प्रकरण  तिसरें


ऋषिसंघाच्या  कार्याची  भूमिकाआपल्या पृथ्वीवर परमज्ञानी मनुष्यांच़ा एक सुसंघटित संघ असून उत्क्रांतीचीं सूत्रें  या संघाकडून आंतून हलविलीं ज़ातात असें पूर्वींच्या प्रकरणांत आम्हीं सांगितलें आहे; पण हें आमच़ें म्हणणें सर्वांस पटेलच़ असें नाहीं. ज़र पृथ्वीच्या व्यवहाराच्या पाठीमागें परम दयाळु महाज्ञानी पुरुष आहेत तर पृथ्वीवर एवढें दुःख कां ?  या दुःखाच़ें निवारण हीं थोर माणसें कां करीत नाहींत ?  मानवी उत्क्रांति संपलेली आहे अशा अधिकाराचीं माणसें ज़र मनुष्य ज़ातीला वळण लावीत असतील, तर मानवी इतिहासांत इतका अन्याय कां ?  सांपत्तिक दृष्ट्या जगांतील बहुजनसमाज इतका कंगाल कां ?  जगाचें दुःख या परम कारुणिक पुरुषांना दिसत नाहीं कां ?  त्या दुःखाच़ा त्यांना कळवळा येत नाहीं कां ?  राजकारणाच्या क्षेत्रांत सर्वत्र अन्याय दिसतो, अर्थशास्त्राच्या क्षेत्रांत सर्वत्र दारिद्र्य दिसतें, तें या ज्ञानी पुरुषांना नाहींसें करतां येत नाहीं कां ?  एखाद्या पुरुषाला शिष्य म्हणून हातीं धरणें व त्याला शहाणा करणें, यापेक्षां सर्व ज़गाला सुखी करणें ही गोष्ट जास्त महत्त्वाची नाहीं कां ?  हे जीवन्मुक्त पुरुष मूठभर लोकांना शिष्य करण्याऐवजीं जगाच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रांतील अन्याय नाहींसे करण्यासाठीं कां झ़टत नाहींत ?  त्यासाठीं आपल्या योजना जगासमोर कां मांडीत नाहींत ?

प्रस्तुत पुस्तकांत जे मूलभूत विचार मांडण्यांत येत आहेत त्यांवर वरील प्रकारच़े आक्षेप पुष्कळदां घेण्यांत येत असतात. हे आक्षेप मूलग्राही असल्यामुळें आमच्या प्रतिपाद्य विषयाच्या पुढील पायऱ्या सांगण्याच्या अगोदर ह्या आक्षेपांच़ा परामर्श घेणें अवश्य आहे. त्यांच़ा नीट विचार झाल्यावर आपला पुढील मार्ग निष्कंटक होईल. यासाठीं ह्या आक्षेपांकडे या प्रकरणांत लक्ष पुरवूं या.

