट व च़ुकीच्या वाटतात त्या करण्याची ज्याला इच्छा असेल, त्या गोष्टींच़ा मोह पडून त्या करणें ज्याला रास्त वाटत असेल, त्या गोष्टी निषिद्ध आहेत अशी ज़ोराची आज्ञा करण्याची ज्याच्या मनोदेवतेला शक्ति आलेली नसेल, त्या माणसाला कोणींहि जीवन्मुक्त पुरुष होतकरू उमेदवार म्हणून निवडून घेणार नाहीं. विवेक व नीतिमत्ता यांच़े बरेच़ धडे ज्याच़े शिकून झालेले आहेत अशा माणसासच़ ते होतकरू म्हणून समजतात. अर्थात् हव्या त्या अनीतीच्या गोष्टी करण्याचें स्वातंत्र्य या मार्गावर नसतें हें उघड आहे. पण शिष्याच़ें हें स्वातंत्र्य गुरूंनीं हिरावून घेतलेलें असतें असें मात्र नाहीं. गुरूंनीं योग्य तऱ्हेच़ा शिष्य निवडलेला असतो इतकाच़ त्याच़ा अर्थ असतो. त्याच़प्रमाणें बुद्धीच्या बाबतींतहि या मार्गावर वाटेल तें स्वातंत्र्य शिष्याला असत नाहीं. उदाहरणार्थ स्त्रियांना आत्मा नसतो, निपुत्रिक माणसें नरकांत पडतात, ख्रिस्तीधर्माखेरीज़ इतर धर्मांच्या अनुयायांना मुक्ति मिळणार नाहीं, काशीस मरण आल्यास पुनर्जन्माचा फेरा संपतो, वगैरे निरनिराळ्या धर्मांतील अथवा दुसऱ्या क्षेत्रांतील  वेडगळ मतें ज्याच्या बुद्धीला सयुक्तिक दिसत असतील, त्याला कोणींहि जीवन्मुक्त पुरुष मुमुक्षुमार्गावरच़ा होतकरू उमेदवार म्हणून निवडून घेणार नाहीं; म्हणूनच़ या मार्गावरील होतकरू मंडळींमध्यें असले मूर्ख विचार आढळणें संभवत नाहीं. यावरून वाचकांच्या ध्यानांत येईल कीं नीतीच्या व बुद्धीच्या क्षेत्रांत जीं माणसें फार खालच्या पायरीवर असतात, त्यांच्याकरितां हा मार्ग नाहीं. पण ज्या सुबुद्ध व नीतिमान् माणसांना सद्गुरु शिष्य म्हणून हातीं धरतात त्यांना ते पूर्ण विचारस्वातंत्र्य देत असतात. शिष्याला जी गोष्ट चुकीची वाटते ती कोणींहि जीवन्मुक्त त्याच्यावर लादीत नाहींत. हे शिष्य च़ुका करीत नाहींत असें नाहीं. इतर लोकांप्रमाणें त्यांच्याहि हातून च़ुका होतात व इतर लोकांप्रमाणेंच़ च़ुकांच्या ठेंच़ा लागून ते शहाणपण शिकत असतात. शिष्यांना गुरूंची मदत असते व इतरांना ती नसते, इतकाच़ दोघांमध्यें फरक असतो.

