प्रकरण  दहावें


पुढचा  मार्ग


या पुस्तकांत मुमुक्षुमार्गाच़ें जें वर्णन आम्हीं येथवर दिलें आहे तें एका अर्थानें बहिरंगदृष्टीच़ें आहे हें लक्षांत ठेवणें ज़रूर आहे. ज्या माणसानें साखरेची गोडी स्वतः च़ाखली नाहीं त्याला साखरेच्या च़वीचा साक्षात् अनुभव द्यावयाचा असला तर साखरेच़ा खडा त्याच्या जिभेवर ठेवणें अवश्य आहे. तसें केलें म्हणजेच़ साखरेच्या गुणधर्माविषयींच़े त्याचे सारे संशय नाहींसे होतील. ज़ोपर्यंत साखरेच़ा खडा माणसाच्या जिभेवर ठेवण्याच़ा योग आला नाहीं, तोंपर्यंत साखरेच्या च़वीच़ें शाब्दिक वर्णन करण्याशिवाय दुसरा मार्गच़ संभाव्य नसतो. साखरेच़ा खडा हा एक स्थूल पदार्थ आहे व म्हणूनच़ तो उच़लून जिज्ञासूच्या जिभेवर ठेवणें सहज़ शक्य असतें. मुमुक्षुमार्गावरील विकासाची व अनुभवाची गोष्ट वेगळी आहे. ते अनुभव ज्याच़े त्यानें घ्यावयाच़े असतात, व ज़ोपर्यंत माणसाची ती तयारी झ़ालेली नाहीं तोंपर्यंत वैखरी वाणीनेंच़ त्या मार्गाच़ें वर्णन करण्याखेरीज़ अन्य उपाय शक्य नसतो. ज़ो खरा जिज्ञासू असेल त्याला असलें शाब्दिक वर्णन पूर्ण समाधान देईल असें आम्हीं मुळींच़ म्हणत नाहीं. पण तारतम्याच्या दृष्टीनें पाहिल्यास कांहींच़ न समज़ण्याऐवजीं बहिरंगदृष्टीचें शाब्दिक वर्णनहि आपणांला थोडेंफार उपयोगी पडेल हें तो जिज्ञासू विसरणार नाहीं. ज़ोंवर माणसाला दूध मिळालें नाहीं तोंवर त्यानें दुधाची तहान ताकावर भागवावी यांत वावगें तें काय ?  या मार्गावर मुमुक्षु पुढें ज़ाऊं लागला कीं, त्याचें अंतरंग खोल खोल होऊं लागतें, अंतरंगांतील एकाखालचीं एक अशीं दालनें उघडूं लागतात, तेथें नवे जडजवाहीर, नवीं हिरेमाणकें च़मकूं लागतात, त्याच्या हृदयांत नवीन प्रकाश येतो, त्याच्या दृष्टीला, समज़ुतीला, नीतिमत्तेला नवीन नवीन ऐश्वर्य येऊं लागतें व अशा रीतीनें तो मुमुक्षु सरतेशेंवटीं उत्क्रांतिशिखर गांठतो. पण या साऱ्या गोष्टींच़ा जिवंतपणा शब्दांनीं वर्णन करतां येत नाहीं. दिव्याच़ें वर्णन ज़री उत्तमोत्तम शब्दांनीं केलें तरी त्या वर्णनानें दिवा लागत नाहीं. परंतु ज़री दिवा न लागला तरी योग्य प्रकारच्या वर्णनानें माणसाच्या मनाला दिव्याच्या रचनेची व त्याच्या प्रकाशाची अंधुकशी तरी कल्पना आणून देतां येते, हें कांहीं खोटें नाहीं.  आमच़ा प्रयत्न तशाच़ प्रकारचा आहे हें वाचकांनीं ध्यानांत बाळगावें. कॉलेजमध्यें गेल्यावर प्रत्येक वर्षाच़े कोणकोणते अभ्यास असतात, रसायनशाळेंत कसकसे प्रयोग करावे लागतात, काव्य शिकल्यानें मनोवृत्ति कशा नाज़ूक व सुसंस्कृत होतात, इतिहासाच्या अध्ययनानें माणसाच़ें मन कसें विशाल होतें, कोणकोणत्या परीक्षा किती किती वर्षांनीं घेण्यांत येतात, त्या परीक्षांची तयारी कशी करावी लागते वगैरे वर्णन वाच़ल्यानें माणसाला कॉलेजच्या अभ्यासाची परिपूर्ण कल्पना येईल असें बिलकुल नाहीं. परिपूर्ण कल्पना हवी असेल तर त्यानें स्वतः कॉलेजांत ज़ाऊन अभ्यास केला पाहिजे. तद्वत् मुमुक्षुमार्गाची पूर्ण कल्पना येण्यास त्या मार्गानें जिज्ञासूनें स्वतः गेलें पाहिजे हें उघड आहे. पण त्या मार्गानें ज़ाण्याची हौस अगोदर मनांत उत्पन्न झ़ाल्याखेरीज़ कोणींहि तो प्रयत्न करणार नाहीं. ती हौस उत्पन्न करावी इतकाच़ ह्या पुस्तकांतील वर्णनाच़ा उद्देश आहे, आणि बहिरंगदृष्टीनें केलेलें आमच़ें शाब्दिक वर्णन त्या कामीं वाचकांस थोडें तरी उपयोगी पडेल अशी आमची उमेद आहे.

किती  जन्म  लागतात ?