प्रथम ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, मानवी उत्क्रांतीला योग्य वळण लावण्याच्या कामीं जीवन्मुक्त पुरुष जे उद्योग करतात त्या उद्योगांत एक गोष्ट त्यांनीं ठाम ठरविलेली असते. ती ही कीं, मनुष्याच्या बुध्दिस्वातंत्र्यावर यत्किंचितहि घाव घालावयाच़ा नाहीं. बुध्दीची जी ज्योत प्रत्येक माणसाच्या अंतरंगांत असते तीच़ त्याला वाट दाखवीत असते. कांहीं माणसांमध्यें ही बुध्दीची ज्योत अगदीं लहान असेल, कांहींच्या ज्योतीचा प्रकाश अगदीं अंधुकहि असेल, पण जी काय लहानमोठी ज्योत माणसाच्या अंतरंगांत असते तीच़ त्याला मार्गदर्शक होत असते. ही ज्योत कदापि विझवावयाची नाहीं, उलट तिच़ा प्रकाश शक्य तितका जास्त करावयाचा हें सर्व जीवन्मुक्तांचें कायमच़ें धोरण असतें. त्या जीवन्मुक्त पुरुषांनीं मनांत आणलें तर प्रत्येक माणसाच्या हृदयांतील ही बुध्दिस्वातंत्र्याची ज्योत विझ़वून व ज़बरीनें प्रत्येक माणसाला सदाचारानें वागण्यास लावून त्यांना सर्व जग सुखी करतां येईल. पण तसें करण्याची त्यांची इच्छा नाहीं. प्रत्येक माणसाच्या बुध्दीला स्वातंत्र्य असतें. समोर असलेल्या निरनिराळ्या गोष्टींपैंकीं तो आपल्या बुध्दिस्वातंत्र्याच्या ज़ोरावर हवी ती गोष्ट निवडीत असतो. व्यक्तिमात्राच़ें हें बुध्दिस्वातंत्र्य ज़र चिरडून टाकलें, त्यानें अमुकच़ केलें पाहिजे असें ज़र त्याच्यावर बंधन घातलें तर समाजांतील सर्व भानगडी सरळ करतां येतील व मानवज़ात सुखी होऊं शकेल. मनुष्याला ज़र यंत्रासारखें बनविलें, त्याच़ें वर्तन अमुक प्रकारच़ें असलें पाहिजे अशी त्याच्यावर बाहेरून सक्ति केली, किंवा त्याच्या मनांतच़ आंतून अशी एक कळ फिरविली कीं फक्त च़ांगल्या गोष्टी करणें त्याला भाग होईल, तर जगांत सुबत्ता व सुख यांचें रामराज्य निर्माण होणें कठीण नाहीं. अलीकडे लहान मुलांचीं अशीं पुष्कळ खेळणीं बाज़ारांत मिळूं लागलीं आहेत कीं त्यांना किल्ली दिली कीं त्यांच्या सर्व ठराविक हालच़ाली बिनच़ूक होतात. मणसाला अशा प्रकारच़ें खेळणें बनविणें हें उत्क्रांतीचें ध्येय नाहीं. उत्क्रांतिक्रमांत सर्व माणसें सरतेशेवटीं ज़बाबदार व सर्वांगपरिपूर्ण बनावयाचीं आहेत. आदर्श माणसानें आपलें कर्तव्य समज़ून उमज़ून निवडावयाच़ें आहे, योग्य तें बुध्दिपुरस्सर स्वीकारावयाच़ें आहे. माणूस सांगकाम्या व्हावा असें सृष्टीच़ें ध्येय नाहीं. तो डोळस, विवेकी व ज़बाबदार व्हावा, वाईट मार्गानें ज़ाण्याची मोकळीक असूनहि सन्मार्गगामी व्हावा अशी उत्क्रांतीची योजना आहे.
अनेक आईबाप आपल्या मुलांना सदा धारेवर धरतात, त्यांना बिलकुल स्वातंत्र्य न देतां बारीकसारीक गोष्टींतहि त्यांनीं कसें वागावें याच़ें त्यांच्यावर बंधन घालतात. अशा कुटुंबांत ज़री पुष्कळ सुबत्ता आणि सुख असलें तरी ज़बाबदारीची ज़ाणीव नसते. त्यांतील मुलांच्या अंगीं कर्तबगारी येत नाहीं. स्वतः विचार करून योग्य अयोग्य ठरविण्याची व तदनुसार वागण्याची त्यांना त्यांच्या आईबापांनीं संवयच़ लाविलेली नसल्यामुळें आईबाप मेले, तर असलीं मुलें पंगु होतात; व वाईट संगतींत सांपडलीं तर कुमार्गासहि लागतात. दुसऱ्या प्रकारच़े आईबाप असतात ते आपल्या मुलामुलींना ठराविक मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य देतात. त्यामुळें कधीं कधीं वडील माणसांच्या मताविरुध्द तीं वागतात आणि त्यानें कौटुंबिक शांतिसुखाच़ा थोडाफार भंगहि होतो, पण स्वातंत्र्याच़ा उपयोग करण्यास हीं मुलें हळूं हळूं शिकतात, योग्य अयोग्य निवडण्याच़ें सामर्थ्य त्यांना येतें, आणि ज़री कधीं मधीं त्यांच़े हातून च़ुका झाल्या व त्या च़ुकांचें प्रायश्चित्त भोगणें ज़रूर झालें, तरी हींच़ मुलें मोठेपणीं ज़बाबदारी अंगावर घेण्यास समर्थ होऊन नांवलौकिकास च़ढतात. उत्क्रांतिमार्गावर प्रत्येक माणसाला कांहीं स्वातंत्र्य असतें. समोर असलेल्या अनेक मार्गांपैंकीं कोणता धरावा हें आपल्या बुध्दीच्या ज़ोरावर त्याला ठरवावें लागतें. हें ठरवितांना पुष्कळ माणसें अज्ञानतः अथवा लोभमोहादि दोषांमुळें च़ुका करतात. त्यानें जगांत दुःख निर्माण होतें. ज़र माणसाला खरोखरी शहाणें करावयाचें असेल, ज़र त्याला ज़बाबदारी शिकवावयाची असेल, स्वतःच्या विवेकानें त्यानें योग्य अयोग्य निवडावें ही कुवत त्याच्या अंगीं आणावयाची असेल, तर त्याला बुध्दिस्वातंत्र्य पाहिजे, च़ुका करण्याची संधि पाहिजे, आणि ठेंच़ खाऊन सुधारण्याची शक्यता पाहिजे. आदर्श मनुष्य यंत्र नसून संपूर्ण स्वतंत्र व संपूर्ण ज़बाबदार असा प्रतिईश्वर असतो. उत्क्रांतिमार्गावर असलीं आदर्श माणसें निर्माण व्हावयाचीं असल्यामुळें त्यांना आरंभापासून बुध्दिस्वातंत्र्य देणें ज़रूर असतें. त्यामुळें मानवी इतिहासांत पुष्कळ दुःख येतें; पण तें सारें शिक्षणात्मक असतें. अर्थात् हें बुध्दिस्वातंत्र्य कधींहि नाहींसें करावयाच़ें नाहीं असें सर्व जीवन्मुक्तांच़ें नित्य धोरण असतें.

माणसावर ज़बरी केल्यामुळें ज़र तो सद्वर्तनी झाला तर त्या सद्वर्तनाची किंमत काय ?  माणसाच्या हृदयांत एखादी कळ कोणीं फिरविली किंवा त्याच्या पोटांत अमुक एक औषधाची गोळी घातली, आणि त्याच़ा परिणाम म्हणून ज़र तो मनुष्य खरें बोलूं लागला तर त्या खरें बोलण्याची किंमत काय ?  ज़र खोटें बोलणें त्याला शक्यच़ नाहीं तर तो खरें बोलतो याला महत्त्व काय ?  बरें, महत्त्व राहो, पण त्याला शाश्वती काय ?  कळ फिरविल्यामुळें किंवा पोटांत गोळी गेल्यामुळें जी जीभ अनन्यगतिक होऊन खरें बोलते, ती जीभ ती कळ संपल्यावर किंवा ती गोळी पच़ून नाहींशी झाल्यावर पुढें खरें बोलेल कशावरून ?  ज़र मानवी वर्तनाला कांहीं किंमत असेल तर तें वर्तन बुध्दिपुरस्सर झालें पाहिजे आणि त्याला शाश्वती पाहिजे. अलीकडे कित्येक शास्त्रज्ञांनीं शोध लावला आहे कीं माणसाच्या शरीरांत निरनिराळ्या ग्रंथी असतात आणि या गांठींतले रस निरनिराळे मनोधर्म उत्पन्न करतात. समज़ा, हे शोध आणखी पुढें गेले आणि असें ठरलें कीं माणसाच्या कांखेंत अमुक गांठ बसविली कीं तो सत्यवादी होईल, त्याच्या मानेखालीं उजवीकडे अमुक गांठ बसविली कीं त्याचा स्वार्थ सर्वस्वी सुटेल, आणि डावीकडे अमुक बसविली तर संपूर्ण निरहंकार वृत्ति त्याच्या मनांत बाणेल; असल्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचीं पथकें कामास लावून वाटेल त्या देशाला आपल्या भूमीवरील भांडणें, मारामाऱ्या, गुन्हे सारे बंद करतां येतील. पण या सुधारणेला किंमत काय
?  या गांठींतून ते रस बाहेर येण्याच़ें थांबले कीं त्या सुधारणेची इतिश्री होणार नां ?  च़ोराच्या अंगांत एका विशिष्ट गांठीच़ें कलम करून त्याला साव बनविणें व त्याच़े हात बांधून त्याला साव बनविणें यांत तत्त्वतः फरक नाहीं. जीवन्मुक्तांच़ा मार्ग वेगळा आहे. सूर्य ज़सा आपला प्रकाश झ़ाडांवर पाडून झ़ाडांना पालवी, फुलें-फळें आणतो, तद्वत् माणसांमध्यें सद् वृत्तींचा विकास करून जग सुधारण्याचा जीवन्मुक्तांचा उद्योग आहे. तो उद्योग अधिक कठीण आहे आणि म्हणूनच़ तो कष्टप्रद होतो व त्याला कालावधि लागतो.