ह्या शिष्यत्वाच्या पायरीच़ें रहस्य नीट समज़ण्यापूर्वीं माणूस त्या पायरीपाशीं कसा व कोणत्या प्रकारें येऊन पोहोंच़तो त्याच़ा आपण अगोदर विचार करूं. मनुष्यकोटींत ज़ो जीव येतो तो प्रथम प्राणिकोटींतून येतो, व मनुष्यकोटींत त्याच़े शेंकडों जन्म होतात आणि सरतेशेवटीं सर्वगुणसंपन्न होऊन तो मानवी उत्क्रांतिमार्गाच़ा शेवट गांठतो. मानवकोटींतले प्रारंभाच़े पुष्कळ जन्म प्रवृत्तिमार्गाच़े असतात. पुढें कांहीं जन्म प्रवृत्तिमार्गावरून निवृत्तिमार्गांत नेणाऱ्या वळणावरच़े असतात. नंतर कांहीं थोडे जन्म निवृत्तिमार्गावर होतात आणि सरतेशेवटीं माणसाचा विकास परिपूर्ण होतो. 'प्रवृत्तिमार्ग' म्हणजे उद्योग करण्याच़ा मार्ग व 'निवृत्तिमार्ग' म्हणजे स्वस्थ, निष्क्रिय बसण्याच़ा मार्ग असा लोक सांप्रत या शब्दांच़ा अर्थ करीत असतात. पण तो बरोबर नाहीं. दोन्हींहि मार्ग उद्योगाच़ेच़ असतात हें लक्षांत ठेवलें पाहिजे. प्रवृत्ति व निवृत्ति यांच़े भलते अर्थ लोकांनीं केल्यामुळें आज़ या शब्दांविषयीं इतका घोंटाळा माज़ला आहे कीं त्या शब्दांच़ा खरा अर्थ येथें स्पष्ट करणें अत्यावश्यक आहे. स्वतःकरतां केलेला उद्योग प्रवृत्तिमार्गाच़ा असतो, तर सबंध सृष्टि, तिच़ा कर्ता, त्याची योजना हीं ओळखून त्या योजनेनुसार केलेला उद्योग निवृत्तिमार्गाच़ा असतो. मीं वेगळा आहे, स्वतंत्र आहे, मला माझ्यासाठीं सुख, संपत्ति, अधिकार, लोकप्रियता हीं हवीं आहेत, ही भावना प्रवृत्तिमार्गाची आहे व त्या धोरणाच़ा सर्व उद्योग प्रवृत्तिमार्गावर माणसाची प्रगति करीत असतो. मीं वेगळा नाहीं, मीं सबंध सृष्टीच़ा एक अंश आहे, त्या सृष्टीच्या विकासाची जी योजना ईश्वरानें आंखली आहे तिच़ें धोरण मला समज़लें आहे, त्या धोरणानें मीं सारे उद्योग करीन, त्या उद्योगांत मला स्वतःला अमुक एक हवें आहे असें बिलकुल नाहीं, ही भावना निवृत्ति-मार्गाची निदर्शक असून त्या भावनेनें केलेले सर्व उद्योग माणसाला निवृत्ति-मार्गावरून पुढें नेत असतात. 'मीं'पणाची गांठ घट्ट बांधणें, ती दृढ करणें हें प्रवृत्ति-मार्गाच़ें कार्य असतें; तर ती गांठ सोडून ईश्वराच्या योजनेची योग्य दिशेनें परिपूर्ति करण्यास त्या दोरीच़ा उपयोग करणें हें निवृत्तिमार्गाच़ें कार्य असतें. प्रवृत्तिमार्गावर माणूस जगाशीं भांडतो, जगांतील सारें तूप आपल्या पोळीवर ओढूं पाहतो व स्वतःच़ा सवता सुभा स्थापन करतो. हा सवता सुभा निरनिराळ्या गोष्टींच़ा असूं शकेल. अगदीं प्रारंभींच्या कित्येक जन्मांत हा सवता सुभा वासनांच़ा असतो. आपल्या इंद्रियांच़े लाड पुरवावे, आपण गोडगोड अन्न खावें, सुंदर सुंदर सहचर मिळवून कामवासनेची तृप्ति करावी, डौलाच़ा पोशाख करावा, आनंदानें दारू पिऊन त्या निशेच़ा आनंद घ्यावा, लोकांस बुचाडून आपली भर करावी अशी वृत्ति त्या वेळीं ज़ोरदार असते.
या वृत्तीनें वागत असतांना आपल्या अगदीं ज़वळच्या माणसासहि तिच़ा किती उपद्रव होतो याचा विचार माणसाच्या गांवींहि नसतो. वासनांस मोकाट सोडून त्या तृप्त केल्या तर त्या स्वतःलाच़ तापदायक होतात, त्या पायीं स्वतःची प्रकृति बिघडते, सारे लोक आपले शत्रु होतात आणि आपणांला दुःख देतात वगैरे अनेक गोष्टी तो अनुभवितो आणि मग वासनांच़ा अंकित होण्याच़ें हळूंहळूं टाळतो.  प्रवृत्तिमार्गावर मग पुढच़े त्याच़े जे जन्म होतात त्यांत तो अगदींच़ सर्वांस बुचाडित नाहीं, कुटुंबियांशीं तरी स्वार्थत्यागी वृत्तीनें वागतो, व डामडौल, जिव्हालौल्य, कामवासना वगैरे गोष्टी थोड्याफार कह्यांत आणून अभिमान, अधिकार, सत्ता, मनाच़ें सुख यांच्या मागें लागतो. या स्थितींत असतांना त्याची वृत्ति पूर्वींप्रमाणेंच़ स्वार्थी असते, पण कनिष्ठ प्रतीच़ा स्वार्थ कमी होऊन उच्च प्रकारच़ा स्वार्थ त्याला आवडूं लागतो. सत्तेच़ा लोभ, ज्ञानाच़ा अभिमान, लोकप्रियतेच़ा हव्यास वगैरे महत्त्वाकांक्षांच़ा पगडा त्याच्या मनावर बसतो, व कनिष्ठ व्यसनें आणि भावना मावळून स्वार्थी, पण उच्च आकांक्षांची मुहूर्तमेढ घट्ट होऊं लागते. असला माणूस कुटुंबियांशीं प्रेमानें वागेल, प्रकृति बिघडेल म्हणून खादाडपणा, मद्यपान, अतिरिक्त विषयसेवन वगैरे गोष्टींपासून अलिप्त राहील, सत्ता-ज्ञान-लोकप्रीति हीं मिळविण्यासाठीं वासनांना ताब्यांत ठेवून नाना कष्ट करील, अभ्यास करील, पैसे खर्चील, आपल्या पोळीवरच़ें तूप थोडें थोडें दुसऱ्याच्या पोळीवरहि टाकील, पण या सर्वांच़ा हेतु स्वार्थाची गांठ जास्त ज़ोरानें बांधण्याचा असतो. पूर्वींची दोरी भरड कापसाची होती, आतां ती तलम रेशमाची झाली. पण दोन्हीं वेळां जी गांठ बांधण्यांत आली ती स्वार्थमूलक होती हें विसरतां कामां नये. हा सारा प्रवृत्तिमार्ग होय. या मार्गावर माणूस व्यसनांत पडून मग त्यावर जय मिळविण्यास शिकतो. निरलसपणा, निर्धार, चातुर्य, हुशारी वगैरे अनेक गुणांची संपादणी करतो. प्रवृत्तिमार्गावर त्याच़े एकंदरींत असे पुष्कळच़ जन्म होतात.

निवृत्तिमार्गाची  छाया

त्याच्या पुढच्या अनेक जन्मांत प्रवृत्तीचा पगडा हळूंहळूं कमी होऊं लागतो आणि निवृत्तीची छाया पडण्यास सुरुवात होते. धड प्रवृत्ति नाहीं, धड निवृत्ति नाहीं, प्रवृत्ति मावळत आहे व निवृत्ति उदय पावत आहे असें हें पुढच़ें वळण असतें. निवृत्तीची एक खूण म्हणजे देण्याची वृत्ति, स्वार्थ विसरण्याची, दुसऱ्याच्या सुखांत आनंद वाटण्याची वृत्ति ही होय. या वळणावरच्या अनेक जन्मांत ज्याप्रमाणें तो बरेच़ उद्योग स्वार्थी भावनेनें करतो त्याप्रमाणें बरेच़ उद्योग दुसऱ्याच्या सुखांत आनंद वाटतो याहि भावनेनें करतो. तो आपल्या पोळीवर ज़सें तूप ओढतो, तसें दुसऱ्याच्या पोळीवर आपल्या पोळीवरच़ें तूप घालतो; पण पूर्वीं प्रवृत्तिमार्गावर असतांना नाइलाज़ म्हणून लोकांच्या पोळीवर तूप घालीत होता, आंवळा देऊन कोहळा काढण्यासाठीं घालीत होता, पण आतां दुसऱ्याच्या पोळीवर जास्त तूप घातल्यानें त्या दुसऱ्याला आनंद होतो व त्या आनंदांत आपणांलाहि आनंद होतो या कारणामुळें तो त्या पोळीवर तूप घालूं लागतो. त्याच़े विचार, त्याच्या वासना व क्रिया या सर्वांस या वळणावर असतांना ही सामान्य दिशा हळूंहळूं लागते आणि उत्तरोत्तर 'घेण्यांत' आनंद वाटण्याची वृत्ति मावळून 'देण्यांत' आनंद वाटण्याची वृत्ति प्रभावी होते. वाङ्मयाची आवड, कलेची आवड, ध्येयाची आवड, परोपकाराची आवड, जग सुधारण्याची आवड, तत्त्वविचारांची आवड, धर्माची आवड, ईश्वराची आवड वगैरेंपैंकीं कांहींच़ा परिपोष असल्या जन्मांत होत असतो आणि या आवडींतील स्वार्थी भावना हळूंहळूं कमी होत ज़ाते.

