प्रकरण  अकरावें


आध्यात्मिक  विकास  व  त्याची  दिशा


अध्यात्ममार्गावरील सर्व टप्प्यांच़ें वर्णन येथवर झ़ालें. पण त्या वर्णनावरून आध्यात्मिक प्रगतीच्या फक्त एकाच़ बाज़ूची कल्पना वाचकांना येऊं शकेल. आध्यात्मिक प्रगतीच़ा विषय आकलन करण्यास कठीण आहे. यासाठीं त्या विषयाकडे निराळ्या प्रकारच़ा आणखी एक दृष्टिक्षेप करून तो विषय या प्रकरणांत जास्त विशद करावा असा आमच़ा उद्देश आहे.

माणूस सृष्टीच्या क्षेत्रांत व्यवहार करीत असतो. तो ज्या क्षेत्रांत व्यवहार करतो त्याला 'लोक' असें म्
हणतात. तो ज्या साधनानें (अथवा उपाधीनें) व्यवहार करीत असेल त्या साधनाला 'देह' अथवा 'कोष' म्हणतात.

[पुष्कळ लोक 'देह' व 'कोष' हे शब्द समानार्थकच़ मानतात. पण कित्येकांच्या मतें त्यांमध्यें फरक आहे. ज्या साधनांच़ा हिंडण्याफिरण्याकडे जीवाला उपयोग होत असेल त्याला 'देह' म्हणावें, व ज्याच़ा तसा उपयोग होत नसेल त्याला 'कोष' म्हणावें, असा फरक ही मंडळी करतात. कांहीं उपाधि हिंडण्याफिरण्यास उपयोगी पडत नाहींत. उदाहरणार्थ, माणसाच़ा प्राणमय कोष स्थूलदेहाला प्राण पुरविण्यासाठीं असल्यामुळें त्याच़ा हिंडण्याफिरण्याकडे उपयोग करतां येत नाहीं. कांहीं उपाधि अशा असतात कीं, त्यांच़ा पुरेसा विकास होण्याच्या अगोदर त्यांच़ा हिंडण्याफिरण्याकडे उपयोग होऊं शकत नाहीं. पण तितका विकास झ़ाल्यावर ती उपाधि आपल्या क्षेत्रांत अनिरुद्ध संचार करूं शकते. उदाहरणार्थ असंस्कृत माणसाच़ा वासनादेह भुवर्लोकांत हिंडून नाना क्रिया करूं शकत नाहीं. सुसंस्कृत माणसांपैंकीं कित्येकांच़े वासनादेह या गोष्टी करूं शकतात. तितका विकास होण्याच्या अगोदर त्या उपाधीला 'कोष' म्हणतात व विकास झ़ाल्यावर 'देह' म्हणतात. असा फरक 'देह' व 'कोष' या शब्दांत आहे असें कांहींच़ें मत आहे. या पुस्तकांत या फरकावर ज़ोर देणें अवश्य नसल्यामुळें 'कोष' व 'देह' हे शब्द समानार्थानें योजण्यांत आले आहेत.]

प्रत्येक मनुष्य दृश्य सृष्टीमध्यें शेतकी, व्यापार, नोकरी, प्रवास, खाणेंपिणें, अध्ययन, सांसारिक गृहकृत्यें वगैरे शेंकडों उद्योग करीत असतो. हे सर्व उद्योग ज्या क्षेत्रांत च़ालतात त्याला दृश्य जग अथवा स्थूल सृष्टि असें म्हणतां येईल. आपल्या धर्मग्रंथांतून त्याला 'भूलोक' असें म्हटलेलें आहे. या भूलोकांत व्यवहार करण्यासाठीं नाक, डोळे, हातपाय वगैरे इंद्रियें असलेलें शरीर त्याच़ें साधन (उपाधि) होतें. या शरीरास धर्मग्रंथांत 'स्थूलदेह' असें नांव देतात. क्रिया करणें हा या देहाच़ा विशेष व मुख्य गुण आहे. माणूस दृश्य सृष्टीखेरीज़ अदृश्य सृष्टींतहि व्यवहार करूं शकतो. दृश्य सृष्टि व अदृश्य सृष्टि हा भेद सृष्टीमध्यें नसून सामान्य प्रतीच्या माणसास दिसतें काय व दिसत नाहीं काय या फरकावरून तो माणसानें आपल्या सोयीसाठीं केलेला असतो हें आपण विसरतां कामां नये. अदृश्य सृष्टीच़े अनेक भाग आहेत. एका भागास 'भुवर्लोक' म्हणतात. त्या क्षेत्रांतलें व्यवहाराच़ें साधन 'वासनादेह' हें होय. भावना-वासना हा या देहाच़ा विशेष गुण असतो. 'स्वर्गलोक' या नांवाच़ा अदृश्य सृष्टीच़ा आणखी ज़ो एक भाग आहे, त्या क्षेत्रांत 'मनोदेह' हें साधन घेऊन माणूस व्यवहार करीत असतो. तर्कशास्त्र च़ालवून अनुमानें काढणें हा या देहाच़ा विशेष गुण असतो. प्रत्येक जिवंत माणसाला स्थूलदेह, वासनादेह, मनोदेह असे तीन देह असतात.

[माणसाच़े जे सूक्ष्मदेह असतात त्यांना संस्कृत वाङ्मयामध्यें नांवें देण्याच्या निरनिराळ्या पद्धति आहेत. एका पद्धतीनुसार त्यांना देह म्हणून स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह अशीं नांवें दिलेलीं आहेत. कधीं कधीं महाकारणदेह असा च़ौथाहि देह सांगितलेला आढळतो. दुसऱ्या एका पद्धतीप्रमाणें या देहांना कोष म्हणतात व अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय अशीं नांवें दिलेलीं आढळतात. याखेरीज़ लिंगदेह वगैरे नांवेंहि ज़ुन्या वाङ्मयांत आढळतात. हिंदुधर्मांत सहा दर्शनें आहेत हें आमच्या वाचकांस माहीत आहेच़. प्रत्येक दर्शनाची विचारपद्धति वेगळी असते व एका दर्शनांत एक प्रकारचीं नांवें तर दुसऱ्या दर्शनांत दुसऱ्या प्रकारचीं नांवें आढळतात.  ज़ुन्या ग्रंथांतलीं नांवें तात्त्विक दृष्ट्या देण्यांत आलेलीं आहेत. त्या ग्रंथकारांच़ा हेतु माणसांचे सूक्ष्म देह पाहून त्यांच़ें तपशीलवार वर्णन करण्याच़ा नव्हता. तात्त्विकदृष्ट्या सर्व विश्वाच़े दुवे नीट ज़ुळवून एक सुसंगत विचारसरणी जनतेसमोर ठेवण्याच़ा होता. अर्थात् त्या ग्रंथकारांना आपले दुवे ज़ुळविण्याच्या कामीं जेथें जेथें खंड पडेल तेथें एखादी नवीन कल्पना किंवा एकादें नवीन तत्त्व अथवा एखादा नवीन संबंध त्या ठिकाणीं घालून आपले सर्व दुवे सुसंगतपणें ज़ुळवून घ्यावे लागले आहेत. हे दुवे ज़ुळवितांना वरील सूक्ष्मदेहांचीं नांवें प्रामुख्यानें त्या त्या ग्रंथकारांनीं नमूद करून आपल्या तत्त्वविचारांची सांखळी अखंड बनविलेली आहे. त्या साऱ्या ग्रंथकारांची विचारसरणी एकच़ नसल्याकारणानें एका ग्रंथांत एका प्रकारचीं नांवें, तर दुसऱ्या ग्रंथांत दुसऱ्या प्रकारचीं नांवें; एका ग्रंथांत सूक्ष्म देहांची संख्या एक, तर दुसऱ्या ग्रंथांत दुसरीं;
एका ग्रंथांत एका पारिभाषिक संज्ञेच़ा अर्थ एक, तर दुसऱ्या ग्रंथांत वेगळा असें झ़ालेलें आहे. सूक्ष्मलोकांच्या, सूक्ष्मदेहांच्या व सूक्ष्म अवस्थांच्या नांवांत असें वैचित्र्य संस्कृत ग्रंथांत फार आढळतें.