मानवी  स्वातंत्र्य

बुध्दिस्वातंत्र्य असल्यामुळें ज़सा जगांत माणसाच्या सद्गुणांस वाव सांपडतो, तसा त्याच्या वाईट वृत्तींनाहि सांपडतो. अर्थात् अज्ञान, दुराग्रह, निष्ठुरपणा, स्वार्थ वगैरे गोष्टी जगांत माज़तात व त्यामुळें जग दुःखीकष्टी होतें. हें दुःख जीवन्मुक्त पुरुष नाहींसें करूं इच्छित नाहींत. एखाद्या शहरांतील लोक शहरांत सर्वत्र घाण करीत असले, तर ती बंद करण्याचा उपाय म्हणजे ती घाण म्युनिसिपालिटीनें निमूटपणें काढून टाकणें होय असें कित्येकांस वाटेल; पण या उपायानें त्या शहरांतील नागरिक सुधारणार नाहींत. शहरांत ज़ागज़ागीं त्यांनीं घाण करावी, रस्त्याच्या कडेनें त्यांनीं आपल्या मुलांना प्रातर्विधि उरकण्यासाठीं बसवावें, रस्त्यावर असलेल्या इमारतींमधील लोकांनीं आपापल्या घरांतील केरकच़रा रस्त्यावर ओतून टाकावा, असें ज़र नागरिक लोक एका बाज़ूनें करूं लागले व दुसऱ्या बाज़ूनें म्युनिसिपालिटीनें ही सारी घाण बिनतक्रार साफ़ करण्याचें सुरूं केलें, तर तें शहर स्वच्छ होणार नाहीं व तेथील नागरिक नीतिहि सुधारणार नाहीं. म्युनिसिपालिटी जितकें जितकें शहर साफ़ करील तितकी तितकी अधिक घाण लोक शहरभर करतील. अशा वेळीं म्युनिसिपालिटीनें हस्तपत्रकें काढून शहरवासीयांना आरोग्याचें शिक्षण दिलें पाहिजे, जे घाण करीत असतील त्यांना दंड केला पाहिजे, घाणीनें ज़ो उपद्रव होतो तो कित्येक निर्ढावलेल्या लोकांना भोगावयास लावला पाहिजे आणि नागरिकांच्या मार्गांत कांहीं प्रामाणिक अडचणी असल्या तर त्या दूर केल्या पाहिजेत. असे नाना उपाय केले तर शहर कायमच़ें निर्मळ होईल व नागरिकांना ज़बाबदारीची ज़ाणीव येईल. जगांत जें दुःख आहे तें माणसाच्या दुर्गुणांनीं व स्वार्थी प्रवृत्तींनीं निर्माण झ़ालेलें आहे. स्वतः खटपट करून जेव्हां माणूस या दुःखांचीं कारणें नाहींशीं करील तेव्हां दुःख ज़ाईल व माणूस ज़बाबदारीचें सद्वर्तन शिकेल. अशा स्थितींत जगाच्या पाठींमागें असलेले परम कारुणिक महात्मे जगांतील दुःख पुसून टाकण्यास तयार होणार नाहींत. लबाड, स्वार्थी, अज्ञ व क्रूर अशा जनतेनें दुःखाचीं झाडें जगांत सर्वत्र लावावीं आणि त्या परम कारुणिक जीवन्मुक्तांनीं त्या झाडांना येणारीं कडू फळें आपल्या पोटांत घालून तीं खाऊन पच़वून  निमूटपणें नाहींशीं करावीं हा श्रमविभाग जगाला आवडला तरी तो परिणामीं हितकर नसतो. अर्थात् हे जीवन्मुक्त पुरुष तसें धोरण स्वीकारीत नाहींत.

जग च़ुटकीसारखें एकदम कां सुधारत नाहीं, जगाची प्रगति इतक्या मंदगतीनें कां च़ालते याचें कारण वरील विवेचनावरून उघड होईल. माणूस अत्यंत मंदगतीनें शिकतो व शहाणा होतो. दुःखाचे विविध अनुभव घेऊन तो सद्वर्तनी होतो. जग म्हणजे असल्या मंदगतीनें प्रगति करणाऱ्या व्यक्तींचा मेळावा होय. अर्थात् व्यक्ति ज़र सावकाशपणानें शहाणी होत असेल तर सर्व जगहि सावकाशपणानेंच़ सुधारणार. या सर्व गोष्टींच़ा विचार जीवन्मुक्त पुरुष करतात, आणि मानवी उत्क्रांति शक्य तितकी लवकर होण्यासाठीं त्यांना योग्य दिसतील ते सर्व उपाय अंमलांत आणतात. कुशल बागवान ज़शी बागेची काळजी घेतो, तशी ते जगाची काळजी घेतात. ज्या झ़ाडाला पांच़ वर्षांनीं फूल यावयाच़ें, त्या झ़ाडाला खत घालून, योग्य वेळीं पाणी देऊन, त्याच्या सभोंवतीं कुंपण घालून, त्याच्यावर सांवली पडत असली तर ती काढून टाकून, हरप्रयत्नानें त्याला तीनचार वर्षांत बागवान फूल आणूं शकतो. पण आंब्याच्या कोईपासून अर्ध्या तासांत झाड तयार करून त्याच़े आंबे प्रेक्षकांस खायला देण्याच़ें  जादुगाराच़ें सामर्थ्य त्या बागवानाला नसतें. असलेले सृष्टिनियम त्याला मोडतां येत नाहींत अथवा नवे सृष्टिनियम त्याला बनवितां येत नाहींत. जीवन्मुक्त पुरुषांचे मानवी उत्क्रांति साधण्याच़े प्रयत्न बागवानासारखे असतात.