या वळणांतून बाहेर पडल्यावर माणसाच्या निवृत्तिमार्गाला स्पष्टपणें सुरुवात होते. कांहींतरी कारण घडून मीं कोण, कोठें चाललों, ईश्वराला अस्तित्व आहे काय,  जीविताचें ध्येय काय वगैरे प्रश्न याच़ सुमारास त्याच्या डोळ्यांसमोर ज़ोरानें येतात. रामदास म्हणतात त्याप्रमाणें -- 'ज़ो संसारदुःखें दुःखावला । ज़ो त्रिविधतापें पोळला । तोचि अधिकारी झ़ाला । परमार्थासी ।।' असें होऊन दुःखाग्नींत भाज़ल्यामुळें या प्रश्नाकडे कधीं कधीं त्याच़रं लक्ष वेधतें. कधीं कधीं अतिशय श्रीमंतींत व ऐषआरामांत लोळून व त्यांच़ा मनाला कंटाळा वाटून हे प्रश्न त्याच्या मनासमोर येतात. तें कसेंहि असलें तरी जीवितांतल्या अति गहन प्रश्नांचीं उत्तरें तो जिव्हाळ्यानें शोधूं लागतो. प्रवृत्तिमार्गावर निर्व्यसनीपणा, कर्तबगारी, बुद्धिमत्ता, निर्धारशक्ति, मेहनतीपणा हे गुण त्यानें स्वार्थाकरितां केलेल्या धडपडींत संपादलेले असतात. पुढें निवृत्तिमार्गाशीं येतांना परोपकारबुद्धि, स्वार्थत्याग, सेवेची आवड हे गुण त्याच्या स्वभावांत प्रकट होण्याची क्रिया सुरूं झालेली असते. एकंदरींत नीतिदृष्ट्या हा माणूस सद्गुणी व ध्येयनिष्ठ झालेला असतो. ईश्वरावर आणि धर्मतत्त्वांवर त्याच़ा विश्वास असेल वा नसेल. ईश्वरावर विश्वास असला तर आपण ईश्वरास ओळखावें, त्याच़ें कार्य करावें याची उत्कंठा त्यास लागते. पण ईश्वरावर व धर्मावर विश्वास नसला तरी एखाद्या ध्येयाची निष्ठा त्याच्या मनांत दृढ झालेली असते, व त्या ध्येयाच्या दृष्टीनें जनसेवा व लोकसेवा करावी याकडे त्याच़ें मन ओढ घेत असतें. कधीं एखाद्या परमोदार व्यक्तीविषयीं त्याच्या मनांत आदर व प्रेम भरलेलें आढळतें आणि त्या व्यक्तीची सेवा करावी अशी त्यास उत्कंठा लागलेली असते.

येथपर्यंत ज़ो माणूस प्रगति करीत आला, तो शिष्यत्वाच्या पायरीज़वळ येऊन पोहोंच़ला आहे असें समज़ावें. येथपर्यंतची माणसाची प्रगति जी आम्हीं वर वर्णिलेली आहे तिच़ा तपशील जगावरील सर्व माणसांस शब्दशः लागू पडेल असें नाहीं. एकंदर विकासाची दिशा दाखविण्याला वरील वर्णन ठीक आहे. पण 'व्यक्ति तितक्या प्रकृति' या न्यायानें निरनिराळ्या माणसांमध्यें तपशिलाच्या दृष्टीनें ज़री थोडेफार फरक होत असले तरी सामान्यतः वर दिलेल्या दिशेनेंच़ मानवी प्रगति होत असते यांत शंका नाहीं. ही प्रगति जन्मोजन्मीं करीत ज़ो मनुष्य निवृत्तिमार्गाला स्पष्टपणें लागलेला आहे, तो जीवन्मुक्त पुरुषांस त्यांच्या कामासाठीं होतकरू म्हणून वाटण्याच़ा संभव असतो आणि म्हणूनच़ तो त्यांच़ा शिष्य होण्याच्या टप्प्याज़वळ आलेला असतो.

