प्रकरण  बारावें


जीवन्मुक्त  ऋषींचे  कांहीं  उद्योग


जगाच्या पाठीशीं जीवन्मुक्त ऋषींची एक संस्था आहे असें या पुस्तकांत आम्हीं अनेक वेळां सांगितलें आहे. त्यांच्या उद्योगांपैंकीं कांहींच़ा उल्लेख मागें तिसऱ्या प्रकरणांत आला आहे. त्या प्रकरणांत त्यांच्या उद्योगांची सर्वसामान्य भूमिकाहि आम्हीं विवरण करून सांगितली आहे. पण ऋषिसंघाच्या कित्येक कार्यांच़ा उल्लेख तेथें करणें प्रस्तुत नव्हतें. या प्रकरणांत त्यांच़ा विचार करावयाच़ा आहे.

ऋषिसंघांतले पुरुष जे जे उद्योग करीत असतात ते इतक्या उच्च प्रकारच़े असतात कीं सामान्य प्रतीच्या माणसाला त्यांची कल्पना होणार नाहीं. सुसंस्कृत माणूस जे उद्योग करीत असतो ते ज़से त्याच्या घरच्या कुत्र्याला आकलन होत नाहींत तशीच़ येथें स्थिति असते. माण्साच्या उद्योगांपैंकीं खाणें, पिणें व फिरणें इतकेच़ उद्योग कुत्र्याला समज़तील. लिहिणें, वाच़णें, अभ्यास करणें, व्याख्यान देणें, उद्योगधंदा करून चरितार्थ च़ालविणें, लोकहिताचीं कामें करणें, संस्था स्थापणें, देवपूजा करणें, यंत्रें च़ालविणें, कारखाना काढणें, वकिली करणें, व्याज-बट्टा करणें, वगैरे जीं अनेक कामें माणूस करीत असतो त्यांची कल्पना कुत्र्याला कदापि येऊं शकणार नाहीं. तद्वत् जीवन्मुक्त पुरुष जगद्हितार्थ जे व्यवहार करतात त्यांपैंकीं बहुतेक सामान्य माणसाच्या बुद्धीच्या आटोक्यांत येण्याज़ोगे नसतात. अर्थात् जे कांहीं थोडे फार त्याच्या बुद्धीला समज़तील, त्यांच़ेंच़ येथें संक्षिप्त वर्णन करतां येणें शक्य आहे. या व पुढल्या अशा दोन प्रकरणांत तें करण्याच़ा आमच़ा मानस आहे.

सिद्धसंघांतील पुरुष ईश्वरी योजनेनुसार नाना प्रकारांनीं जगाची प्रगति करीत असतात. सूर्य ज़सा पृथ्वीवर प्रकाशतो व अनंत वनस्पती व प्राणी त्याच़ा प्रकाश शोषून स्वतःची वाढ करतात, तद्वत् उच्च भूमिकेवरून हे जीवन्मुक्त पुरुष सर्व जगावर अध्यात्मप्रकाशाच़ा व
र्षाव करीत असतात आणि प्रत्येकाच्या ग्रहणशक्तीप्रमाणें ती शक्ति त्याच्या अंतर्यामांत शिरून त्याच़ा विकास करीत असते. सर्व पृथ्वीच़े त्यांनीं व्यवस्थित विभाग केलेले आहेत, आणि प्रत्येक विभागावर जीवन्मुक्त पुरुष नेमलेले आहेत. असल्या कार्यविभागांत एकेका जीवन्मुक्ताच्या छत्राखालीं मोठमोठाले देश येतात, आणि ते त्यांतील जीवांची ज़बाबदारी आपल्या अंगावर घेतात. मनुष्यकोटीखेरीज़ इतर जीवांकडेहि ते आपल्या शक्तीच्या प्रेरणा सोडतात आणि त्यांच्याहि वाढीस साहाय्य देतात. ह्या प्रेरणा निरनिराळ्या प्रकारच्या असतात आणि निरनिराळ्या भूमिकांवरून त्या सोडण्यांत येतात. जीवन्मुक्त पुरुष स्वतःच्या अशा प्रेरणा ह्या प्रकारें जगावर सोडीत असतातच़. खेरीज़ पुष्कळ विदेहमुक्त पुरुष जगाच्या हितासाठीं आपल्या तपःसामर्थ्यानें जीवांच्या विकासास साहाय्यक अशा अनेक शक्ति उत्पन्न करीत असतात. या विदेह-मुक्तांस थिऑसफ़ीच्या परिभाषेंत 'निर्माणकाय' अशी संज्ञा आहे. [ही संज्ञा थिऑसफ़ीय वाङ्मयांत बुद्धधर्मांतून घेतलेली आहे.] त्यांनीं निर्माण केलेला हा अध्यात्मशक्तीच़ा खजिना सिद्धसंघाच्या ताब्यांत असतो आणि या संघांतील हे जीवन्मुक्त पुरुष या खजिन्यांतली शक्तीहि आपल्या कार्यार्थ उपयोगांत आणीत असतात. पुष्कळ वेळां ही शक्ति कारणदेहाच्या भूमिकेवरची असते; आणि प्रत्येक जीवात्म्यावर ती वर्षिली ज़ाऊन त्याच़ें अंतरंग अधिक विस्तृत आणि ध्येयनिष्ठ होत असतें. ठराविक प्रदेशांतील सर्व जीवांवर शक्ति-वर्षाव करण्याच़ा उद्योग एक एक जीवन्मुक्त पुरुष करीत असतो. याखेरीज़ एका विशिष्ट मनोरचनेच्या माणसांची प्रगति करण्याच़ा व त्यासाठीं त्या मनोरचनेच्या माणसांवर विवक्षित शक्तीचें सिंचन करण्याच़ा त्यांच़ा आणखी एक उद्योग असतो; आणि आश्चर्य हें कीं लाखों माणसांवर ज़री ते अशा प्रकारें शक्तीच़ा वर्षाव करीत असले, तरी प्रत्येक माणसाकडे ती शक्ति ज़ातांना त्याच्या त्याच्या आवश्यकतेस अनुरूप असें तिच्यांत स्थित्यंतर करण्याची योजना जीवन्मुक्त पुरुष करूं शकतात.

कर्मकांड

कित्येक जीवन्मुक्तांनीं
जगावरील विशिष्ट धर्मांशीं निकट संबंध ठेविलेला असतो. प्रत्येक धर्मामध्यें कांहीं कर्मकांडाच़े विधि सांगितलेले असतात. हिंदुधर्मांतील पूजा, संध्यावंदन, ख्रिस्ती धर्मांतले यूखरिस्ट वगैरे सारखे विधिसंस्कार सर्व धर्मांत असतात. प्रत्येक धर्मांत अमुक रीतीनें अमुक मंत्र म्हणावा, किंवा अमुक अमुक विधि वा करविन्यास अमुक अमुक त-हेनें वा वृत्तीनें करावा अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात; व त्या गोष्टी योग्य प्रकारें केल्या असतां अदृश्य भूमिकेवर शक्ति प्रकट होऊन ती माणसांच्या प्रगतीस साहाय्य करीत असते. ही शक्ति ऋषिसंघाकडूनच़ येत असते. धर्मांतलें कर्मकांड सारें कुचकामाच़ें आहे, 'ज्ञानात् एव तु कैवल्यम्' असें म्हणणारा एक पक्ष आहे. त्याच्या विरुद्ध कर्मकांडानेंच़ मोक्ष मिळतो, त्याशिवाय मुक्ति नाहीं असें म्हणणारा दुसरा पक्ष आहे, निदान पूर्वीं होता. दोन्हींहि पक्ष एकांगी आहेत. कर्मकांड हें शास्त्रीय प्रयोगांसारखें असतें. प्रयोग न समज़तां वेडेपणानें केले, त्या प्रयोगांच़े नियम मोडून केले, तर ते फुकट ज़ातात. कर्मकांड विधिवत् व लक्षपूर्वक केलें तर त्यानें मोक्ष मिळत नाहीं, पण विकासास साहाय्यक अशी शक्ति उत्पन्न होते; व माणूस ज़र स्वतःच्या अंतरंगांत अध्यात्म प्रगतीच़ा प्रयत्न करीत असेल तर ह्या शक्तीच़ें त्याला साहाय्य मिळून त्याची प्रगति बऱ्याच़ अंशानें जलद होऊं लागते. रस्त्यावरून च़ालत ज़ाणारा माणूस, ज़र वारा अनुकूल असेल तर ज़रा अधिक वेगानें ज़ाईल, वारा प्रतिकूल असेल तर त्याच़ा वेग मंद होईल. तद्वत् कर्मकांडाच़ा माणसाला उपयोग होत असतो. वारा अनुकूल दिशेनें येवो वा प्रतिकूल दिशेनें येवो, ज़ो माणूस रस्त्यावर नुसता स्तब्ध उभा असेल त्याला त्या वाऱ्याच़ा उपयोग नाहीं. तद्वत् ज्या माणसाच़ा अध्यात्म प्रगतीच़ा कांहींच़ प्रयत्न नसेल त्याला विधिसंस्कार ज़वळ ज़वळ निरुपयोगीच़ होत. ते त्याच्यामध्यें अंधविश्वास वाढवितील अथवा दंभ उत्पन्न करतील. पण ज़ो माणूस विशिष्ट दिशेनें अध्यात्म प्रगतीची सुज़ाणपणें खटपट करीत असेल त्याला धर्मविधींच़ें साहाय्य होऊन, त्याची प्रगति जलदीनें होऊं शकते. कांहीं प्रकारच्या माणसांना तर त्यांच़ा पुष्कळच़ उपयोग होतो. कांहींना फारसा होत नाहीं. कर्मकांड हें अध्यात्म प्रगतीला आवश्यक नाहीं, पण पोषक आहे. कर्मकांडाच़े विधि केल्याशिवाय अध्यात्म प्रगति होऊं शकते. पण ते विधि नीटपणानें केले तर पुष्कळांना अध्यात्म मार्गावर साहाय्य मिळून अधिक वेगानें प्रगति करतां येते, यांत संशय नाहीं. जगांतल्या सर्व धर्मांतील विधिसंस्काररूपी योजनेंतून जी शक्ति प्रकट होत असते तिच़ा उगम सिद्धसंघांतल्या कांहीं जीवन्मुक्तांपासून झ़ालेला असतो.