थिऑसफ़ीय ग्रंथांत जीं नांवें आढळतात तीं तत्त्वविचारांच़े दुवे ज़ुळविण्याकरितां दिलेलीं नसून वस्तुस्थिति पाहून दिलेलीं आहेत. तीं नांवें देतांना एकाद्या तत्त्वविचारसरणीला बाध आला तर त्याची फिकीर करण्यांत आलेली नाहीं. आधुनिक शास्त्रसंशोधक ज्याप्रमाणें कोणत्याहि एका विचारसरणीस वाहून न घेतां फक्त सृष्टीच़ें बारकाईनें निरीक्षण करतो तद्वत्
थिऑसफ़ीय संशोधकांनीं आपली सूक्ष्मदृष्टि फुलवून या सूक्ष्मदेहांच़ें तपशीलवार अवलोकन केलेलें आहे व त्यांची माहिती प्रसिद्ध केलेली आहे. अर्थात् थिऑसफ़ींत जीं नांवें दिलेलीं आहेत तीं वस्तुस्थिति समज़ण्यास अधिक सोयीवार आहेत. या पुस्तकांत तात्त्विक वादविवाद करण्याचा हेतु नसल्यामुळें ज़ुन्या ग्रंथांतलीं नांवें न घेतां थिऑसफ़ीय नांवें घेतलीं आहेत.

अशा परिस्थितींत थिऑसफ़ीय नांवांचे संस्कृत ग्रंथांत नक्की पर्यायशब्द कोणते आहेत तें बिनच़ूक सांगणें कठीण आहे. त्यांतल्या त्यांत जी संस्कृत परिभाषा आम्हांस शिष्टसंमत वाटली ती आम्हीं या पुस्तकांत संस्कृतभाषाभिमानी लोकांकरितां कांहीं ठिकाणीं दिली आहे. एकादे वेळीं त्यांत च़ुका आढळणें संभवनीय आहे. तसें झ़ालें तरी या पुस्तकांतील मुख्य मुद्द्यांस कोणत्याहि प्रकारच़ा बाध येणार नाहीं हें आमच्या वाचकांनीं विसरूं नये.]

हे तिन्हीं देह एकमेकांत मिसळून राहिलेले असतात. सोडावॉटरमध्यें ज़सें पाणी व गॅस हीं एकत्र असतात आणि आपणांला सोडावॉटरच्या बाटलीमध्यें फक्त त्यांतलें पाणी दिसतें व गॅस अदृश्य असतो तद्वत् वासनादेह व मनोदेह हे माणसाच्या स्थूलदेहाच्या आंत-बाहेर पसरून राहिलेले असले तरी सामान्य माणसाला ते दिसत नाहींत. या तीन देहांपैंकीं प्रामुख्यानें स्थूलदेह क्रिया करतो. वासना वासनादेहांत स्फुरतात आणि संकल्प-विकल्प-अनुमान वगैरे गोष्टी मनोदेहाला करतां येतात. दर जन्माच्या शेवटीं हे तिन्हीं देह क्रमानें मरतात व पुढच्या जन्मीं हे तिन्हीं नवीन येतात. या तिघांना साकल्यानें 'देहात्मा' अथवा Personality असें नांव देण्याच़ा परिपाठ आत्मविद्येच्या वाङ्मयांत आहे. हे तीन देह, अर्थात् त्यांत व्यक्त होणारा ज़ो चैतन्यांश तो 'देहात्मा' होय.

[स्थूल देहांत व्यक्त होणाऱ्या जीवात्म्याच्या अंशाला अगर जीवांशाला 'विश्व' अशी संस्कृत ग्रंथांतली संज्ञा आहे. वासनादेह व मनोदेह मिळून होणारा ज़ो सूक्ष्मदेह त्यांतील जीवांशाला तैजस् अशी संज्ञा आहे. देवी भागवतांत (७.३२.४७ व ४९) 'प्राज्ञस्तु कारणात्मा स्यात् सूक्ष्मदेही तु तैजसः। स्थूलदेही तु विश्वाख्यः त्रिविधः परिकीर्तितः।।' असें म्हटलें आहे. थिऑसफ़ीच्या वाङ्मयांत मनोदेह, वासनादेह, व स्थूलदेह हे जे दर नव्या जन्मीं नवीन येणारे तीन देह त्या तिन्हीं देहांतील जीवांशाला देहात्मा अथवा Personality ही एकच़ संज्ञा दिलेली आहे.]


जीवात्मा  व  देहात्मा

दर जन्मीं हे तीन नवे देह घेऊन व त्या देहांच्या द्वारानें क्रिया, वासना व विचार वगैरे उद्योग सर्व जन्मभर करून माणूस ज़ो अनुभव गांठीं बांधतो व ज़ो गुणविकास संपादन करतो तो सारा जीवात्म्यामध्यें सांठविला ज़ातो. देहात्मा हें त्या गुणविकासाचें ज़णूं उपकरण किंवा साधन असतें. पलंगावर पहुडणाऱ्या एकाद्या माणसानें खालीं ज़मिनीवर असलेला रुपया हात लांब करून ज़सा उच़लावा तद्वत् देहात्मारूपी हात खालीं सोडून जीवात्मा वर लिहिलेल्या क्षेत्रांतील अनुभवरूपी संपत्ति स्वतःपाशीं वर ओढून घेत असतो. माणसें विहिरींत पोहरा सोडून पाणी वर काढतात आणि तें हौदांत ओतून हौद भरतात. ह्या उपमेवरून ही क्रिया ध्यानांत येण्याज़ोगी आहे. पोहरा हा देहात्मा आहे. देहात्मा हा क्रिया, वासना व विचार हे तीन प्रकार जगत्-रूपी विहिरींत जन्मभर करीत असतो आणि अनुभवरूपी जीवनानें आपला पोहरा भरतो. जन्माच्या अंतीं जीवात्मा तो पोहरा वर ओढून घेतो आणि त्यांतील पाणी कारणदेहरूपी हौदांत सांठवून ठेवतो. अशा रीतीनें तो दर जन्मीं नवा पोहरा (देहात्मा) विहिरींत सोडून नाना गुण, नाना सामर्थ्यें, नाना शक्ति, नाना प्रकारची थोरवी व ज्ञानसंपन्नता मिळवीत असतो आणि ती सारी संपत्ति पुनः पुनः वर ओढून घेऊन त्याच़ा कारणदेह अधिकाधिक ऐश्वर्यवान् होत ज़ातो. या जीवात्म्यास थिऑसफ़ीय परिभाषेंत Individuality किंवा Ego असें म्हणतात.

हा जीवात्मा दर जन्ममरणागणिक उत्पन्न होत नाहीं अगर नाश पावत नाहीं. देहात्म्याच्या मानानें तो शाश्वत असतो. दर जन्मींच़ा देहात्मा (अर्थात् स्थूलदेह, वासनादेह, मनोदेह ही त्रयी) नवीन असतो. त्या देहात्म्याच्या पोहऱ्यांतून जें ज्ञान, जे गुण, जें सामर्थ्य, दर जन्मीं जीवात्मा वर ओढून, स्वतःमध्यें, स्वतःच्या हौदामध्यें, कारणदेहामध्यें सांठवीत असतो तो जीवात्मा अर्थात् साऱ्या जन्मांत एकच़ एक कायम असतो. दर नव्या जन्मीं तो जीवात्मा (कारणदेहांत राहणारा जीवात्मा) आपला अल्पांश देहात्म्यांत (नवा स्थूलदेह, नवा वासनादेह, नवा मनोदेह या त्रयीमध्यें) घालून त्या देहात्म्याला उत्क्रान्तीच्या क्षेत्रांत अनुभव गोळा करण्यासाठीं धाडून देतो व त्या जन्माच्या शेवटीं तो देहात्मा नष्ट होऊन उत्क्रान्तिक्षेत्रांतलें पीक कारणदेहांत सांठविलें ज़ातें. अशा रीतीनें या जीवात्म्याची एकसारखी प्रगति च़ालूं असते. जीवात्मा हा व्यापार करून पैसे मिळवूं इच्छिणारा पेढीच़ा मालक व देहात्मा हा देवघेव करण्यासाठीं त्यानें कांहीं काळ बाज़ारांत पाठविलेला एजंट किंवा कारभारी अशी ज़ोडी असते.

या जीवात्म्याला सर्व जन्मांची आठवण असते. आपल्या सर्व जन्मांच़ें ध्येय काय आहे, आपणांला कोणींकडे ज़ावयाच़ें आहे, आपला जीवनहेतु काय, हें त्यानें च़ांगल्या प्रकारानें ओळखलेलें असतें. जीवात्म्याच़ा सर्वांत कनिष्ठ देह म्हणजे कारणदेह असतो. या देहाला तात्त्विक व अमूर्त (Abstract) विचार करण्याची विशेष शक्ति असते. देहात्म्याच्या मानानें जीवात्मा, म्हणजे नोकराच्या मानानें ज़सा यजमान, तसा असतो. देहात्मा हा अल्पज्ञ, अल्पसामर्थ्याच़ा असतो व त्याच्या तुलनेनें जीवात्मा हा सर्वज्ञ व सर्वसमर्थ असतो असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं.