या पुस्तकांतील आठव्या प्रकरणांत
पहिल्या महादीक्षेच़ें वर्णन पुरें झ़ालें आहे. च़ालूं प्रकरणांत त्यापुढच़ा सबंध मार्ग संक्षेपतः वर्णावयाचा आहे. पहिल्या महादीक्षेपासून पांच़व्या महादीक्षेपर्यंतच़ा मार्ग -- म्हणजे मोक्षपदवी मिळेपर्यंतच़ा मार्ग -- च़ालावयास सामान्यतः स्थूलमानानें च़ौदा जन्म लागतात असें तज्ज्ञ सांगतात. पण मानवी उत्क्रांतिमार्गावरील हे जन्म सरतेशेंवटच़े असल्यामुळें व येथवर आलेला माणूस सहज़च़ सामर्थ्यवान्, ज्ञानी व ध्येयनिष्ठ असल्यामुळें या अंतिम जन्मप्रणालिकेंत त्याची वाढ अत्यंत झ़पाट्यानें होते. हे जन्म नक्की च़ौदाच़ असतात असें नाहीं. ते कमी किंवा जास्ती होऊं शकतात. दर जन्मीं माणूस किती प्रगति करील यावर जन्मांची संख्या अवलंबून असते. [समुद्राला ज़शी भरतीओहोटी असते तशी मानवी इतिहासालाहि असते. कांहीं प्रसंगीं अध्यात्ममार्गावरची प्रगति जलद होते तर कांहीं प्रसंगीं तिला वेळ लागतो. काहीं काळ त्या प्रगतीला अनुकूल असतात तर कांहीं प्रतिकूल असतात. काळाचा ओघ अनुकूल असला तर जन्म कमी लागतील; प्रतिकूल असला तर जास्त लागतील.  असल्या कारणांनीं जन्मांच्या संख्येंत फरक पडेल हें ध्यानांत ठेवलें पाहिजे.]   अर्थात् असलीं विधानें कालवाचक असण्यापेक्षां प्रगतीच्या प्रमाणाचीं दर्शक असतात हें विसरतां कामां नये. पण जन्म कमी असले वा जास्त असले तरी सामान्य प्रतीच्या माणसाच्या मानानें या जन्मांत मुमुक्षूच्या प्रगतीच़ा वेग मात्र फारच़ वाढलेला असतो. पहिल्या यत्तेंतला मुलगा एका वर्षांत जितकें शिकेल त्यापेक्षां एम्.ए. च्या वर्गांतला विद्यार्थी एका दिवसांत जास्त शिकूं शकतो. तद्वत् या मार्गावरील पुरुषाची स्थिति असते. माणसाच़े मानवकोटींतले जन्म सातआठशें किंबहुना हज़ार पर्यंत होत असतात असें मानलें तर फारशी चूक होईल असें नाहीं. पण यांपैंकीं शेवटच्या च़ौदा जन्मांत माणूस हा मुमुक्षूमार्ग आमूलाग्र संपवून परमपद गांठतो. यावरून तो मार्ग फारसा बिकट नाहीं किंवा लांब नाहीं, असा गैरसमज़ मात्र कोणींहि करून घेऊं नये. त्या जन्मांतील प्रगतीच़ा वेग अत्यंत शीघ्र होत असतो आणि म्हणूनच़ च़ौदा जन्मांत हा मार्ग च़ालून संपण्याच़ा संभव उत्पन्न झ़ालेला असतो. माणसाचे एकंदर जन्म एक हज़ार होतात अशी कविकल्पना केली तर नऊशेंशायशीं जन्मांत त्यानें जितकी वाटच़ाल केली असेल तितकी वाटच़ाल तो शेवटच्या च़ौदा जन्मांत आटपतो असा आम्हीं अज़मास बांधल्यास अतिशयोक्तीच़ा दोष आमच्या माथीं बसेल असें आम्हांस वाटत नाहीं. प्रगतीच्या वेगांत इतका फरक पडत असतो !  दुसरें असें कीं बहुधां हे च़ौदा जन्म मध्यंतरीं दोन जन्मांमधला नेहमींच़ा काल न ज़ातां लागोपाठ होतात. सामान्य माणूस मृत्यूनंतर भुवर्लोक व स्वर्गलोक यांत बरींच़ वर्षें घालवितो आणि मगच़ पुढील जन्म घेतो. पहिल्या महादीक्षेनंतर प्रायः माणसाच़ा एक जन्म झ़ाल्यावर तत्काळ दुसरा होत असतो; कारण मध्यंतरींच्या काळांत जी वाढ व्हावयाची ती जिवंतपणीं करण्याचें सामर्थ्य त्याला आलें असल्यामुळें त्यासाठीं त्याला निराळा काळ द्यावा लागत नाहीं. म्हणूनच़ नुसत्या काळाच़ाच़ हिशेब केला तर या शेवटच्या च़ौदा जन्मांच़ा काळ पूर्वींच्या जन्मांच्या मानानें फारच़ अल्प दिसतो. पण यावरून हा मार्ग सोपा व छोटा आहे असें वाटण्याचें कारण नाहीं. दहावीस वर्षें हळूंहळूं वाढून ज़ोमदार झ़ालेलें आंब्याचें झ़ाड, योग्य वेळ आली असतां एकदम मोहोर धरतें आणि चारपांच महिन्यांत पक्व फळें उत्पन्न करतें हें आपण पहातोंच़.

या मार्गावरील विकास सर्वांगीण असतो. ज्ञान, क्रिया व आनन्द (अर्थात् भक्ति व भावना) या तिन्हीं अंगांच़ा संपूर्ण विकास या मार्गावर होत असतो. ज्या ज्या गोष्टी माणसाच्या स्वभावांत सध्यां थोड्याशा विकसित झ़ाल्या आहेत त्या साऱ्या या मार्गावर पूर्णपणें फुलतात. ज्या अद्यापि बीजरूप अतएव सुप्तावस्थेंत आहेत त्याहि साऱ्या पूर्णपणें वाढतात. हा मार्ग च़ालून संपला कीं माणसाची अमुक एक बाज़ू फुलून अद्यापि परमोच्च स्थितीस ज़ावयाची शिल्लक राहिली आहे असें असत नाहीं. अर्थात् या सर्वांगीण विकासाच्या परिपूर्णावस्थेमध्यें अशा कितीतरी बाज़ू येत असणार कीं ज्यांची कल्पनाहि आपणांला सध्यां होणार नाहीं. अर्थात् त्यांच़ें वर्णन करतां येणें दुरापास्त होय.