जग सुधारण्याच़े जे जीवन्मुक्त पुरुषांच़े मार्ग आहेत त्या सर्वांची सांगोपांग माहिती उपलब्ध नाहीं. त्यांपैंकीं बरेच़ मार्ग प्रस्तुत लेखकांच्या व वाचकांच्या बुध्दीच्या आटोक्याबाहेर असण्याचा संभव आहे. त्यांपैकीं कांहीं थोड्या मार्गांची किंचिन्मात्र कल्पना या पुस्तकाच्या समग्र अभ्यासानें आमच्या वाचकांना येऊं शकेल. जगाच्या आर्थिक व राजकीय सुधारणेच्या उत्कृष्ट योजना आंखून हे जीवन्मुक्त पुरुष त्या योजना सर्वांसमोर कां ठेवीत नाहींत असा कोणीं प्रश्न विचारतात. आम्हांला ज़र लढाई नको आहे, तर जगांतून लढाईची हकालपट्टी करण्याची एक उत्तम योजना हे ज्ञानी पुरुष जगापुढें कां मांडीत नाहींत ?  आम्हांला दारिद्र्य नको आहे, तर जगांतील दारिद्र्य नाहींसें करण्याची दुसरी एक समाजसत्तावादाची उत्तम योजना ते जनतेला कां सादर करीत नाहींत ?  असले प्रश्न सार्वजनिक क्षेत्रांत काम करणारीं माणसें कधीं कधीं विचारतात. याला उत्तर असें कीं लढाईची हकालपट्टी करण्याची योजना करण्याला आज़ तरी एखाद्या जीवन्मुक्त पुरुषानें पुढें सरसावण्याच़ें कारण नाहीं. तशी योजना जगासमोर ठेवणारीं अनेक माणसें आज़ विद्यमान आहेत. आम्हींहि ती थोडक्या शब्दांत येथें मांडूं शकूं. प्रथम सर्व मोठ्या राष्ट्रांची एक यादी करावी ; आणि मग 'आम्हीं केव्हांहि लढाई करणार नाहीं, वादाच़ा मुद्दा आला तर ति-हाईत पंच नेमून ते ज़ो निकाल देतील तो आम्हीं शिरसावंद्य मानूं, आणि जें राष्ट्र असल्या पंचांच़ा निकाल न मानतां लढाईस उद्युक्त होईल त्याच्या विरुध्द बाकीच्या राष्ट्रांनीं संघटित लढाई पुकारावी व त्यासाठीं आम्हीं आमच़ें सैन्य त्या सर्व राष्ट्रांच्या संघाच्या हवालीं करूं' अशा आशयाच्या करारपत्रावर त्या सर्व राष्ट्रांच्या हळूंहळूं सह्या घ्याव्या आणि सर्वांच्या सह्या झ़ाल्याबरोबर तो करार अंमलांत आणावा. तपशिलांत ज़रूर तो फरक केल्यास लढाईची जगांतून हकालपट्टी करण्यास आमची ही योजना पुरेशी आहे हें कोणासहि समजेल.  असें असतांना जगांतील लढाई कां बंद होत नाहीं ?  त्याच़ें खरें कारण असें कीं फारच़ थोड्या देशांना लढाईच़ा खरोखरी संपूर्ण तिटकारा आलेला आहे. कांहीं देशांना तर युध्दाची मनांतून खुमखूम आहे. ज्या राष्ट्रांना लढाईच़ा पुष्कळ तिटकारा आहे त्यांच्या मनांतहि आपलें सैन्य ज़रूर तेव्हां इतर राष्ट्रांच्या हवालीं करण्याची इच्छा नाहीं. खेरीज़ फार लांबच्या राष्ट्रांत लढाई झाली आणि आपल्या राष्ट्राच़ा त्यांत फायदा तोटा मुळींच़ नसला तर असली लढाई बंद करण्यासाठीं जी तत्त्वनिष्ठा लागते ती पुष्कळ राष्ट्रांना नाहीं व असल्या दूरच्या लढाईपायीं द्रव्यबळ व मनुष्यबळ खर्च़ण्याची त्यांना इच्छा नाहीं. हल्लींच्या राष्ट्रसंघांत जीं माणसें प्रमुख आहेत त्यांपैंकीं कांहींना लढाईच़ा तादृश तिटकारा आलेला नाहीं व फक्त तोंडानें शांतिसूक्तें म्हणण्यापलीकडे कित्येक पुढारी कांहींहि करूं इच्छित नाहींत. एवंच काय कीं खरोखरी लढाई बंद करण्याची तीव्र इच्छा व राष्ट्राराष्ट्रांच्या व्यवहारांत न्याय आणण्याची तत्त्वनिष्ठा हीं जनतेंत पुरेशा प्रमाणांत नाहींत. यामुळेंच़ लढाई बंद करण्याची उत्कृष्ट योजना एखाद्या राजकारणी पुरुषानें जगासमोर ठेविली तरी ती फुकट जाते. तेव्हां एखाद्या जीवन्मुक्त पुरुषानें एक सर्वांगसुंदर योजना जगासमोर ठेवावी या म्हणण्याला कांहींच़ अर्थ नाहीं. दारिद्र्याची हकालपट्टी करण्यासाठीं समाजसत्तावादाची सर्वमान्य अशी योजना अद्यापि जगापुढें आलेली नाहीं, हें खरें आहे. तशी योजना आंखणें फारच़ भानगडीचें काम आहे. पण तशी योजना एखाद्या जीवन्मुक्तानें आंखली तर तीहि लढाई थांबविण्याच्या उपरोक्त योजनेप्रमाणें केराच्या टोपलींत खास ज़ाईल !