उत्क्रांतिमार्गावरून येथपर्यंत च़ालत आलेला माणूस जगांत मोठा लोकोत्तर असा गणण्यांत येईलच़ असें नाहीं. पुष्कळ वेळां असल्या माणसाला जग फारसा मान देत नाहीं. जग ज्या मंडळींना लोकोत्तर मानतें तीं माणसें पुष्कळ वेळां कोणत्या तरी एका गुणांत फारच़ पुढें गेलेलीं असावीं लागतात. कधीं तो गुण महत्त्वाचा असेल तर कधीं नसेल व कधीं तो दोषहि असूं शकेल. उत्क्रांतिदृष्ट्या क्रिकेट् किंवा बुद्धिबळें खेळणें हा कांहीं अतिशय महत्त्वाचा गुण नाहीं. पण या खेळांत ज़ो चँपियन् किंवा अग्रेसर असेल त्याला लोक एक प्रकारच़ा मोठेपणा देत असतात. मग तो माणूस इतर गोष्टींत अडाणी, मूर्ख आणि व्यसनाधीन असला तरी त्याच्या मोठेपणाला जग हरकत घेत नाहीं. उत्तम गणिती, उत्तम गवई, उत्तम लेखक, उत्तम वक्ता, उत्तम वकील, तसेंच़ यशस्वी व्यापारी, यशस्वी योद्धा, यशस्वी मुत्सद्दी, यशस्वी मुशाफ़र, यशस्वी संशोधक यांना जगांत अग्रपूजेच़ा मान बहुत वेळां मिळत असतो, व असल्या लोकांच्या अंगच़े गुण क्रिकेट् किंवा बुद्धिबळें यांतल्या गुणांपेक्षां जास्त विविध व व्यापक स्वरूपाच़े असतात. पण असल्या माणसांत कित्येक फार मोठे दोष असले तरी जग त्या दोषांस्तव त्या माणसांना फारसें कमी लेखीत नाहीं. एखादा यशस्वी योद्धा व्यभिचारी असला तरी ज़ोंवर तो समरांगणावर विजय मिळवीत च़ालला आहे, एखादा वकील खाज़गी व्यवहारांत लबाड असला तरी ज़ोंवर त्याच्या उलटतपासणीच्या सरबत्तीसमोर साक्षीदार ज़मीनदोस्त होत आहे, आणि एखादा वक्ता पोकळडोक्या असला तरी ज़ोंवर आपल्या वक्तृत्वानें तो श्रोतृसमाजाला डोलवीत आहे तोंवर त्याच्या मोठेपणावर जग बोळा फिरवीत नाहीं. उलट पक्षीं एखादा माणूस असा असूं शकेल कीं आपल्या व्याख्यानांत रंगीबेरंगी दारूकाम मनमुराद सोडण्याची कला त्याला साधलेली नाहीं, पण तो बोलण्यांत च़ांगला आहे, वकिली डावपेच़ांत दुसऱ्याला पकडण्याची युक्ति त्याला अवगत नाहीं पण तो बुद्धिमान् आहे,  इतकेंच़ नव्हे तर खाज़गी व्यवहारांत प्रामाणिक, नीतिमान् व विचारी आहे. असल्या माणसावर त्याच़े वैयक्तिक मित्र फार लोभ ठेवितील हें खरें, पण एकंदर समाजांत त्याला कोणीं लोकोत्तर म्हणणार नाहीं. शिष्याच्या पायरीज़वळ आलेलीं माणसें एखाद्या गुणांत फारच़ वरचढ असल्यास जग त्यांस मोठेपणाच़ा मान देईल. सर्वांच्या डोळ्यांत भरणारा तसला वरच़ढपणा त्यांच्या अगीं नसला तर जग त्यांच्यामध्यें कांहीं विशेष आहे असें मानणार नाहीं. तें कसेंहि असलें तरी शिष्याच्या पायरीज़वळ येऊन पोहोंच़णारा माणूस बऱ्याच़ बाबतींत  समतोल विकासाचा असावा लागतो, मग त्याच्या अंगीं जगाच्या डोळ्यांत भरणारा एखादा गुणविशेष पराकाष्ठेच़ा फुललेला असो वा नसो. त्या माणसाची एकंदर वाढ पुष्कळ बाज़ूंनीं झालेली असावी लागते. फार मोठे दुर्गुण त्याच्यांत असतां कामां नयेत. ते दुर्गुण त्याच्या लौकिक मोठेपणास विघ्न करीत नसले तरी शिष्यत्व मिळविण्याच्या मार्गावरून त्याला निःसंशय खालीं लोटीत असतात. यावरून असें कोणीं समज़ूं नये कीं ज्ञान, भक्ति व क्रिया हीं मानवी विकासाचीं तिन्हीं अंगें त्याच्या ठिकाणीं सारखींच़ वाढलेलीं असलीं पाहिजेत. त्यांपैंकीं कोणतेंहि अंग जास्त असलें तरी त्याला हरकत नसते. पण एखादें अंग अगदींच़ कमी असल्यास मात्र च़ालत नाहीं. परीक्षा पास व्हावयाची असेल तर एखाद्या विषयांतलें विशेष नैपुण्य विद्यार्थ्याला कोणताच़ अडथळा करणार नाहीं; उलट त्यानें दुधांत साखर पडल्यासारखें होईल. पण एखाद्या विषयांत फारच़ कमी मार्क मिळाले तर मात्र तो विद्यार्थी पास होऊं शकणार नाहीं. तद्वत् शिष्य होणारा माणूस कोणत्याहि बाबातींत अगदींच़ शून्य मार्क मिळवीत असेल तर च़ालणार नाहीं. त्याच्या परीक्षेंत निःस्वार्थबुद्धि व नैतिक विकास ही मुख्य बाब असते. सर्व गोष्टींत आणि विशेषतः नीतिमत्तेच्या बाबतींत ज़णूं त्याला निदान अमुक इतके मार्क तरी पडावे लागतात. ते फारच़ कमी पडतील तर त्याला शिष्यत्व मिळण्याचा संभव राहत नाहीं.

ओळख  कशी  पडते ?

ऋषिसंघांतल्या जीवन्मुक्तांनीं जगांतील सर्व क्षेत्रें आपापल्या कार्यासाठीं वांटून घेतलेलीं असतात; आणि ते जगांतील मानवांकडे अंतर्दृष्टीनें पाहूं शकतात. काळोख्या रात्रीं डोंगरावरून खालच्या प्रदेशाकडे पाहिलें तर जेथें दिवा असेल तें ठिकाण पाहणाराला ज़सें सहज़ दिसतें, तद्वत् ज्या माणसापाशीं ज़रूर त्या गुणांची ज्योत पाज़ळत असेल त्याच्याकडे या जीवन्मुक्तांची नज़र अचूकपणें ज़ाऊन पोहोंचते. त्या जीवन्मुक्त पुरुषांच्या अस्तित्वाची अंधुक कल्पनाहि त्याच्या मनांत येण्याच्या अगोदर त्या जीवन्मुक्तांनीं त्याची मुद्दाम ओळख करून ठेवलेली असते आणि म्हणूनच़ अशा माणसाची तयारी झ़ाल्याबरोबर त्याला आपोआप गुरु भेंटूं शकतो.

जीवन्मुक्त गुरूंना आपल्या भावी शिष्यामध्यें कांहीं गोष्टी आवश्यक वाटत असतात
. त्या ज्याच्या अंगीं नसतील त्याला ते अर्थातच़ शिष्य म्हणून अंगीकारीत नाहींत. परोपकार, जगदुद्धार, लोकसंग्रह या शब्दांत अनुस्यूत असणारी निष्काम कर्मयोगाची सेवावृत्ति ज्या माणसामध्यें बाणलेली नसेल, जो माणूस जनहितार्थ झ़टत नसेल, दुसऱ्याचें बरें करावें ही वृत्ति ज्याच्या स्वभावांत अज़ून उमललेली नसेल तो माणूस शिष्य होऊं शकणार नाहीं. जीवन्मुक्त पुरुष म्हणजे जगाचा उद्धार करणारा व 'सर्वभूतहिते रताः' या कोटींत सांपडणारा पुरुष. ज्याला दुसऱ्याचें बरें करण्याची उत्कंठा नाहीं, त्याला तो पुरुष अर्थातच़ आपल्या उद्योगांत साहाय्यक म्हणून घेणार नाहीं. ऋषिसंघ हा जगदुद्धारासाठीं आहे. तेव्हां त्यांत शिरूं पाहणाऱ्या नवशिक्याला जगदुद्धाराची आवड असलीच़ पाहिजे हें उघड आहे. मीं बुद्धिपुरस्सर ईश्वरकार्य करीन, अशीहि वृत्ति शिष्याच्या ठायीं असली पाहिजे. जगांतील पुष्कळ माणसें चांगलीं कार्यें करीत असतात. पण तीं कार्यें त्यांनीं बुद्धिपुरस्सर ईश्वरसेवा म्हणून केलेलीं नसतात. अर्थात् ईश्वरी योजनेस प्रतिकूल असणारे उद्योगहि वेळेनुसार असल्या लोकांच्या हातून होण्याच़ा संभव असतो. जगाच्या पाठीशीं ईश्वराच़ा संकल्प आहे, हें समज़ून बुद्धिपुरस्सर त्या संकल्पानुसार कार्य करणारा ज़ो माणूस असेल, तो समज़ून उमज़ून त्या संकल्पास विरोधी असणारे उद्योग करणार नाहीं. म्हणून ती ओळख असणारा शिष्य सद्गुरूंना हवा असतो. आपल्या वैयक्तिक आवडीनावडी ज़र त्या योजनेशीं ज़मत नसतील तर त्या टाकाव्या लागतात. ज्या माणसानें ईश्वरी योजनेनुसार उद्योग करण्याचें ब्रीद बुद्धिपुरस्सर स्वीकारलें असेल तोच़ माणूस जगाच्या धुमश्चक्रींत केव्हांहि न गोंधळतां आणि मार्गभ्रष्ट न होतां, सतत व नेटानें आपले उद्योग योग्य दिशेनें सुरूं ठेवूं शकेल. समज़ून उमज़ून जे ईश्वरी योजनेच्या परिपूर्तीकरतां झ़टत नाहींत ते वावटळीच्या वेळीं पाल्यापाच़ोळ्यासारखे उडून ज़ाण्याचा संभव असतो आणि वैयक्तिक आवडीनावडीच़ा पगडा त्यांच्या मनावर बसून कधीं त्यांच़ा ईश्वरी योजनेला पाठिंबा मिळावा व कधीं विरोध व्हावा असे प्रसंग येतात. ज़ो शिष्य होणार त्याच्या मनांत शिकण्याची इच्छा असली पाहिजे हेंहि उघड आहे. अर्थात् मीं जन्मतःच शहाणा आहे, मला दुसऱ्या कोणाकडून कांहींहि शिकण्याची गरज़ नाहीं, अशी अहंमन्यता ज्याच्या अंगीं असेल त्याला शिष्य म्हणून कोणीं निवडणार नाहीं. शांतपणें ज़ो दुसऱ्याचें म्हणणें ऐकून घेण्यास तयार आहे, दुसऱ्यापासून शिकण्याची ज्याला हौस आहे असाच़ माणूस सद्गुरूच़ा शिष्य होऊं शकेल.