संयोजना

माणसाच्या पायांत अनेक बेड्या किंवा बंधनें आहेत. या मार्गावर तो तीं बंधनें हळूंहळूं तोडतो आणि तीं सारीं तुटलीं म्हणजे सरतेशेंवटीं तो पूर्णपणें मुक्त किंवा मोकळा व स्वतंत्र होतो, अशी कल्पना मनासमोर उभी करून बुद्धधर्मानें या मार्गाच़ें वर्णन केलें आहे. या दृष्टीनें पाहिलें तर पहिल्या महादीक्षेनंतर माणसाला तीन बेड्या किंवा 'संयोजना' तोडाव्या लागतात. त्या तुटल्या म्हणजे तो दुसऱ्या महादीक्षेच़ा अधिकारी होतो. या तीन संयोजनांचीं पाली भाषेंतील नांवें सक्कायदिठ्ठी, विचिकिच्छा, सीलबत्तपरामास अशीं आहेत. या तिहींच़े संस्कृत भाषेंतील पर्यायशब्द अनुक्रमें स्वकायदृष्टि, विचिकित्सा व शीलव्रतपरामर्ष असे आहेत. स्वकायदृष्टि, म्हणजे मीं वेगळा आहे, माझ़ें हिताहित इतरांपेक्षां वेगळें आहे ही भावना होय. हिला देहबुद्धि असें म्हटलें तरी च़ालेल. ही सुटून मीं ईश्वरी जीवनाच़ा एक अंश आहे असें माणसास प्रत्यक्ष अनुभवानें पटावयास पाहिजे असतें. विचिकित्सा म्हणजे संशय. कर्माचा नियम व पुनर्जन्माचा सिद्धान्त यांविषयींच़ा हा संशय असतो. हा संशय मुमुक्षूला नाहींसा करावा लागतो. तो भोळ्या भावानें नाहींसा करून संशयाच्या ज़ागीं अंधश्रद्धेची स्थापना करावयाची असते असें मात्र बिलकुल नाहीं. अंतःस्फूर्तीनें म्हणा, पूर्वजन्मींची आठवण होण्याच़ें योगसामर्थ्य मिळवून म्हणा अथवा बुद्धीस तें सत्य पूर्णपणें पटल्यामुळें म्हणा तो संशय नाहींसा व्हावा लागतो. हा सब
ंध मार्ग अंधश्रद्धेच़ा नाहीं, डोळसपणाच़ा आहे, हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. शीलव्रतपरामर्ष म्हणजे मोक्षमार्गावर प्रगति होण्यासाठीं कर्मकांडाच़े विधि अवश्य असतात ही समज़ूत होय. कर्मकांड उपयोगी असेल; पण तें आवश्यक नाहीं. त्याशिवाय माणसाच़ें च़ालूं शकतें. कर्मकांड हें आत्मप्रत्ययाची ज़ागा कदापि घेऊं शकणार नाहीं, त्यावर प्रगतीसाठीं अवलंबून राहणें च़ूक आहे, ही समज़ूत माणसाला आली म्हणजे ही तिसरी संयोजना तुटते. [आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते। योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते।। (गीता ६,३)  म्हणजे योगारूढ होऊं इच्छिणाऱ्यास कर्मकांड हें प्रगतीच़ें कारण (साधन) होतें, पण योगारूढ झ़ाल्यावर कर्माच़ा उपशम (कर्माच़ा त्याग) पुढील प्रगतीच़ें साधन होतें असें भगवान् म्हणतात.]

दुसरी  महादीक्षा

मग मुमुक्षूला दुसरी महादीक्षा दे
ण्यांत येते. हा विधि स्वर्लोकाच्या (मनोलोकाच्या) भूमिकेवर करण्यांत येतो. मनोदेहानें स्वतंत्र व्यवहार करण्याची शक्ति माणसाला प्राप्त झ़ाली असल्याखेरीज़ त्याला ही दीक्षा देण्यांत येत नाहीं. मनोदेहानें माणसाला स्वर्गलोकींच्या भूमिकेवर व्यवहार करतां येत असतो. स्वर्गलोकांत निरनिराळ्या दर्जाचीं माणसें मरणोत्तर सुखभोग भोगीत असतात. त्यांची परिस्थिति लक्षांत घेऊन त्यांच्या विकासास परोपरीनें साहाय्य करण्याची कला या दीक्षेच्या पूर्वीं मुमुक्षूला साध्य करावी लागते. दुसऱ्या दीक्षेच्या वेळीं उमेदवाराला त्याबद्दल प्रश्न विचारण्यांत येत असतात व ज़र या कामाच़ा त्याला पुष्कळ अनुभव असला तरच़ तो त्या प्रश्नांचीं समाधानकारक उत्तरें देऊं शकतो. पहिल्या महादीक्षेच्या वेळीं मुमुक्षूला जें ज्ञान व जी शक्ति देण्यांत आली होती तिच़ा त्यानें लोकहितार्थ कसा काय उपयोग केला आहे ह्याचीहि चौकशी ह्या विधीच्या वेळीं केली ज़ाते आणि ज्या लोकांस त्याच़ें साहाय्य झ़ालें असेल त्यांना बोलावण्यांत येऊन त्यांच्याकडून त्या गोष्टी वदविण्यांत येतात. पहिल्या महादीक्षेच्या वेळीं उमेदवाराच़ा पुरस्कार करण्यास ज़से दोन जीवन्मुक्त पुरुष लागतात तसे ते या दीक्षेच्या वेळींहि अवश्य असतात. पूर्वींच्या दीक्षेप्रमाणें या दीक्षेच्या प्रसंगींहि मुमुक्षूला नवीन शक्ति, नवीन ज्ञान व नवीन उपदेश हीं देण्यांत येतात आणि योग्य क्षणीं सनत्कुमारांचा तारा प्रकाशित होतो. या विधीच्या वेळीं मनोदेह एकदम मोठा विशाल होऊन त्यांतल्या शक्ति झ़पाट्यानें विकास पावतात. या दीक्षेला बुद्धधर्मांत सकृदागामिन् असें नांव आहे. हिंदुधर्मांतलें संस्कृत नांव 'कुटीचक' आहे. याच़ा उत्तानार्थ (लौकिक ग्रंथांत) झ़ोंपडी बांधून गांवाबाहेर राहणारा असा दिलेला असतो. पण वास्तविक गूढार्थ असा कीं, या स्थितींत नवीन सूक्ष्मदेहाच्या निरनिराळ्या योगसिद्धि त्यास शिकविल्या ज़ातात. अर्थात् सूक्ष्मदेह ही त्याची नवीन कुटी बांधली ज़ाते. दुसऱ्या महादीक्षेच्या वेळीं मनोदेहाची एकदम फार वाढ होत असली, तरी त्या मनाच्या वाढलेल्या शक्ति तत्काळ मेंदूच्या द्वारां प्रकट होत नाहींत. त्यांच़ा मेंदूवर फार ताण पडत असल्यामुळें त्या हळूंहळूंच़ मेंदूच्या द्वारानें व्यक्त होऊं शकतात व ती क्रिया संपूर्ण होण्याला पुष्कळ वर्षांच़ा अवधि लागतो. पहिल्या महादीक्षेच्या पूर्वीं मुमुक्षु रात्रीं वासनादेहानें भुवर्लोकांत वावरून परोपकाराच़ें काम करण्यास शिकलेला असतो. ती कला साधल्यावर त्यास मनोदेहानें स्वर्लोकांत हिंडून कार्य करण्याच़ा उद्योग शिकावा लागतो. तो नीटपणें करतां आला म्हणजे त्याच्या दुसऱ्या महादीक्षेच़ा समय येतो. मनोदेहानें स्वर्गलोकांत कार्य करीत असतांना एकदम वासनादेहानें त्यास भुवर्लोकांत दृश्य व्हावयाच़ें असेल तर योगशक्तीनें त्यास भुवर्लोकांतील द्रव्याच़ा एक तात्पुरता देह निर्माण करणें अवश्य होतें. ही क्रिया आपल्या जीवन्मुक्त गुरूंपासून मुमुक्षूला प्रथम शिकावी लागते व दुसऱ्या महादीक्षेच्या ज़रा पुढेंमागें ती मुमुक्षूला शिकविण्यांत येते. स्वर्लोकांत मनोदेहानें हिंडत असतांना ज़रूर तेव्हां एकदम भुवर्द्रव्याच़ा तात्पुरता देह उत्पन्न करून त्या देहानें भुवर्लोकांतील अवश्य तो उद्योग करावा व तो झ़ाल्यावर तो तात्पुरता देह वितळून विसर्जन करावा, ही क्रिया मुमुक्षूला फार उपयोगी पडते. अन्य रीतीनें न होणारे अनेक उद्योग या युक्तीनें त्याला करतां येतात. या तात्पुरत्या देहाला 'मायावी रूप' असें म्हणतात.