जगांत अनेक क्षेत्रें, आणि पवित्र स्थानें आहेत. तेथें पुष्कळदां भाविक माणसांच़े मेळे व यात्रा ज़मत असतात. कांहीं ठिकाणीं देवालयांतून देवांच्या मूर्ति असतात.  कोठें कोठें ज़ुन्या संतांचीं स्थानें असतात आणि तेथें संतांच्या खऱ्या वा खोट्या स्मारक वस्तु ठेवलेल्या असतात. सिद्ध संघांतील पुरुष असल्या ठिकाणीं येणाऱ्या माणसांच्या भाविक वृत्तीच़ा फायदा घेऊन तेथें आपली शक्ति ओततात आणि त्या स्थानांत जागृति उत्पन्न करतात व तेथें ज़मणाऱ्या लोकांना त्या शक्तीच़ा उपयोग होतो. हीं येणारीं माणसें निःस्वार्थी, अध्यात्मप्रेमी व परोपकाररत असलीं तर त्यांना दैवी प्रसाद लाभल्यासारखें वाटतें, व त्यांच़ेवर असल्या शक्तीच़ा विशेष परिणाम होऊन त्यांच्या प्रगतीला बरेंच़सें साहाय्य होतें. ज़री तीं माणसें भोळीं, अज्ञ, व अशिक्षित असलीं तरी त्यांनाहि या शक्तीच़ा थोडा तरी उपयोग होतोच़. काशी, मक्का व रोम अशांसारख्या क्षेत्रांत अशा शक्तीच़ा आविर्भाव सिद्धसंघांतील पुरुष अनेकवार करतात आणि अशा रीतीनें तेथें आलेल्या माणसांचें अंतःकरण फुलविण्याच़ा प्रयत्न केला ज़ातो. जगांतील सर्व धर्मांसंबंधानें असें कार्य करण्यांत येतें.

जीवन्मुक्त पुरुष तत्त्वविचार, भौतिक शास्त्रें, ललित-कला वगैरे अनेक क्षेत्रांत आणखी एक प्रकारच़ा उद्योग करतात. ते निरनिराळ्या प्रकारचीं विचारचित्रें (Thought Forms) निर्माण करून तीं पृथ्वीच्या मनोमय वातावरणांत सोडून देतात. ज्या मंडळींची या शास्त्रांत विशेष गति असेल, विशेष अभ्यास केल्यामुळें ज्या मंडळींचीं मनें संस्कारक्षम झ़ालीं असतील, किंवा ज्या माणसांत त्या त्या विषयासंबंधीं प्रतिभा उत्पन्न झ़ालेली असेल, त्या माणसांच्या मनाला हीं विचारचित्रें नवीन कल्पना व सुधारणांच्या नवीन दिशा सुच़वितात आणि अशा रीतीनें जगांत नवीन शोध लागतात व जगाच्या निरनिराळ्या क्षेत्रांना चालना मिळते.

दृश्य जगांतल्या ज्या नाना च़ळवळी व उद्योग आहेत त्या सर्वांच़ें धोरण प्रगतीपर असावें यासाठींहि हे पुरुष खटपट करतात. इष्ट कार्यास उत्तेजन देणें, अनिष्ट वृत्तींस विरोध करणें, एका पारड्यांतलें ज़णूं वज़न काढून वा घालून तें हलकें अथवा ज़ड करणें आणि पृथ्वीवरच्या घडामोडींस इष्ट प्रकारच़ें वळण देणें हें कार्य ते सदा करीत असतात. एखादा हुषार नावाडी सुकाणूवर हात ठेवून वाऱ्याची दिशा, भरती ओहोटी, पाण्याच़ा ओघ, लाटांच़ें हेलावणें, वादळाची धुमश्चक्री यांमधून आपली नाव इष्ट दिशेनें ज़शी नेतो, अडच़णी टाळण्यासाठीं कधीं थोडा या बाज़ूस तर कधीं त्या बाज़ूस असा तो वेळेनुसार वळला तरी ध्येयमुक्काम न सोडतां ठरलेल्या बंदरांत ज़ातो, तद्वत् नाना च़ळवळी, नाना मतें, नाना संस्कृति ह्या ज्या त्यांच्या देखरेखीखालीं असतात त्यांना हे कर्णधार सदा योग्य दिशेनें पुढें नेत राहतात.


दर  शतकाच्या  शेवटीं

सिद्ध संघांतलीं कांहीं माणसें
दर शतकांतील शेवटल्या पंचवीस वर्षांत जगाच्या हितासाठीं एक नवा उद्योग सुरूं करीत असतात. [मैत्रेयांच्या आज्ञेनें च़ौदाव्या शतकापासून ही प्रथा च़ालूं करण्यांत आली आहे. पहा डॉ.बेझ़ंट यांच़ें London Lectures 1907, पृ.१२४, १२५.]  हा उद्योग विशेषतः यूरोपीय लोकांच्या सुधारणेसाठीं असतो. गेल्या शतकाच्या शेवटल्या भागांत थिओसॉफ़िकल् सोसायटीची स्थापना, सायकिकल् रिसर्च् सोसायटीसारख्या संस्थांच़े इंग्लंड, अमेरिका व यूरोपमधील उद्योग, व उत्क्रांति-वादाच़ें प्रणयन आणि प्रसार या तीन महत्त्वाच्या गोष्टी सिद्धसंघाच्या प्रयत्नांचीं फळें आहेत. इंग्लंडांत एलिझ़बेथ राणीच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धांत बेकन् , शेक्सपियर वगैरेंच़ा उदय होऊन इंग्रजी भाषेस व नवीन विचारांस चालना मिळाली, शास्त्रीय शोधांच़ा पाया घालण्यांत आला व ज़णूं एका सुधारणाऱ्युगाच़ा (Renaissance) प्रारंभ झ़ाला असें इतिहास सांगतो. हा प्रयत्नहि सिद्धसंघाकडून करण्यांत आलेला होता. सोळाव्या शतकाच्या शेवटल्या भागांत झ़ालेला तो प्रयत्न होय.