अमुक होतकरू माणूस उत्क्रांतिदृष्ट्या शिष्यत्वाच्या पायरीज़वळ आला आहे असें जीवन्मुक्त गुरूंनीं पाहिलें म्हणजे ते त्याला अनेक रीतींनीं अनेक गोष्टी सुचवितात. त्याच्यांत जे दोष असतील ते कमी करण्याच़ा, व ज्या उणीवा असतील त्या भरून काढण्याच़ा ते प्रयत्न करितात. सर्व जीवन्मुक्त पुरुष अंतरंगाच्या भूमिकेवर प्रेरणा पाठवीत असतात. तसल्या प्रेरणा पाठवून ते आपल्या भावी होतकरू शिष्यांना स्फूर्ति देतात, त्यांची उत्कंठा द्विगुणित करतात आणि कार्योत्साहाला नेट देतात. सूर्य आपल्या किरणांनीं कमळाला ज़सें फुलवितो तशा प्रकारची ही क्रिया असते. आपणांला कोण फुलवीत आहे हें ज़सें कमळाला समज़त नाहीं, तसें आपल्या अंतर्यामांत जे स्फूर्तीच़े झ़रे नित्य उदय पावतात त्यांचें उगमस्थान कोठें आहे हें बहुधां त्या भावी शिष्याला कळत नाहीं. ही स्फूर्ति आपली स्वतःचीच़ आहे असेंहि त्याला वाटण्याचा संभव असतो. एखाद्या होतकरू माणसाला जी माहिती असणें अवश्य आहे ती ज़र त्याला नसली तर ती ज्याच्याकडून मिळेल किंवा ज्या संस्थेंत मिळेल त्या  माणसाशीं किंवा त्या संस्थेशीं ऋणानुबंध ज़ोडण्याची प्रेरणा कधीं कधीं ते सद्गुरु त्या माणसाला देतात. अशा अनेक तऱ्हांनीं ते त्याला मार्गदर्शक होतात आणि त्याचें वैगुण्य भरून काढण्याच़े यत्न करतात. तो मनुष्य ज़र विचारी असला तर या सर्व गोष्टींचा तो पुरा फायदा घेतो आणि शहाणा होतो. तो कितपत फायदा घेईल हें त्या माणसाच्या चित्तशुद्धीवर व सदसद्विवेकबुद्धीच्या विकासावर अवलंबून असतें. सद्गुरूंची कोणावरहि ज़बरी असत नाहीं. सुच़विलेल्या गोष्टींच़ा फायदा घ्यावा कीं नाहीं हें सर्वस्वी त्या माणसावर अवलंबून असतें. आकुंचितपणा, अभिमान, दुराग्रह, आवडनावड, अविवेक वगैरे दोष ज़र त्याच्या स्वभावांत नसतील तर तो त्यांच़ा फायदा घेऊं शकतो; ते ज़र त्याच्यामध्यें असतील तर ह्या अंतरंगांतील सूचनांचा तो अव्हेर करतो. समोर उपस्थित होणाऱ्या नव्या नव्या परिस्थितीच़ा फायदा त्याला घेतां येत नाहीं; आणि  त्यामुळें तो मागें पडतो. अंतरंगांतून नाना प्रकारची स्फूर्ति देण्याचा उद्योग सद्गुरु नेहमींच़ करीत असतात, आणि होतकरू माणसाला ज़वळ करून शिष्य म्हणून अंगीकारल्यावर आणि मुमुक्षुमार्गावरून तो बराच़ पुढें गेल्यावरहि स्फूर्ति देण्याची ही क्रिया ते सुरूं ठेवितात. शिष्याला शिकविण्याच़ा तो त्यांच़ा एक राजमान्य मार्ग आहे.