राजकारणाचें  क्षेत्र

राजकारण व अर्थशास्त्र ह्यांचीं क्षेत्रेंच़ अशीं आहेत कीं त्यांत स्वभावतःच़ मलिनपणा फार असतो. एखाद्या प्रसंगीं या क्षेत्रांतहि ध्येयवादाला पुष्कळ वाव मिळूं शकेल हें खरें आहे. पण गेल्या दोन हज़ार वर्षांचा एकंदर इतिहास पाहिला तर जगाच्या राजकारणांत युध्दें, लुटालूट, आक्रमण, राज्यक्रांति, ज़ुलूम, सूड, खून, महत्त्वकांक्षा, फसवाफसवी यांच़ेंच़ प्राधान्य आढळेल. अर्थशास्त्राच्या व्यवहारी क्षेत्रांतहि लोभ, स्वार्थ, व्यापारांतली लबाडी, संप, पिळणूक, नासधूस वगैरे गोष्टी फार प्रमाणांत दिसून येतात. श्रीकृष्णाची शिष्टाई ज़ुन्या काळीं कौरवांनीं मानली नाहीं. आज़ ज़र कोणीं श्रीकृष्ण जगासमोर आला तर त्याच़ें म्हणणें आज़च़े क्रांतिकारक, आज़च़े मुत्सद्दी, आज़च़े सेनापति, आज़च़े हुकूमशहा, आज़च़े भांडवलवाले किंवा आज़चे मज़ुरांच़े पुढारी मानतील असें म्हणण्यास फारशी ज़ागा नाहीं.
ज्या क्षेत्रांतील दहापैंकीं नऊ उद्योगांत 'बळी तो कान पिळी' हें ब्रीदवाक्य अद्यापि प्रभावी आहे, कोणाच्या मनगटांत किती ज़ोर आहे, याच्या हिशेबावरच़ ज्या क्षेत्रांतील बरेच़से उद्योग नेहमीं च़ालतात, त्या क्षेत्रांत ईश्वर व त्याची योजना यांना मानाचें स्थळ मिळवून देणें किती कठीण आहे व त्या क्षेत्रांतील अहंमन्य कार्यकर्त्यांना आपले उद्योग ईश्वरी होकायंत्राच्या दिशेनें च़ालवा असें सांगून त्यांची दिशा बदलून घेणें किती मुष्किलीचें आहे हें कोणाच्याहि लक्षांत येईल. पण हीं क्षेत्रेंहि ऋषिसंघाच्या कक्षेंतलींच़ असतात. राजकारण हें मनूच्या अधिकारांतलें क्षेत्र असतें, हें पूर्वीं आम्हीं लिहिलेंच़ आहे. या क्षेत्रांतहि ईश्वरी योजना वंद्य मानणारा पुढारी एखादे वेळीं ऋषिसंघाला सांपडतो व त्यावेळीं ऋषिसंघ आपली योजना त्याला समज़ावून देऊन त्याच्याकडून सुबुध्दपणें ती योजना सफल करण्याचें कार्य करून घेतो. भगवद्गीतेंत दहाव्या अध्यायांत श्रीकृष्णांनीं आपली योजना अर्जुनासमोर ठेविली आहे. भगवंतांनीं अर्जुनाला त्या वेळीं सांगितलें आहे कीं इतिहासाला प्रवाह असतात, व नदीच्या पात्रांतून जसें पाणी समुद्राकडे वाहतें किंवा तेजस्वी ज्योतीकडे जशी पतंगांची रांग धांवत जाते तसे हे इतिहासाच्या रंगभूमीवरचे प्रवाह सुरूं असतात. त्या रंगभूमीवर कोणत्या गोष्टी होतील व कोणत्या होणार नाहींत याची योजना अगोदर निश्चित केलेली असते, आणि शहाण्या राजकारणी पुरुषाचें काम हें असतें कीं ती योजना समजावून घेऊन त्यानें ती जगांत प्रकट करण्यास निमित्तमात्र कार्यवाह व्हावें. [भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायांतील २६ ते ३४ श्लोक पहा. त्यांत वरील विचारसरणी अनुस्यूत असलेली सांपडेल.]  समर्थ रामदास स्वामींनीं दिलेल्या वर्णनावरून त्यांनाहि त्यांच्या कालची भावी राजकीय योजना दाखविण्यांत आलेली दिसते. त्यांच्या आनंदवनभुवन नामक स्फुट प्रकरणांत 'स्वप्नीं जें देखिलें रात्रीं। तें तें तैसेंचि होतसे।।'  असें त्यांनीं आरंभीं म्हटलें असून लगेच़ त्यानंतर महाराष्ट्रांत शिवाजीमहाराज़ व मोंगल यांचा जो सामना झाला त्याच़ा सविस्तर उल्लेख केलेला आहे. [स्वप्नांत म्हणजे मनाच्या एका ज्ञानगर्भ अवस्थेंत. संतांना स्वप्नांत दृष्टान्त होत असतात हें महशूर आहेच़.]  हें प्रकरण वाच़णारास रामदास स्वामींना ज्या कार्यक्षेत्रांत पुढें पडावयाच़ें होतें त्या क्षेत्रांतील ईश्वरी योजना अगोदर दाखविण्यांत आली होती आणि त्या योजनेनुसार पुढें सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणें घडून आल्या, याविषयीं संदेह राहणार नाहीं. अलीकडेहि क्वचित्प्रसंगीं असें झालेलें आढळतें.

[या बाबत भागवत-गोखलेकृत 'स्वप्नमालिकेंतील मुलीशीं लग्न व इतर खऱ्या  घटना' या पुस्तकांतील सिध्दांच़ा संघ व हिंदुस्थानचें स्वराज्य नामक प्रकरण वाचनीय आहे.