धोक्याची  ज़ागा

या मार्गानें ज़ाणें म्हणजे डोंगराचा उभा
च़ढाव च़ढण्यासारखें आहे हें पूर्वीं सांगितलेंच़ आहे. अर्थात् हा उत्क्रांतीच़ा कठीण च़ढाव च़ढत असतांना कोठेंहि माणसाच़ा पाय घसरण्याच़ा संभव असतो. पांच़वी महादीक्षा मिळवून माणसानें मुक्तिपद गांठलें कीं माणूस सर्वथा सुरक्षित झ़ाला असें मानतां येईल. पण त्या परमपदाची प्राप्ति होईपर्यंत या मार्गावर अमुक एका ठिकाणीं माणूस घसरणार नाहीं अशी कधींच़ ग्वाही देतां येत नाहीं. कृत्रिम हवामान उत्पन्न करून ज़सें प्रयोगशाळेंत एखादें झ़ाड आपण लवकर लहानाच़ें मोठें करतों, त्याप्रमाणें मुद्दाम तीव्र प्रयत्न करून माणूस आपली वाढ या मार्गावर अत्यंत जलदीनें करीत असतो; आणि म्हणूनच़ त्या प्रयत्नांत कांहीं तरी गोम राहण्याच़ा संभव पुनः पुनः उत्पन्न होत असतो. पाय घसरण्याची ज़री अनेक ठिकाणीं शक्यता असली तरी या दुसऱ्या महादीक्षेनंतरच़ा या मार्गावरच़ा कांहीं भाग त्यांतल्या त्यांत अधिक धोक्याच़ा असतो आणि या ठिकाणींच़ माणूस घसरून त्याचें अधःपतन होण्याची विशेष भीति असते. असले अधःपात झ़ाले कीं माणूस मार्गभ्रष्ट होऊन कधीं कधीं कित्येक जन्महि फुकट घालवितो. दुसऱ्या महादीक्षेनंतर मनाच्या शक्ति एकदम वाढतात आणि मुमुक्षूच्या हृदयांत ज़र अभिमानाच़ें मूळ खोल कोठें तरी लपून राहिलेलें असलें तर तें या प्रसंगीं जीव धरून वर येतें. मग त्या अभिमानाच्या ज़ोरावर भलत्या गोष्टी करून माणूस मार्गच्युत होण्याचा संभव असतो. सर्वतोपरी तो सावध नसेल, अहंभाव, स्वार्थ, दुराग्रह, आकुंचितपणा यांचीं हृदयस्थ बीजें त्यानें पूर्वीं अगदींच़ ज़ाळून टाकलेलीं नसतील, तर या ठिकाणीं माणसाला विशेष धोका असतो.

दुसऱ्या महादीक्षेपासून तिसऱ्या महादीक्षेपर्यंतच़ा ज़ो काल आहे त्यांत आणखी कांहीं बंधनें अथवा बेड्या तोडण्याच़ा भाग असत नाहीं. पण पुष्कळदां या काळांत योगसिद्धींच़ा विकास होत असतो. मात्र या काळीं सर्व मुमुक्षूंच्या सिद्धि विकसित होतातच़ असा नियम नाहीं.