हा होतकरू माणूस अंधळा व परावलंबी व्हावा अशी त्यांची बिलकुल इच्छा नसते. त्याच़ें त्याला समज़ावें, त्यानें स्वतःच्या पायावर उभें राहण्यास शिकावें, असेंच़ त्यांचें धोरण असतें. या मार्गावर गुरूच्या खांद्यावर बसून शिष्याला प्रगति करतां येणें शक्य नसतें. शाळेंतल्या शिक्षकानें धडा पाठ केला तर तो शिष्याला ज़सा येत नाहीं तसाच हा प्रकार आहे. हा मार्ग म्हणजे आंतून स्वतःला फुलविण्याच़ा आणि अंतरंगांतून निरनिराळ्या शक्ति प्रकट करून शहाणें होण्याच़ा मार्ग आहे. झ़ाडाच्या प्रयत्नानें ज़सें फूल फुलतें, त्याप्रमाणें शिष्याला आपलें अंतरंग स्वतःच्या प्रयत्नानें फुलवावें लागतें. सद्गुरु हे सूर्यप्रकाशाप्रमाणें त्याला साहाय्य देत असतात. या अनुभवाच्या मार्गावर ज्याच़ा त्याला अनुभव घ्यावा लागतो, ज्याच़ा त्याला खटाटोप करावा लागतो, ज्याची त्याला अंतरंगांत जागृति यावी लागते, ती अंधानुकरणानें येत नाहीं; आणि म्हणूनच़ कोणींहि सद्गुरु अंधवृत्तीला उत्तेजन देत नाहींत. हिंदुस्थानांत आज़ अनेक गुरु आपल्या शिष्यांस आंधळेपणा शिकवीत असतील, पण हा अवनतीच़ा परिणाम आहे. त्या धोरणानें वागणारे सध्यांच़े गुरु खरे गुरूच़ नव्हत व शिष्यहि खरे शिष्य नव्हत. खऱ्या शिष्याला पूर्ण बुद्धिस्वातंत्र्य असतें. मात्र बुद्धिस्वातंत्र्याच्या नांवाखालीं स्वैरवृत्ति व वासना यांना त्यानें मोकाट सोडलें अथवा अहंकार, आकुंचितपणा, आग्रह यांच्या हातांत स्वतःच़ा लगाम दिला, तर सद्गुरु त्याला दूर करतात आणि तो मार्गच्युत होतो. कोणतेहि जीवन्मुक्त सद्गुरु दुसऱ्यावर ज़बरी करून त्याच़े दोषहि चिरडून टाकणार नाहींत, मग बुद्धिस्वातंत्र्याच़ा गुण चिरडला ज़ाण्याचें नांवच़ नको.

ज़रूर  असलेल्या  गोष्टी

होतकरू माणसाला शिष्यत्वाच्या पायरीवर च़ढावयाचें असेल तर त्याच़े विचार उदार असणें ज़रूर असतें. मूर्खपणाच़े व आकुंचितपणाच़े विचार, तसेंच़ मनाच्या गैरसमज़ुती त्याच्या मार्गांत अडथळा उत्पन्न करतात. त्याला 'ग'ची पीडा असेल तर त्याला अर्थातच़ सद्गुरु हातीं धरणार नाहींत. स्वभावाच़ा चिरचिरेपणा, रिकाम्या च़ौकशा करण्याची खोड, विशेषतः अध्यात्ममार्गावर कोण किती पुढें गेलेला आहे याची विनाकारण पंचाईत करण्याची वृत्ति, इतरांशीं ज़मवून न घेण्याच़ा दुर्गुण, सदा आपला अपमान झ़ालासें वाटून दुसऱ्यावर संतापण्याच़ा प्रकार, आत्मविश्वासाच़ा व हिंमतीच़ा अभाव, या साऱ्या गोष्टी शिष्य व गुरु यांच्यामध्यें अडथळा उत्पन्न करतात आणि त्यामुळें अशा माणसाला सद्गुरु स्वतःज़वळ ओढीत नाहींत. माझ्या वांट्यास मोठीं व प्रतिष्ठितपणाचींच़ कामें आलीं पाहिजेत, जीं कामें लहानसहान आहेत, जीं केलीं असतां जगांत गाजावाजा होत नाहीं, तीं मीं करणार नाहीं ही वृत्तीहि शिष्यत्वप्राप्तीला प्रतिबंधक होत असते. आपणाला शिष्य म्हणून स्वीकारावें अशी ज्या माणसाची इच्छा असेल त्याच्या मनांत आत्मसमर्पणाची भावना परिपूर्ण असली पाहिजे. आत्मसमर्पण करणें म्हणजे बुद्धि गहाण ठेवून आंधळेपणा स्वीकारणें, असा अर्थ नव्हे. संपूर्ण आत्मसमर्पण करणें म्हणजे मींपणाच़ा कांहींहि अंश वेगळा राखून न ठेवणें. मीं सद्गुरूच़ा शिष्य होण्यास तयार आहे, पण माझ़ें व अमक्याच़ें वैयक्तिक भांडण आहे, त्याच्याशीं मला सद्गुरु सहकार्य करावयास सांगतील तर मीं तें ऐकणार नाहीं, असें ज़ो म्हणेल किंवा मीं  जी जी जगाची सेवा करीन ती लोकांत प्रसिद्ध झाली पाहिजे, तसें होत नसेल तर मीं सेवा करण्यास तयार नाहीं, अशी ज़ो मनांत अट ठेवील, किंवा मीं सद्गुरूंकरतां अमुक एक काम केलें तर ते मला काय देतील असा सवदा ज़ो करूं पाहील, त्याला आत्मसमर्पणाची वृत्ति नाहीं असें समज़ावें. सेवेची माणसाला हौस वाटली पाहिजे, या सेवेंत स्वतःला विसरण्याची त्याची तयारी पाहिजे, व या कामांत यश मिळविण्यासाठीं आपले दोष, दुर्गुण, वैयक्तिक रागलोभ चिरडून टाकण्याची तयारी पाहिजे. 'ज़शी देणावळ तशी धुणावळ' ह्या बाज़ारांतल्या वृत्तीनें कोणींहि या मार्गावर वागतां कामां नये.