माणसांमाणसांमधील  भेद

जीवात्मा हा रथाच़ा मालक आहे व देहात्मा हा रथाच्या घोड्यासारखा आहे; असें उपनिषदांत वर्णन आहे व तेंहि या बाबतींत समर्पक आहे.

[कठोपनिषदांत (१, ३, ३-७) पुढील वर्णन आहे --
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ।।
इंद्रियाणि हयान् आहु विषयांस्तेषु गोचरान् ।
आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः ।।
]

उत्तम स्थिति म्हणजे रथाच्या मालकाच्या ताब्यांत त्याच़े घोडे सदासर्वदा असावे ही होय. घोडे चलाख, चपल, उमदे व हुशार असावे, मोठमोठ्या मज़ला मारण्याची शक्ति त्यांच्या अंगांत असावी, पण ते रथाच्या मालकाच्या सर्वस्वी अधीन असावे, तो मालक नेईल त्या वाटेनें त्यांनीं बिनबोभाट ज़ावें, त्यांना स्वतःची खोड नसावी, स्वतःच्या आवडीनिवडी नसाव्यात, मालकाची इच्छा असेल त्या रस्त्यानें त्यांनीं भरधांव पळावें, आणि मालकास नको असेल त्या वाटेकडे त्यांनीं ढुंकूनहि पाहूं नये; ही उत्तम स्थिति होय. त्या उत्तम स्थितींत मालक स्वतःला मालक म्हणून ओळखून घोड्यांना सदा आपल्या ताब्यांत ठेवूं शकतो आणि घोडे स्वतःला च़ाकर म्हणून ओळखून यजमानाच़ें कार्य निमूटपणानें पण कौशल्यानें करतात. पण ही उत्तम स्थिति पुष्कळ माणसांच्या ठायीं आढळत नाहीं. पुष्कळांच्या रथाच़े घोडे स्वतःलाच़ यजमान म्हणून समज़तात आणि यजमान नेईल तेथें घोडे ज़ाण्याऐवजीं ते घोडे त्या यजमनाला हवे तिकडे फरफटत नेत असतात आणि बहुशः त्याला खड्ड्यांत घालतात. घोडे भलतीकडे धावूं लागले कीं यजमानाला ते बिलकुल आवरत नाहींत. यजमान त्यांच्या तावडींत सांपडलेला असतो व त्याच़ें कांहींच़ च़ालत नाहीं. यदा कदाचित् त्या यजमानानें लगाम खेंच़ून त्या घोड्यांना योग्य मार्गानें वळविण्याच़ा उद्योग केला तर ते घोडे थयथय नाच़ूं लागतात, पुढच़े पाय उच़लतात आणि मागच़े पायहि वर करून लाथा झ़ाडतात, आणि मारे दंगामस्ती करून यजमानाला हवा असलेला मार्ग सोडून आपणांला पाहिजे असेल त्या वाटेनें धूम ठोकतात. यजमानानें नोकर ठेवावा आणि नोकरानें यजमानाची नोकरी न करतां त्याला धाब्यावर बसवून स्वतःच़ यजमान बनावें अशी ही स्थिति असते. दिल्लीच्या बादशहानें दक्षिणेंतल्या आपल्या एका प्रांतावर एक सरदार नेमून त्यास आपला नोकर म्हणून तेथें बंदोबस्ताकरितां पाठवावें व त्या सरदारानें स्वतंत्र होऊन तें राज्य स्वतःच़ बळकवावें, अशांतला जीवात्म्या-देहात्म्याच़ा व्यवहार पुष्कळदां झ़ालेला दिसून येतो. जीवात्म्याच़ा देहात्मा हा नोकर. पण या देहात्म्याला स्वतःच्या आवडीनिवडी असतात, स्वतःच़ा स्वार्थ असतो. नाना वासना, कामना, नाना व्यसनें, नाना प्रकारच़े अभिमान, नाना प्रकारच़े हट्ट व नाना प्रकारच्या खोडी त्याला असतात. त्यांच़े लाड पुरवावयासाठीं तो स्वतःच़ सत्ताधारी बनतो, आणि खरा राज़ा ज़ो जीवात्मा, त्याच़ें कांहीं च़ालूं देत नाहीं, उलट त्याला बंदिवान् करतो. मनुष्यकोटींत जन्म होऊं लागले कीं प्रारंभीं जीवात्मा अगदीं असहाय असतो आणि देहात्म्याच्या सर्वस्वी आहारीं ज़ातो. नाना वासना आणि व्यसनें, नाना स्वार्थ आणि लोभ यांच़ें त्या वेळीं साम्राज्य असतें आणि जीवात्म्यापाशीं सांठविलेला अनुभव व सामर्थ्य हीं अगदीं थोडीं असल्यामुळें त्याच़ें कांहींच़ च़ालत नाहीं. पुढें ज़सज़सा दर जन्मीं जीवात्मा अनुभव गांठीं बांधील आणि दुष्कृत्यांच़े वाईट परिणाम भोगून शहाणा होऊं लागेल, त्या मानानें त्याच़ें सामर्थ्य व शहाणपणा हीं वाढीस लागतात; आणि देहात्म्याच्या घोड्यांची दंगामस्ती कमी होऊन जीवात्म्याची त्यांच़ेवर थोडी तरी हुकमत च़ालूं लागते. पुष्कळ जन्मपर्यंत देहात्मा व जीवात्मा यांच़ा हा लढा सुरूं असतो. कधीं देहात्म्याच्या घोड्यांनीं भरधांव पळत सुटावें आणि जीवात्म्याला खड्ड्यांत पाडावें, तर कधीं जीवात्म्यानें लगाम घट्ट धरून त्या घोड्यांस आपल्या अधीन ठेवावें असे प्रकार च़ालत राहून कधीं या बाज़ूस जय, तर कधीं त्या बाज़ूस जय, असे हेलकावे सुरूं असतात. पुढें उत्तरोत्तर जीवात्म्याच़े जयाच़े प्रसंग जास्त जास्त होतात व देहात्मा अधिकाधिक प्रमाणांत त्याला अंकित होतो. सुसंस्कृत माणसाची अशी स्थिति झ़ालेली असते. पुढें हळूंहळूं देहात्म्याला कळून येतें कीं मीं जीवात्म्याच़ा नोकर आहे. जीवात्माहि ज़ोरदार व अनुभवसंपन्न झ़ाल्यामुळें तो प्रभावी होतो व त्याच्यावर संपूर्णपणानें हुकमत च़ालवूं लागतो. आणखी नंतर ही स्थिति सुधारत ज़ाऊन शेवटीं देहात्मा संपूर्णपणें शुद्ध व निर्मळ होतो व जीवात्म्याला नको असणारी गोष्ट करण्याची त्याची वृत्ति संपूर्णपणें मरून ज़ाते. या वेळीं देहात्मा जीवात्म्याच़ा बंदा ग़ुलाम बनलेला असतो आणि त्याच्या साऱ्या इच्छा स्वतःमध्यें संपूर्णपणें प्रतिबिंबित करूं लागतो. अशा रीतीनें देहात्म्याच़ें स्वतंत्र अस्तित्व नाहींसें होतें व तो फक्त ज़णूं उपयोगाच़ें साधन अथवा हत्यार बनतो. माणसाची जेव्हां इतकी प्रगति होईल तेव्हांच़ तो पहिल्या महादीक्षेला पसंत केला ज़ातो.