सिद्धसंघांतले पुरुष कधीं कधीं एकत्र ज़मण्याच़े समारंभ करीत असतात. असल्या प्रसंगीं कांहीं वेळां त्यांच्या शिष्यांनाहि हज़र राहण्याची मुभा असते. मुमुक्षूस दीक्षा देण्याच्या समारंभाच्या वेळींहि अनेक जीवन्मुक्त व त्यांच़े शिष्य गोळा होत असतात हें आपण या पुस्तकांत पूर्वीं पाहिलेलें आहेच़. दर सात वर्षांनीं सनत्कुमार स्वस्थानीं श्वेतद्वीपांत शंभलग्रामीं जीवन्मुक्तांच़ें सम्मेलन बोलावीत असतात. त्या सभेला सर्व जीवन्मुक्तांना आमंत्रण असतें आणि कधीं कधीं उच्च पायरीच्या कांहीं शिष्यांनाहि बोलावण्यांत येतें. सामान्यतः सनत्कुमार व इतर जीवन्मुक्त पुरुष यांच्या गांठी वारंवार पडत नाहींत. सिद्धसंघांतल्या निरनिराळ्या कार्यक्षेत्रांतील मनु, महाचोहण, बोधिसत्त्व (जगद्गुरु) वगैरे जे अधिकारी आहेत त्यांस मात्र सनत्कुमारांच्या भेंटीच़ा प्रसंग पुनः पुनः येतो;  पण या सभेच्या वेळीं सर्व जीवन्मुक्त एकत्र ज़मतात. पृथ्वीवर आणि सूक्ष्म भूमिकांवर काय काय उद्योग केले पाहिजेत ह्याविषयीं कांहीं दिशा दाखविण्यासाठीं सनत्कुमार त्या सर्वांस या संमेलनास एकत्र बोलावीत असावेत असें वाटतें.


वैशाखी  पौर्णिमा

वैशाखी पौ
र्णिमेला जीवन्मुक्तांच़ा एक मेळा दरसाल भरत असतो. याची प्रथा भगवान् गौतमबुद्ध निर्वाणपदाप्रत गेले तेव्हांपासून पडली आहे. चार कुमारांखेरीज़ बाकी सारे सिद्धसंघांतील पुरुष या वेळीं उपस्थित होतात. त्यांच्या शिष्यांनांच़ नव्हे तर सामान्य माणसांना सुद्धां या समारंभास हज़र राहण्यास आडकाठी नसते. या संनेलनाच़ें ठिकाण ठरलेलें आहे. तें हिमालयाच्या उत्तर बाज़ूस एका निर्जन प्रदेशांत असून नेपाळच्या सरहद्दीपासून फार दूर नाहीं. ल्हासा शहरापासून तें ठिकाण पश्चिमेस सुमारें चारशें मैलांवर येईल. या समारंभाची माहिती त्या प्रदेशांतील पुष्कळ लोकांना आहे. अर्थात् शेंकडों सामान्य दर्जाच़े यात्रेकरू या प्रसंगास हज़र असतात. वैशाखी पौर्णिमेच्या अगोदर कांहीं दिवस ते एकसारखे त्या ठिकाणीं येत असतात आणि तंबू देऊन राहतात. तेथें एक मैल दीड मैल लांबरुंद मैदान आहे. मैदानाच्या सभोंवार टेंकड्या आहेत. एका बाज़ूनें त्या मैदानांतून एक ओढा वाहतो. या मैदानांत एक एकसंधी सुमारें बारा फूट लांब व सहा फूट रुंद अशी एक शिला आहे. ज़मिनीच्या वर सुमारें तीन फूट ती दिसते. या समारंभास या शिलेच़ा उपयोग वेदीप्रमाणें होतो. ती त्यावेळीं फुलांनीं शृंगारलेली असते. तिच्या मध्यभागीं पाण्यानें भरलेला एक सुवर्णकुंभ ठेवलेला असतो. पौर्णिमा लागण्याच्या अगोदर सर्व यात्रेकरू त्या शिलेकडे तोंड करून शिलेपासून दूर अंतरावर शांत चित्तानें बसतात. पौर्णिमा-क्षणाच्या आधीं सुमारें एक तास जीवन्मुक्त पुरुष येण्याची सुरुवात होते. ते अर्थात् सूक्ष्मदेहानें येतात व तात्पुरतें स्वतःला दृश्य स्थितींत आणतात. शिलेसमोर ते त्यांच़े शिष्य विशिष्ट रांगांनीं कांहीं सूक्तें म्हणत असतात आणि त्यांच्या रचनेमध्यें ठराविक अनुक्रमानुसार विशिष्ट फेरफार केले ज़ातात. मध्यभागीं थोडा वेळ सनत्कुमारांच़ा राजदंड घेऊन भगवान् मैत्रेय उभे असतात. पौर्णिमा लागण्याच्या क्षणीं भगवान् मैत्रेय तो राजदंड वर करून गौतमबुद्धांच़ें आवाहन करतात. लगेच़ आकाशांत एका बाज़ूस गौतमबुद्धांची मोठी विशाल प्रतिमा प्रकट होते, आणि तिच्या सभोंवार नाना वर्णांचीं प्रचंड तेजोवलयें च़मकत असतात. मग महामंगल सूत्राच़ें गायन करण्यांत येतें. शेवटीं भगवान् बुद्ध आनंदानें हात उच़लून सर्वांना आशीर्वाद देतात व सर्वत्र पुष्पवृष्टि होते.

[हा समारंभ दरवर्षीं वैशाख पौर्णिमेला शतकानुशतकें होत आलेला आहे. बुद्ध धर्माला हा समारंभ परिचित आहे. अनेक शतकांपूर्वीं ह्यू एन् संग् नांवाच़ा ज़ो चिनी प्रवाशी हिंदुस्थानांत आला होता त्यानेंहि या समारंभाच़ा उल्लेख आपल्या ग्रंथांत केला असून ही समारंभाची ज़ागा त्यानें पाहिली असावी असें त्याच्या लिहिण्यावरून दिसतें. या प्रसंगास दरसाल शेंकडों लोक हज़र असतात. जगांतले लोक ज़री असल्या गोष्टींविषयीं श्रद्धाहीन झ़ाले असले, असे प्रकार होणें अशक्य आहे असें  ज़ोरज़ोरानें म्हणत असले, तरी हा समारंभ शेंकडों लोकांसमोर दर वर्षीं बिनबोभाट च़ालूं असतो. सुसंस्कृत माणसानें वैशाख पौर्णिमा लागण्याच्या क्षणाच्या सुमारें एक तास अगोदर मुद्दाम झ़ोंपीं ज़ाण्याच़ा प्रयत्न केला व त्या वेळीं त्या ठिकाणीं ज़ाण्याच़ा मनांत निश्चय ठेवला तर वासना-देहानें या समारंभाला त्याला हज़र राहण्याच़ें बहुशः भाग्य लाभेल. पुरावा या दृष्टीनें मात्र असल्या प्रयत्नाच़ा फारसा उपयोग होणार नाहीं. कारण विशेष अनुकूलतेशिवाय माणूस वासनादेहानें पाहिलेल्या गोष्टींची ज़ाणीव मेंदूंत आणूं शकत नाहीं. या ठिकाणीं हज़र राहून बुद्धांच्या आशीर्वादाच़ा फायदा मात्र त्याला मिळूं शकेल.  वरील समारंभाच़ें सविस्तर वर्णन व त्याच़ें रंगीत चित्र लेडबीटरकृत The Masters & the Path या पुस्तकांत जिज्ञासूंस सांपडेल.]

आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. जगांतील सर्व लहान मोठ्या गुरूंच़े गुरु जे बोधिसत्त्व भगवान् मैत्रेय त्यांच्या आश्रमांत कित्येक जीवन्मुक्त पुरुष व त्यांच़े शिष्य या दिवशीं एकत्र ज़मतात व गौतमबुद्धांच्या धर्मचक्रप्रवर्तन सूत्रावर भगवान् मैत्रेय एक उत्कृष्ट प्रवचन सर्व श्रोत्यांस ऐकवितात. ते स्वतः पाली भाषेंत बोलतात आणि आश्चर्य हें कीं प्रत्येक श्रोत्याला तें आपण आपल्या मातृभाषेंत ऐकत आहोंत अशी प्रतीति वाटते.

सिद्धसंघाच्या कामाचीं अनेक क्षेत्रें आहेत, व त्यांवर निरनिराळे अधिकारी नेमलेले आहेत. या क्षेत्रांचीं कामें कोणतीं असतात तें सामान्य माणसाला च़ांगल्या प्रकारें आकलन होणें शक्य नाहीं. पण त्यांपैंकीं कांहीं भाग त्याला अल्पशा प्रमाणांत समज़ेल असें वाटतें. तेव्हां त्याहि कार्याच़ें येथें थोडेंसें वर्णन करणें अवश्य होय. सिद्धसंघांत धर्म व शिक्षण यांच़ें एक क्षेत्र असतें. या खात्याच़े जे सर्वांत मोठे अधिकारी, त्यांना बोधिसत्त्व, व्यास
अथवा जगद्गुरु म्हणतात. मानवी वंशाच़ा विस्तार व राष्ट्रीय घडामोडी वगैरेंच़ें आणखी एक क्षेत्र असतें. भगवान् मनु या क्षेत्रावर अधिष्ठित असतात. आणि एकेका मनूच्या हाताखालीं एकेक मूलवंश आणि त्या वंशांतलीं राष्ट्रें दिलेलीं असतात. मनु व बोधिसत्त्व यांची जी पायरी आहे त्याच़ पायरीच़े आणखी एक अधिकारी सिद्धसंघांत असतात. त्यांना महाचोहण म्हणतात. त्यांच्याहि हातांखालीं अनेक उद्योग असतात. स्त्रियांच़े विशेष प्रश्न, बाळंतपण व शिशुसंगोपन यांसारख्या गोष्टींकडे लक्ष देणारीहि एक विभूति सिद्धसंघांत असते. तिला जगदंबा अगर जगन्माता असें म्हणतां येईल. आपण या क्षेत्रांतील कांहीं उद्योगांच़ा थोडासा विचार करूं.

