प्रकरण  तेरावें


मुमुक्षूंचे  प्रकार  व  लोकसंग्रहाचे  मार्ग


या पुस्तकांत ज़ो मार्ग वर्णिलेला आहे तो ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग आहे, कीं कर्ममार्ग आहे, असा प्रश्न वाचकांच्या मनांत येण्याज़ोगा आहे. कारण ह्या तिन्हीं मार्गांपैंकीं अमुक एक मार्ग या पुस्तकांत विशेषेंकरून निर्देशिलेला वाचकांस कोठेंहि आढळणार नाहीं. हिंदुधर्मांत ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग व कर्ममार्ग असे तीन मार्ग सांगितलेले आढळतात. त्या तिन्हींपैंकीं अमुक एक मार्ग कनिष्ठ व अमुक एक श्रेष्ठ असा प्रकार आहे कां ?  असला तर या पुस्तकांतील वर्णन कोणत्या मार्गाबद्दल आहे ?  ह्या व ह्यासारख्या कांहीं प्रश्नांच़ें स्पष्टीकरण वाचकांसमोर ठेवणें ज़रूर आहे. तें स्पष्टीकरण करण्यासाठीं प्रस्तुत प्रकरण आम्हीं लिहीत आहों. तें करतांना कांहीं मूलभूत तत्त्वांच़ा
ऊहापोह करणें आपणांला प्राप्त आहे.

प्रथम हें सांगणें ज़रूर आहे कीं माणसांची वाढ आरंभीं आरंभीं ज़री एकांगी दिसत असली तरी ती सरतेशेवटीं सर्वांगीण व च़ौरस होणें अवश्य असतें. मनुष्याच़ा विकास सर्व बाज़ूनीं व्हावा लागतो. उन्नतीची परमसीमा गांठलेला माणूस म्हणजे नुसता ज्ञानी, नुसता भक्तिमान् किंवा नुसता कर्मकुशल नसतो. या सर्व गोष्टी त्याच्या ठायीं असून दुसऱ्याहि अनेक आणखी असतात. मुक्त झ़ालेला माणूस म्हणजे पांच़वी महादीक्षा घेतलेला माणूस होय. हा माणूस सामान्य माणसाच्या मानानें उत्क्रान्तिमार्गावर इतका पुढें गेलेला असतो कीं त्यानें उन्नतीच़ें परमशिखर गांठलें आहे, त्याला आणखी उन्नति करण्यास वाव राहिलेला नाहीं, असें त्या सामान्य माणसाच्या दृष्टीस दिसलें तर त्यांत फारशी च़ूक नाहीं. त्या स्थितीच्या पुढेंहि उत्क्रान्ति असते. तीं जीवन्मुक्त माणसें स्वतःच़ तसें सांगतात; तेव्हां त्यांच्या पायरीपाशीं वाट अशी संपते असें तत्त्वतः म्हणतां येणार नाहीं. पण सामान्य प्रतीच्या माणसानें 'उन्नतीची परम सीमा' असें या स्थितीला म्हटलें तर व्यवहारदृष्ट्या त्या म्हणण्याला हरकत नाहीं, इतकी वरची  ही पायरी आहे हें आपण विसरतां कामां नये. या पायरीपाशीं आलेला माणूस आपण पाहिला तर तो च़ौफेर फुललेला आहे, सर्वगुणसंपन्न आहे असें आपणांला दिसेल.

हें ज़र माणसाच़ें परमध्येय आहे तर तें गांठण्याला नुसती भक्ति, नुसतें ज्ञान, नुसतें कर्म हीं एकेकटीं पुरणार नाहींत हें स्पष्टच़ आहे. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग या त्रयीसंबंधानें जनतेंत पुष्कळ गैरसमज़ुती आहेत. भक्तिमार्ग हा सर्वांत सोपा मार्ग होय असें कित्येकांस वाटतें; वादविवादाच़ा मार्ग हा ज्ञानमार्ग होय अशी पुष्कळांची समज़ूत असते; तसेंच़ कर्मठपणा व कर्ममार्ग हीं एकच़ होत अशी बऱ्याच़ ज़णांची कल्पना असते. या साऱ्या कल्पना च़ुकीच्या आहेत. या तीन मार्गांपैंकीं अमुक एक मार्ग तत्त्वतः सोपा आहे असें नाहीं. मानवी स्वभावाच्या मुळाशीं ज्या गोष्टी आहेत त्यांवरून माणसांच़े स्थूलमानानें तीन भेद पडतात. मानवी स्वभावाला तीन पैलू असतात असेंहि म्हणतां येईल. त्यांतला एक पैलू म्हणजे ज्ञानविभाग होय. या भागांत तर्क, ज्ञान, आकलनशक्ति, कल्पकता, बुद्धिमत्ता, अंतःप्रज्ञा (Intuition) वगैरे अनेक बाबी येतात. दुसरा भावनेच़ा होय. त्यांत प्रेमळपणा, आनंद, दया वगैरे हृदयवृत्ति येतात. तिसरा पैलू किंवा भाग क्रियारूपी असतो. त्यांत निर्धार, प्रयत्न, सामर्थ्य, कार्यकुशलता, कर्मकांड वगैरे बाबींच़ा समावेश होत असतो.

या तीन विभागांपैंकीं सरतेशेंवटीं तिन्हीं भाग फुलणें हें आवश्यक आहे, व अशा रीतीनें हा सर्व मार्ग ज्याच़ा च़ालून झ़ाला तो परमज्ञानी, परमभक्तिमान् व परम समर्थ असा व्हावयाच़ा असतो. पण सरतेशेंवटीं ज़री अशा प्रकारें माणसाची वाढ च़ौफेर व्हावयाची असली तरी आरंभीं त्याची वाढ सहज़च़ एकांगी असते. पुष्कळ सामान्य दर्जाचीं माणसें भाविक व हृदयवृत्तींनीं भरलेलीं असतात. जिज्ञासा अथवा कार्यकौशल्य हें त्यांच्यामध्यें अगदीं बेताच़ेंच़ असतें. कित्येक माणसें जिज्ञासू व च़ौकस असतात. त्यांच़ा विशेष ओढा ज्ञान मिळविण्याकडे असतो; पण त्यांच्या हृदयांत भावनांच़ा ओलावा फारसा नसतो व एखादा उद्योग करून त्याची ज़बाबदारी पार पाडण्याची हातोटीहि त्यांना फारशी साधत नाहीं. तिसऱ्या प्रकारचीं जीं माणसें असतात त्यांच्या भावना ज़ोरदार नसतात अथवा त्यांची जिज्ञासाहि फारशी तीव्र नसते. पण नेटानें उद्योग करण्याच़ा निर्धार त्यांच्या अंगीं असतो. तीं माणसें कार्यक्षम, कार्यकुशल व मेहनती असतात. कोणत्या माणसामध्यें कोणता विभाग प्रभावी असणार हें त्याच्या पूर्वींच्या इतिहासावर अवलंबून असतें. जगांतील आज़चीं माणसें प्रथम प्राणिकोटींतून मानवकोटींत निरनिराळ्या प्रकारांनीं आलीं. मनुष्यकोटींत आल्यावर अगदीं कनिष्ठ स्थितींत पुष्कळ जन्म घेऊन मगच़ आपण ज्याला सामान्य प्रतीच़ा माणूस म्हणतो त्या पायरीपर्यंत बहुजनसमाज सांप्रत येऊन पोंच़लेला आहे. अर्थात् कांहीं संस्कार त्याच्यामध्यें दृढ झ़ालेले आहेत व कांहीं अगदीं निर्बल आहेत. कांहीं बाबतींत त्याची वाढ साधारण बरी झ़ालेली आहे, तर दुसऱ्या कांहीं गोष्टींची वाढ अगदीं अल्प झ़ालेली आहे. या कारणांमुळें ज्या माणसाच्या हृदयवृत्ति बऱ्याच़ फुललेल्या असतील त्याला आपण भाविक अथवा भक्तिमार्गी म्हणतों. ज्याची ज्ञानाची बाज़ू जास्त फुललेली असेल त्याला ज्ञानमार्गी म्हणतों आणि ज्याच्यामध्यें क्रियेच़ा भाग अधिक विकसित होऊन ज्याला कार्यसामर्थ्य आलें असेल त्याला कर्ममार्गी म्हणतों.