शिवात्मा

देहात्म्याच्या मानानें जीवात्मा सर्वज्ञ व सर्वसमर्थ असतो असें आम्हीं वर लिहिलें आहे. पण वस्तुतः तोहि सर्वज्ञ व सर्वसमर्थ असतो असें नाहीं. नोकराच्या मानानें यजमान मोठा असतो. तुलनेच्या दृष्टीनें पाहिल्यास नोकर अल्पसामर्थ्याच़ा व यजमान सर्वसत्ताधारी असतो असें म्हणतां येईल. पण यजमान नोकराच्या मानानें ज़री सर्वसत्ताधारी असला तरी स्वतंत्र दृष्टीनें त्याच्याकडे पाहिल्यास तो सर्वसमर्थ असेलच़ असें नाहीं. समज़ा, हा यजमान म्हटलेला मनुष्य एका पेढीवरच़ा मुख्य आहे आणि पेढ्या अनेक असून त्या साऱ्या पेढ्यांच़ा मालक वेगळा आहे. तर आमच्या नोकराच़ा यजमान हा ज़री नोकराच्या मानानें सर्वज्ञ व सर्वसमर्थ असला तरी सर्व पेढ्यांच़ा ज़ो मालक तो त्याच्याहिपेक्षां वरच़ढ असणार. एवढेंच़ नव्हे तर नोकराच्या मानानें ज़सा यजमान पुष्कळच़ मोठा, तद्वत् त्या यजमानाच्या मानानें सर्व पेढ्यांच़ा मालक हा पुष्कळच़ मोठा असावयाच़ा हें उघड आहे. देहात्मा-जीवात्म्यासंबंधाच़ें असेंच़ असतें. देहात्म्याच्या अपेक्षेनें जीवात्मा सर्वज्ञ असतो; पण जीवात्मा कितीहि मोठा असला तरी माणसाच्या अंतर्यामीं त्याहूनहि अधिक उच्च असें एक सिंहासन असतें. या सिंहासनावर ज़ो बसतो त्याला आत्मविद्येच्या परिभाषेंत शिवात्मा (Monad) म्हणतात. देहात्म्याच्या मानानें जीवात्मा अनेक पटींनीं मोठा असतो, त्याच़प्रमाणें जीवात्म्याच्या मानानें शिवात्माहि अनेक पटींनीं मोठा असतो. देहात्म्यानें जीवात्म्याच्या हातीं नोकरासारखें राबावें हा ज़सा सृष्टिसंकेत असतो, तद्वत् जीवात्म्यानेंहि शिवात्म्याच़ें साधन बनावें अशी जीवात्म्याची भवितव्यता असते. अर्थात् शिवात्मा जें वळण घालून देईल त्याप्रमाणें जीवात्म्यानें वागावयाच़ें असतें. देहात्मा हा नोकर होय. जीवात्मा हा त्याच़ा यजमान, पण हा यजमानहि वस्तुतः स्वतंत्र नसून तो स्वतः शिवात्म्याच़ा मुनीम किंवा प्रतिनिधि असतो.

देहात्म्याला पहिल्या महादीक्षेच्या पायरीवर पोहोंच़ावयाचें असल्यास जीवात्म्याच़ें पूर्णपणें अंकित होऊन 'मला स्वतंत्र अस्तित्व नाहीं, जीवात्म्याच्या साठींच़ माझ़ें अस्तित्व आहे,' हा धडा पूर्णपणें शिकावा लागतो. देहात्मा ज़सा जीवात्म्याच़ा अंकित झ़ाला, तद्वत् पुढें जीवात्म्याला शिवात्म्याच़ें अंकित व्हावयाच़ें असतें, व पांच़व्या महादीक्षेच्या पायरीवर ही क्रिया संपूर्ण होते. ही दीक्षा मुक्तीची अवस्था होय. त्या स्थितीशीं माणूस आला म्हणजे जीवात्मा हा शिवात्म्याच़ा संपूर्णपणें पाईक झ़ालेला असतो. जीवात्म्याच्या गळीं हा धडा उतरविण्याचें काम पहिल्या महादीक्षेपासून पांच़वीपर्यंत करावें लागतें. 

सामान्य प्रतीच़ा मनुष्य म्हणजे स्थूलदेहाच्या क्रिया, वासनादेहाच्या आवडीनिवडी व मनोदेहाच़ें तर्कशास्त्र या सर्वांच़ा बनलेला असतो. त्या गोष्टींखेरीज़ सामान्य माणसाच्या ठिकाणीं दुसरे कोणतेहि प्रकार फारसे आढळत नाहींत. अर्थात् सामान्य माणसाची ज़ाणीव म्हणजे तो 'देहात्मा' या वर्गांत पडेल अशी असते. त्या देहात्म्याच्या पाठीशीं त्याच़ा जीवात्मा असतो, पण जीवात्म्याच्या अस्तित्वाची ज़ाणीव सामान्य प्रतीच्या माणसाला फारशी नसते. मग त्याच़ें अस्तित्व ओळखून आपण त्याचें अंकित झ़ालें पाहिजे या कल्पनेच़ा त्याच्या मनावर पगडा बसविण्याची गोष्ट दूरच़. असल्या सामान्य जनांना जीवात्मा कसा असतो, त्याच्या शक्ति कोणत्या, याच़ें वर्णन समज़णें अर्थातच़ मुष्किलीच़ें होतें. देहात्मा कसा असतो, देहात्म्यांदेहात्म्यांमध्यें फरक कोणते असतात हें त्यांना सहज़ समज़तें. कमी दर्जाच़ा देहात्मा स्वतःच्या जीवात्म्याला ओळखीत नाहीं. त्या देहात्म्यामध्यें कामक्रोधादि दुर्गुण बऱ्याच़ प्रमाणांत असतात. त्याच़ा स्थूलदेह राठ व असंस्कृत असतो. त्याच़ें वासनादेह व मनोदेह यांतील द्रव्य बोज़ड व घाणेरडें असतें. त्या देहात्म्यावर नाना प्रकारच्या स्वार्थी कामनांच़ा व मोहांच़ा पगडा असतो. कोणत्याहि उच्च ध्येयाची कांस धरण्याची आवड अगर कुवत त्याला नसते. उच्च प्रतीच्या माणसाच़ा देहात्मा आपल्या जीवात्म्यास स्वतःच़ा यजमान म्हणून ओळखून त्याची नोकरी आनंदानें करीत असतो. त्याच्यावर स्वार्थी वासना-विचारांच़ा पगडा बसलेला नसतो. घाणेरड्या वृत्ति त्याच्यावर मोहिनी टाकूं शकत नाहींत. त्याच्या सर्व देहांतलें द्रव्य निर्मळ व चांगले संस्कार घेईल असें असतें. असल्या तऱ्हेचीं च़ांगलीं व वाईट अशीं देहात्म्याचीं दोन्हीं उदाहरणें आपण पाहिलेलीं असतात व म्हणून तीं आपणांला समज़तात. पण जीवात्मा कसा असतो याच़ें वर्णन केलें तर सामान्य प्रतीच़ा माणूस देहात्मा म्हणून सृष्टींत वावरत असल्यामुळें तें वर्णन त्याला आकलन होण्यास कठीण ज़ाईल हें उघडच़ आहे. तथापि त्यासंबंधाची थोडी तरी कल्पना जिज्ञासूला येणें अवश्य असल्यामुळें जीवात्म्याच़ें अल्पस्वल्प वर्णन या स्थळीं देणें अवश्य आहे. जीवात्म्याच़ा सर्वांत खालच्या प्रतीच़ा देह म्हणजे 'कारण-देह' होय. देहात्म्याच्या मानानें जीवात्मा फार उच्च पायरीवर असला तरी जीवात्म्याजीवात्म्यांमध्यें कमी अधिक अनुभवसंचयामुळें न्यूनाधि
क्याच़ा फरक असतो हें आपण वर पाहिलेंच़ आहे. अगदीं कमी प्रतीच़ा जीवात्मा असला तर त्याच़ा कारण-देह पोकळ असतो, त्यांत च़ांगल्या च़ांगल्या शक्तींची बांधणी व अभिव्यक्ति झ़ालेली नसते. पण जीवात्मा कितीहि कमी दर्जाच़ा असला तरी त्याच्या कारण-देहामध्यें घाणेरडें द्रव्य कधींहि असत नाहीं, आणि कोणतेहि दुर्गुण त्याच्यामध्यें राहूं शकत नाहींत. कमी प्रतीच़ा जीवात्मा ज़णूं रिता व पोकळ असतो, उच्च जीवात्मा नाना गुणांनीं व सामर्थ्यांनीं ज़णूं भरलेला असतो, असा त्या दोघामध्यें फरक असतो. कारणदेह हें अमूर्त विचारांच़ें आणि तात्त्विक चिज़ांच़ें ज़णूं माहेरघर असतें. जगांतील सर्व आकार, सर्व सौंदर्य, सर्व कला, सर्व तत्त्वविचार वगैरे सर्वांच़ें मूळ या ठिकाणीं असतें. असल्या उच्च गोष्टींच़ा भाग कांहीं जीवात्म्यांत फार असतो तर कांहीं जीवात्म्यांत अगदीं थोडा असतो. कारणदेहाच्या भूमिकेच्या वर गेलों तर पुढें बुद्धीची भूमिका लागते. या बुद्धीच्या भूमिकेवर सर्व सृष्टी एक आहे असा माणसाला प्रत्यक्ष अनुभव येतो; आणि माणूस प्रत्येक वस्तूकडे बाहेरून न पाहतां ज़णूं तिच्या पोटांत शिरून व तिच्याशीं आंतून एकरूप होऊन तिच़ें ज्ञान मिळवूं शकतो. या बुद्धीच्या भूमिकेवर योग्य वेळीं जीवात्म्याला एक नवीन कोंब (किंवा देह) अंकुरित होतो व मग या भूमिकेवरच्या साऱ्या शक्ति त्याच्यामध्यें आस्ते आस्ते प्रकट होऊं लागतात. कमी प्रतीच्या जीवात्म्याला बुद्धीच्या पायरीवरची ही ज़ाणीव आलेली नसते. उच्च प्रतीच्या जीवात्म्यामध्यें या पायरीवरच़ा देह नांवारूपास येतो आणि येथील ज़ाणीव व त्या ज़ाणिवेंतील सर्व गुण कालवशात् फुलून ज़ातात. याहि पलीकडे जीवात्म्याची आणखी एक पायरी असते. तिला आत्म्याची भूमिका किंवा निर्वाण म्हणतात. कमी प्रतीच्या जीवात्म्याच़ा या पायरीवर विकास झ़ालेला नसतो, पण ज़सज़शी जीवात्म्याची प्रगति होईल त्या मानानें येथील विकासास सुरुवात होते, आणि यथाकाल तो विकास संपूर्ण होतो. कारण-देहाची भूमिका, बुद्धि व आत्मा या दोघांची भूमिका या सर्वांवरील विकास पूर्ण झ़ाला, म्हणजे जीवात्मा परमोच्च स्थितीस गेला असें म्हणतां येईल. हा योग पांच़व्या महादीक्षेच्या वेळीं येत असतो. 