मनुष्याच्या अंगीं आवश्यक ते सारे गुण आलेले असले म्हणजे सद्गुरु त्याला आपल्याज़वळ करितात; मग तो माणूस कोणत्याहि ज़ातीचा, धर्माचा वा राष्ट्राचा असो. या बाबतींत वयोमान, स्त्री-पुरुष भेद, इत्यादिकांना बिलकुल महत्त्व नसतें. एखाद्याची मनोरचना भक्तिप्रधान असली व दुसऱ्याची ज्ञानप्रधान असली तरी त्या बाबतींत जीवन्मुक्त गुरु फरक करीत नाहींत. ज़ोंवर आवश्यक ते गुण अंगीं आहेत तोंवर माणसाच्या स्वभावांत ज्ञान, भक्ति, क्रिया या तीन मूलभूत शक्तींपैंकीं कोणती शक्ति प्रधान आहे ह्यावर शिष्याची प्रगति बिलकुल अवलंबून नसते. कोणत्या माणसाला कोणता जीवन्मुक्त ज़वळ ओढील हें शिष्याच्या मनोरचनेवर अवलंबून असतें. तसेंच़ तें त्या दोघांच्या पूर्वऋणानुबंधावरहि अवलंबून असते. हा ऋणानुबंधसुद्धां पुष्कळ वेळां स्वभावसाम्यावरच़ असतो.
तें कसेंहि असलें तरी ज्ञानप्रधान, अतएव ज्ञानमार्गी माणसाला गुरु लवकर ज़वळ करतील व भक्तिप्रधान, अतएव भक्तिमार्गी माणसाला विलंब लागेल असा पंक्तिप्रपंच ऋषिसंघांत नाहीं. लग्न करणें वा न करणें, यांपैंकीं या मार्गावर अमुक एक आवश्यक आहे असें नाहीं. ध्येयनिष्ठ अविवाहित माणूस ईश्वरकार्याला अधिक सुटा व स्वतंत्र असतो. पण ध्येयनिष्ठ विवाहित स्त्रीपुरुषहि पुष्कळ ईश्वरकार्य करूं शकतात. कुटुंबाच़ें वातावरण अशा उच्च प्रकारच़ें ठेवणें कीं उच्च प्रकारच़े जीव त्यामध्यें जन्मास येऊन ते ऋषिसंघाच़ें कार्य करतील; कुटुंबांतील मुलांस ध्येयनिष्ठ बनविणें, ऋषिसंघांत शिरण्याची आवड त्यांच्यामध्यें उत्पन्न करणें, वगैरे अनेक प्रकारच्या गोष्टी फक्त विवाहित स्त्री-पुरुषच़ करूं शकतात.  अर्थात् माणूस ज़र गुणी असेल तर त्याला सद्गुरु ज़वळ ओढतील; मग तो विवाहित असो अगर अविवाहित असो. मद्यपान व मांसाहार हे या मार्गावर अडथळे होतात. अतिरिक्त मद्यपान वाईट आहे हें कोणासहि न सांगतां समज़ेल. पण परिमित मद्यपानहि या मार्गावर विघ्न उत्पन्न करतें. या मार्गावर आवश्यक असलेल्या ध्यानधारणादिक क्रियांस परिमित मद्यपानाचीहि फार अडच़ण होत असते. मांसाहार देहांत घाण घालीत असल्यामुळें तोहि अशाच़ प्रकारची अडचण करितो. खेरीज़ मांसाहारामध्यें दयाधर्माची पायमल्ली होत असते. अर्थात् विशेष कारण असल्याशिवाय दयासागर सद्गुरु मौज़ेखातर मांसाहार करणाऱ्या माणसाला ज़वळ ओढतील असा फारसा संभव नसतो.

जगांत अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक गुप्त संप्रदाय व अनेक धार्मिक चळवळी सध्यां आहेत. यांपैंकीं अमुक संस्थेच़ा अमुक माणूस अनुयायी किंवा सदस्य आहे या कारणास्तव कोणताहि जीवन्मुक्त त्यास होतकरू समज़णार नाहीं. कारण शिष्यत्व मिळविण्यांत योग्यतेच़ा प्रश्न असतो. विवक्षित संस्थेच्या सभासदत्वाच़ा असत नाहीं. तथापि अशा कांहीं धार्मिक चळवळी आज़ अस्तित्वांत आहेत कीं ज्यांच़ा होतकरू माणसाला बराच़ उपयोग होईल. असल्या चळवळींपैंकीं थिओसॉफ़िकल् सोसायटी ही एक महत्त्वाची संस्था आहे. मास्टर मौर्य व मास्टर कुठूमी यांनीं ती स्थापिली आहे. जीवन्मुक्त पुरुष पृथ्वीवर सध्यां अस्तित्वांत आहेत. त्यांची एक सुसंघटित संस्था आहे, ईश्वरी योजनेनुरूप पृथ्वीवरील जीवांची उत्क्रांति करण्याचें काम ही संस्था करीत असते. हीं मतें थिओसॉफ़िकल् सोसायटीच्या पुढाऱ्यांनीं गेलीं ऐंशीं-पंचाऐंशीं वर्षें सर्व जगासमोर स्पष्टपणें मांडलेलीं आहेत. हे पुढारी स्वतः जीवन्मुक्तांच़े शिष्य आहेत, व जीवन्मुक्त सद्गुरूंच़ें शिष्यत्व संपादणें हें या सोसायटींतल्या अनेक सभासदांच़ें ध्येय आहे. अर्थात् ज्या माणसाला ही शिष्यत्वाची पदवी पाहिजे असेल, त्याला या सोसायटीच़ा पुष्कळ उपयोग होईल हें उघड आहे. सोसायटीच्या पुढाऱ्यांनीं या विषयासंबंधानें पुष्कळ वाङ्मय प्रसिद्ध केलें आहे. त्या वाङ्मयांत पुष्कळ माहिती दिली असून ती अत्यंत स्फूर्तिदायक आहे. या दिशेनें स्वतः प्रयत्न करणारीं जीं माणसें थिओसॉफ़िकल सोसायटींत आहेत, त्यांच्याशीं विचारविनिमय केल्यास पुष्कळ गैरसमज़ दूर होऊन नवीन माणसाला स्वतःचा मार्ग अधिक स्पष्टपणें दिसण्याच़ाहि संभव आहे. या सोसायटींत एक अंतःसंप्रदाय आहे, व या मार्गानें लवकर प्रगति कशी करावी हें या संप्रदायांत शिकविलें ज़ातें. अर्थात् या सर्व गोष्टींच़ा ज़ो शहाणपणानें फायदा घेईल त्याला शिष्यत्वाच्या पायरीपर्यंत ज़ाण्यास या सोसायटीची मदत होईल हें उघड आहे. अशा प्रकारची मदत करणाऱ्या अनेक संस्था ज़ुन्या काळीं सर्व जगभर होत्या. हल्लींहि गुप्त रूपानें किंवा उघड स्वरूपांत असल्या संस्था विद्यमान आहेत. त्यांच़ाहि उपयोग माणसाला होऊं शकेल. उलट पक्षीं ऋषिसंघ, ईश्वरी योजना, ती योजना सफल करण्यासाठीं होतकरू माणसांनीं उद्योग करण्याची आवश्यकता, जीवन्मुक्त ऋषींचें सध्यांचें अस्तित्व व त्यांचें शिष्यत्व आज़च्या काळींहि मिळविण्याची शक्यता वगैरे मुद्द्यांची थट्टा ज्या ज्या संस्थांतलीं ज़बाबदार माणसें करीत असतील त्या संस्था होतकरू माणसाला उपकारक होऊं शकणार नाहींत हें उघड आहे.