ज्ञानमार्गांत माणूस नुसतें ज्ञानच़ मिळवितो असें नाहीं. ज्ञानमार्गावरहि माणसाच्या भावनांच़ा व क्रियाशक्तीच़ा विकास होत असतो; पण ज्ञानाच़ा विकास मात्र जास्त प्रमाणांत होतो व इतर गुणांच़ा दुय्यम प्रमाणांत च़ालूं असतो. त्याच़प्रमाणें भक्तिमार्गावर प्रेम, भक्ति वगैरे भावनांच़ा विकास प्रभावी असतो व ज्ञान आणि क्रिया या अंगांच़ा त्या मानानें कमी असतो. कर्ममार्गावरहि तशीच़ स्थिति असते. त्या मार्गावर प्राधान्यानें कार्यकौशल्याची वाढ होते व इतर गोष्टींची वाढ दुय्यम प्रमाणांत होत असते. यावरून वाचकांच्या ध्यानांत येईल कीं, हे तीन मार्ग अगदीं वेगळे व स्वतंत्र असे बिलकुल नाहींत. म्हणून या तिन्हीं मार्गांना परस्परांहून अगदीं भिन्न मानणें व यांपैंकीं एकच़ श्रेष्ठ मानणें म्हणजे मोठी घोडच़ूक करणें होय. एकाच़ मार्गाच़े हे तीन पर्याय आहेत व माणसांच्या वैयक्तिक सोयीसाठीं तसे पर्याय मानणें उपयुक्त आहे इतकेंच़ फार तर म्हणतां येईल. आतां हें खरें आहे कीं पुष्कळ माणसांस भक्तिमार्ग सोपा वाटतो.  पण त्याच़ें कारण तो मार्ग मुळांतच़ इतर मार्गांपेक्षां सोपा आहे असें मुळींच़ नाहीं. ज्या माणसांची वृत्ति तशा प्रकारची अगोदरच़ झ़ालेली असेल, भावनांची वाढ अधिक झ़ालेली असल्यामुळें ज्यांच्या हृदयाला प्रेमळपणाच़ा जास्त ओलावा आलेला असेल, त्यांना तो मार्ग सोपा वाटणें साहजिक आहे. पण ज्यांच़े पूर्वसंस्कार प्रामुख्यानें ज्ञानाच़े असतील, प्रेमळपणाची वाढ अगदीं कमी प्रमाणांत झ़ाली असल्यामुळें ज्यांच़ें हृदय दगडासारखें घट्ट राहिलेलें असेल, त्यांना भक्तिमार्ग रुच़ावयाच़ा नाहीं किंवा सोपा ज़ावयाच़ा नाहीं. एखाद्या विद्यार्थ्याला वाङ्मय व काव्य हीं सोपीं वाटतात, एखाद्याला गणित सोपें वाटतें; पण त्यावरून मुळांतच़ वाङ्मयाभ्यास सोपा किंवा गणित सोपें आहे असें आपण ज़सें म्हणत नाहीं, एका विद्यार्थ्याची गति गणितांत विशेष असली तर तो त्या विद्यार्थ्याच़ा स्वभावगुण आहे असें ज़सें आपण समज़तों, तसाच़ येथें प्रकार असतो. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग व कर्ममार्ग यांपैंकीं वस्तुतः कोणताच़ जास्त सोपा किंवा जास्त कठीण नाहीं. ज्याच़ा पूर्वीं ज़सा गुणविकास झ़ालेला असेल त्या मानानें त्याला एक मार्ग अधिक सुलभ वाटतो व दुसरा कठीण वाटतो इतकेंच़. ज्याला ज़ो मार्ग सोपा वाटेल तो त्याला प्रिय वाटावा, तो मार्ग त्यानें धरावा, त्यावर त्याची प्रगति जलदीनें व्हावी हें सारें स्वाभाविक आहे. पण त्यावरून अमुक एक मार्ग वस्तुतः सोपा आहे अथवा बिकट आहे असा त्याच़ा बिलकुल अर्थ नाहीं. एका टेंकडीच्या पूर्व दिशेस पायथ्याशीं एक माणूस उभा आहे व दुसरा माणूस पश्चिम बाज़ूस पायथ्याशीं उभा आहे व दोघांना टेंकडीवर च़ढावयाच़ें आहे अशी कल्पना करा. पूर्व बाज़ूच़ा माणूस आपल्या पायापाशी जी टेंकडीची बाज़ू आहे त्या बाज़ूनें च़ढला तर तें त्याला सोपें व ज़वळच़ें होईल व पश्चिम बाज़ूच़ा माणूस आपल्या बाज़ूनें च़ढला तर त्याला तो च़ढाव नजीकच़ा होऊन सोपा ज़ाईल. कोणत्याहि बाज़ूनें माणूस वर च़ढला तरी ज़ोंवर टेंकडीची उंची एकच़ आहे तोंवर त्याला सारखीच़ शक्ति खर्च़ावी लागेल हें गणितानें
सिद्ध करून दाखवितां येईल. पूर्व बाज़ूच्या माणसानें अर्ध्या टेंकडीला वळसा घालून पश्चिम बाज़ूच्या माणसाज़वळ अगोदर ज़ावें व मग च़ढण्यास सुरुवात करावी हा द्राविडी प्राणायाम होईल. ज़ो माणूस जेथें असेल तेथून सुरूं होणारा मार्ग त्याला अधिक स्वाभाविक, सरळ व सुकर होणार हें उघड आहे.

एवंच या तीन मार्गांपैंकीं अमुक एक कठीण व अमुक सुलभ, अमुक एक मार्ग श्रेष्ठ व अमुक कनिष्ठ असें बिलकुल म्हणतां यावयाच़ें नाहीं. प्रारंभीं हे मार्ग फार भिन्न वाटतात; पण टेंकडीच्या शिखराच्या जितकें जितकें जास्त ज़वळ ज़ावें तितके तितके हे सर्व मार्ग परस्परांच्या जास्त संनिध येतात व टेंकडीच्या शिखरावर एक होतात. प्रारंभीं प्रत्येक मार्गांत एकेका गोष्टीवरच़ भर असतो. सुरुवातीला ज्ञानमार्गावर ज्ञानाच़ें प्राबल्य असतें. पण पुढें तें ज्ञान भरीव व जिवंत करण्यासाठीं व स्वतःच्या विकासाला समतोलपणा आणण्यासाठीं भावना व क्रिया यांचीहि माणसाला वाढ करावी लागते व त्यामुळें तोच़ ज्ञानमार्ग दुसऱ्या दोन्हीं मार्गांच्या अगदीं नजीक येऊं लागलासा वाटतो. भक्तिमार्ग व कर्ममार्ग या मार्गांवरहि पुढें इतर सर्व गोष्टींच़ा विकास करणें आवश्यक होतें आणि सर्व मार्ग परस्परसदृश होऊन शेंवटीं ते एकरूप होतात, यामुळें या तिन्हीं मार्गांस एका दृष्टीनें एका मार्गाच़े तीन प्रकार म्हटलें तर जास्त शोभेल. तसें केल्यानें त्या मार्गांविषयींच्या लोकांच्या गैरसमज़ुती तरी दूर होतील.

वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षांत येईल कीं या पुस्तकांत ज्या विकासमार्गाच़ें वर्णन आम्हीं दिलेलें आहे तो मार्ग एक असून त्यांत ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व भक्तिमार्ग हे तीनहि पर्याय समाविष्ट झ़ालेले आहेत. हाच़ विचार दुसऱ्या शब्दांनीं सांगावयाच़ा झाला तर आम्हीं असें म्हणूं कीं या पुस्तकांतला ज़ो गुरुमार्ग आहे त्याची एकंदर दिशा एकच़ आहे, पण प्रत्येक वृत्तीच्या माणसास आपापल्या आवश्यकतेनुरूप त्यांत ज़रूर ते फरक करण्यास पुरेसा वाव आहे. एका वृत्तीच्या माणसाच़ा ध्यानधारणादि अभ्यास दुसऱ्या वृत्तीच्या माणसापेक्षां थोडासा वेगळा असूं शकेल. जगद्हिताच़ें एकानें अंगीकारलेलें काम दुसऱ्यानें अंगीकारलेल्या कामापेक्षां भिन्न असूं शकेल. जगाकडे पाहण्याची एकाची दृष्टि दुसऱ्याहून कांहीं भिन्न असेल. निरनिराळ्या दृष्टींच्या मुमुक्षूंच्या आवडी, त्यांच्या कामाच्या पद्धति याहि वेगळ्या असूं शकतील. मुमुक्षूमुमुक्षूंमधील हा वेगळेपणा आरंभीं फारच़ वाटतो, किंबहुना अज्ञ माणसाला तो विरोधासारखा वाटून त्याची दिशाभूलहि करतो. पण ज़सज़सें या मार्गानें पुढें ज़ावें त्या मानानें सर्व मुमुक्षूंच्या अंगीं सर्वच़ प्रकारच़ा विकास दिसूं लागतो व त्यांमधील फरक नज़रेआड होऊं पहातात. माणसाला भक्तिमार्ग आवडो, ज्ञानमार्ग आवडो वा कर्ममार्ग आवडो, या पुस्तकांत दर्शविलेली उत्क्रान्ति प्रत्येकाला साध्य करतां येईल. ती उत्क्रान्ति होत असतांना वृत्तिभेदानें थोडेसे फरक उत्पन्न होतील इतकेंच़. दोन गवई एकच़ चीज़ गात असले तरी त्यांच्या आवाज़ांत, तानांत फरक होतो तसाच़ हा प्रकार आहे. या पुस्तकांत दिलेला मार्ग सर्वसंग्राहक आहे. सर्व वृत्तींच्या माणसांना तो मार्ग च़ालतां येईल अशी वस्तुस्थिति आहे.

सात  प्रकार

सृष्टिकर्ता ज़ो ईश्वर त्याला तीन अंगें आहेत असें हिंदुधर्म शिकवितो. ब्रह्मा, विष्णु व महेश हीं एकाच़ ईश्वराचीं तीन सगुण अंगें आहेत. ब्रह्म्यामध्यें सत्, विष्णुमध्यें चित् व महेशामध्यें आनंद हे भाग प्रमुख असतात. प्रत्येक मनुष्य हा ईश्वराच़ा अंश असल्यामुळें हीं तिन्हीं अंगें प्रत्येक माणसामध्यें असतात. पण त्यांपैंकीं एक अंग प्रमुख असतें व दुसरीं दोन गौण असतात. या कारणामुळेंच़ ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व भक्तिमार्ग असे तीन मार्ग अस्तित्वांत आले आहेत.

[याच़ तीन विभागांना हिंदुधर्मांत इच्छा, ज्ञान व क्रिया असें म्हणतात. मानव हा ईश्वराच़ा अंश आहे. त्याला गीता 'ममैवांश' (म्हणजे माझ़ाच़ अंश) असें म्हणते. क्रिया, ज्ञान, इच्छा हे मानवाच़े पैलू सत्,  चित् व आनंद या ईश्वराच्या तीन गुणांचीं प्रतिबिंबें आहेत. ब्रह्मा, विष्णु व शिव यांच्यापैंकीं प्रत्येकांत एकेक अंग प्रमुख असतें. सामान्य माणसांतहि कोणतें तरी एक अंग प्रमुख असतें व त्या एका अंगाला प्राधान्य देणाऱ्या मार्गानें त्याची प्रगति स्वभावतः होते. त्या प्रगति-मार्गावरून पुढें ज़ात असतांना एका अंगाच़ा विशेष विकास होतो व बाकीच्या अंगांच़ा तितका होत नाहीं. मुक्ति मिळविलेल्या पुरुषांत देखील ते पुरुष ज्या मार्गानें पुढें गेले असतील त्या मार्गानुरूप एका अंगाच़ा विकास दुसऱ्या अंगापेक्षां अधिक झ़ालेला असावा असें तत्त्वतः वाटतें. या कारणांमुळें मोठमोठ्या सिद्धपुरुषांमध्येंहि व्यक्तिवैशिष्ट्य असतें व तदनुसार ते निरनिराळ्या अधिकाराचीं कामें अंगावर घेतात. ब्रह्मर्षि, राजर्षि, देवर्षि या संज्ञा वैशिष्ट्यदर्शक आहेत. पण सिद्धपुरुषांची उत्क्रान्तीची पायरी इतकी उच्च असते कीं व्यवहारदृष्ट्या त्यांच्यामध्यें सर्व गुण संपूर्णपणें फुललेले आहेत असें म्हणावें लागतें.]

खरोखरी जास्त खोल विचार करावयाच़ा असला तर हा तीन मार्गांच़ा विभाग अपुरा पडतो. माणसांमाणसांमधले प्रकार स्थूलमानानें समज़ण्यास तो विभाग ज़री सुटसुटीत वाटला तरी बारकाईनें विचार करावयाच़ा असल्यास हा तीन मार्गांच़ा विभाग कांहींसा अस्पष्ट व त्रोटक आहे असें दिसून येतें. अधिक तपशिलांत शिरावयाच़ें असल्यास माणसांच्या मनोरचनेच़े सात प्रकार आहेत असें म्हणावें लागेल. हा सप्तांगी विभाग सृष्टींत व अध्यात्मशास्त्रांत इतक्या ठिकाणीं दिसून येतो कीं तो सर्व चराचराला  आधारभूत आहे असें मानावें लागतें. उपनिषदांत तसें स्पष्ट लिहिलें आहे. 

[परब्रह्मापासून सृष्टीची निर्मिति कशी झ़ाली त्याच़ें वर्णन मुंडकोपनिषदांत असें आहे  :--  (२,१,८) :--
सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्त होमाः ।
सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिताः सप्त सप्त ।।

]

सप्तलोक, सप्तद्वीपें, सप्तस्वर्ग, सप्तपाताल, सप्तसमुद्र वगैरे धार्मिक गोष्टींत तो दिसून येतो. सूर्यप्रकाशांतील सात वर्ण, सुरांची सप्तकें, रसायनशास्त्रांतील मेंडेलियेव्ह्च्या कोष्टकांतील सप्तकें हीं पाहिलीं म्हणजे सृष्टीच्या मुळाशींहि हा सप्तधा भेद आहे असें ठरतें. तद्वत् माणसांमध्येंहि मनोरचनेच़े सात प्रकार आहेत. सूर्यापासून ज़से सात प्रकारच़े प्रकाश बाहेर पडतात तद्वत् ईश्वरापासून सात प्रकार व्यक्त होतात अशी कल्पना केली तर सृष्टीच़े सात विभाग पडूं शकतील. तदनुसार माणसांच़े सात प्रकार दिसून येतात. या प्रकारांना थिऑसफ़ीय वाङ्मयांत Ray किंवा 'किरण' म्हणण्याच़ा परिपाठ आहे.