निरनिराळ्या  भूमिका

वरील वर्णनावरून लक्षांत येईल कीं, स्थूलदेहाची भूमिका, वासनादेहाची भूमिका व मनोदेहाची भूमिका अशा तीन देहात्म्याच्या पायऱ्या असतात. त्याच़प्रमाणें कारणदेहाची भूमिका, बुद्धीची भूमिका व निर्वाणाची भूमिका या जीवात्म्याच्या विकासाच्या तीन पायऱ्या असतात. देहात्मा हा जीवात्म्याच़ा नोकर असतो. त्याच़प्रमाणें जीवात्मा शिवात्म्याच़ा ज़णूं मुनीम असतो.

शिवात्मा कसा असतो त्याच़ें वर्णन करणें आमच्या आटोक्याबाहेर आहे. त्याला माणसाच्या हृदयांतला खोलांतला खोल चैतन्यांश म्हटलें, अंतर्यामींच़ा साक्षात् परमेश्वर म्हटलें, परब्रह्माच़ा स्फुल्लिंग म्हटलें तर शोभेल. यापलिकडे त्याच़ें शब्दांनीं वर्णन करणें म्हणजे ज़मिनींतल्या बिळांत राहणाऱ्या प्राण्यानें हिमालयाच्या अत्युच्च शिखरावरून सर्व सृष्टीच़ा देखावा किती शोभिवंत, किती अफाट व किती उदात्त दिसतो याच़ें वर्णन आपल्या बिळांत बसून सांगण्यासारखें अप्रयोजक होईल.

या प्रकरणांत प्रथम देहात्मा, मग जीवात्मा व सरतेशेवटीं शिवात्मा अशा पायऱ्यांच़ें च़ढत्या भांज़णीच़ें वर्णन आम्हीं येथवर दिलें आहे. आतां आणखी उलटीकडून सुरुवात करून तेंच़ वर्णन उतरत्या भांज़णीच्या क्रमानें करूं. म्हणजे या कठीण विषयांतील कांहीं मुद्दे अधिक स्पष्ट होतील.

ईश्वर सर्व सृष्टींत अनुस्यूत आहे, सर्व वस्तूंच्या अंतर्यामीं आहे. तो ईश्वर माणसाच्याहि अंतर्यामीं आहे. माणसाच्या अंतर्यामीं असणारें जें ईश्वराच़ें सर्वांत शुद्ध, सर्वांत जिवंत, सर्वांत उच्च आणि सर्वांत खोल असें स्वरूप त्याला शिवात्मा (Monad)
म्हणतात.  हा शिवात्मा इतका ज्ञानी, इतका तेजस्वी, इतका आनंदानें स्फुरणारा असतो, त्याच्या शक्ति इतक्या तीव्र असतात, त्याच़ा महिमा इतका मोठा असतो कीं त्याची यथार्थ कल्पना आपल्यासारख्या अप्रबुद्ध माणसांना होणें नाहीं. हा शिवात्मा माणसाच्या अंतरंगांत पर-निर्वाण नांवाच्या अति उच्च भूमिकेवर राहात असतो.

उतरती  भांज़णी

हा शिवात्मा आपलाच़ एक अंश वेगळा काढून त्या अंशाला खालच्या भूमिकेवर पाठवितो. उच्चासनावर बसलेला माणूस
खालीं पडलेला जिन्नस उचलण्याकरितां आपलाच़ एक अंश -- अर्थात् आपलाच़ हात -- खालच्या बाज़ूस नेतो, तद्वत् ही क्रिया असते. विहिरीच्या कांठावरील माणूस विहिरींतलें पाणी वर काढण्याकरितां ज़सा विहिरींत पोहरा सोडतो तद्वत् शिवात्मा जीवात्मारूपी पोहरा खालच्या भूमिकेवर सोडतो अशी कल्पना केली तरीहि शोभेल. मात्र हा पोहरा त्या माणसाच़ा ज़णूं अंगभूत अवयवच़ असतो असें मानलें पाहिजे.  माणूस आपला हात ज़ो खालीं करतो तो हात त्या माणसाच्या अंगाच़ा एक भाग असतो. त्याच़ें अंग व त्याच़ा हात हीं एकाच़ हाडामांसांचीं बनलेलीं असतात, एकच़ रक्त त्या दोहोंमध्यें खेळत असतें. तद्वत् शिवात्म्यानें खालीं सोडलेला जीवात्मा त्याच़ाच़ खरोखरच़ा एक भाग, एक अंश असतो. ज़ोंवर तो हात खालीं लोंबत आहे तोंवर आपण त्याला 'हात' असें वेगळें नांव देऊन त्यावर वेगळेपणाच़ा आरोप करतों. पण उचलावयाची जिन्नस हातांत धरून त्यानें आपला हात वर ओढून घेतला म्हणजे सारें अंग एकच़ आहे, हात म्हणून निराळें नांव देण्याची गरज़ नाहीं हें आपल्या लक्षांत येतें. याप्रमाणें जीवात्मा हा शिवात्म्याच़ा खालीं सोडलेला ज़णूं हात असतो.

या जीवात्म्याला तीन प्रकारच्या शक्ति प्रकट करतां येतात. पैंकीं जी सर्वांत कनिष्ठ असते तिला अमूर्त विचार (Abstract Thought) असें नांव दिलें तर च़ालेल. त्याच्या वरच्या शक्तीला अंतःप्रज्ञा, बुद्धि (Intuition) हीं नांवें शोभण्यासारखीं आहेत. सर्वांत श्रेष्ठतम असलेली जी तिसरी शक्ति तिला निर्वाण किंवा आत्मशक्ति असें म्हणण्यास हरकत नाहीं. खरोखरी या भूमिका इतक्या उच्च आहेत कीं त्यांवरील सामर्थ्यें व्यक्त करण्यास समर्पक असे शब्द लौकिक भाषेमध्यें सांपडत नाहींत. वरील तीन शक्तींपैंकीं अमूर्त विचारांची शक्ति
कारणदेहांत प्रकट होते. अंतःप्रज्ञेची बुद्धिदेहांत (Buddhic Body) व निर्वाणशक्ति आत्मदेहांत (Atmic Body) प्रकट होते. मुक्ति मिळविलेल्या पुरुषाच्या ठायीं हे तिन्हीं देह संपूर्णपणें विकसित झ़ालेले व कार्यक्षम असतात. खरोखरी बुद्धिदेह आणि आत्मदेह यांना देह म्हणणें गैर आहे. कारण त्यांना लांबी, रुंदी, आकार वगैरे मोज़मापें नसतात. एखादा लोहचुंबक असला तर त्याच्या सभोंवार त्या चुंबकाच़ें क्षेत्र (Magnetic Field) असतें. त्या क्षेत्राला देह असें नांव आपण देणार नाहीं. लोहचुंबकाच्या सभोंवार असलेल्या क्षेत्राला देह हें नांव देणें जितकें अनुचित होईल, त्यापेक्षां कितीतरी जास्ती अनौचित्य बुद्धिदेह आणि आत्मदेह या संज्ञांत आहे. पण नाइलाज़ास्तव त्यांना देह म्हणण्याशिवाय गत्यंतर नाहीं. मुक्ति मिळविलेल्या माणसाच़ा कारणदेहहि संपूर्णपणें विकसित झ़ालेला असतो, व तो आकारानें इतका प्रचंड असतो कीं मोठें मैदानहि त्यांत सहज़ मावूं शकेल. अगदीं कनिष्ठ दर्जाच्या माणसाच़ा कारणदेह त्याच्या दृश्य देहापेक्षां ज़रा मोठा, पण साबूच्या पाण्याच्या बुडबुड्यासारखा पोकळ व रिकामा असतो; आणि त्याच्या ठायीं वरच्या दोन देहांच़ा मागमूसहि नसतो.