पहिली महादीक्षा घेतलेल्या माणसाला 'स्रोतापन्न' असें बुद्धधर्मांतलें नांव आहे. स्रोतापन्न म्हणजे प्रवाहांत प्रविष्ट झ़ालेला. हा मार्गरूपी प्रवाह त्याला परमपदापर्यंत पोहोंच़विणारा असतो. दुसरी महादीक्षा घेतलेल्या मुमुक्षूला 'सकृदागामिन्' असें बौद्ध नांव आहे. 'सकृदागामिन्' म्हणजे ज्याला पुढें एकदांच़ जन्म घेणें उरलें आहे तो. सामान्यतः
अपेक्षा अशी असते कीं दुसरी महादीक्षा घेतल्यानंतर त्याच्या पुढच्याच़ जन्मीं तिसरी व चवथी अशा दोन्हीं महादीक्षांचा तो मुमुक्षु अधिकारी व्हावा. तिसरी महादीक्षा घेतलेल्या माणसाला 'अनागामिन्' म्हणजे 'पुन्हां जन्म न घेणारा' असें नांव बुद्धधर्मानें दिलेलें आहे; कारण असें कीं ज़ो 'अनागामिन्' झ़ाला तो बहुशः त्याच़ जन्मीं च़वथी महादीक्षा घेऊन 'अर्हत्' होतो. अर्हत् झ़ालेल्या माणसाला पुनः पृथ्वीवर जन्म घेणें अवश्य नसतें. त्याच़े पुढील जन्म सूक्ष्म भूमिकांवर झ़ाले तरी च़ालतें. पण पृथ्वीवर लोकसंग्रहाची आवश्यकता फार असल्यामुळें अर्हत् पदवी मिळविलेले पुरुषहि प्रायः आपले पुढील जन्म पृथ्वीवरच़ घेतात. अर्हत् पदवी मिळाल्यावर सामान्यतः सात जन्मांनीं माणूस पांच़वी दीक्षा घेऊं शकतो, असा हिशेब आहे. पहिल्या दीक्षेपासून पांच़वीपर्यंत च़ौदा जन्म लागतात; तेव्हां नुसत्या जन्मांच्या संख्येवरून हिशेब केल्यास अर्हत् पदवी देणारी च़वथी महादीक्षा या मार्गाच्या मध्यबिंदूशीं येते असें एका दृष्टीनें म्हणतां येईल. पांच़व्या महादीक्षेंतून मुमुक्षु पार पडला म्हणजे बुद्धधर्मांत त्याला 'अशेख' म्हणतात. अशेख म्हणजे अ-शिष्य; ज्याला आतां कांहीं शिकावयाच़ें उरलें नाहीं तो, शिष्य नाहीं असा. हिंदुधर्मांतहि या पायऱ्यांना व्यवस्थित नांवें असलीं पाहिजेत. पण ग्रंथांतील नांवांच्या नक्की अर्थाविषयीं तितका निश्चितपणा वाटत नाहीं. पहिली महादीक्षा घेतलेल्या पुरुषाला बहुशः 'बहूदक' म्हणतात असें वाटतें. दुसरी घेतलेल्याला 'कुटीचक' म्हणतात. 'बहूदक' म्हणजे बहुत तीर्थें हिंडलेला, कोणत्याहि एका स्थानास बद्ध अगर आसक्त नसलेला असा आहे. कुटीचक याचा अर्थ वर आलाच आहे. ज्या मुमुक्षूला तिसरी महादीक्षा मिळाली त्याला हंस हें नांव असावें. हंस याच़ा एक अर्थ सोहम् असा आहे. हंस नीरक्षीरविवेक करूं शकतो, अर्थात् नित्यानित्यविवेक करूं शकतो, या दृष्टीनें हंस हें नांव दिलेलें असावें. च़वथी महादीक्षा घेतलेला ज़ो अर्हत् त्याला संस्कृतांत परमहंस म्हणतात. पांच़वी घेतल्यावरचीं संस्कृत नांवें 'मुक्त', 'अतीत' अशीं आहेत. [या पुस्तकाच्या शेवटीं 'दीक्षांचीं नांवें' म्हणून परिशिष्ट दिलें आहे तें पहा.] 

तिसरी  महादीक्षा

तिसरी महादीक्षा सनत्कुमार स्वतः देतात किंवा आपल्या हाताखालच़े जे तीन कुमार त्यांपैंकीं कोणास तरी देण्यास सांगतात.
ही दीक्षा दुसऱ्या कुमारांच्या हस्तें देण्यांत आली असली तर दीक्षेनंतर मुमुक्षूला सनत्कुमारांसमोर हज़र करण्याच़ा विधि केला ज़ातो. तिसरी महादीक्षा झ़ाल्यावर पुढें दोन संयोजना तोडाव्या लागतात. त्यांचीं बौद्ध नांवें 'कामराग' व 'पतिघा' अशीं आहेत. कामराग म्हणजे वासना तृप्त करण्याविषयींची आसक्ति. पतिघा म्हणजे क्रोध. ज़ो माणूस तिसऱ्या महादीक्षेच्या पुढें गेला त्याच्या ठायीं सामान्यतः समाजांत आढळणाऱ्या वाईट वासना व क्रोध हे ढोबळ दोष शिल्लक असतील हें संभवत नाहीं. असल्या माणसाच्या अंतरंगांतील सर्व ढोबळ दोष पूर्वींच़ नाहींसे झ़ालेले असणार. पण ढोबळ प्रकार गेले असले तरी हेच़ दोष पुनरपि नाज़ूक, सुंदर व मोहक अशीं नाना स्वरूपें घेऊन मानवी हृदयांत लपून राहूं शकतात.  या मार्गावरील दोषांस जीं नांवें दिलेलीं आहेत त्यांच़ा उत्तान अर्थ येथें अभिप्रेत नाहीं. ज़ो माणूस या मार्गाकडे वळतो त्याच़ें अंतरंग जगांतील बहुजनसमाजाच्या मानानें निर्मळच़ असतें. ज़र तें जगाच्या दृष्टीनेंहि घाणेरडें असेल तर तो या मार्गाकडे वळणारच़ नाहीं. पण जगाच्या रीतीनेंहि माणूस अगदीं च़ांगला असला तरी या मार्गावरील कसोटी लावल्यास तो पुष्कळच़ हिणकस ठरण्याच़ा संभव असतो. या हिणकस भागांस अगदीं निराळीं नांवें देतां आलीं असतीं तर बरें झ़ालें असतें. पण भाषेंत तितकी शब्दसंपत्ति नाहीं. सामान्य माणसाला ज़ो क्रोध येत असतो तो सर्वांच्या परिचयाच़ा आहे. मुमुक्षु मार्गावर ज़ो आला त्याच्या अंगांत तो क्रोध बिलकुल नसतो. उलट तो माणूस जगाच्या दृष्टीनें अगदीं शांत असा ठरण्याज़ोगा असतो. ज्या गोष्टी दुसऱ्यानें केल्या असतां सामान्य प्रतीच़ा माणूस संतापेल त्या गोष्टींनी हा माणूस आपली शांति किंचितहि ढळूं देणार नाहीं. पण जरी वर वर पाहतां हा माणूस जगाला अगदी शांत दिसला, तरी त्याच्या अंतरंगांत जास्त तलम स्वरूपाचे झिरझिरीत व मोहक असे क्रोधाचे अनेक प्रकार शिल्लक राहिलेले असतात. हे क्रोधाच़े प्रकार असे असतात कीं, जग त्याला कदाचित् क्रोध म्हणून ओळखूंहि शकणार नाहीं. किंबहुना न्यायनिष्ठुरता, अब्रूदारपणा, ताठपणा, तल्लखपणा, इभ्रत, सात्त्विक रोष, स्वाभिमान, प्रतिष्ठा, कर्तृत्व, हुकमत, रुबाब, सामर्थ्य, अशीं शेंकडो आकर्षक नांवें जग त्या क्रोधाला देऊन तो दोष नसून गुण आहे असेंहि भासवील. असल्या प्रकारच्याच़ दोषांच्या बेड्या या मार्गावर तोडावयाच्या शिल्लक असतात, हें वाचकांनीं लक्षांत ठेवावें. त्या बेड्यांस कामराग, विचिकित्सा अशीं ज़री नांवें असलीं व त्या नांवांच़ा लौकिक अर्थ ज़री कांहींहि होत असला तरी त्या उत्तान अर्थावरून कोणींहि स्वतःची गैरसमजूत करून घेऊं नये. या मार्गावरील बेड्यांस जे शब्द योजलेले आहेत त्या सर्वांसंबंधानेंच़ आमचें असें म्हणणें आहे. त्यांचे ढोबळ अर्थ या मार्गावर लागू पडणार नाहींत.