गेलें महायुध्द १९१४ सालीं सुरूं होऊन १९१८ सालीं संपलें. या कालांत डॉ.बेझंट् यांना हिंदुस्थानांत होमरूलची च़ळवळ चालविण्यास ज़रूर ती माहिती जीवन्मुक्त पुरुषांपासून मिळालेली होती. उदाहरणार्थ, १९१५ सालीं त्यांस कांहीं जीवन्मुक्त पुरुषांनीं अंतरंगाच्या भूमिकेवर एका विशिष्ट स्थळीं बोलावून नेलें होतें व महायुध्दांतील कांहीं भावी गोष्टी चित्ररूपानें त्यांना दाखविल्या होत्या. महायुध्दांत इंग्लंड जिंकेल हें त्यावरून
त्यांस माहीत झालें होतें. डॉ.बेझंट् यांस अंतरंगाच्या भूमिकेवर ज्या वेळीं या गोष्टी दाखविण्यांत आल्या त्या वेळीं त्या भूमिकेवर श्री.लेडबीटरहि हजर होते. त्याबद्दलचीं त्या दोघांनीं त्या वेळीं स्वहस्तानें केलेलीं टिपणें अद्याप अड्यार येथें आहेत. १९१७ सालीं डॉ.बेझंट् या राष्ट्रीयसभेच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या अध्यक्षीय भाषणांत पुढील वाक्य आहेः- To me speaking for a moment not as a politician, but as a student of spiritual laws, to me the end of the war is sure. या वाक्यानंतर इंग्लंड जिंकेल असें त्यांनीं त्या भाषणांत सांगितलेलें आहे.]

पण ईश्वरी योजना ओळखून त्याप्रमाणें बुध्दपुरस्सर कार्य करूं इच्छिणारीं माणसें राजकारण, अर्थशास्त्र वगैरेंच्या क्षेत्रांत एकंदरींत फारशीं आढळत नाहींत. हीं क्षेत्रें स्वार्थमूलक भावनांनीं बहुशः भरलेलीं असतात. अर्थात् अध्यात्म मार्गाकडे ज्यांच़ें तोंड नुकतेंच़ फिरलें आहे अशा जीवन्मुक्तांच्या नवशिक्या शिष्यांना या क्षेत्रांतील काम देणें धोक्याच़ें असतें. प्रयत्नतः ज्यानें आपला लोभ किंचित् जिंकला आहे अशा माणसाला ज़ुगार व सट्टेबाजी यांच़ें नियंत्रण करण्यासाठीं अंमलदार म्हणून नेमलें, किंवा मोठ्या श्रमानें ज्याच़ें दारूच़ें व्यसन अंशतः सुटलें आहे अशा माणसाला दारूबंदी यशस्वी करण्यासाठीं दारूच्या विक्रीवर देखरेख करावयास सांगितली, तर तें काम त्याच्या हातून नीट होण्याच़ें बाज़ूसच़ राहून त्या माणसाच़ें अधःपतन होण्याच़ा संभव उत्पन्न होतो. तद्वत् जीवन्मुक्तांच्या नूतन शिष्यांना या क्षेत्रांतील काम सांगितलें तर तें यशस्वी न होतां शिष्यांच़ें चरित्र मलिन होण्याच़ें भय उत्पन्न होईल, या कारणास्तव पुष्कळ शिष्यांना जीवन्मुक्त पुरुष या क्षेत्रांतलें काम सांगत नसावेत असें वाटतें.

[जे लोक जीवन्मुक्त पुरुषांच़ें शिष्यत्व मिळविण्याची खटपट करीत असतात त्यांना लौकिक व्यवहारांत कशा प्रकारच़ा धोका असतो याची कांहींशी कल्पना या मार्गांतील एक तज्ज्ञ श्री.लेडबीटर् यांनीं दिलेल्या पुढील इशाऱ्यावरून येऊं शकेल. ते लिहितात :--

There is so much excitement and unpleasant feeling connected with politics in almost every country, that the wisest course for the student of occultism is to have as little as possible to do with the whole matter (Inner Life, Vol I, p.295).

म्हणजे 'बहुतेक सर्व देशांतल्या राजकारणांत इतका चित्तक्षोभ असतो, इतक्या अनिष्ट भावना मिसळलेल्या असतात कीं, अध्यात्ममार्गी मनुष्यानें त्या वातावरणाशीं आपला संबंध जितका कमी येईल तितका ठेवणें यांत शहाणपणा आहे.'

राजकारणांतील पक्षोपपक्ष, त्यांचीं भांडणें, निवडणुकींमधील नाना प्रकार, वर्तमानपत्रांच़ा परस्परांविषयींच़ा शिवराळपणा वगैरे गोष्टी पाहिल्या म्हणजे वरील उपदेशाचें रहस्य ध्यानांत येईल. राज्यव्यवस्थेंत सुधारणा करून लोकांस सुखी करणें हें राजकारणाच़ें ध्येय असतें. त्या ध्येयासाठीं अध्यात्ममार्गी माणसानें झ़टणें योग्य आहे हें खरें; पण हें ध्येय राजकारणाच्या व्यवहारांत कोठल्याकोठें बाज़ूस जाऊन पडतें आणि असहिष्णुता, भांडखोरपणा, अप्रामाणिकपणा, स्वार्थसाधूपणा यांच़ा पगडा राजकारणांत अनेक वेळां बसतो, हें आमच्या वाचकांस सांगणें नकोच़. श्री.लेडबीटर दुसरीकडे लिहितात :--

To make money to use in His service, to win power in order to help Him with it, all these may be part of the Master's work. Yet in doing these things the disciple must be ever on guard against self-deception and must see that he is not cloaking with the holiness of the Master's name what is underneath a selfish desire to wield power and handle money (The Masters & the Path, p.82).

म्हणजे 'जीवन्मुक्त सद्गुरूसाठीं जें काम शिष्यानें करावयाच़ें त्यांत त्यांच्या कार्यार्थ खर्च़ करण्यासाठीं पैसे मिळविणे, त्यांच्या उपयोगीं पडण्यासाठीं सत्ता व अधिकार संपादन करणें ह्या गोष्टींचा समावेश होऊं शकेल. पण या गोष्टी करतांना स्वतःची आत्मवंचना होत नाहीं याची शिष्यानें सावधगिरी बाळगली पाहिजे, व सद्गुरूच्या पवित्र नांवाखालीं संपत्तीच़ा व्यवहार करण्याची व सत्ता गाज़विण्याची स्वार्थी वृत्ति आपण आपल्या हृदयांत झ़ांकून ठेवलेली नाहीं याची त्यानें खबरदारी घेतली पहिजे.'
]

जेव्हां पुष्कळ प्रगति झालेला खंबीर असा शिष्य या कामाकडे देतां येईल तेव्हांच़ त्याला हें काम निर्धास्तपणें सांगण्यांत येणार.