शिवात्म्यानें ज़सा जीवात्मारूपी आपला अंश वेगळा करून तो विहिरींतल्या पोहऱ्याप्रमाणें खालच्या भूमिकांवर सोडलेला असतो, तद्वत् हा जीवात्माहि आपला एक अंश वेगळा करून विहिरींतल्या पोहऱ्याप्रमाणें त्या अंशाला (देहात्म्याला) आणखी खालच्या क्षेत्रांत अनुभव गोळा करण्यासाठीं पाठवून देतो. या क्रियेला जन्म म्हणतात. जीवात्मा जेव्हां जन्मास येतो तेव्हां त्यानें आपलाच़ एक अंश त्या जन्माशीं संलग्न केलेला असतो. जीवात्मा आपल्या अंगाच़ा एक अंश ज़णूं निराळा करतो आणि त्याला जन्म घेण्यास खालीं पाठवितो. या निराळ्या काढलेल्या आणि जन्मांत गुंतविलेल्या भागास देहात्मा म्हणतात असें वर सांगितलेंच़ आहे. माणसानें विहिरींत पोहरा टाकला तर त्या पोहऱ्याची दोरी हवेंत असते, पोहरा पाण्यांत असतो आणि त्या पोहऱ्याचें बूड विहिरीच्या तळच्या चिखलांत गेलेलें असतें. तद्वत् देहात्मारूपी ज़ो अंश जीवात्म्यानें खालीं सोडलेला असतो त्याच़ा कांहीं भाग स्वर्लोकांत असतो, कांहीं भुवर्लोकांत आणि कांहीं भूलोकांत असतो. भूलोकांत त्यानें स्थूलदेह परिधान केलेला असतो, भुवर्लोकांत वासनादेह पांघरलेला असतो आणि स्वर्लोकांत मनोदेह धारण केलेला असतो; दर जन्मीं या तिन्हीं देहांत देहात्मा अनुस्यूत असतो. जन्म संपला कीं एक एक देह गलित होऊन नष्ट होतो आणि त्या गळून ज़ाणाऱ्या देहांतून तो देहात्मा अनुभव शोषून घेतो आणि तिन्हीं देह गळाले कीं त्या सर्वांनीं मिळविलेले अनुभव स्वतःमध्यें ओढून घेऊन देहात्मा जीवात्म्यांत मिळून ज़ातो. अशा रीतीनें एक जन्म संपतो व दुसऱ्या जन्मास सुरुवात होते. दर जन्मीं जीवात्म्यानें अनुभव घेण्यासाठीं देहात्मारूपी अंश वेगळा काढून खालच्या क्षेत्रांत त्याची रवानगी करून द्यावी, तेथें  त्या त्या देहांच्या द्वारां जन्मभर मिळविलेले अनुभव जन्माच्या शेवटीं आपल्या अंगांत देहात्म्यानें ओढून घ्यावे व मग जन्मापुरत्या वेगळ्या झ़ालेल्या त्या देहात्म्यानें पुनः जीवात्म्यांत ज़ाऊन मिसळावें असा सारखा क्रम च़ालतो. अशा प्रकारें जीवात्मा देहात्म्याच्या साधनानें अनुभवाच़ा संचय करून स्वतःच़ा विकास करीत असतो. च़मच़ा घेऊन ज़सा माणूस दूध पीत असतो तद्वत् देहात्मारूपी च़मच्यानें जीवात्मा अनुभवरूपी गोरस पिऊन स्वतःची वाढ करतो. 

जीवात्म्यानें अशा प्रकारें ज़ो अंश वेगळा काढून दर जन्मीं खालच्या क्षेत्रांत प्रकट केलेला असतो तो माणसाच्या देहांत विशिष्ट स्थळीं प्रकट असलेला सूक्ष्म दृष्टीला दिसूं शकतो. 'अंगुष्ठमात्रः हिरण्मयः पुरुषः' किंवा 'अंगुष्ठमात्रः पुरुषोंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः।' वगैरे उपनिषदांतील रूपकात्मक वर्णन त्याच़ेंच़ आहे. तो च़ांदणीसारखा दिसतो असें म्हटलें तर अधिक शोभेल. खालच्या क्षेत्रांत उतरलेला हा जीवात्म्याच़ा ज़णूं प्रतिनिधि होय असें म्हणतां येईल. देहात्मा म्हणून आपण ज्याला म्हणतों, व ज़ो मनोदेह, वासनादेह व स्थूलदेह यांच्यामधून प्रकट होत असतो तोच़ हा. हा तारा किंवा अंगुष्ठमात्र पुरुष पुष्कळ लोकांच्या हृदयांत च़काकत असतो. तेथें सूक्ष्मदेहांत चक्र असतें त्यांत तो असलेला दिसतो. पण अनेक माणसांमध्यें तो तेथें नसून दुसऱ्या एखाद्या चक्रांत अधिष्ठित असल्याच़ें दिसून येतें. माणसाची मनोरचना, त्याच्या विकासाची दिशा, त्याच़ा वंश व उपवंश इत्यादिकांवर त्याच़ें स्थान अवलंबून आहे असें तज्ज्ञ म्हणतात. आणि म्हणूनच़ तो तारा कित्येक माणसांत मस्तकांत, कंठस्थानीं वा इतरत्र असल्याच़ें आढळतें.

माणसाची प्रगति होणें म्हणजे शिवात्म्यानें जीवात्म्याच़ा लगाम घट्ट धरून आणि जीवात्म्यानें देहात्म्याच़ा लगाम घट्ट धरून  त्यांस वळविणें आणि देहात्म्याच्या द्वारानें जीवात्म्याच़ा अनुभवसंचय, गुणसंचय व शक्तिसंचय वाढणें, तसेंच़ जीवात्म्याच्या द्वारां संपादलेला हा सारा विकास शिवात्म्यामध्यें ज़ाऊन मिळणें ही क्रिया होय. मनुष्य मुक्त झ़ाला म्हणजे जीवात्मा शिवात्मा एक होतात व जीवात्म्यानें संपादन केलेली सर्व संपत्ति शिवात्म्यामध्यें एकवटते. त्या वेळीं देहात्मा व जीवात्मा हे दोन्हीं निष्कलंक झ़ालेले असतात. त्यांच्या साऱ्या शक्ति फुललेल्या असतात आणि शिवात्मा आंतून ज़सा लगाम ओढील त्याप्रमाणें देहात्मा व जीवात्मा यांच्या क्रिया तंतोतंत च़ालतात. अर्थात् शिवात्मा ज़र प्रत्यक्ष ईश्वरांश आहे तर माणसाच्या साऱ्या क्रिया ईश्वरसंकेताबरहुकूम होतात हें उघड आहे.

ही परमसीमा गांठण्यापूर्वीं शिवात्मा आंतून लगाम हलवून जीवात्म्याला वळवूं पाहतो आणि जीवात्माहि आंतून लगाम हलवून देहात्म्याला वळवूं पाहतो. अशा रीतीनें शिवात्मा आंतून प्रेरणा देऊन जीवात्म्यास कसा वळवितो व कोणकोणत्या प्रकारच़ा त्याच़ा विकास होतो हा भाग समज़ण्यास कठीण आहे. हें कार्य पहिल्या महादीक्षेपासूनच़ प्रामुख्यानें सुरूं होतें व पांच़व्या महादीक्षेपाशीं संपतें. तेव्हां अर्थात् त्याविषयीं नीटशी कल्पना येणें बिकट आहे. जीवात्मा व शिवात्मा यांचीं स्वरूपें समज़णें अगोदर कठीण, कोणत्या निरनिराळ्या भूमिकांवर ते कार्यक्षम असतात तें ध्यानांत आणणेंहि कठीण. तेव्हां शिवात्मा हातची लगाम कशी ओढतो आणि जीवात्म्यास वळवून व त्याच़ा गुणविकास करून अंतीं त्याशीं कसा एकरूप होतो याच़ें वर्णन आम्हांस येथें कसें साधणार ? हा भाग फार पुढच़ा असल्यामुळें सामान्य जिज्ञासूला त्याच़ा तितका उपयोगहि नाहीं. तेव्हां त्याच़ें विवेचन करण्याच्या भरीस न पडणें हें बरें.