येथवर केलेल्या विवेचनावरून दिसून येईल कीं, नदीच्या पाण्याबरोबर आपोआप पुढें ज़ाणाऱ्या पानाप्रमाणें ज्या माणसाला च़ालीरीतींच्या व शिष्टाचारांच्या प्रवाहासमवेत, स्वतःच़ा विचार व प्रयत्न न करतां, ढकलत ढकलत पुढें ज़ावयाचें असेल, वाटेंत कधीं भोंवऱ्यांत घिरट्या घालाव्या, कधीं बाज़ूला दगडांमध्यें अडकून पडावें, वेळेनुसार नदीप्रवाह थोडा वेळ उलट्या दिशेनें ज़ात असला तर त्याबरोबर मागें फिरावें, अशा प्रकारें ज्याला रमत रमत सावकाशीनें ज़ावयाच़ें असेल, त्याच्याकरितां हा मार्ग नाहीं. असला माणूसहि केव्हांतरी सरतेशेवटीं ज्ञानोदधीस ज़ाऊन मिळणार हें खचित आहे. पण वाफ़ेच्या इंजिनानें पाणी कापीत कापीत शीघ्र गतीनें ज़ाणाऱ्या आगबोटीसारखें ज्याला सरळ नाकासमोर ज़ावयाचें आहे, पाण्याच्या शक्तीनें पाण्याबरोबर न ज़ातां स्वतःच्या सामर्थ्यानें वेगांत ज़ावयाचें आहे, भोंवऱ्यांत न सांपडतां आणि खबदडींत न अडखळतां ज्याला तडक समुद्र गांठणें आहे, त्याकरितां पडतील ते श्रम करण्याची ज्याची तयारी आहे, त्याच्याच़साठीं हा गुरुमार्ग आहे. मीं कोणीं ढुढ्ढाचार्य आहे ही भावना माणसाला या मार्गावर विसरावी लागते. सामान्यतः माणसाच़ा स्वभाव असा असतो कीं प्रत्येक गोष्टीकडे पाहून 'मला' या गोष्टीच़ा फायदा काय, याच़ा विचार त्याच्या मनांत सदा यावा. प्रायः ह्या 'मीं'च्या मुहूर्तमेढीभोंवतीं त्याचे विचार, त्याच्या वासना व त्याच्या क्रिया सारख्या  घिरट्या घालीत असतात. या मार्गानें ज़ाऊं इच्छिणाऱ्या माणसाला ही वृत्ति टाकून द्यावी लागते. त्यानें 'मीं'ची मुहूर्तमेढ उपटून टाकून ईश्वर, ईश्वराची योजना, जीवन्मुक्त गुरु, त्यांचें कार्य, जगाची उत्क्रांति, लोकसंग्रह यांची मुहूर्तमेढ त्या ठिकाणीं रोंवली पाहिजे. स्वतःची आवड कांहींहि असो, जी गोष्ट जगाच्या प्रगतीला साहाय्यक असेल तिला आपण पाठिंबा द्यावा, व विरोधक असेल तिच्या उलट जावें असें धोरण त्यानें ठेवणें ज़रूर असतें.  सर्व जीवन्मुक्त याच़ धोरणानें च़ालतात आणि म्हणून शिष्य होऊं पाहणारानें जीवन्मुक्तांच्या या दृष्टीच़ा अंगीकार करणें अवश्य असतें. त्यानें अशी दृष्टि ठेवून कांहींतरी लोकोपकाराच़ें कार्य अंगावर घेतलें असलें पाहिजे. कोणतेंहि सत्कार्य हें सद्गुरूच़ेंच़ कार्य असतें. रोज़च्या संसारांत प्रत्येक माणसाला असलें सत्कार्य सदैव सांपडण्याज़ोगें असतें. बारीक सारीक गोष्टीमध्येंहि त्याला काम करण्यास वाव असतो. ही गोष्ट लहान आहे असें न म्हणतां आपल्यासमोर जें करण्यासारखें असेल तें त्यानें अंगावर घेतलें पाहिजे. कुटुंबांतल्या लहान सहान गोष्टींखेरीज़हि अनेक सार्वजनिक उद्योग त्याला करण्यासारखे असतात. सर्व धर्म ऋषिसंघानें स्थापलेले आहेत. त्यांची योग्य दिशेनें सुधारणा करणें अवश्य असतें. थिओसॉफ़िकल् सोसायटी ही जीवन्मुक्तांनींच़ स्थापली आहे. तिच़ें कामहि करण्याज़ोगें आहे. ईश्वर-संकल्पास न सोडतां निःस्वार्थ बुद्धीनें व स्वतःच्या आवडीनावडी बाज़ूला ठेवून देशोदेशीं नाना क्षेत्रांत सुधारणा करण्यास वाव आहे. शिक्षणसुधारणा, गरिबांची सुधारणा, तरुणांच्या चळवळी, स्काउट् ची चळवळ, को-मेसनरी, लिबरल् कॅथलिक् चर्च वगैरेंमधील कितीतरी उद्योग करण्याज़ोगे आहेत. त्यांतला आपणांस आवडेल व पटेल असा कांहींतरी उद्योग ईश्वरी संकल्पाची परिपूर्ति व भावी सद्गुरूंची सेवा म्हणून माणसानें अंगावर घेतला पाहिजे. त्याबरोबरच़ त्या माणसानें स्वतःचें शील सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा रीतीनें माणूस वागूं लागला म्हणजे त्या होतकरू माणसाकडे त्याच्या भावी सद्गुरूचें लक्ष वेधतें आणि ते त्याला ज़वळ करतात. त्या सद्गुरूंच्या कल्पनेवर ध्यान करूनहि त्यांचें लक्ष त्याला आपणांकडे वेधतां येईल. पण तसें करण्याची गरज़ नसते. मात्र योग्य रीतीनें ध्यान केल्यास त्या सद्गुरूपासून मिळणारी शक्ति त्याला स्फूर्ति देण्यास व शील सुधारण्यास उपयोगी पडण्याज़ोगी असते. हा मार्ग सोपा आहे असें कोणाच़ेंहि म्हणणें नाहीं. होतकरू माणूस आणि जीवन्मुक्त सद्गुरु यांच्यामध्यें भूपृष्ठ व हिमालयाचें शिखर इतकें महदंतर असतें.  हें अंतर तोडीन असा ज्यानें
चंग बांधला त्याला उत्क्रांतीच़ा मोठा च़ढाव भराभर च़ढावा लागेल हें उघड आहे. हा च़ढाव इतका कठीण आहे आणि त्याची उंची इतकी प्रचंड आहे कीं, या मार्गानें वर ज़ाऊन पूर्वींच्या लोकांनीं ज़र यश मिळविलें नसतें, तर आज़ त्या मार्गानें जाऊं पाहणाऱ्याला लोकांनीं वेड्यांत काढलें असतें. पण, ज्ञानेश्वरांनीं वर्णिल्याप्रमाणें 'पाठीं महर्षी येणें आले । साधकांच़े सिद्ध झ़ाले ।' असा पूर्वेतिहास असल्यानें आज़हि त्या मार्गानें पुढें ज़ाऊन अखेरी साधणें शक्य आहे यांत संदेह नाहीं. या बिकट मार्गावर अनेक पायऱ्या आहेत. त्या सर्वांच़ा विचार या पुस्तकांत आपणांला यथाक्रम कर्तव्य आहे. पैंकीं पहिलीच़ा विचार पुढील प्रकरणांत करूं.
 

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण ५ : पहिली पायरी