हा विचार केल्यास असल्या क्षेत्रांत जीवन्मुक्त पुरुषांच्या हाताखालीं बुध्दिपुरस्सर काम करणारीं माणसें फार कमी कां असतात त्याच़ा उलगडा होईल. पण न उमज़तां त्यांचें कार्य करणारीं अनेक माणसें या क्षेत्रांत वावरत असतात. राजकारणाच्या क्षेत्रांतहि जीवन्मुक्त पुरुषांनीं आंखलेली योजना असते. संस्कृतीच़े उदयास्त, राष्ट्रांचे जयापजय वगैरे कितीतरी गोष्टी त्या योजनेंत निश्चित केलेल्या असतात. आणि सेनापति, राज़े, लोकाग्रणी, मुत्सद्दी यांना नकळत जीवन्मुक्त त्यांना हातीं धरतात व त्यांच्या द्वारानें ते आपली योजना सफल करून घेतात. बुदबळांच़ा डाव खेळणारा माणूस प्रत्येक बुदबळाच्या गतिस्वातंत्र्याच्या आड न येतां आपण योजलेला डाव यशस्वीपणानें ज़सा खेळतो, तद्वत् हे जीवन्मुक्त पुरुष जगांतील मोठ्या माणसांस हातीं धरून त्यांच्या द्वारानें आपली ईश्वरी योजना यशस्वी करतात. हातीं धरलेल्या माणसाची कारवाई जेव्हां त्यांना अनुकूल असते तेव्हां ते त्याला उत्तेजन देतात. जेव्हां ती त्यांना प्रतिकूल असते तेव्हां ते तिला नाना प्रकारांनीं पायबंद घालतात; व ज़रूर झाल्यास ते त्याला राजकारणांत प्रतिपक्ष्याकडून पाडून निर्माल्यवत् करतात. एखादे वेळीं दुसरा एखादा पुढारी त्याच्या विरुध्द उभा करून त्याच्या उद्योगाच़ें महत्त्व नाहींसें करतात. गतिशास्त्रांतील निष्णात माणूस निरनिराळ्या प्रेरणांच्या दिशा हिशेबानें ठरवून ज्याप्रमाणें सर्वांपासून इष्ट प्रकारची व इष्ट सामर्थ्याची प्रेरणा निर्माण करूं शकतो, तद्वत् हे जीवन्मुक्त पुरुष या क्षेत्रांतील निरनिराळ्या मोठ्या माणसांना ज़रूरीप्रमाणें हातीं धरून आपलें कार्य तडीस नेतात. समर्थांनीं दासबोधांत म्हटलें आहे, 'नष्टासि नष्ट योजावे । वाचाळासि वाचाळ आणावे । ... धटासि आणावा धट । उध्दटासि पाहिजे उध्दट । खटनटासि खटनट । अगत्य करी।।' (१९, ९).

वरील विवेचनावरून ध्यानांत येईल कीं पृथ्वीवरील जीवन्मुक्त माणसें राजकारण, अर्थशास्त्र वगैरेंच्या क्षेत्रांतहि काम करीत असतात.

[उदाहरणार्थ, हिंदुस्थानांतील राष्ट्रीय सभा कांहीं जीवन्मुक्तांच्या प्रेरणेनें स्थापण्यांत आलेली आहे. आश्चर्य हें कीं ही गोष्ट धडधडीत हिंदी जनतेच्या डोळ्यांसमोर घडली असूनहि तिची गंधवार्ताहि आज़ फारशी कोणाला नाहीं.
काँग्रेस स्थापण्याचा मान श्री.ए.ओ.ह्यूम् यांज़कडे ज़ातो हें सर्वमान्य आहे. मास्टर एम्. व मास्टर के.एच्. यांच्याशीं श्री.ह्यूम् यांचा पत्रव्यवहार बरेच दिवस चालूं होता व तो पत्रव्यवहार अलीकडे पुस्तकरूपानें प्रसिध्द झालेला आहे. अलीकडच्या संशययुगांत एखाद्या सुशिक्षित माणसानें प्रसिध्द केलें कीं कांहीं जीवन्मुक्त पुरुषांची मला माहिती आहे व त्यांनीं सांगितल्यावरून मीं अमुक एक राजकीय संस्था स्थापिली आहे, तर त्याची सगळी लोकप्रियता रसातळास ज़ाऊन लोक त्यास वेड्याच्या इस्पितळांत घालण्याची सूचना केल्याखेरीज़ राहवयाचे नाहींत !  अशा परिस्थितींत ह्यूम् साहेबांना काँग्रेसची खरी पूर्वपीठिका मोकळेपणानें जनतेसमोर मांडणें अत्यंत गैरसोयीच़ें वाटलें असणार हें उघड आहे. पहिली काँग्रेस १८८५ सालीं पुण्यास भरवावी असें अगोदर ठरलें होतें. त्या सुमारास श्री.ह्यूम् साहेब पुण्यास आले होते व सार्वजनिक सभेचे त्या वेळचे एक पुढारी श्री.सीतारामपंत चिपळूणकर ह्यांची व ह्यूम् साहेबांची गांठ पडली होती. या भेंटीची हकीकत रा.सीतारामपंत चिपळूणकरांनीं बार्शीचे रा.रामचंद्र मोरेश्वर साने यांना त्याच़ वेळीं सांगितली होती. ती हकीकत रा.साने यांनीं १०-२-२५ च्या केसरींत आपल्या सहीनिशीं प्रसिध्द केली आहे. तींत साने लिहितात कीं राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसंबंधीं एक गोष्ट अद्याप अप्रसिध्द असून ती मीं या पत्रांत देत आहे. ती अशी कीं वरील भेंटींत ह्यूम् साहेबांनीं रा.चिपळूणकरांना सांगितलें कीं मला एक ऋषितुल्य ज्ञानी पुरुष भेंटला होता व त्यानें मला हिंदी लोकांच्या कल्याणाकरितां झटण्यास सांगितल्यामुळें मीं काँग्रेसच़ा पुढाकार घेतला आहे. केसरीमधील हें पत्र समग्र वाचण्याज़ोगें आहे.]