जगांत निरनिराळ्या वंशांचीं माणसें आहेत हें आपण पाहतों. नीग्रो, चिनी व हिंदु अशीं तीन माणसें घेतलीं तर नीग्रोच़े केंस कुरळे व ओंठ ज़ाड दिसतात. चिनी माणसाच़ा चेहरा च़ौकोनी असून त्याच्या चेहऱ्यावर दाढी, मिशा वगैरे फार कमी प्रमाणांत असतात.  हिंदु माणूस पाहिला तर त्याच़ा चेहरा लांबट असतो व त्याच़े केंस नीग्रोसारखे नसून लांब व सडपातळ असतात. डोळे जास्त सरळ, हनुवटी रुंद अशी असते. असले बाह्य फरक निरनिराळ्या वंशांत असतात. तद्वत्त् त्यांच्या मज्जातंतूंच्या संवेदनक्षमतेंत फरक असतात. तसेंच़ मनाच़े गुणहि सर्व माणसांत सारख्या प्रमाणांत फुललेले नसतात. एका वंशाच़ा मध्यम प्रतीच़ा माणूस घेऊन त्याची दुसऱ्या वंशांतल्या अत्यंत कनिष्ठ अथवा अत्यंत उच्च माणसाशीं तुलना केली तर ती यथोचित होणार नाहीं, पण दोन्हीं वंशांचीं मध्यम दर्जाचीं माणसें घेतलीं तर त्यांच्या निरनिराळ्या गुणांच्या विकासांत व देहाच्या संवेदन-क्षमतेंत वेगळालेपणा दिसून येतो. चिनी-जपानी माणसांस लढाईंत मोठी ज़खम झ़ाली तरी तीं माणसें त्या ज़खमेस प्रायः दाद देत नाहींत, व गुंगीच्या औषधाशिवाय अनेक शस्त्रक्रिया तीं माणसें सोसूं शकतात. पण हिंदु किंवा इंग्रज़ माणूस घेतला तर शस्त्रक्रियेच़ा अथवा ज़खमेच़ा त्याच्या मज्जातंतूंवर इतका मोठा धक्का बसतो कीं तो त्याला सहन होणें ज़ड ज़ातें. जपानी-ब्रह्मी माणसाच़ें घ्राणेंद्रिय हिंदु अगर इंग्रज़ माणसाइतकें संस्कारक्षम नसतें. हा फरक वंशभिन्नत्वाच़ा आहे. जगांत मानवांच़े अनेक मूलवंश असतात
; व प्रत्येक मूलवंशाला अनेक शाखा असतात. दोन निरनिराळ्या मूलवंशांत देहाच़े व मनाच़े मोठाले फरक असतात. एकाच़ मूलवंशांतल्या दोन शाखा (उपवंश) घेतल्या तर त्यांमध्यें तितके मोठाले फरक असत नाहींत, पण कमी प्रमाणांत त्यांच्यामध्येंहि फरक आढळतात. प्रत्येक मूलवंशांत अथवा प्रत्येक उपवंशांत एका विशिष्ट गुणाच़ा जास्त विकास होत असतो. पृथ्वीवर सध्यां तीन मूलवंश आहेत [त्यांना Lemurian, Atlantean  व Aryan अशीं थिओसॉफ़िकल् नांवें आहेत] व प्रत्येक मूलवंशाच्या अनेक शाखा (उपवंश) आहेत. भविष्यकाळीं नवीन मूलवंश व उपवंश उत्पन्न व्हावयाच़े आहेत. इतिहासाच़ा वर्ग, गणिताच़ा वर्ग, भूगोलाच़ा वर्ग, ड्राइंगच़ा वर्ग अशा प्रकारच़े ज़से कांहीं शाळांमध्यें वर्ग असतात आणि  त्या त्या वर्गांत ज़ाऊन मुलें प्रामुख्यानें त्या त्या विषयांमध्यें प्रगति करतात, तद्वत् मूलवंश व उपवंश हे मानवी शाळेंतील ज़णूं वर्ग आहेत, व प्रत्येकांत माणसाच़ा विकास विशिष्ट रीतीनें होत असतो आणि त्या सर्वांत माणूस अनेकवार जन्म घेऊन स्वतःची अष्टपैलू व अनेकविध वाढ करून घेऊं शकतो. हे मूलवंश व उपवंश निरनिराळ्या देशांत पसरतात, तेथें राज्यें स्थापून निरनिराळ्या ज़ातींची संस्कृति निर्माण करतात आणि आपल्या कक्षेंत जन्मलेल्या माणसांच्या विकासाला विशिष्ट प्रकारच़ें वळण देत असतात. माणसांच़े असले मूलवंश निर्माण करण्याच़ें काम सिद्धसंघांतील ज्या अधिकाऱ्याकडे सोंपविलेलें असतें त्याला 'मनु' असें नांव असतें. प्रत्येक मूलवंशाला उपवंशरूपी सात शाखा क्रमशः फुटत असतात आणि ते ते मनु आपल्या मूलवंशावर व त्याच्या साती शाखांवर देखरेख ठेवतात. प्रत्येक शाखेला योग्य त्या प्रदेशांत पाठवून तेथें तिची संख्या वाढवितात व त्या शाखेची एक विशिष्ट वळणाची संस्कृति स्थापून तिच़ें राष्ट्र बनवितात, व योग्य वेळीं त्या राष्ट्रांत प्रतिभावान् माणसें जन्मास घालून त्या राष्ट्राला मोठ्या ऐश्वर्यास च़ढवितात. राष्ट्रांच़े व संस्कृतींच़े उदयास्त, त्यांच़े उत्कर्ष व अपकर्ष मनूंच्या योजनेनुसार होत असतात.

आपण हिंदु लोक म्हणजे आर्य नांवाच़ा ज़ो एक मूलवंश आहे त्याची पहिली मूलशाखा (Root Stock) आहोंत. आर्य वंशाचे जे मनु आहेत त्यांना 'वैवस्वत' मनु म्हणतात. त्यांच्याबद्दलची कांहीं माहिती या पुस्तकांत पूर्वीं आलीच़ आहे [मागें प्रकरण २ पहा.]  या मनूंनीं आर्यवंशाच्या स्थापनेच़ा व विस्ताराच़ा ज़ो अवाढव्य उद्योग केला आहे त्यांतल्या थोड्याशा गोष्टी येथें देऊं; म्हणजे त्यावरून सिद्धसंघाच्या एका क्षेत्रांतील कार्याची कांहीं कल्पना आमच्या वाचकांस करतां येईल. नवीन मानववंश उत्पन्न करावयाच़ा म्हणजे पूर्वींच्या वंशांतील माणसें काळजीनें निवडून घेऊन त्यांच्यापासूनच़ उत्पन्न करावयाच़ा असतो. आपल्या भावी मूलवंशांत ज्या गुणांची वाढ करावयाची असेल तो गुण अल्पांशानें तरी ज्या माणसांत अगोदरच़ आहे अशीं माणसें प्रत्येक मनु प्रथम निवडतात व इतर लोकांपासून त्यांना प्रायः अलग करतात. योग्य वेळीं ते असल्या माणसांच्या पोटीं स्वतः जन्म घेऊन येतात आणि आपल्या सामर्थ्यानें संततीच्या स्थूलसूक्ष्म देहांस विशेष वळण लावतात. हें वळण अगदीं सावकाशीनें पिढ्यानुपिढ्या दृढ होत असतें. त्या वळणाची छाप आपल्या भावी वंशावर नीट व कायम बसावी म्हणून मनूंनां त्यांत वेळोंवेळीं अनेक जन्महि घेणें अवश्य होतें. कधीं कधीं एखाद्या विवक्षित देशाच्या माणसांना आपल्या वंशांत विवाह करण्याची संधि देऊन त्यांत कांहीं नवीन गुणांचें मिश्रणहि करावें लागतें. अशा रीतीनें जीं माणसें निर्माण होतील त्यांतलीं अधिक होतकरू माणसें पुन्हां एकत्र आणून त्यांच्या संततींत ते गुण जास्त वाढतील अशी योजना करावी लागते. नवीन मूलवंश निर्माण करण्याची ही सर्वसामान्य पद्धति असते.