हे सात प्रकार खालच्या कोटींतहि दिसून येतात. खनिज कोटींत निरनिराळे आकार धरणारे द्रव्यांच़े स्फटिक (crystals) दिसून येतात व त्यांवरून रसायनशास्त्रांत अमका पदार्थ अमक्या पद्धतीच्या स्फटिकाच़ें रूप घेत असतो असें ठरविलेलें आहे. वनस्पति कोटींतहि निरनिराळे प्रकार दिसून येतात व त्या प्रकारांवरूनच़ वनस्पतिशास्त्रांत वनस्पतींच़ें वर्गीकरण केलें ज़ाते. पशुकोटींतहि असले वर्ग आढळतात. गाय, म्हैस, घोडा, गाढव या प्राण्यांमध्यें, विशेषतः त्यांच्या खुरांमध्यें इतकें साम्य आहे कीं शास्त्रदृष्ट्या ते सारे एका वर्गांत मोडतात. लांडगा व कुत्रा यांमध्येंहि तसेंच़ साम्य आहे. मांज़राला वाघाची मावशी असें म्हणण्याच़ा प्रघात आहे. त्याला हेंच़ साम्य कारणीभूत आहे. यावरून दिसून येईल कीं अगदीं खालच्या कोटीपासून थेट वरच्या कोटीपर्यंत जीवांच़े निरनिराळे प्रकार दिसून येतात. उत्क्रांतिक्रमांत जीवांच़ा ज़री विकास होत असला व प्रत्येक जीव ज़री खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर येत असला तरी तो ज्या एका विशष्ट प्रकारच़ा असेल तो त्याच़ा प्रकार तसाच़ अखेरपर्यंत कायम राहतो. Canis या वर्गांतील लांडगा हा प्राणी खालच्या प्रतीच़ा आहे. उत्क्रान्तिक्रमांत तो प्राणी आपला वर्ग न सोडतां त्याच़ वर्गांतली एक पायरी वर च़ढून ज़णूं कुत्रा होईल, पण आपला वर्ग सोडून तो घोडा किंवा मांज़र होणार नाहीं. तद्वत् वाघ, सिंह, चित्ता हे प्राणी आपल्या Felis या वर्गांत उत्क्रान्तिक्रमानुसार वर च़ढतील, आणि मांज़राच़ें रूप घेतील, पण दुसऱ्या वर्गांत उडी टाकून झेब्रा किंवा हत्ती होणार नाहींत. निरनिराळ्या कोटी म्हणजे सृष्टीच्या वाड्याच़े एकेक मज़ले आहेत अशी कल्पना केली तर जीवांच़े हे सात प्रकार म्हणजे एकेका मज़ल्यावरून वरच्या मज़ल्यावर च़ढण्याच़े सात जिने आहेत असें मानावयास हवें. अगदीं खालच्या कोटींतला जीव ज्या जिन्याला एकदां लागला त्या जिन्यानेंच़ तो एकसारखा वर च़ढत असतो. वरच्या मज़ल्यावर पोहोंच़ल्यानंतरहि आपली बाज़ू सोडून दुसऱ्या बाज़ूच़ा जिना तो धरीत नाहीं, तर आपल्याच़ बाज़ूच्या जिन्यानें सर्व मज़ले च़ढत असतो. एक जीव एका अंगच्या जिन्यानें एका विशिष्ट उंचीपर्यंत च़ढला असला आणि दुसरा जीव दुसऱ्या जिन्यानें तितक्याच़ उंचीवर पोहोंच़ला असला तर त्यांच़ा दर्जा समान आहे इतकेंच़ फक्त म्हणतां येईल. पण प्रकार मात्र वेगळे राहतील.

मनुष्यांचे  स्वभावभेद

आपण आपल्या सभोंवतालचीं माणसें पाहिलीं तर त्यांच्या मनांची ठेवण वेगवेगळी आहे असें आपणांस दिसून येतें. पण कोणता माणूस या सात वर्गांपैंकीं कोणत्या वर्गांत पडेल हें नक्की ठरविणें फार कठीण ज़ातें. पुष्कळ माणसांची वाढच़ इतकी कमी झ़ालेली असते कीं, त्यांच़ें वैशिष्ट्य अप्रकट असतें; नाना गुणांना आणि दोषांना पालवी येण्याइतकी ज्यांची वाढ झ़ालेली आहे त्यांच्यामध्यें हें वैशिष्ट्य दृष्टोत्पत्तीस आलेलें असतें, पण त्यांपैंकीं अमुक माणूस अमक्या मनोवृत्तीच़ा (किरणाच़ा) आहे असें ठाम सांगणें सुलभ असत नाहीं. कारण माणसांच्या स्वभावांत इतक्या भानगडी असतात कीं त्यांच्या निरनिराळ्या मिश्रणांच़ा सामान्य माणसाला कस लावतां येत नाहीं. तरीहि कधीं कधीं कांहीं माणसांची वृत्ति ओळखणें शक्य होतें. एखाद्या सुसंस्कृत माणसाला कर्मकांडाची आवड विशेष प्रमाणांत असली तर तो सातव्या किरणाच़ा आहे, अथवा तो अत्यंत प्रेमळ व भाविक असला तर तो सहाव्याच़ा आहे असें एखादे वेळीं बिनच़ूक सांगतां येईल. तुकाराम महाराज़ व समर्थ रामदासस्वामी यांमधला फरक कोणासहि दिसण्याज़ोगा आहे. तो लक्षांत घेणारास पहिले सहाव्या किरणाच़े व दुसरे पहिल्या किरणाच़े आहेत असें म्हणण्यास ज़ागा आहे. पण ज्ञानेश्वर कोणत्या किरणाच़े होते हें सांगणें तितकें सोपें नाहीं. यावरून हा विषय किती बिकट आहे याची वाचकांनीं कल्पना करावी.

वरील विवेचनावरून माणसांच्या सात प्रकारांची कांहीं कल्पना वाचकांना येईल.  [या सात वृत्तींच्या (किरणांच्या) संबंधानें भरपूर माहिती उपलबध नाहीं. पण श्री.लेडबीटरकृत The Masters & the Path पृ. ३७३ ते ४०७ वर, व The Seven Rays by Mr. Ernest Wood या ग्रंथांत हल्लीं उपलब्ध असलेली माहिती पाहतां येईल.]  हे सर्व प्रकार अगदीं वेगळे नसतात, त्यांत पुष्कळ भाग सामान्य असतो हें लक्षांत ठेवणें ज़रूर आहे. हा वेगळेपणा वैशिष्ट्यदर्शक असतो, उच्चनीच भावाच़ा त्यांत भाग नसतो. या पुस्तकांत ज़ो उत्क्रान्तिमार्ग वर्णिलेला आहे तो या साती प्रकारच्या माणसांचा आहे. ऋषिसंघामध्यें या साती प्रकारांस साहाय्य करणारे वेगवेगळे अधिकारी (जीवन्मुक्त) असतात.

सिद्धसंघांतील ह्या सात वृत्तींच्या प्रतिनिधीभूत अधिकाऱ्यांची थोडी माहिती येथें देणें उपयुक्त होईल. या सातांपैंकीं प्रत्येक वृत्तीच़ा विशेष गुण, व त्या वृत्तीच्या माणसास आध्यात्मिक प्रगति करावयाची असल्यास कोणता विचार त्यानें आपल्या मनांत सतत वागवावयास पाहिजे तो, तसेंच़ ऋषिसंघांतील त्या वृत्तीच्या प्रतिनिधीभूत अधिकाऱ्याच़ें नांव, हीं पुढील कोष्टकांत दिलीं आहेत :


वृत्तीच़ा अथवा
किरणाच़ा क्रमांक
वैशिष्ट्य दर्शविणारा
गुण
अध्यात्मप्रगति करण्यासाठीं या वृत्तीच्या मुमुक्षूच्या
मनांत कोणता विचार सतत असावयास पाहिजे तो
ऋषिसंघांतील हल्लींच़े
अधिकारी

सामर्थ्य
मीं खंबीरपणानें, धैर्यानें व चिकाटी न सोडतां ईश्वरकार्य करीन.
मास्टर मौर्य

शहाणपणा
शुद्ध प्रेमानेंच़ ज्याच़ा परिपोष होतो तें अंतःप्रतिभेच़ें ज्ञान मीं संपादन करीन.
ऋषि कुठूमी

चतुरपणा किंवा
इतरांशीं जमवून
घेण्याची हातोटी
प्रत्येक क्षणीं योग्य तीच़ गोष्ट करावी व बोलावी आणि प्रत्येक माणसाशीं
त्याच्याच़ च़ालीनें च़ालावें, ही हातोटी मीं शिकेन आणि अशा रीतीनें
इतरांस जास्त च़ांगल्या रीतीनें मीं साहाय्य करूं शकेन.
व्हेनेशियन् मास्टर

सौंदर्य
माझ्या जीवनांत व माझ्या परिस्थितींत मीं सौंदर्य आणि सुरेखपणा
हे गुण आणण्याची शक्य ती खटपट करीन व अशा रीतीनें माझी
परिस्थिति व जीवन हीं मीं ईश्वरास शोभेशीं करीन. सर्व सृष्टींत सौंदर्य
पाहण्याची कला मीं शिकेन व त्यामुळें ईश्वराची अधिक च़ांगल्या
रीतीनें सेवा करण्यास मीं समर्थ होईन.
मास्टर सेरपिस्

शास्त्र
(तपशीलवार ज्ञान)
मीं ज्ञान संपादन करीन, त्यांत बिनच़ूकपणा व तंतोतंतपणा हे गुण
आणीन व त्याच़ा उपयोग ईश्वरकार्याकडे करीन.
मास्टर हिलारियन्