चौथी  दीक्षा  व  अवीचि

कामराग व पतिघा
या बेड्या तुटल्या म्हणजे मुमुक्षु च़ौथ्या महादीक्षेपाशीं येऊन पोहोंच़तो. या पायरीपाशीं आलेल्या मुमुक्षूला एका भयंकर प्रसंगांतून ज़ावें लागतें. अगोदर त्याच़ा थोडाफार लौकिक झ़ालेला असतो आणि जनता त्याला मान देत असते. मग कांहीं तरी आकस्मिक कारण उद्भवतें, आणि त्याच्याविषयीं एकादी विलक्षण गैरसमज़ूत लोकांत पसरून सर्व लोक त्याच्यावर उलटतात. सर्वच़ लोक, त्याच़े इष्टमित्रहि त्याच्या नीतिमत्तेसंबंधानें सुद्धां संशय घेऊं लागतात; व त्याच्या प्रत्येक शब्दाच़ा भलता अर्थ करूं लागतात. या प्रसंगीं कित्येकदां त्यास आत्यंतिक दारिद्र्य येतें व कधीं कधीं देहाच़े भयंकर रोगहि त्याला ज़डतात. कांहींतरी अनपेक्षित निमित्त होऊन त्याच़ेवर खून, व्यभिचार, वगैरेंसारख्या भयंकर अपराधांच़े आरोपहि येतात. या वेळीं अशा रीतीनें तो मुमुक्षु अगदीं एकटा पडतो. अगदीं जिवलग स्नेहीहि कांहींतरी कारणानें त्याच्यावर उलटलेले आढळतात. बाहेरून अशी मानखंडना व पाणउतारा होत असतो. मान खालीं करावयास लागावी अशी भोंवतालची परिस्थिति झ़ालेली असते आणि आंतून ज़र तो त्यावेळीं निश्चल राहिला तर त्याच्या गळ्यांत विजयश्रीची माळ पडत असते. या प्रसंगीं मुमुक्षूला फार दुःख भोगावें लागतें, जग त्याला पायाखालीं तुडवतें, जगाच्या दृष्टीनें त्याच़ा पूर्ण अधःपात झ़ालेला असतो. पण अंतरंगाच्या भूमिकेवर त्याची फत्ते होत असते, आणि त्या जयाची जगाला वार्ताहि नसते. या दुःखांपासून मुमुक्षु नवीन धडे शिकतो. त्याचे दुःखभोग प्राचीन काळचीं पूर्वकर्मांचीं देणीं देण्यापायीं खर्च़ पडतात; आणि त्याच्या सुटकेच़ा समय त्यामुळें कांहींसा ज़वळ येतो. या महादीक्षेच्या समारंभाच्या वेळीं 'अवीचि' नांवाची एक अत्यंत दुःखाची अवस्था मुमुक्षूला अनुभवावी लागते. आपण सर्व विश्वांत एकटे पडलों आहोंत, त्या भयाण एकांतांत आपल्या हृदयांतलें सर्व जीवन आटून गेलें आहे, परमेश्वराच़ें सर्व सृष्टीच्या अणुरेणूंतून वाहणारें जें जीवन, त्याच्याहिपासून आपली संपूर्ण ताटातूट झ़ाली आहे, असा मुमुक्षूला त्या वेळीं अनुभव वाटतो. हा अनुभव क्षणैकच़ असतो; पण त्या भूमिकेवर दिक् व काल यांचें अस्तित्व नसल्यामुळें मुमुक्षूला ती स्थिति अनाद्यनंतशी भासते. हा अनुभव पराकाष्ठेच़ा भयंकर असून मुमुक्षूचा थरकांप करून टाकतो. कांहीं मुमुक्षु या भीषण परीक्षेला टिकत नाहींत. ते या प्रसंगीं खच़ून ज़ातात. तसें झ़ालें तर या दीक्षाद्वाराज़वळून घसरून ज़ाऊन ते मागें पडतात व त्यांना योग्य तो अधिकार पुन्हां संपादन करण्यासाठीं हा च़ढाव ज़णूं पुनः च़ढावा लागतो. आपण सर्वतोपरी एकाकी राहिलों व बाह्य सृष्टीपासून आपला संबंध सर्वस्वी तुटला तरी आंतून आपण ईश्वराशीं खरोखरी एक आहों. बाह्यवस्तुमात्रापासून होणारी ताटातूट व तीपासून उत्पन्न होणारें भय, ही सारी माया आहे, हें मुमुक्षूला शिकवून अंतर्यामींच्या आत्मजीवनाच्या आत्यंतिक सत्याच्या बैठकीवर त्याचें आसन घट्ट बसविण्याकरितांच़ या वेळीं त्याच़े सारे बाह्य आधार काढून घेऊन त्याला अवीचीच़ा दारुण अनुभव देण्यांत येत असतो.

अर्हत् पदवी मिळाल्यावर पांच़व्या दीक्षेच्या तयारीकरितां पुढें पांच़ संयोजना तोडाव्या लागतात. त्यांचीं नांवें -- रूपराग (सरूप स्थितींत, व्यक्त स्थितींत असण्याची आसक्ति), अरूपराग (अव्यक्त सृष्टींत राहण्याची कामना), मान (अभिमान), उद्धच्च (अहंता), व अविज्या (अविद्या) अशीं आहेत. हे शब्द खोल अर्थानें घेतले पाहिजेत हें उघड आहे. त्यांच़ा नक्की अर्थ काय, त्या स्थितींत कोणते दोष निर्मूल करावयाच़े राहिलेले असतात हें सामान्य प्रतीच्या माणसानें कसें सांगावयाच़ें ?