वैवस्वत  मनूंचा  उद्योग

या पद्धतीनुसार वैवस्वत मनूंनीं हज़ारों वर्षांमागें पूर्वींच्या वंशामधून अनेक होतकरू माणसें निवडलीं.  [वैवस्वत मनूंच्या अवाढव्य उद्योगाच़ें वर्णन  Man: Whence, How & Whither या बेझ़ंट्-लेडबीटरकृत पुस्तकांत सविस्तर दिलेलें आहे. Lives of Alcyon या पुस्तकांतहि त्यांच्या उद्योगांतले कांहीं प्रसंग वर्णिलेले आहेत.] 
हल्लीं जेथें अटलांटिक् समुद्र आहे तेथें त्या वेळीं एक खंड होतें. [या खंडाची माहिती The Story of Atlantis, The Secret Doctrine, Man: Whence, How & whither वगैरे थिऑसफ़ीय पुस्तकांत दिलेली आहे.]  त्याला अटलांटिस् म्हणतात. हीं माणसें तेथें राहात होतीं. त्यांची संतति तेथें वाढल्यावर मनूंनीं त्यांना अरबस्तानांत आणलें. [हीं माणसें मनूंनीं निवडलेलीं असल्यामुळें त्यांना आम्हीं निवडलेले लोक आहों अशी भावना वाटत असे. हल्लींच्या यहुदी लोकांत आपण ईश्वराच़े निवडलेले लोक Chosen People आहों अशी जी समज़ूत आहे तिच़ें मूळ या भावनेंत आहे.]   त्या ठिकाणीं त्यांनीं त्यांची वसाहत स्थापिली व तेथें त्यांची लोकसंख्या वाढूं दिली. पुढें त्यांच़ेवर आपत्ति येऊन त्यांपैंकीं बरींच़ मृत्युमुखीं पडलीं. जीं शिल्लक राहिलीं त्यांच़े त्यांनीं श्वेतद्वीपाज़वळ चार विभाग केले आणि चार निरनिराळ्या दरींमध्यें त्यांच्या वेगळाल्या वसाहती स्थापिल्या. [हल्लीं जेथें गोबीच़ें वाळवंट आहे, त्यांत श्वेतद्वीप होतें.]  बाह्य जगांतील कांहीं माणसांस येथें आणवून त्यांना त्या वसाहतींत सामील करून घेतलें, आपल्या मानवी नमुन्यास ज़रूर तीं स्थित्यंतरें विवाहादि साधनांनीं घडवून आणलीं, आणि त्यांत पुनः पुनः स्वतः जन्म घेऊन आपल्या इष्ट नमुन्याला ठरीवपणा आणण्याच़ा प्रयत्न केला. त्या काळीं ज्या निरनिराळ्या लढाया होत त्यांच़ा त्यांनीं फायदा घेतला आणि आपल्या वसाहतींतील अनेक अनुपयोगी माणसें मरावीं; व जीं विशेष होतकरू माणसें शिल्लक राहतील त्यांच्यामध्यें विवाह घडवून इष्टदिशेनें त्यांच्या स्थूलदेहांच़ा नमुना सुधारावा असें त्यांनीं पुनः पुनः केलें व मग आर्यवंशाच़ें एक मोठें साम्राज्य त्यांनीं तेथें स्थापिलें.

चार निरनिराळ्या खोऱ्यांत ज्या वसाहती मनूंनीं करविल्या होत्या त्या प्रत्येकींत कांहीं विशिष्टपणा होता व आर्यवंशाच्या चार निरनिराळ्या शाखा त्यांपासून पुढें निर्माण करण्यांत आल्या. ह्या शाखांच्या (उपवंशांच्या) नमुन्यांस स्थैर्य आल्यानंतर तीं माणसें मनूंनीं निरनिराळ्या देशांत पाठविलीं. अशा रीतीनें श्वेतद्वीपाज़वळच्या खोऱ्यामधून बाहेर ज़ाणारी पहिली शाखा अरबस्तानांत धाडण्यांत आली.  मध्य आशियांत श्वेतद्वीपाज़वळ जे लोक स्थायिक राहिले होते त्यांना पहिला उपवंश म्हणतात. अरबस्तानांत जी शाखा गेली तिला दुसरा उपवंश म्हणतात. ही शाखा इ.स.पूर्वीं सुमारें ४०००० वर्षांपूर्वीं तिकडे गेली. या शाखेनें अरबस्तान व आफ्रिकेच़ा बराच़ मोठा भाग व्यापून आर्य संस्कृति तेथें पसरली. ख्रि.पू.सुमारें तीस हज़ार वर्षांपूर्वीं मनूंनीं आणखी एक शाखा (तिसरा उपवंश) इराणकडे पाठविली. या शाखेनें हळूंहळूं भूमध्यसमुद्रापासून पामीर्स् व पर्शियन् आखातापासून अरलच्या समुद्रार्यंतच़ा प्रदेश व्यापून तेथें एक साम्राज्य स्थापिलें. पुढें आणखी दोन शाखा यूरोपकडे पाठविण्यांत आल्या. त्यांना अनुक्रमें च़वथा व पांच़वा उपवंश असें म्हणतात. हे लोक पुढें यूरोपमध्यें केल्ट् व ट्यूटन् या नावानें प्रसिद्ध झ़ाले. यूरोपांत सध्यां हे दोन्हीं निरनिराळ्या देशांत पसरलेले आहेत. केल्ट् लोक जे आले ते प्राचीन इतिहासांतल्या ग्रीक लोकांच्याहि अगोदरच़े त्यांच़े पूर्वज होत. त्यांच्याच़ संततीला हल्लीं रोमन्स् वंश, लॅटिन रेसिस् अशीं नांवें कधीं कधीं देण्यांत येतात. ग्रीसची पूर्वींची सौंदर्यप्रधान व कलाप्रधान संस्कृति यांनीं स्थपिली आणि ग्रीस, इटली, फ़्रान्स, आयर्लंड वगैरे देशांत राज्यें केलीं. या संस्कृतींत कलाकौशल्य, भावनाविकास, सौंदर्य ह्या गुणांच़ा जास्त परिपाक करण्यांत आला. पांच़वा उपवंश म्हणजे ट्यूटन् लोकांच़ा. सध्यांच़े इंग्रज़ व जर्मन् म्हणजेच़ ट्यूटन् उपवंश होय. भौतिक शास्त्रांच़ा परिपोष या वंशांत जास्त झ़ाला. आयरिश किंवा ज़ुने ग्रीक लोक ज़से भावनाप्रधान होते व आहेत तसे हे नसून तर्कप्रधान बुद्धि या वंशांत जास्त वाढलेली आहे. अगदीं अलीकडे या वंशाच़े लोक कानडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया न्यूझ़ीलंडपर्यंत पसरले आहेत. या उपवंशांची अशा प्रकारें पाठवणी केल्यानंतर श्वेतद्वीपासंनिध असलेले जे मूळचे लोक त्यांची वैवस्वत मनूंनीं हिंदुस्थानांत रवानगी केली. ह्या लोकांस पहिला उपवंश असें म्हणतात. हे लोक प्रथमतः इ.स.पूर्वीं १८००० च्या सुमारास हिंदुस्थानांत उतरले व त्यानंतर हळूंहळूं हज़ारों वर्षांपर्यंत त्यांच्या लाटा त्या प्रदेशांतून हिंदुस्थानाकडे सारख्या येतच़ होत्या. या लोकांनीं हिंदुस्थानांत हळूंहळूं आर्य संस्कृतीच़ा पगडा बसविला. या सर्व उद्योगाच़ा विचार केला म्हणजे हज़ारों वर्षांच़ा संकल्प डोळ्यांसमोर ठेवून मनु आपलें कार्य कसें करतात, राष्ट्रीय व सांस्कृतिक घडामोडींचीं प्यादीं या भूगोलाच्या विस्तीर्ण फलकावर कशी मागें पुढें सरकवितात आणि हें कार्य किती अवाढव्य व दीर्घकालीन असतें याची कांहींशी कल्पना आमच्या वाचकांस येऊं शकेल, आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' या शब्दांवर खरा प्रकाश पडेल.