जिज्ञासूस विशेष महत्त्वाच़ा भाग म्हणजे पहिल्या महादीक्षेच्या अलीकडच़ा होय. अगदीं कमी दर्जाच्या माणसापासून प्रारंभ करून पहिल्या महादीक्षेपर्यंतचीं माणसें पाहिलीं तर त्या सर्वांत असें दिसून येतें कीं जीवात्मा लगाम ओढून देहात्म्याला सारखा वळवीत आहे. अगदीं हीन माणसांमध्यें देहात्मा ओढाळपणा करून जीवात्म्याला भलतीकडे नेत असतो आणि पहिल्या महादीक्षेच्या टप्प्यापाशीं आलेल्या माणसामध्यें जीवात्मा प्रभावी होऊन देहात्म्याला आपल्या इच्छेनुसार वळवीत असतो. टेलिफ़ोनवर बोलत असतां बोलणाराच़ा संदेश ऐकणाराच्या कानांत कमी अधिक स्पष्टपणें ज़ात असतो ही गोष्ट आपल्या परिचयाची आहे. अगदीं सामान्य प्रतीच़ा माणूस घेतला तर त्याच़ा जीवात्मा देहात्म्याकडे ज्या प्रेरणा पाठवितो, जे संदेश पाठवितो, ते अगोदर निर्बल असतात, टेलिफोनच्या तारेंतून ते देहात्म्याच्या कानावर स्पष्टपणें पडत नाहींत, तो जेव्हां फारच़ मोठ्यानें ओरडेल तेव्हां किंचितसा ध्वनि देहात्म्यास ज़ाणवेल अशी स्थिति असते. त्या दोहोंमधलें दळणवळण फारसें सुरूं झ़ालेलें नसतें, आणि ज़री जीवात्म्याच़ा संदेश देहात्म्याच्या कानावर पडला तरी स्वतःच्याच़ आवडीनिवडींत तो दंग असल्यामुळें तो त्या संदेशानुरूप वागत नाहीं. एवंच सामान्य प्रतीच़ा माणूस म्हणजे देहात्माच़ असतो. जीवात्मा त्यावर फारच़ थोडा परिणाम करूं शकतो आणि तो परिणामहि क्वचित्प्रसंगींच़ घडत असतो.

कमी प्रतीच्या माणसाच़ा बराच़ काळ क्षुद्र व निरुपयोगी गोष्टींत ज़ात असतो. दारू पिणें, मांस खाणें, विड्या ओढणें, जिभेच़े लाड पुरविणें यांत पुष्कळ माणसांच़ा स्थूलदेह दंग असतो. दुष्ट कामवासना, हांवरेपणा, संताप, भांडखोरपणा, दुरभिमान वगैरे वाईट वृत्तींनीं त्यांच़ा वासनादेह भरलेला असतो. स्वार्थी विचार करण्याखेरीज़ त्यांच्या मनोदेहाला दुसरा विचार फारसा सुच़त नाहीं. तमाशे व शर्यती पहाणें, कोंबडे झ़ुंज़विणें, टोणग्यांच्या टकरी लावणें, शिकार करणें ह्या त्यांच्या मनाच्या करमणुकी असतात. अशा प्रकारच़ा देहात्मा जे उद्योग करीत असतो त्यांपैंकीं एकाच़ेंहि अगत्य जीवात्म्याला वाटत नाहीं. जीवात्म्याला प्रगतीची दिशा माहीत असते. त्यानें स्वतःच़ें ध्येय ज़ाणलेलें असतें. आपला देहात्मा असले क्षुद्र व हानिकारक उद्योग सदा करीत आहे हें जीवात्म्यानें पाहिलें व त्या देहात्म्याला आपण वळवूं शकत नाहीं, आपला ठसा त्याच्यावर बिलकुल उठत नाहीं, याच़ा त्यानें अनुभव घेतला म्हणजे तो निराश होण्याच़ा संभव असतो. हा देहात्मा अगदीं कुचकामाच़ा आहे, तो घेऊन आपणांस काय करावयाच़ें आहे, असें वाटून जीवात्मा हताश होत्साता कधीं कधीं स्वस्थ बसतो. त्याला वाटतें पुढच्या जन्मीं आपण पाहूं, सध्यां या जन्मीं या देहात्म्याशीं संबंध नको. अशा प्रकारें जीवात्म्याला देहात्म्याची किळस आली तर विस्मय वाटण्याच़ें कारण नाहीं. एखाद्या चारित्र्यवान्, सद्गुणी व अब्रूदार स्त्रीच्या पोटीं दुराचारी, व्यसनाधीन व नीचवृत्तीच़ा मुलगा जन्मास आला असला आणि हा मुलगा कुलांगार आहे असा पुनः पुनः तिनें अनुभव घेतला असला तर ती निरुपायास्तव कष्टी होऊन त्याच़ा संबंध तोडून टाकते. तद्वत् जीवात्म्याला करावेंसें वाटतें. पुढच्या जन्मीं बऱ्या देहात्म्याशीं आपला ऋणानुबंध ज़डेल, त्या वेळीं आपण प्रगतीच़ा प्रयत्न करूं, सध्यांच़ा देहात्मा इतका निकृष्ट आहे कीं त्याच्या द्वारां प्रयत्न न करतां स्वस्थ बसलें तरी नुकसान नाहीं असें त्यास कधीं कधीं वाटते, आणि तो आपल्या प्रेरणा देहात्म्यापर्यंत पाठवून त्याला वळण लावण्याच़ा उद्योग टाकून देतो.

मुमुक्षूचें  कर्तव्य

जीवात्म्याच्या उच्च प्रेरणा ज़र देहात्म्याला हव्या असतील
तर ज्या गोष्टींच़ें जीवात्म्याला अगत्य वाटतें त्या देहात्म्यानें करावयास हव्यात. पुष्कळ गोष्टींनीं जीवात्म्याच़ा विकास होत असतो आणि त्याच़ें त्याला महत्त्व असतें. देहात्म्याच्या मानानें जीवात्मा फारच़ शहाणा व सुज़ाण असतो. जगांत देहात्मा जे व्यवहार करीत असतो, ज्या वासना व विचार मनांत बाळगीत असतो, त्यांतील योग्य काय, त्यांपैंकीं कोणत्या गोष्टींनीं स्वतःची प्रगति विशेष होईल व कोणत्या गोष्टी प्रगतीच्या दृष्टीनें फोल आहेत याची त्याला च़ांगलीच़ माहिती असते. अर्थात् जीवात्म्याला आनंद देणाऱ्या आणि त्याच्या दृष्टीनें महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी देहात्मा ज़र करील तर जीवात्म्याला त्यांच़ें अगत्य वाटेल, त्यांत कमी अधिक करणाऱ्या प्रेरणा तो देहात्म्याकडे पुनः पुनः पाठवील आणि जीवात्मा व देहात्मा यांमध्यें निकटभाव उत्पन्न होऊन दोघांमधील दळणवळण वाढेल. परसेवेच्या, निःस्वार्थीपणाच्या, खऱ्या प्रेमळपणाच्या, ज्ञानवृद्धीच्या, कर्तव्यदक्षतेच्या, कलाकृतीच्या, दृढनिश्चयाच्या, ज्या धीरोदात्त गोष्टी असतात त्या करण्यास देहात्मा झ़टेल तर हा देहात्मा माझ्या विकासास फार उपयुक्त आहे हें ज़ाणून जीवात्मा त्याशीं सलगीच़ा ऋणानुबंध उत्सुकपणें ज़ोडील आणि आपल्या हातीं असलेल्या लगामानें त्याला सदा सन्मार्ग दाखवीत राहील. अध्यात्म मार्गावर पाऊल ठेवण्याची हौस असेल त्यांनीं या धोरणानें वागत असलें पाहिजे. पुष्कळ वेळां लोकांस वाटतें कीं आपला जीवात्मा, आपली मनोदेवता, आपल्या हृदयांतला ईश्वर आपणांस कां वाट दाखवीत नाहीं ?  तो जीवात्मा ज़णूं झ़ोंपल्यासारखा कां वाटतो ?  आपला हात धरून तो आपणांस उत्क्रांतिमार्गावरून जलदीनें पुढें पुढें कां नेत नाहीं ?  यावर आम्हीं त्या मंडळींना उलट असा सवाल करूं कीं रोज़च्या चोवीस तासांत तुम्हीं जीवात्म्याची आठवण एकदां तरी काढतां कां ?  देहात्मा या दृष्टीनें तुम्हीं सदा वागतां. आपण जीवात्म्याचें काम करणारे च़ाकर आहों ही कल्पनाच़ तुम्हांला पटत नाहीं. उलट तुम्हीं त्या कल्पनेची थट्टा करतां, आणि वेळप्रसंगीं तुम्हीं आपल्या दुर्वर्तनामुळें खड्ड्यांत पडलांत म्हणजे अंतर्यामींच़ा जीवात्मा मला या खड्ड्यांतून आतां बाहेर कां काढीत नाहीं, त्यानें मला या खड्ड्याच़ा अगोदरच़ कां इशारा दिला नाहीं, तो इतका शहाणा आहे तर मला कां मार्गदर्शक होत नाहीं असे स्मशानवैराग्याच़े प्रश्न विचारतां !