भक्ति
मीं माझ्या हृदयांत भक्तीची प्रचंड शक्ति वाढवीन व तिच्या ज़ोरावर
अनेक माणसांस ईश्वरचरणांपाशीं नेईन.
मास्टर जीझ़स्

विधि-संस्कार
देवदेवता माणसाला जें साहाय्य देण्यास सदा तत्पर असतात, त्याच़ा
संपूर्ण फ़ायदा त्याला करून देण्यासाठीं ईश्वरानें घालून दिलेल्या
पद्धतीनुसार मीं माझी ईश्वरोपासना करीत राहीन.
मास्टर रगोझ़ी
 

अंतिम स्थितींत सर्व माणसांना सर्व गुण संपादन करावे लागतील हें वर आम्हीं लिहिलेंच़ आहे. पण ज़ोंवर आपण त्या स्थितीप्रत ज़ाऊन पोहोंच़लों नाहीं, तोंवर आपापल्या विशेष गुणांवर जास्त ज़ोर देणें माणसाला स्वाभाविक आहे. तो ज़ोर देत असतांना माणसानें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं आपण आपल्याच़ मार्गाच़ा अतिरेक करतां कामां नये. आपल्या मार्गांत ज़ो एकांगीपणा आहे त्याच़े स्वाभाविक दोष टाळणें आपलें कर्तव्य आहे. वर दिलेल्या पांच़व्या वृत्तीचीं माणसें बुद्धिमान् असतात पण त्यांच्यामध्यें बुद्धीच्या मानानें भक्तिभावाची व प्रेमळपणाची वाढ कमी प्रमाणांत असल्यामुळें तीं माणसें कधीं कधीं मनानें कठोर, सर्वांवर प्रतिकूल टीका करणारीं, लोकांविषयीं तादृश सहानुभूति न बाळगणारीं अशीं होतात. सहाव्या वृत्तीच़ा माणूस भाविक व प्रेमळ असतो. पण कधीं कधीं भक्तिभावाच्या मानानें त्याच्या विवेचक बुद्धीची वाढ फारच़ कमी झ़ालेली असते आणि आपल्या हृदयोर्मींत तरंगत राहून तो च़ुकीच़े निर्णय ठरविण्याच़ा संभव असतो. तेव्हां प्रत्येक माणसानें असल्या दोषांविषयीं सावध राहिलें पाहिजे. अंतीं सर्व गुणांची संपूर्ण व समतोल वाढ झ़ाली म्हणजे ते सारे दोष ज़ातात.

या पुस्तकांत ज़ो प्रगति-मार्ग वर्णन केलेला आहे त्यानें ज्याला ज़ावयाच़ें असेल त्याला स्वतःची विशेष वृत्ति कोणती आहे हें समज़णें बिलकुल अवश्य नाहीं. ती त्याला ओळखतां न आली तरी प्रगति-मार्गानें पुढें ज़ाण्यास त्यास अडच़ण नसते. मात्र त्या वृत्तीची
ज़र त्याला सुज्ञपणानें ओळख पटली तर त्याच़ा त्याला बराच़ उपयोग होऊं शकेल आणि त्याच्या मार्गांतील पुष्कळ भानगडी नाहींशा होतील. स्वतःची वृत्ति ओळखल्यामुळें कोणतें कार्य आपल्या वृत्तीस जास्त अनुरूप आहे हें त्याच्या ध्यानांत येऊन तो पुष्कळ गोष्टींच़ा निर्णय जास्त च़ांगल्या प्रकारानें करतो आणि विवेक व तारतम्य हे गुण शिकतो. ज्या माणसाची वाढच़ फारशी झ़ालेली नाहीं त्याची मनःप्रवृत्ति ओळखणें ज़वळ ज़वळ अशक्य असतें. ज्या बीजाचें अद्याप साधारणसेंहि रोप झ़ालेलें नाहीं, ज्याला थोडी तरी पालवी व एखादें तरी फूल वा फळ आलेलें नाहीं त्या झ़ाडाची ज़ात समज़णें कठीण असतें. तद्वत् ज्याच्या शक्ति अद्याप हृदयांत मुकुलित आहेत, बीजांतल्यासारख्या प्रसुप्त आहेत, ज्याच़े विशेष गुण फारसे प्रकट झ़ालेच़ नाहींत, त्याची मनोरचना कोणती आहे हें सांगतां येणें दुर्घट असतें. सामान्य प्रतीच्या माणसांसंबंधानें ही अडच़ण फार भासते, पण ज्याच्या शक्तीच़ा विकास बराच़ झ़ालेला असेल -- आणि ज़ो या पुस्तकांत दर्शविलेल्या मार्गाच्या नजीक आलेला असेल त्याच़ा विकास हटकून झ़ालेला असतो -- त्याला स्वतःची मनोरचना ओळखणें अगदींच़ अशक्य असतें असें नाहीं.

पण स्वतःच्या अंतरंगांत शिरून स्वतःची वृत्ति ओळखणें ही गोष्ट मुमुक्षूलाहि सोपी नाहीं. ती करतांना त्याच्या हातून च़ुका होण्याच़ा संभव असतो. स्वतःच्या स्वभावाची मूळ बैठक कोणती व विशेष कारणानें त्यांत आलेल्या अवांतर गोष्टी कोणत्या, याची माणसाला निवड करतां न आली तर या कामीं त्याच़ा घोंटाळा होण्याच़ा संभव असतो. एखादा माणूस श्रीमंतींत जन्मलेला असला तर लोकांवर सत्ता गाज़विण्याच़े त्याला हरघडी प्रसंग येतात व कलाकौशल्याकडे लक्ष देऊन त्यापायीं पैसा खर्च़ण्याची त्याला ऐपतहि असते. सुंदर परिस्थितींत व शोभिवंत पदार्थांच्या समागमांत नीटनेटकेपणानें राहण्याची त्याला सहज़च़ हौस उत्पन्न होते. या गोष्टींकडे वरवर पाहिल्यास तो मनुष्य पहिल्या किंवा च़ौथ्या (सामर्थ्याच्या किंवा सौंदर्याच्या) वृत्तीच़ा माणूस आहे असें वाटण्याच़ा संभव उत्पन्न होतो. एकाद्याच़ें शिक्षण फार झालें असल्यास मीं पांच़व्या (तपशीलवार ज्ञानाच्या शास्त्रीय) वृत्तीचा आहें असें त्याच़ें मन त्यास सांगूं लागतें. पण हे गुण ज़र त्याच्या स्वभावांत पक्के बिंबलेले नसले, त्यांच्याकडे ज़र त्याच़ा ज़ोराच़ा ओढा नसला तर ते प्रस्तुत जन्माच्या विशेष परिस्थितीमुळें जास्त मोठे दिसावे आणि त्याच्या स्वभावांतील मूलभूत व कायमच़े गुण त्यांच्याखालीं लपून राहिलेले असावेत असेंहि होऊं शकतें.

म्हणून या मुद्द्याच़ा विचार करतांना प्रत्येक माणसानें आपल्या प्रस्तुत जन्माच्या परिस्थितीकडे व तींतून उद्भवलेल्या वरवरच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतां कामां नये. आपल्या मनांतली खोलांतली खोल ओढ कोणत्या दिशेची आहे, आपल्या आवडी कोणत्या आहेत, आपले गुण कोणते आहेत, आपणांस कोणत्या गोष्टी सहज़ साधतात व कोणत्या दुष्कर वाटतात, आपल्या अंगांत विशेष दोष कोणते आहेत, कोणत्या प्रकारचीं थोर माणसें आपलें मन अधिक ज़ोरानें आकर्षून धरतात, वगैरे गोष्टींच़ा माणसानें अनेक वर्षेंपर्यंत व काळजीनें विवेक केला पाहिजे, निर्विकार मनानें व मननपूर्वक विवेक केला पाहिजे. तसेंच़ इतर लोकांशीं आपल्या गुणदोषांची निःपक्षपातबुद्धीनें तुलना केली पाहिजे. तरच़ त्याला हा प्रश्न कमीअधिक प्रमाणांत उलगडूं शकेल. लोकांनीं आपणांला आपला मार्ग आयता सांगण्यापेक्षां अशा रीतीच्या खटपटीनें माणसाला आपल्या अंतरंगाची पारख करतां आली तर त्याच़ा त्याला जास्त उपयोग होतो. अशा डोळस खटपटीनें माणसानें स्वतःची वृत्ति ओळखलेली असली तर त्याला स्वतःच्या अंतरंगाच़ा जास्त च़ांगला परिचय होतो, व म्हणूनच़ बुद्धिपुरस्सर आपला विकास करण्याच़ें त्याच़ें कार्य सुलभ होत असतें. लोकांनीं सांगितलेलें उत्तर बाहेरून डकविलेल्या कागदासारखें असतें, व स्वतःच्या अंतरंगांतून खणून वर काढलेलें उत्तर हृदयांतल्या झ़ऱ्यासारखें स्वतःशीं अंगभूत झ़ालेलें असतें आणि म्हणूनच़ तें माणसाला जास्त मार्गदर्शक होत असतें.