[मनूंच्या कार्यासंबंधानें ज्ञानेश्वर लिहितात 'रिगे मन्वंतर मनूपुढें। वंशावरी वंशाच़े मांडे। जैसी इक्षु-वृद्धि कांडेनकांडे। जींके जेवी।।' (अध्याय १५, श्लोक १, ओंवी १२८). म्हणजे मनूपुढें मन्वंतर पसरलेलें असतें. त्यांत एका वंशापाठीमागें दुसरा वंश अशी मांडणी असते, आणि ऊंस ज़सा पेऱ्यापेऱ्यानें वाढत ज़ातो तशी ही वंशाची वाढ सर्वत्र ऐश्वर्य मिळवीत ज़ाते. ज्ञानेश्वरी वरवर वाच़णाऱ्याच्या लक्षांत प्रायः वर दिलेला हा सारा अर्थ येत नाहीं. कांहीं टीकाकारांनीं तर या ओंवीच़ा अर्थ करतांना सूर्यवंश व सोमवंश हे वंश उत्पन्न होत असतात असें लिहिलें आहे. पण वंशावरी वंशाच़े मांडे असे ज्ञानेश्वरांच़े शब्द आहेत आणि उंसाच्या पेरांची त्यांनीं उपमा दिली आहे. तेव्हां एका पाठीमागें एक असे मानववंश पृथ्वीवर प्रसृत होतात असें सांगण्याच़ा त्यांच़ा मानस उघड दिसतो.]

धर्म  व  शिक्षण

हें मनूंच़ें कार्य स्थूल सृष्टींतच़ बहुतांशीं च़ालूं असतें. भूकंप, ज्वालामुखी, यांच्या साहाय्यानें खंडेंच्या खंडें उच्छदणें व समुद्रांत गडप करणें, नवीन खंडें समुद्राच्या वर आणणें, माणसांच़े गट तयार करून त्यांस निरनिराळ्या देशांत पाठविणें, निरनिराळीं राष्ट्रें व संस्कृति निर्माण करणें, त्यासाठीं विवाहादिकांच़े नियम करणें वगैरे बाह्य गोष्टी त्यांच्या कार्यांत विशेष असतात. पण मनाची व बुद्धीची वाढ, आध्यात्मिक उत्क्रांति ह्याहि गोष्टी संस्कृतीला आवश्यक असतात; आणि ती बाज़ू प्रमुखतः बोधिसत्त्व अथवा जगद्गुरु यांच्या कार्यकक्षेंत येत असते. ज़से भगवान् मनु लोकांत जन्म घेऊन राजसत्तेच्या आधारानें माणसांचीं शरीरें व राष्ट्रें तयार करतात, तद्वत् जगद्गुरुहि निरनिराळ्या उपवंशांत स्वतः जन्म घेऊन किंवा आपल्या शिष्यांना जन्मास घालून मानवांचीं व राष्ट्रांचीं मनें विकसित करीत असतात. ज्ञानाच़ें क्षेत्र त्यांच्या हातांत असतें. कोणत्या संस्कृतीला कोणत्या वळणाच़ें धर्मज्ञान व शिक्षण अनुकूल आहे याच़ा विचार करून तसला धर्म तेथें स्थापणें हें त्यांच़ें काम असतें. जगांत जे धर्म विद्यमान आहेत त्या सर्वांवर देखरेख ठेवणें, त्यांमध्यें नवीन जीवन ओतून त्यांतल्या सद्वृत्तींस उत्तेजन देणें हेंहि त्यांच़ें काम असतें. कधीं कधी नवीन धर्म स्थापण्यासाठीं ते स्वतः जन्म घेऊन येतात, तर कधीं कधीं आपल्या हाताखालच्या एखाद्या अधिकारी पुरुषास पाठवितात. हल्लींच़े जे बोधिसत्त्व आहेत त्यांना भगवान् मैत्रेय म्हणतात हें पूर्वीं सांगण्यांत आलेलें आहेच़. पूर्वींच़े बोधिसत्त्व भगवान् व्यास होते. त्यांनीं व्यास म्हणून मध्य आशियांत असतांना ज़ो जन्म घेतला त्यांत आर्यधर्म स्थापला. पुढें अरबी संस्कृतींत दुसऱ्या उपवंशांत 'हर्मीज़्' म्हणून ते जन्मास आले आणि त्यांनीं ईजिप्त देशांत दुसरा एक धर्म स्थापला. नंतर त्यांनीं इराणांत झ़रथुष्ट्राच़ा जन्म घेऊन इराणी धर्म स्थापिला. पुढें ऑर्फियसच़ा जन्म घेऊन प्राचीन ग्रीकांच्या धर्माची प्राणप्रतिष्ठा केली. मौलिक सत्य एकच़ आहे; अर्थात् त्या सत्याच़ा प्रसार करण्यासाठीं जगांत जे धर्म प्रकट होतात ते मुळांत एकच़ असावयाच़े. पण निरनिराळ्या संस्कृतींत माणसांच्या मनाची वाढ वेगळ्या दिशेनें होते आणि त्या मूळच्या सत्याची विशिष्ट प्रकारानें मांडणी केली तर त्या माणसांस विवक्षित गुणांच़ा विकास करण्यास तिच़ा जास्त उपयोग होत असतो. या दृष्टीनें बोधिसत्त्व निरनिराळ्या धर्मांची मांडणी त्या त्या लोकांस अनुरूप होईल अशी मुद्दाम करीत असतात. सर्व धर्म शिकवितात कीं, माणसाच्या हृदयांत आणि सृष्टीच्या मुळाशीं एक प्रचंड व ज्ञानस्वरूपी शक्ति आहे, मग लोक तिला ईश्वर म्हणोत, देव म्हणोत, ब्रह्म म्हणोत, आत्मतत्त्व म्हणोत, किंवा दुसरें कांहींहि नांव देवोत.  या ईश्वराच़ें बाह्य सृष्टींतील स्थूल प्रतीक सूर्य होय असें व्यासांनीं आर्य लोकांना शिकविलें. ती शिकवण गायत्री मंत्रांत अंतर्भूत आहे. त्यांनींच़ हर्मीसच़ा जन्म घेऊन मिसर देशांत 'हृदयस्थ प्रकाश' हें ईश्वरास ओळखण्याच़ें स्थान होय असें लोकांना सांगितलें. झ़रतुष्ट्र म्हणून इराणांत येऊन ईश्वर अग्नींत असतो ही शिकवण प्रसृत केली; आणि ग्रीक संस्कृतींत ऑर्फियस म्हणून अवतरून हृदय-मन-सृष्टि यांमधील सौंदर्य हें ईश्वरस्थान होय या शिकवणीवर त्यांनीं ज़ोर दिला. पुढें अखेर त्यांनीं भगवान् गौतमबुद्ध म्हणून हिंदुस्थानांत जन्म घेतला आणि धर्माची आणखी एक निराळी मांडणी जनतेसमोर ठेविली. मधून मधून जन्म घेणें व प्रत्येक संस्कृतीला विशिष्ट वळण देण्यासाठीं त्यांत एक विशिष्ट वळणाच़ा धर्म स्थापणें हा त्यांच्या उद्योगांपैंकीं एक उद्योग असतो. खेरीज़ जगांत दुसरे अनेक शिक्षणात्मक उद्योग ते करीत असतील असें वाटतें. धर्माच़ा इतिहास पाहिला तर विशिष्ट वृत्तींच़ा जिवंत झ़रा एखाद्या काळांत एकदम आल्यासारखा दिसतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्रांत भक्तिप्रेमाच़ा झ़रा एकदम मुकंदराजाच्या काळापासून निघून तो थेट तुकाराम महाराज़ांच्या वेळेपर्यंत वहात आलेला दिसतो आणि त्याच़ा परिणामहि त्या काळच्या लोकांवर विशेष झ़ालेला होता. आर्यधर्मांत शैव मतानें ख्रिस्तपूर्व अनेक शतकांपूर्वीं सामान्य जनांच्या मनांत कठोर वृत्ति उत्पन्न केलेली होती हें इतिहासज्ञांस विदित आहेच़. त्या वेळीं श्रीकृष्णांनीं गोकुळांत येऊन स्वतःस भक्तीच़ें केंद्र बनविलें आणि भक्तीच़ा नवा प्रवाह निरनिराळ्या दिशांनीं कित्येक शतकेंपर्यंत आर्य लोकांवर सोडला आणि लोकांचीं मनें मऊ केलीं. असल्या गोष्टी पाहिल्या म्हणजे बोधिसत्त्व ज्या क्षेत्राच्या मूर्धस्थानीं असतात त्या क्षेत्राच्या उद्योगाची किंचितशी तरी कल्पना आपणांला करतां येईल. गौतमबुद्धांच्या नंतर फारच़ थोड्या वर्षांनीं आद्य शंकराचार्य अवतरले.  [या पुस्तकाच्या शेंवटीं 'गौतमबुद्ध व शंकराचार्य' नांवाच़ें परिशिष्ट आहे तें पहा.]  तसेंच, हिंदुस्थानांत श्रीकृष्ण व महावीरहि त्याच़ सुमारास कार्य करीत होते. इराणांत मिथ्र, चीन देशांत लउत्स व खुंफुत्से आणि ग्रीस देशांत पायथॅगोरस् हेहि त्याच़ सुमारास अवतरले होते. या सर्व गोष्टींच़ा विचार केला म्हणजे लोकांच्या उद्धारार्थ एक जागतिक प्रयत्न सिद्धसंघानें त्या काळीं सुरूं केला होता असें उघड दिसतें. हल्लींच़े बोधिसत्त्व भगवान् मैत्रेय आहेत. गौतमबुद्धांनीं निर्याणानंतर आपली बोधिसत्त्वाची गादी सोडली आणि मग भगवान् मैत्रेय त्या गादीवर आले. पुढें वृंदावनांत श्रीकृष्ण व पॅलेस्टाईनमध्यें ख्राइस्ट् म्हणून त्यांनीं दोनदां जन्म घेतला व एका धर्माची सुधारणा व दुसऱ्याची प्राणप्रतिष्ठा केली.