पुनः पुनः जन्म घेऊन व दर जन्मीं देहात्मारूपी आपला अंश अनुभव घेण्यास उत्क्रांतिक्षेत्रांत पाठवून आपली प्रगति होत असते हें जीवात्म्याला माहीत असतें. पण याखेरीज़ त्याची प्रगति होण्याच्या दुसऱ्या अनेक वाटा असतात हें आपण विसरतां कामां नये. एखादा महत्त्वाकांक्षी पुरुष निरनिराळे खटाटोप करून त्यांपासून निरनिराळ्या गोष्टी संपादन करतो. कांहीं उद्योगधंदे करून पैसे मिळवितो, कांहीं सार्वजनिक कामें करून लोकप्रेम संपादन करतो, दुसरे अनेक मार्ग धरून ज्ञान, अधिकार, वगैरे गोष्टी प्राप्त करून घेतो, तद्वत् जीवात्म्याला स्वतःची सर्वांगीण प्रगति करण्यासाठीं अनेक वाटा मोकळ्या असतात. जन्म घेऊन अनुभव गोळा करणें ही त्याच्या प्रगतीची एकच़ एक दिशा असते असें नाहीं. जीवात्मा कारणदेहानें एका उच्च भूमिकेवर रहात असतो. त्या भूमिकेवर दुसरे पुष्कळ ज्ञानी जीवात्मे असतात, देवकोटींतले थोर लोक असतात. आणखीहि अनेक गोष्टी तेथें अशा असतात कीं ज्यांच्या साहाय्यानें जीवात्म्याच़ा तेथें पुष्कळ विकास होईल
. विहिरीच्या कांठावरून पोहऱ्यानें पाणी काढणाऱ्या माणसाला कोणकोणत्या मार्गांनीं प्रगति करण्याची शक्यता असते त्याची कल्पना त्या पोहऱ्याला कशी येणार ?  तद्वत् जीवात्मा आपल्या त्या श्रेष्ठ भूमिकेवर रहात असतांना तो तेथें कोणकोणत्या विविध दिशांनीं स्वतःची उन्नति करूं शकेल याच़ा तपशील आपणांला सांगतां येणार नाहीं. ती परिस्थिति आनंदाची असते व प्रगति करण्यास तेथें पुष्कळच़ वाव असतो हें मात्र खास. अर्थात् देहात्मा आपलें ऐकत नाहीं, तो भलत्यासलत्या, क्षुद्र व अपकारक गोष्टींच्या नादास लागला आहे, असें ज़र जीवात्म्यानें पाहिलें, तर पुढच्या जन्मीं त्याची दुरुस्ती करूं असें म्हणून त्यानें त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावें यांत आश्चर्य नाहीं. एखाद्या व्यापाऱ्यानें दहा ठिकाणीं पेढ्या काढल्या असल्या व त्यांपैंकीं एका पेढीवरच़ा नोकर आळशी व मूर्ख निघाला तर तो व्यापारी इतर पेढ्यांवरच़े व्यापार जास्त नेटानें च़ालवील व पुढच्या वर्षीं दुसरा च़ांगला नोकर ठेवूं असें म्हणून त्या पेढीवरच़ा त्या वेळच़ा व्यापार संपुष्टांत आणील हें उघड आहे. जीवात्मा असेंच़ करीत असतो. ह्या जन्मींच़ा देहात्मा अडमुठा व दुर्गुणी असला तर पुढच्या जन्मींच़ाहि तसाच़ असावयाच़ा, तो एकदम शहाणासुर्ता व्हावयाच़ा नाहीं हें सिद्धच़ आहे; आणि म्हणून एका जन्मींच़ा देहात्मा व्रात्य आहे यास्तव त्याकडे दुर्लक्ष करून त्याला मोकाट सोडून देणें शहाणपणाच़ें नसतें हें खरें; तसेंच़ जन्म घेऊन देहात्म्याच्या द्वारानें ज्या विशेष गुणांच़ा विकास होत असतो तो विकास अन्य मार्गांनीं होऊं शकत नाहीं हेंहि खरें. याच़ कारणामुळें पुनः पुनः जन्म घेऊन प्रगति करण्याची योजना अस्तित्वांत आलेली आहे. विकासाच़े दुसरेहि अनेक मार्ग आपणांला खुले आहेत, ते मार्ग आनंदपूर्ण आहेत, हें जीवात्म्यानें पाहिलें, ह्या देहात्म्याच्या द्वारानें प्रस्तुत जन्मीं आपली फारशी प्रगति होण्याच़ा संभव नाहीं असें त्याच्या लक्षांत आलें म्हणजे तो तें द्वार जास्त उघडण्याच़ा उद्योग न करतां तें बंद करण्याच्या खटपटीस स्वाभाविकपणेंच़ लागणार. त्याच़ा विस्मय वाटण्याच़ें कारण नाहीं. 

बहुतेक सर्व माणसांची वागणूक पाहिली तर ते 'देहात्मे' या दृष्टीनें व्यवहार करीत असतात हें उघड आहे.  त्यांना अध्यात्म मार्गावर यावयाच़ें असलें तर त्यांनीं स्वतःच्या अंतरंगांत शिरून नव्या धोरणानें आपलें वर्तन ठेवण्याच़ा सारखा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या अंतरंगांतला ज़ो उत्तमोत्तम भाग आहे, जी स्वतःची मनोदेवता आहे तिच्याशीं एकरूप होण्याच़ा व त्या धोरणानें आपली वर्तणूक बदलण्याच़ा त्यांच़ा खटाटोप असला पाहिजे. या कामीं ध्यानाच़ा माणसाला फार उपयोग असतो. जीवात्म्याच़ा चष्मा स्वतःच्या डोळ्यांस लावून, त्या दृष्टीस जें तारतम्य दिसतें, ज़ो विवेक करतां येतो, तदनुसार मन, वासना, वाचा, क्रिया वगैरे वळविण्याच़ा माणसानें उद्योग केला; स्वार्थी वृत्ति सोडून दुर्गुण टाकण्याची खटपट केली, कीं जीवात्मा जास्त जास्त प्रमाणांत देहात्म्याकडे प्रेरणा सोडून देहात्म्याच्या द्वारानें प्रकट होऊं लागतो. देहात्मा मग जीवात्म्याच़ा बंदा नोकर बनून देहात्म्याच्या द्वारानें जीवात्म्याच्या प्रेरणांखेरीज़ दुसरें कांहीं प्रकट होऊं शकत नाहीं, अशी स्थिति कालवशात् उत्पन्न होते. या स्थितीपर्यंत आल्याशिवाय माणूस पहिल्या महादीक्षेच़ा अधिकारी होऊं शकत नाहीं. त्या दीक्षेच्या पुढच़ा मार्ग तो आक्रमूं लागला कीं जीवात्म्याचीं आणखी नवीन नवीन अंगें प्रकट होतात, बुद्धि, निर्वाण वगैरेंचीं दालनें उघडूं लागतात, आणि प्रगतिपथावरून प्रचंड वेगानें तो पुढें पुढें ज़ाऊन सरतेशेवटीं जीवात्मा व शिवात्मा एकरूप होतात. आध्यात्मिक प्रगतीची ही अशी दिशा आहे आणि त्या मार्गावरच़े सर्व टप्पे कमी अधिक विस्तारानें या पुस्तकांत पूर्वीं येऊन गेलेच़ आहेत.

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण १२ : जीवन्मुक्त ऋषींच़े कांहीं उद्योग