माणसाच्या समोर अनेक प्रकारच़े उद्योग असतात. त्यांपैंकीं आपण कोणता अंगावर घ्यावा हें ठरविणें बहुशः भानगडीच़ें असतें. आपल्या सभोंवतीं नाना वृत्तीच़े लोक नाना उद्योग करीत असतात, व स्वतःच़ें अंतर्याम ज्याला ठाऊक नाहीं, आपली भावी विकासाची दिशा कोणती हें ज्यानें ओळखलें नाहीं, तो अंधानुकरणानें भलतेच़ उद्योग स्वतःच्या अंगावर घेण्याच़ा संभव असतो. अशा प्रकारें लोकांकडे पाहून माणसानें आपल्या चरित्राला अननुरूप असें वळण दिलें असलें तर तें वळण आपणांस ज़ुळत नाहीं, तें आपलें 'सहज़' व 'स्वभावनियत' 'कर्म' नाहीं हें त्यास कालांतरानें अनुभवास येतें, व एक उद्योग टाकून, दुसरा घेणें त्यास भाग पडतें. यासाठीं ज्यास अध्यात्म मार्गानें प्रगति करावयाची असेल त्यानें स्वतःच़ा मार्ग व स्वतःच़े गुणविशेष नीट शोधण्याच़ा बरेच़ दिवस उद्योग केला पाहिजे. एकदां तो उद्योग साधला म्हणजे माणसाला 'स्वधर्म' समज़ला असें झ़ालें. अशा रीतीनें आपली दिशा मुक्रर झ़ाली म्हणजे आपलें कर्तव्य काय व अकर्तव्य काय हें माणसाला अधिक च़ांगलें कळूं लागतें. मग तो आग्रहानें आपली वृत्ति लोकांवर लादीत नाहीं; उलटपक्षीं आपणांवरहि लोकांची वृत्ति लादून घेत नाहीं. त्याच़ा मार्ग त्याला स्वतःला दूरपर्यंत नीट दिसतो आणि म्हणूनच़ तो त्याला नीट च़ालतां येतो.


वर ज्या सात वृत्ति सांगितल्या आहेत त्या प्रत्येकीच्या मूर्धस्थानीं एक एक ऋषि अधिकारी असतो. त्याला थिऑसफ़ीच्या परिभाषेंत 'चोहण' म्हणतात. चोहण या शब्दाच़ा अर्थ भगवान् असा आहे. हल्लींच्या साती चोहणांचीं नांवें वर कोष्टकांत शेंवटल्या सदरांत आलींच़ आहेत. एखादा माणूस अध्यात्ममार्गानें पुढें ज़ाऊं लागला म्हणजे कोणत्या तरी जीवन्मुक्ताच़ा व त्याच़ा ऋणानुबंध ज़ुळतो. ते जीवन्मुक्त बहुधां स्वतः त्याच़ मार्गानें त्या माणसाच्या अगोदर पुढें गेलेले व परमपद गांठलेले असतात. त्या जीवन्मुक्तांहून श्रेष्ठ असे या मार्गावरच़े चोहण असतात. सर्व जगांतील माणसें या सात वाटांनीं पुढें ज़ात आहेत अशी कल्पना आपणांस आपल्या मनासमोर करावयाची असली तर एकाच़ दिशेकडे ज़ाणारे व एकाच़ ठिकाणीं सरते शेंवटीं मिळणारे सात रस्ते एका भव्य मैदानांत आहेत, त्या साती मार्गांवर सर्व मनुष्यज़ात विभागलेली आहे, प्रत्येक मार्गावरचीं प्रारंभी प्रारंभींचीं मंडळी ध्येय न दिसल्यामुळें अत्यंत सावकाशपणें व घोंटाळत घोंटाळत च़ाललीं आहेत, त्यांच्या पुढचीं मंडळी बुद्धिपुरस्सर आपल्या ध्येयाच्या दिशेनें पावलें टाकीत आहेत व म्हणून त्यांची गति थोडी अधिक आहे, त्यांच्याहि पुढें पाहिलें तर स्वार्थ विसरून जगताची सेवा आपापल्या मार्गानें करूं इच्छिणारीं निवृत्तीच्या वळणावरचीं माणसें आहेत, व त्या माणसांच़ा व त्यांच्यापुढें असलेल्या जीवन्मुक्त पुरुषांच़ा ऋणानुबंध ज़ुळूं पहात आहे, आणखी पुढें पाहिल्यास त्या मार्गावरून पुढें गेलेले जीवन्मुक्त पुरुष च़ालत आहेत, व त्यांच्याहि पुढें प्रत्येक मार्गाच़ा योगक्षेम वाहणारे व त्या मार्गावरच्या सर्व लहान थोर व बऱ्यावाईट माणसांना आंतून स्फूर्ति देणारे 'चोहण' उभे आहेत असें चित्र आपल्या मनःचक्षूंसमोर आपणांला रंगवावें लागेल.

या सात चोहणांची कांहीं माहिती आम्हीं पुढें देत आहों. तीवरून हल्लीं चोहणांच्या स्थानीं कोण व कोणत्या प्रकारच़े पुरुष आहेत हें आमच्या वाचकांस च़ांगल्या प्रकारें उमज़ेल. चोहण ही व्यक्ति नसून ती एक ज़णूं अधिकाराची गादी आहे हें वाचकांनीं लक्षांत ठेवावें.

पहिल्या मार्गावरच़े चोहण ऋषि मौर्य हे आहेत. भागवत पुराणांत त्यांस 'मरु' असें म्हटलेलें आहे. हे पुढील मानववंशाच़े 'मनु' होणार आहेत. थिओसॉफ़िकल् सोसायटी स्थापणाऱ्या दोन जीवन्मुक्तांपैंकीं हे एक आहेत. हे या जन्मीं देहानें रजपूत असून 'मौर्य' वंशाशीं त्यांच़ा कांहीं संबंध असावा. ते सध्यां तिबेटांत शीगात्झ़ी शहराज़वळ राहतात. थिओसॉफ़िकल् वाङ्मयांत त्यांना मास्टर एम् , मास्टर मोर्या, मार्स (Mars) अशीं नांवें दिलेलीं आहेत. [येथें जीं नांवें आम्हीं देत आहों त्यांपैंकीं कांहीं सांकेतिक आहेत. Lives of Alcyone  व  Man: Whence, How & Whither  या पुस्तकांमध्यें तीं सांकेतिक नांवें प्रथम देण्यांत आलीं होतीं.]  ते बांध्यानें उंच़ आहेत. त्यांच्या डोळ्यांत अलौकिक सामर्थ्य व राजतेज दिसतें. त्यांच़ा जन्म राजकुलांत व्हावा व ते पुढें राजपदावर आरूढ व्हावे असें त्यांच्या मागील अनेक जन्मांत पुनः पुनः झ़ालेलें आहे. वैवस्वत मनूंनीं आर्य लोक हज़ारों वर्षांपूर्वीं हिंदुस्थानांत अनेक मोठीं पथकें करून पाठविले होते. त्यांच़ें आधिपत्य कांहीं जन्मांत याच़ पुरुषाकडे होतें. राजकीय घडामोडी यांच्या क्षेत्रांत येतात. ते वैवस्वत मनूंच़े हस्तक आहेत. ््

दुसऱ्या मार्गावरील जे 'चोहण' त्यांस मास्टर कुठूमी, मास्टर के.एच्., अथवा मर्क्युरी (Mercury) अशीं नांवें थिऑसफ़ीच्या वाङ्मयांत दिलेलीं आहेत. वेदांतल्या कुठूमी शाखेवरून त्यांच़ें पहिलें नांव पडलें असावेंसें वाटतें.  हे भावी मानववंशाच़े बोधिसत्त्व होणार आहेत. भागवत पुराणांत त्यांस 'देवापि' म्हटलेलें आहे. ते या जन्मीं काश्मिरी ब्राह्मण असून मास्टर एम् यांच्या स्थानाज़वळ सध्यां राहतात. पूर्वींच्या अनेक जन्मांत ते मोठमोठ्या ठिकाणीं उपाध्याय व धर्मगुरु होऊन गेलेले आहेत. थिओसॉफ़िकल् सोसायटीच़े हे दुसरे संस्थापक होत.  ते आदर्श शिक्षक आहेत. ते मागील एका जन्मीं पायथॅगोरस् व दुसऱ्या एका जन्मीं नागार्जुन होते. मास्टर कुठूमी व मास्टर मौर्य यांच़ा उल्लेख या पुस्तकांत पूर्वीं अनेकवार आलेलाच़ आहे.