अपत्यजन्म

स्त्रिया, अपत्यजन्म व अपत्यसंगोपन यांच्याकडे विशेष लक्ष पुरविण्याच़ें एक क्षेत्र सिद्धसंघांत असून त्या खात्याच़ें आधिपत्य ज्या विभूतीकडे आहे तिला 'जगदंबा' असें हिंदुधर्मानें नांव दिलेलें आहे. ही विभूति देवकोटींतील आहे, अर्थातच़ ती स्थूलदेहधारी नाहीं.  पण ज़रूर तेव्हां ती योगसामर्थ्यानें स्थूलदेह घेऊन प्रकट होऊं शकते.

अलीकडे सर्व जगभर स्वातंत्र्याची च़ळवळ सुरूं आहे आणि प्रत्येक माणसाला, ज़ातीला, राष्ट्राला स्वातंत्र्याची तळमळ लागलेली आहे. स्त्रीज़ातीलाहि स्वातंत्र्य हवें असून स्त्रियांच्या च़ळवळी सर्व जगभर कमी अधिक प्रमाणांत च़ालूं आहेत आणि स्त्रीवर्गावर असलेलीं ज़ुन्या काळचीं बंधनें सुटत असून नाना प्रकारच्या नवीन क्षेत्रांत स्त्रिया पदार्पण करूं लागल्या आहेत. याच़े पुष्कळ च़ांगले परिणाम होत आहेत आणि कित्येक वाईट परिणामहि होत आहेत. त्याबाबत जगाला विवेक शिकविण्याचें काम या क्षेत्राकडून होण्यासारखें आहे. ज़ुन्या काळापासून सामाजिक सत्ता पुरुषांच्या हातीं असल्यामुळें स्त्रियांसंबंधानें समाजानें बऱ्याच़ बाबतींत अन्याय केले आहेत. जगांत स्त्रीस्वातंत्र्याची जी लाट हल्लीं पसरत आहे तिच़ें ध्येय या अन्यायांच़ें परिमार्जन करावें असें आहे आणि तें सर्वस्वी स्तुत्य आहे; पण जगांत ज्या लाटा मोठ्या ज़ोरानें उसळतात त्यांच़ें कार्य प्रायः विवेकशील नसतें. स्त्रियांच्या च़ळवळींत विवेकशीलता आणून समाजास त्याच़ा फायदा करून देणें हें या क्षेत्राच़ें कार्य आहे.

स्त्रियांच्या चळवळींत जीं माणसें पुढाकार घेत आहेत त्यांना स्त्रीच़ें स्थान जीवनांत कोणतें हें नीटपणें न समज़ल्यामुळें स्त्रियांच्या च़ळवळींत अनेक अनिष्ट गोष्टी शिरण्याच़ा संभव उत्पन्न झ़ाला आहे. पुरुष हा ज़सा जीव आहे तसा स्त्री हाहि एक जीवच़ आहे. समाजानें दोघांसहि न्यायानें वागविलें पाहिजे व त्याबाबत समाजरचनेंत ज़रूर ते फेरबदल लोकांनीं केले पाहिजेत हें उघड आहे. पण हे फरक करतांना, तसेंच़ ज़ुन्या च़ाली मोडतांना व नवे मार्ग आंखतांना जग ही उत्क्रांतीची शाळा आहे हा मूलभूत विचार विसरतां येणार नाहीं. स्त्रीजन्म व पुरुषजन्म यांतील बऱ्याच़ गोष्टी सारख्या असल्या तरी कित्येक महत्त्वाच्या बाबतींत या दोन जन्मांतींल विकासांत फरक असतो आणि म्हणूनच़ अनेकदां पुरुषजन्म घेऊन व अनेकदां स्त्रीजन्म घेऊन जीवाची अष्टपैलू प्रगति होत असते. स्त्रीवर्ग व पुरुषवर्ग या दोघांच्या संबंधानें ज़री आपण न्यायीपणाची वृत्ति ठेवली तरी प्रत्येकाच़ें वैशिष्ट्य काय आहे, प्रत्येकाच़ें उत्क्रांतींतील कार्य कोणतें आहे, प्रत्येकांत कोणते विशेष गुणदोष असतात, व्यक्तीच्या आणि समाजाच्या संसारांत प्रत्येकाकडून कोणकोणत्या कार्याची अपेक्षा आपण केली पाहिजे, या गोष्टींच़ा नीट विचार न झ़ाल्यास स्त्रियांच्या च़ळवळीपासून च़ांगल्या परिणामांबरोबर वाईट परिणामहि झ़ाल्याखेरीज़ रहाणार नाहींत. असे दुष्परिणाम सध्यांच़ दिसूं लागले आहेत. स्त्रियांना स्वातंत्र्य पाहिजे अशी या च़ळवळीची मागणी आहे, पण ती मागणी करतांना पुरुषांनीं ज्या वाईट गोष्टी करण्याची मुभा आज़ समाजाकडून हिसकावून घेतली आहे ती मुभा स्त्रियांनाहि पाहिजे असें कांहींज़णांस वाटूं लागलें आहे. स्वातंत्र्य म्हणजे जीवाच़ें स्वातंत्र्य, घोड्यावर बसलेल्या स्वाराच़ें स्वातंत्र्य, च़ांगल्या गोष्टींच़ें स्वातंत्र्य, उत्क्रांति करण्याच़ें स्वातंत्र्य, असा अर्थ होय; स्वातंत्र्य म्हणजे वासनांच़ें स्वातंत्र्य नव्हे, स्वारास भलतीकडे नेणारें स्वातंत्र्य नव्हे, वाईट गोष्टी करण्याच़ें स्वातंत्र्य नव्हे, स्वतःची अगर दुसऱ्याची अपक्रांति करण्याच़ें स्वातंत्र्य नव्हे. हा विवेक या च़ळवळींत अद्यापि पुरेशा प्रमाणांत न आल्यामुळें पुरुषांस ज्या अनिष्ट गोष्टी करण्याच़ें स्वातंत्र्य आज़ मिळत आहे तें स्त्रियांसहि द्यावें अशी मागणी कांहीं लोक करीत आहेत. स्वातंत्र्य मागणाऱ्या लोकांमध्यें स्त्रीजन्म व पुरुषजन्म यांचीं वैशिष्ट्यें ओळखणारी मंडळी नाहींत. प्रत्येक जीव स्त्रीजन्मांत कोमल वृत्तींच़ा विकास जास्त प्रमाणांत करतो आणि पुरुषजन्मांत प्रखर गुणांच़ा विकास जास्त प्रमाणांत करतो आणि सर्वांगपरिपूर्णतेला या दोन्हींची आवश्यकता असल्यामुळें माणसाला पुरुषाच़े व स्त्रीच़े जन्म पुनः पुनः बदलून येतात. स्त्रीची कोमल वृत्ति व पुरुषाची कणखर वृत्ति या दोन्हीं वृत्ति जगांत आवश्यक आहेत. व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या संसारांत दोन्हींच़ा उपयोग असून त्या वस्तुतः अन्योन्यपूरक आहेत. हा भाग ध्यानांत न आल्यामुळें स्त्रियांच्या च़ळवळींत कांहीं स्त्रियांच़ें पुरुषीकरण होऊं लागलेलें आहे. जे उद्योग पुरुष करतात तेच़ करण्याची मोठी हौस स्त्रियांमध्यें उत्पन्न होऊं पहात आहे. नोकऱ्यांच्या बाबतींत स्त्रिया व पुरुष यांची स्पर्धा सुरूं होत आहे. स्त्रीला एक विशेष दृष्टि असते. ती दृष्टि व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या संसारांत दृढ करणें हें स्त्रीच़ें विशेष कर्तव्य आहे. हा भाग नज़रेआड होत असून स्त्रीच्या विशेष गुणांना जग मुकेल, स्त्रीपुरुषांच़ें परस्परावलंबित्व विसरलें ज़ाऊन कुटुंबव्यवस्थेला धक्का बसेल, असा कांहीं संभव दिसत आहे. स्वतःची उत्क्रांति करणें हें मानवी जन्माच़ें ध्येय आहे. मूलतत्त्वांकडे फारसें कोणाच़ें आज़ लक्ष नाहीं. अन्योन्यसेवा ही गुलामगिरी होय, असें लोकांना वाटूं लागलें आहे. संस्कृतींत पैशाला वाज़वीपेक्षां जास्त महत्त्व येत असून प्रत्येक माणूस आर्थिक स्वायत्ततेसाठीं धडपडत आहे. वासनांच़े लाड पुरविणें हेंच़ ध्येय अधिक लोकप्रिय होत च़ाललें आहे. नीतिनियम ज़र त्या लाडांच्या आड येत असतील तर ते सारे मोडावे, पतिपत्नीसंबंधांत जी ज़बाबदारी असते ती घेऊं नये, मुलांची जी ज़बाबदारी असते तीहि घेऊं नये, आणि वासनांच्या हौशी मात्र पुरवाव्या अशा प्रकारच़ें वातावरण निर्माण होत आहे.