पण त्या क्षेत्रांत जीं माणसें त्यांनीं हातीं धरलेलीं असतात त्यांपैंकीं बहुतेकांना आपण त्या जीवन्मुक्तांचें कार्य करीत आहों याची कल्पना नसते. ते त्या जीवन्मुक्तांचे बुध्दिपुरस्सर साहाय्यक झालेले नसतात. इतकेंच नव्हे तर कित्येक लोक त्या जीवन्मुक्तांच्या कार्याच्या विरुध्दहि असतात. असलीं हातीं धरलेलीं माणसें विश्वास टाकण्याज़ोगीं असतातच़ असें नाहीं. आज़ तीं या बाज़ूस सांपडावयाचीं, तर उद्यां त्या बाज़ूस सांपडावयाचीं, असेंहि होऊं शकतें. म्हणून नाना गुणावगुणांचे पुढारी हातीं धरून त्यांस उत्तेजन देऊन, विशिष्ट वळण लावून किंवा पायबंद घालून, अथवा त्यांच्या निरनिराळ्या कार्यांची बेरीज़वज़ाबाकी करून जीवन्मुक्त पुरुषांना आपलें धोरण सांभाळावें लागतें.

ज्या जगांत ईश्वरी योजना ओळखून तीस हातभार लावणारे पुढारी हाताच्या बोटांनीं मोज़ण्याइतके कमी आहेत, ज्या जगांत ध्येयवादी, प्रामाणिक व कर्तबगार पुढारी बेताच़ेच़ आहेत, ज्या जगांत हट्टी, अनुदार, महत्त्वाकांक्षी, लबाड, संधिसाधु, ध्येयशून्य अशा माणसांची व पुढाऱ्यांची रेलचेल आहे, त्या जगांतील लोकांस हातीं धरून जगाची उत्क्रांति योग्य दिशेनें व लवकर होईल अशी व्यवस्था करणें अत्यंत कठीण आहे. वारा तिरपा आला तर आपलें शीड तिरपें करून ऋषिसंघ आपली प्रगतीची दिशा कायम ठेवूं पाहील. ईश्वरी योजना मोडूं पाहणाऱ्या पक्षाच़ा नवा बॅट्समन् जगाच्या रंगभूमीवर खेळावयास आला तर नाना देशांत नाना फ़ील्डरांची नवी रचना करून तो त्या बॅट्समन् ला धांवा काढूं देणार नाहीं. नाना लोकांच़े गुणदोष पाहून, त्यांच्या आवडीनिवडींच़ा नीट हिशेब करून, आणि त्यांना न समज़ूं देतां त्यांना आपल्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका देऊन, त्यांच्या द्वारां तो आपल्या मनांतील ईश्वरी संविधानकाच़ा परिपोष करील. कधीं कधीं तर असें वाटतें कीं, काळी शाई घुसळून त्यांतून पांढरा रंग निर्माण करण्यासारखा हा अशक्यप्राय प्रयत्न आहे. म्हणूनच़ तो प्रयत्न करणारीं माणसें मोठ्या अधिकाराचीं असावीं लागतात, आणि म्हणूनच़ जगाच्या उत्क्रांतींत नाना प्रकारच्या भानगडी होत असतात.  मात्र परिणामीं उत्क्रांतीची दिशा च़ुकत नाहीं.

जीं माणसें त्या जीवन्मुक्तांच़ें शिष्यत्व बुध्दिपुरस्सर स्वीकारतात व त्या पायरीवर ज़ाण्यासाठीं स्वतःची नैतिक व बौध्दिक तयारी करतात, त्यांवर त्या जीवन्मुक्तांना जास्त विसंबून राहतां येतें. असल्या शिष्यांना त्या जीवन्मुक्त पुरुषांच्या योजना समज़ण्याचा जास्त संभव असतो. शिष्याच्या हातून च़ुका होत असल्यास त्याला इशारा देऊन त्या टाळणें शक्य असतें. जगांतील राज़ेमहाराज़े, मुत्सद्दी, सेनापति, लोकनायक वगैरेंपेक्षां असले शिष्य ज़री जगाच्या दृष्टीनें कमी महत्त्वाच़े असले तरी जीवन्मुक्त पुरुषांना त्यांच़ा उपयोग करणें सोपें ज़ातें, आणि त्या शिष्यांना त्या जीवन्मुक्त पुरुषांशीं जास्त जास्त सहकार्य करण्याची संधि मिळून सरतेशेवटीं स्वतः जीवन्मुक्त होण्याची अनुकूलता लाभूं शकते. अर्थात् लौकिक अर्थानें जगांतील लोकाग्रणी ज़री जनतेला जास्त मोठे वाटले तरी अंतिम दृष्टीनें विचार केल्यास त्या जीवन्मुक्तांच़ें कार्य बुध्दिपुरस्सर करण्याकरितां जे त्यांच्या शिष्यत्वाची खटपट करतात त्यांची किंमत आमच्या मतें अधिक आहे.  त्यांच्यासाठीं हें पुस्तक लिहिलेलें आहे. अर्थात् बुध्दिपुरस्सर त्या मार्गानें ज़ाण्यासाठीं जी माहिती उपयुक्त होईल ती पुढें दिलेली आहे. पण त्यावरून आमच्या वाचकांनीं आपली अशी समज़ूत करून घेऊं नये कीं, या पुस्तकांत दिलेल्या उद्योगांशिवाय दुसरे अनंत उद्योग जीवन्मुक्त पुरुष करीत नाहींत !


  *  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण ४ : सद्गुरुप्राप्तीच़ा मार्ग