सरतेशेवटीं

हा उद्योग संपल्यावर
माणूस पांच़व्या महादीक्षेच्या द्वारामधून पुढें ज़ातो आणि मुक्त होतो. आपल्या मानानें त्या स्थितीला सर्वांगपरिपूर्ण व सर्वज्ञ अशीं विशेषणें शोभतील. या स्थितीला माणूस पोहोंचला म्हणजे त्याची इतिकर्तव्यता संपली व त्यानें आपलें परमध्येय गांठलें असें होतें. उत्क्रांतिदृष्ट्या ही उंची इतकी आहे कीं, सामान्य माणसाला त्याची कल्पना येणार नाहीं. अर्थात् ती कल्पना आम्हांला आमच्या वाचकांसमोर व्यक्त करणें केवळ अशक्य होय. ज्या अवस्थेच़ें ऐश्वर्य आमच़ें आम्हांलाच़ आकलन होत नाहीं त्याच़ें वर्णन आम्हीं शब्दांनीं दुसऱ्यास कसें सांगणार ?  आणि ज़री आम्हीं स्वतः त्याची कल्पना करूं शकलों तरी ती कल्पना व्यक्त करावयाला शब्द कोठून आणावयाचे ?  ओढून ताणून कोणते तरी शब्द आणले तर ते वाचकांच्या मनांत गैरसमज़ मात्र उत्पन्न करतील. तेव्हां ही परमोच्च व सर्वांगपरिपूर्ण स्थिति कल्पनातीत व अनिर्वचनीय आहे इतकेंच़ म्हणून स्वस्थ बसणें भाग आहे.

या मार्गावरून मुमुक्षु पुढें पुढें ज़ात असतांना त्याच्या अंतर्यामीं नवीं नवीं दालनें खुलीं होत असतात हें आम्हीं पूर्वीं सांगितलेंच़ आहे, पहिल्या महादीक्षेच्या वेळीं गीतेंत ज्याला 'बुद्धि' म्हटलें तें अंतःप्रज्ञेच़ें दालन उघडतें. या दालनाच़ें वैखरी वाणीनें वर्णन करतां येणें शक्य नाहीं. येथें मीं व तूं हा भेद मावळल्याची साक्षात्प्रचीति येते. इतर जीव आपल्यामध्यें साक्षात् आले आहेत, आपण साक्षात् इतर सर्वांमध्यें आहों असा अनुभव येथील ज़ाणिवेला येतो. आपलेपणा नाहींसा होत नाहीं, पण आपलेपणाच्या कक्षेंत इतर जीव येत असतात. आपण स्वतः अस्तित्वांत आहों ही प्रतीति ज़ात नाहीं, पण 'आपण स्वतः' यामध्यें इतरांच़ा समावेश झ़ाल्याच़ा माणसाला प्रत्यय येतो. या अनुभवापूर्वीं माणूस दुसऱ्याकडे जेव्हां पाही तेव्हां तो 'दुसरा' आहे असें त्याला वाटत असे. तो दुसऱ्याकडे जणूं बाहेरून पहात आहे अशी स्थिति असे. आतां ही नवीन ज़ाणीव फुलल्यावर ज्याला आपण 'दुसरा' असें म्हणत होतों तो आपलाच़ एक भाग आहे, तो आपल्यांतच़ समाविष्ट आहे, आपण त्याकडे बाहेरून न पाहतां आंतून जणूं पाहात आहों असा त्याला साक्षात् प्रत्यय मिळतो. अर्थात् माणूस दुसऱ्या माणसाकडे स्वतःसारखें पाहूं शकतो, तो म्हणजे आपणच़ आहों, त्याच़े विचार, त्याच़े हेतु, त्याच्या भावना या आपल्याच़ आहेत हें तो अनुभवूं शकतो. या स्थितींत 'सर्व चराचर हें माझ़ेंच़ शरीर आहे' असें भासूं लागलें हें वामन पंडितांच़ें वर्णन अगदीं यथार्थ आहे. 'यत्र हि द्वैतमिव भवति तदितरं इतरं पश्यति। यत्र त्वस्य सर्वमात्मैवाभूत् तत्केन कं पश्येत् ?' म्हणजे जेथें दोन असतात तेथें एक दुसऱ्याला पाहतो. पण ज्याला सर्व आत्मा झ़ाला त्याच़े बाबतींत कोण कोणाला पाहणार ? असें बृहदारण्यक उपनिषदांतील वर्णन आहे.

पहिल्या महादीक्षेच्या वेळीं या ज़ाणिवेच्या दालनांत माणसाच़ा प्रवेश होतो. पण ही ज़ाणीव त्याच्या अंतरंगांत पूर्णपणें त्या वेळीं फुलत नाहीं. ती स्फुरण्यास फक्त सुरुवात झ़ालेली असते. पहिल्या महादीक्षेच्या पुढील मार्गावर वाटच़ाल करीत असतांना ही नवीन ज़ाणीव पायरीपायरीनें हळूंहळूं पक्व होत ज़ाते आणि एकत्वाच़ा अनुभव जास्त खोल होऊं लागतो, व शेवटीं माणूस सर्वांशीं संपूर्णपणें समरस होतो. या ज़ाणिवेच़ा प्रथमतः जेव्हां उदय होतो तेव्हां ती ज़ाणीव व्यक्त करणाऱ्या देहाची अथवा कोषाची बांधणी झ़ालेली नसते; पण पुढें हळूंहळूं तो देह दैनंदिन अभ्यासानें बांधला जाऊन पूर्णत्वास येऊन पोहोंचतो. ह्या ज़ाणिवेची छाया मेंदूवर संपूर्णपणें पडली म्हणजे जगांतील सर्व पदार्थांची व जीवांची किंमत माणसाला निराळी दिसूं लागते; आणि स्वतःचे जे जगताशीं संबंध आहेत त्यांकडे तो अगदीं नव्या चष्म्यानें पहावयास शिकतो. या नवीन ज़ाणिवेच़ा परिपूर्ण विकास झ़ाला म्हणजे मुमुक्षु अर्हत् पदवीपाशीं आलेला असतो. तेव्हां पहिल्या महादीक्षेपासून च़ौथ्यापर्यंतचें कार्य म्हणजे या नवीन ज़ाणिवेच्या विकासास प्रारंभ करून तो परिपूर्ण करणें हें असतें असें एका दृष्टीनें म्हणतां येईल.