तिसऱ्या मार्गावरील चोहणांस धि व्हेनेशियन चोहण, सॅटर्न (The Venetian Chohan, Saturn) अशीं नांवें थिऑसफ़ीच्या पुस्तकांत दिलीं आहेत. प्रस्तुत जन्मीं हे सर्व ऋषींमध्यें अधिक देखणे दिसतात असें ऐकतों.

ओसीरिस् किंवा मास्टर सेरपिस् (Osiris, Master Serapis) अशीं नांवें च़ौथ्या मनोवृत्तीच्या अधिपतींस दिलेलीं आहेत. हे हल्लींच्या जन्मीं ज़ातीनें ग्रीक आहेत.
त्यांच्या उद्योगाच़ा विशेष संबंध ईजिप्त देशाशीं आहे. त्यांचा चेहरा कार्डिनल् न्यूमन् यांच्यासारखा दिसतो असें सांगतात.

पांचव्या मार्गावरील अधिपतीस मास्टर हिलारियन (Master Hilarion) अथवा नेपच्यून (Neptune) असें नांव आहे.  हेहि या जन्मीं ज़ातीनें ग्रीक आहेत. नीओप्लेटॉनिक च़ळवळींत आयाम्ब्लिकस् नांवानें हेच़ प्रसिद्ध होते. सध्यां ते ईजिप्त देशांत असतात.

सहाव्या मार्गाच़े (भक्तिमार्गाच़े) चोहण पूर्वींच्या एका जन्मीं जीझ़स् या नांवानें प्रसिद्ध होते. म्हणून त्यांस मास्टर जीझ़स् असें नांव देतात. बृहत् किंवा बृहस्पति असेंहि त्यांस नांव दिलेलें आहे. हे या जन्मीं ज़ातीनें सीरियन असून लेबानोन पर्वतावर राहतात. त्यांच़ा पोशाख पांढरा असतो. येथें त्यांना दिलेलें नांव मास्टर जीझ़स् आहे, यावरून फक्त ख्रिस्ती धर्माशीं त्यांच़ा संबंध आहे असें कोणीं समज़ूं नये. भक्तीच्या वृत्तीच़े ते अधिपति आहेत. अर्थात् सर्व धर्मांतले भक्त त्यांच्या छत्राखालीं असतात. ते एका जन्मीं अपोलोनियस् ऑफ् टायाना या नांवानें इतिहासाच्या रंगभूमीवर आले होते. नंतरच्या एका जन्मीं ते श्रीरामानुजाचार्य होते.

सातव्या मार्गावरील चोहणास व्हीनस्, व मास्टर रगोझ़ी अशीं नांवें आहेत. ते सध्यां यूरोपांत राहतात. त्यांच़े अनेक जन्म इतिहासांत प्रसिद्ध आहेत. ते फार शतकांपूर्वीं सेन्ट् आल्बन् होते. पुढें नीओप्लेटॉनिक संप्रदायांत 'प्रॉक्लस्' म्हणून जन्मास आले. रॉजर् बेकन् , ख्रिश्चन् रोझ़ेनक्रूर्टझ़् , जॉन् हुन्याडी, मंक् रॉबर्टस् , फ़्रान्सिस् बेकन् हे सर्व जन्म त्यांच़ेच़ आहेत. ते बहुत भाषा ज़ाणतात. पण ते आपले स्वतःच़े विधि-संस्कार लॅटिन् भाषेंत करतात.

सिद्धसंघाच्या रचनेची थोडी अधिक कल्पना येण्यासाठीं प्रगतीच्या पायऱ्या आपण खालपासून वरपर्यंत क्रमानें पाहूं या. सिद्धसंघांत शिरण्याच्या पूर्वीं माणसाला क्रमानें शिष्यत्वाच्या दीक्षा घ्याव्या लागतात हें आम्हीं या पुस्तकांत पूर्वीं वर्णिलेंच़ आहे. तेव्हां या सोपानाच्या सर्वांत खालच्या पायऱ्या म्हणजे त्या दीक्षांच्या होत. पांचवी महादीक्षा घेतलेला माणूस म्हणजे  'मुक्त' झ़ालेला माणूस होय. [प्रत्येक जीवन्मुक्त या सातांपैंकीं कोणत्या तरी एका मनोवृत्तीच़े असतात व तदनुरूप मार्गानें त्यांची उत्क्रान्ति झ़ालेली असते. सर्व मुक्तांच़े कारणदेह सारखे नसतात. त्यांतील गुणदर्शक रंगांची रचना वेगवेगळी असते. ती रचना पाहून त्या पुरुषांची मनोरचना कोणती आहे आणि ते कोणत्या मार्गानें उन्नत होत गेले आहेत, हें ज़ाणतां येतें.] पांचव्या दीक्षेच्या वरची पायरी म्हणजे 'चोहण' ही होय. चोहण सात असतात हें वर आलेंच़ आहे. चोहणांच्या पायरीच्या एक पायरी वर गेलें कीं, समान अधिकाराच़े तीन अधिकारी सिद्धसंघांत असतात. एका अधिकाऱ्याला मनु म्हणतात. हे पहिल्या मनोवृत्तीच़े म्हणजे सामर्थ्याच़े आदर्श पुरुष होत. (रामदासांच्या समर्थ पदवीच़ा अर्थ आतां जास्त स्पष्ट होईल.) दुसरे जे अधिकारी असतात त्यांच़ें नांव 'बोधिसत्त्व' किंवा 'जगद्गुरु' आहे. हे दुसऱ्या मनोवृत्तीच़े म्हणजे ज्ञानाच़े आदर्श होत. तिसऱ्या अधिकाऱ्यांच़ें नांव 'महाचोहण' आहे. तीन ते सात पर्यंतच्या मनोवृत्ति व त्यांवरील चोहण हे सारे त्यांच्या हाताखालीं असतात. या पांच़ मनोवृत्तींच्या मार्गांवरच़े सर्वांत वडील अधिकारी म्हणजे 'महाचोहण' होत. त्यांच्याहून वरिष्ठ असे त्या वृत्तींच़े दुसरे कोणतेहि अधिकारी आपल्या पृथ्वीवरच्या सिद्धसंघांत नसतात. पहिल्या व दुसऱ्या मनोवृत्तीच्या मार्गावर मात्र सिद्धसंघांत जास्त वरच़े अधिकारी असतात. मुक्ताची दीक्षा पांच़वी होय असा हिशेब धरल्यास सर्व चोहणांची दीक्षा सहावी होय असें म्हणावें लागेल. अर्थात् त्याच्या वरच़े समान पदवीच़े मनु, बोधिसत्त्व व महाचोहण हे तिघेहि अधिकारी सातव्या दीक्षेवरच़े होतात. मनु व बोधिसत्त्व यांच्या मार्गानें पुढें गेलेले व त्यांच्याहून मोठे असे आठव्या पायरीचे अधिकारी सिद्धसंघांत आहेत. मनूच्या अधिकाराच्या पुढची जी पायरी आहे तीवरील पुरुषांस प्रत्येक-बुद्ध म्हणतात. असे तीन अधिकारी ऋषिसंघांत आहेत. सनक, सनंदन व सनातन अशीं तीन नांवें या तीन अधिकाऱ्यांस हिंदुधर्मग्रंथांत दिलेलीं आहेत. बोधिसत्त्वांच्या वरच्या पायरीवर जे अधिकारी असतात त्यांना 'बुद्ध' असें नांव आहे. इतिहासांत प्रसिद्ध असलेले गौतमबुद्ध या पायरीवर सध्यां आहेत. पण ते स्थूलदेहधारी नाहींत. प्रत्येक-बुद्धाची वृत्ति (किरण) नं.१ ची (सामर्थ्याची), व बुद्धाची नं.२ ची (ज्ञानाची) असते. नं.२ च्या ज्ञानवृत्तीच़े सिद्धसंघांतले सर्वांत मोठे अधिकारी म्हणजे बुद्ध होत.
त्यांच्या वरच़े त्या वृत्तीच़े दुसरे कोणीं अधिकारी सिद्धसंघांत नाहींत. नं.१ च्या वृत्तीच़ें मात्र तसें नाहीं. प्रत्येक-बुद्धाच्या पायरीहून त्या वृत्तीची जी वरिष्ठ पायरी आहे, जिला नववी पायरी असें म्हणतां येईल -- त्या पायरीवर सनत्कुमार हे आहेत. सिद्धसंघाच़े हे सर्वश्रेष्ठ अधिपति होत.