या वातावरणांत स्त्रियांच्या च़ळवळीच़ें सुकाणूं शहाण्या माणसांच्या हातांत ठेवणें अवश्य आहे. आपल्या पूर्वजांसमोर नसलेले अनेक प्रश्न स्त्रियांच्या च़ळवळींतून आज़ बाहेर पडत आहेत व त्या प्रश्नांना न्यायाचीं पण विवेकाचीं नवीन उत्तरें देऊन समाजाची नवीन घडी घालणें अवश्य झालें आहे. जी नवीन उपायऱ्योजना आज़ सुच़विण्यांत येत आहे त्यांतील कांहीं भाग योग्य आहे व कांहीं अनिष्ट आहे. नीतिनियमांत बदल करणें अपरिहार्य झ़ालें आहे. संततिनियमनांत कांहीं भाग शहाणपणाच़ा आहे व कांहीं नाहीं. त्याच़ा विवेक ठरविणें ज़रूर आहे. सांपत्तिक अडच़ण म्हणून हल्लीं बुद्धिमान् लोक विवाहच़ करीनासे होत आहेत. त्यावर कांहींतरी तोड काढणें ज़रूरीच़ें आहे. विषयवासनेची जनमनावरील पकड कमी न होतां वाढत आहे. त्यालाहि उपाय केला पाहिजे. या क्षेत्रांतील अत्यंत भानगडीच़े नाना प्रश्न जनतेसमोर सध्यां येत आहेत व ते सोडविण्याच़ें कार्य नुसत्या सुधारणावादी लोकांना अथवा नुसत्या ज़ुन्याच़ा अभिमान बाळगणारांना पेलण्याज़ोगें नाहीं.

सिद्धसंघांतील जगदंबेच्या हाताखालीं जें खातें आहे त्या खात्याकडून मानव ज़ातीला या घोंटाळ्यांतून मार्ग दाखविण्याच़ें कार्य होईल अशी आमची अटकळ आहे. [या क्षेत्रासंबंधीं पूर्वीं फारच़ थोडी माहिती उपलब्ध होती. अलीकडे कांहीं अधिक माहिती बाहेर आली आहे, पण पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळें आमची काय अटकळ आहे तें येथें लिहिलेलें आहे.]  स्त्रीच्या आयुष्यांत अपत्यजन्म ही गोष्ट लाज़ेची नसून अभिमानाची व श्रेष्ठतेची आहे अशी या क्षेत्रांतल्या पुढाऱ्यांची शिकवण आहे. या खात्याकडून प्रत्येक स्त्रीच्या बाळंतपणांत तिच़ें दुःख हलकें करण्यासाठीं अदृश्य सृष्टींतून प्रेरणा धाडण्यांत येत असतात. बाळंतपणाच्या खोलींत देवता येत असतात ही समज़ूत हिंदुधर्मांत असून तिच्या मुळाशीं हें सत्य आहे.

ऋषिसंघाच्या कार्यापैंकीं बराच़सा भाग प्राकृत जनांच्या आटोक्यांत येण्यासारखा नाहीं हें आम्हीं वर लिहिलेंच़ आहे. त्यांतील ज़ो भाग सामान्य
लोकांना थोडाफार समज़ण्याज़ोगा आहे त्याच़ें अत्यल्प वर्णन आम्हीं येथवर वाचकांसमोर ठेविलें आहे. त्यावरून ऋषिसंघाच्या प्रचंड कार्याची वाचकांना पुरेशी कल्पना होणार नाहीं हें आम्हीं ज़ाणून आहों. पण मुळींच़ माहिती नसण्यापेक्षां थोडी माहिती कां होईनां ती वाचकांसमोर ठेवल्यास तिच़ा कांहींतरी उपयोग होईल अशा बुद्धीनें ती आम्हीं येथें दिली आहे. जेव्हां एखादे जीवन्मुक्त पुरुष एखाद्या होतकरू माणसाला शिष्य म्हणून ज़वळ ओढतात तेव्हां या विविध कार्यांतील कांहींतरी उद्योग त्यानें उच़लावा अशी त्यांची अपेक्षा असते. या कार्यांतील खालच्या पायऱ्यांवरील कामें जीवन्मुक्तांच़े शिष्य करीत असतात. लोकसुधारणेच़ें अगर लोकांच्या उपयोगी पडण्याच़ें दृश्य भूमिकेवरच़ें कोणतें तरी लौकिक कार्य प्रत्येक शिष्य यथाशक्ति करीतच़ असतो. तो शिष्य खाणेंपिणें वगैरे गोष्टींत व इतर वर्तनांत शुद्धपणा ठेवीत असल्यामुळें त्याच़ा देह इतर माणसांपेक्षा निर्मल असतो आणि पुष्कळ जीवन्मुक्त पुरुष असल्या शिष्यांच्या देहांच्या द्वारानें एकंदर जनतेवर प्रेरणा धाडून जगाची प्रगति करीत असतात. नुकतींच़ जीं माणसें मृत्यूच्या द्वारांतून पलीकडे गेलीं असतील त्यांस सूक्ष्मदेहानें भेंटून त्यांची विचारपूस करणें, त्यांच़ें भय घालवून त्यांना स्वास्थ्य देणें [या उद्योगाची सविस्तर माहिती लेडबीटरकृत Invisible Helpers या पुस्तकांत दिलेली आहे, ती जिज्ञासूंनीं पहावी],  भुवर्लोकांतील परिस्थिति त्यांस समज़ावून देऊन त्यांच़ें भावी जीवन सुखकर करणें, हीं कामेंहि जीवन्मुक्तांच्या शिष्यांकडे सोंपविलेलीं असतात, व हे शिष्य इतर पुष्कळ होतकरू माणसांस या कामांत भाग घेण्यास शिकवीत असतात. याखेरीज़ प्रत्येक जीवन्मुक्त आपापल्या शिष्यांना कांहीं विशिष्ट कामें नेमून देत असतात आणि तींहि ते करीत असतात. खालच्या प्रतीच़ें काम शिष्यांना नीट साधूं लागलें कीं तें त्यांच्या हातांतून काढून दुसऱ्या नवशिक्यांच्या स्वाधीन करण्यांत येतें आणि ह्या शिष्यांना वरच्या पायरीच़ें काम सांगण्यांत येतें आणि अशा रीतीनें उत्तरोत्तर जास्त जास्त ज़बाबदारीचीं कामें करण्यास ते शिष्य एकसारखे समर्थ होऊन त्यांची प्रगति होत असते. 
 

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण १३ : मुमुक्षूंच़े प्रकार व लोकसंग्रहाच़े मार्ग