अर्हत्
पदवीच्या दीक्षेच्या वेळीं आणखी एक वरच़ें दालन उघडतें. यो बुद्धेः परतस्तु सः। म्हणजे बुद्धीच्या पलीकडे ज़ो असतो तो आत्मा होय असें गीतेनें सांगितलें आहे. बुद्धीच्या पलीकडील ही जी ज़ाणिवेची पायरी आहे, तिला आत्म्याची ज़ाणीव असें म्हणतां येईल. तिलाच़ निर्वाणस्थिति असेंहि म्हणतात. च़वथ्या महादीक्षेच्या वेळीं या निर्वाणस्थितीच्या ज़ाणिवेचा माणसाला अनुभव देणें अवश्य असतें. मग पुढील प्रगति करीत असतांना अर्हताला त्याच़ ज़ाणिवेंत खोल खोल शिरून ती ज़ाणीव पूर्णपणें हस्तगत करावी लागते. हें काम अत्यंत कठीण असतें व तें पुरें साधण्यास अनेक जन्म लागतात.

[निर्वाणस्थितीच़ें वर्णन वैखरी वाणीला करतां येणार नाहीं म्हणून आम्हीं तो प्रयत्न या पुस्तकांत केलेला नाहीं. त्या स्थितीच़ें थोडेंसें वर्णन लेडबीटरकृत The Masters and the Path या पुस्तकांत सांपडेल. डॉ.अरुंडेल यांच्या Nirvana नामक पुस्तकांत अधिक सरस वर्णन आहे. पण शब्दांनीं कितीहि च़ांगलें वर्णन केलें तरी तें लंगडें पडतें असें तज्ज्ञ सांगतात.]

या मार्गावर प्रगति करीत असतांना अशा तऱ्हेनें ज़ाणिवेचीं खोल खोल दालनें मुमुक्षूच्या अंतर्यामांत उघडत असतात हें वाचकांच्या ध्यानांत येईल. मुमुक्षूला ती सारी ज़ाणीव प्रारंभीं स्थूल देहाच्या मेंदूंत आणतां येत नाहीं. तथापि नवें दालन खुलें झ़ालें कीं, त्यांतली ज़ाणीव
मनाच्या पार्श्वभागीं सदैव खडी असते आणि कालगत्या मेंदूवर ती आपलें तेज हळूंहळूं टाकूं शकते. पुढें जास्त प्रगति होऊं लागली म्हणजे ती ज़ाणीव मेंदूंत उतरूं लागते आणि सरतेशेवटीं मेंदूच्या द्वारानें यावत्-शक्य प्रकटहि होते. येणेंप्रमाणें या मार्गावर ज़सा ज़ाणिवेचा पायरीपायरीनें विकास होतो तशी निरनिराळ्या देहांची कार्यक्षमताहि वाढत ज़ाते. सामान्य प्रतीच़ा माणूस जागृत स्थितींत जडदेहाच़ा उपयोग करूं शकतो. त्याला व्यवहारासाठीं वासनादेहाच़ा उपयोग करतां येत नाहीं. तो माणूस झ़ोंपीं गेला कीं, त्याची जागृति संपते. झ़ोंपेंत त्याचा वासनादेह कांहीं उद्योग करूं शकत नाहीं. त्याची ज़रा अधिक प्रगति झ़ाली असेल तर त्याच़ा वासनादेह कार्यक्षम झ़ालेला असतो. स्थूलदेह झ़ोंपीं गेल्यावरहि तो मनुष्य वासनादेहानें भुवर्लोकाच्या क्षेत्रांत हिंडून फिरून नाना उद्योग करूं शकतो. त्याला तितकी कुवत असल्यास वासनादेहानें तो भुवर्लोकाच्या सरहद्दीपाशीं -- चंद्राच्या ज़वळहि -- ज़ाऊं शकेल. प्रायः पहिल्या महादीक्षेच्या अगोदर भुवर्लोकांत वासनादेहानें अनिरुद्ध संचार करून नाना उद्योग करण्याच़ें सामर्थ्य अंगीं आणावें लागतें. वासनादेह कार्यक्षम झ़ाला तरी प्रारंभीं मनोदेह निष्क्रिय असतो. पुढें त्याच्या क्रिया करण्याची विद्या शिकावी लागते आणि ती साध्य झ़ाल्यावर माणूस मनोदेहानें स्वर्गलोकांत पाहिजे तेथें ज़ाऊन नाना प्रकारच़े व्यवहार करतो. दुसऱ्या महादीक्षेच्या अगोदर या गोष्टी साध्य व्हाव्या लागतात. असेंच़ उत्तरोत्तर पुढें च़ालतें. एकेक नवा देह कार्यक्षम होऊन नव्या लोकांत हिंडून नाना व्यवहार करण्यास मनुष्य समर्थ होतो. या व्यवहारांपैंकीं जागृतींत मुमुक्षूला सर्वांची आठवण प्रारंभीं असते असें नाहीं. विशिष्ट देहानें विशिष्ट क्षेत्रांत निद्रेच्या वेळीं व्यवहार करावे व जागृत स्थितींत ते आठवूं नयेत अशी पुष्कळ मुमुक्षूंची स्थिति या मोक्षमार्गावर पुष्कळ कालपर्यंत असूं शकते. मेंदूंत सर्व आठवणींच़ा तपशील आला तर मेंदूवर ताण पडून जागृतींतील नेहमींचीं कामें नीटपणें पार पडण्याच्या कामीं विघ्न येण्याच़ा संभव असतो; आणि म्हणून पुष्कळ वेळां असल्या उद्योगांची आठवण मुद्दाम मेंदूंत आणली ज़ात नाहीं.  मात्र मुक्तीची अंतिम स्थिति गांठल्यावर त्या जीवन्मुक्त माणसाला सर्व देहांनीं त्या त्या भूमिकांवरच़े उद्योग उत्कृष्ट रीतीनें करतां येतात व त्या सर्वांची आठवण मेंदूंत संपूर्ण रीतीनें आणतां येते. असल्या शक्तींच़ा उपयोग करून जीवन्मुक्त दुसऱ्या गोलांवर ज़ाऊं शकतात. या सर्व गोष्टींच़ा विचार केला तर मुमुक्षु मार्गावरील उत्क्रांतीला पुष्कळच़ अंगें असतात हें वाचकांच्या ध्यानांत येण्यास उशीर लागणार नाहीं.

*  *  *  *  *

back to bindhast : home          अनुक्रमणिका         प्रकरण ११ : आध्यात्मिक विकास व त्याची दिशा