[या पायऱ्यांमध्यें विकासाच्या दृष्टीनें किती अंतर असतें त्याच़ा अज़मास करणें सोपें नाहीं. पहिल्या इयत्तेंतल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेच़ा हेडमास्तर व एखाद्या क्षेत्रांत नवीन शोध करणारा संशोधक यांमध्यें बुद्धीच्या विकासाच्या दृष्टीनें किती तफ़ावत असते, तें समज़णें सहज़च कठीण ज़ाईल. दोन्हीं माणसें कदाचित् त्याला ज़वळ ज़वळ सारखींच़ दिसतील. पांच़व्या पायरीवरच़ा जीवन्मुक्त व सहाव्या पायरीवरच़े 'चोहण' यांत प्रगतीच्या दृष्टीनें किती फरक आहे हें सांगणें म्हणजे वरीलसारख्या बिकट प्रश्नांत शिरण्यासारखें होय. जीवन्मुक्त ऋषींच़ा ज़ो अलीकडे पत्रव्यवहार प्रसिद्ध झ़ाला आहे त्यांत एका पायरीवरच्या पुरुषांनीं वरच्या पायऱ्यांवरच्या पुरुषांविषयीं उल्लेख
केलेले सांपडतात. ते पाहिले तर या पायऱ्यांत उत्क्रान्तीच्या दृष्टीनें पुष्कळच़ अंतर असतें असें म्हणावें लागेल.] 

सनत्कुमार हे आपल्या पृथ्वीवरील सर्व जीवांची उत्क्रान्ति करणारे व तितक्यापुरता ईश्वरी संकल्प तडीस नेणारे ईश्वराच़े पृथ्वीवरील श्रेष्ठतम अधिकारी होत. त्यांच़ा सूक्ष्मदेह सबंध पृथ्वीला व्यापून असतो. तेव्हां पृथ्वीवरील सारी उत्क्रान्ति ही त्यांच्या ज़णूं पोटांतच़ समाविष्ट झ़ाली आहे असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. अर्थात् पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्यांच्या ज़ाणिवेंत आपोआपच़ येते. धरणीकंप, जलप्रलय, अग्निप्रलय वगैरे करण्याच्या संहारशक्तीची किल्ली त्यांच्या हातांत असते. त्यांच़ें कार्य समग्र मनुष्य ज़ातीशीं असतें. एकेका व्यक्तीशीं ते प्रायः संबंध ठेवीत नाहींत. पण जेव्हां कधीं कधीं एखाद्या व्यक्तीशीं ऋणानुबंध ज़ोडणें त्यांना ज़रूर होतें तेव्हां ते त्याच्या अंतरंगांत असलेल्या निर्वाण भूमिकेवरच्या आत्मिक ज़ाणिवेशीं तो ज़ोडीत असतात. त्याहून खालच्या पायरीवर ते आपल्या शक्तीच़ा विनियोग करीत नाहींत. मुमुक्षू मार्गावरील सर्व शिष्यांना त्यांची गांठ घेण्याच़ा योग येत नाहीं. पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रगति झ़ाल्यावर त्यांची व मुमुक्षूची समक्ष गांठ होते. ते इतके तेजःपुंज दिसतात कीं त्यांच्या सान्निध्यांत कित्येकांची दृष्टि दिपून गेलेली आहे. ते षोडश वर्षांच़े तरुण दिसतात आणि म्हणूनच़ त्यांना कुमार असें म्हणण्याची वहिवाट आहे. एकदां ज्याला त्यांचें दर्शन घडलें त्याला सृष्टीची उत्क्रान्ति ईश्वरानें आंखलेल्या मार्गानें अवश्यमेव होईल याविषयीं तिळमात्रहि संशय रहात नाहीं. सनत्कुमारांसमवेत दुसरे तिघे कुमार असतात. ते सनत्कुमारांच़े शिष्य आहेत. हे चारी कुमार आपल्या पृथ्वीवरच्या उत्क्रान्तिमार्गानें पुढें गेलेले नाहींत. शुक्र ग्रहावर एक मानवकोटी आहे. ती पृथ्वीवरल्या मानवकोटीच्या मानानें बरीच़ पुढारलेली आहे. हे चारी कुमार त्या उत्क्रान्ति-क्षेत्रांतले आहेत. त्यांच़े देह आपल्या मानवी देहांसारखे नाहींत. त्यांस खाणें पिणें लागत नाहीं, त्यांच्या देहांस आपल्यासारखी झीज़ नाहीं, जन्ममृत्यूहि नाहींत. हज़ारों वर्षें गेलीं तरी त्यांच़े ते देह होते तसेच़ कायम सांच्याच़े रहातात. चाक्षुष मनूंच्या अगोदरच़े म्हणजे तिसऱ्या मानववंशाच़े मनु अधिकारारूढ असतां वेळीं, अर्थात् लक्षावधि वर्षांच्या पूर्वीं शुक्रावरून हे चारी कुमार पृथ्वीवर आले. त्यांच्या बरोबर आणखी अनेक ऋषितुल्य पुरुष होते. त्या सर्वांनीं पृथ्वीवर सिद्धसंघाची प्राणप्रतिष्ठा केली. कालवशात् पृथ्वीवरील उत्क्रान्तिप्रवाहांतून प्रगति करीत करीत ज़सज़शीं माणसें त्या त्या पदवीपर्यंत च़ढलीं तसतशा या शुक्रावरच्या ऋषींनीं आपापल्या ऋषिसंघांतल्या ज़ागा त्यांच्या हवालीं केल्या आणि याप्रमाणें एकेक ऋषि अधिकारनिवृत्त होऊन हा पृथ्वीगोल सोडून अन्य ठिकाणीं गेला. फक्त शुक्रावरल्या उत्क्रान्तीपैंकीं आतां चार पुरुष पृथ्वीवर राहिलेले आहेत. तेच़ हे चार कुमार होत.

असा हा परमपवित्र व परमश्रेष्ठ उत्क्रान्तिमार्ग आहे. 'हा मार्ग जैं देखिजे। तैं तहानभूक विसरिजे।।' असें त्या मार्गाच़ें ज्ञानेश्वरांनीं वर्णन केलें आहे. सिद्धसंघांतील ज्ञानी पुरुषांना उद्देशून 'उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान् निबोधत।' असा श्रुतीनें कंठरवानें सर्व मुमुक्षूंना उपदेश केला आहे. त्यांनाच़ अनुलक्षून श्रीकृष्णांनीं 'तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः।।' असा अंगुलिनिर्देश केला आहे. ते सारे अधिकारी पुरुष आज़ विद्यमान आहेत आणि योग्य प्रकारच़े गुण अंगीं असणाऱ्या मुमुक्षूला हातीं धरून त्याला स्वतःसारखा करण्यास उत्सुक आहेत. पण त्या पुरुषांच़ा हात धरून ते दाखवितात त्या मार्गानें ज़ाण्यास कोणीं मुमुक्षु उत्सुक आहेत कां  ?  हा सध्यांच़ा प्रश्न आहे.
 
*  *  *  *  *

back to bindhast : home                                    अनुक्रमणिका