परिशिष्ट  पांचवें


पारिभाषिक  संज्ञांचें  कोष्टक


माणसाच़े निरनिराळे देह (कोष), ज्यांच्या द्रव्यांच़े ते बनलेले असतात ते लोक (Planes) अथवा त्या सृष्टि (Worlds); त्या सृष्टींचीं तत्त्वें, उपतत्त्वें, तन्मात्रा; देहभेदानें उत्पन्न होणऱ्या जीवाच्या अवस्था व संज्ञा, वगैरे सर्वांच़ा परस्परसंबंध एकदम लक्षांत यावा म्हणून या पुस्तकाच्या शेवटीं कोष्टक दिलें आहे. त्यांत उपतत्त्वें फक्त भूलोकाचींच़ दिलीं आहेत. त्यांच़े इंग्रजी थिऑसफ़ीय पर्यायशब्द भुवर्लोकाच्या (Astral Plane) रकान्यांत दिले आहेत. इतर लोकांचीं उपतत्त्वें तितकींच़ व त्यांच़े परस्परसंबंधहि तसेच़ आणि तत्सदृश असल्यामुळें त्यांच्या संज्ञा त्याच़ समज़ाव्या. अखेरच्या रकान्यांत महादीक्षा दिलेल्या आहेत. ज्या रकान्यांत ज्या दीक्षेच़ा उल्लेख आहे त्या लोकापर्यंत ती दीक्षा घेतलेल्या माणसाची संवित् व कार्यक्षमता असते, म्हणजे संचार होऊं शकतो असें समज़ावें. म्हणजे पहिली दीक्षा घेतलेल्या माणसाची संवित् व संचार भूलोक व भुवर्लोक या दोन सृष्टींतून एकसमयावच्छेदेंकरून असूं शकतो. पुढें हाच़ उत्तरोत्तर च़ढता क्रम समज़ावा.

हें कोष्टक [हें कोष्टक पुस्तकाच्या शेंवटीं दिलेलें आहे.] वाचकांना एकंदरींत मार्गदर्शक व्हावें असें आहे. पण त्या कोष्टकांतील कित्येक संज्ञांसंबंधानें मतभेद होऊं शकेल हें वाचकांनीं विसरूं नये. लोक सात आहेत. प्रत्येक लोकाच़े विभाग (उपलोक) हेहि सात आहेत. अर्थात् दर लोकांत व्यवहार करण्यास एक देह अथवा कोष लागत असल्यामुळें कोष व देहहि सात असले पाहिजेत. प्रत्येक लोकांत व्यवहार च़ालूं असतांना जी स्थिति असते तिला ज़र अवस्था म्हणावयाच़ें, तर अवस्थाहि सात असल्या पाहिजेत. अर्थात् साऱ्या संज्ञा सात सात असल्या पाहिजेत असें तत्त्वतः मानलें पाहिजे. पण ज़ुन्या वा नव्या ग्रंथांत तसें सर्वत्र सांपडत नाहीं. याच़ें एक कारण असें कीं, तत्त्वतः ज्या गोष्टी आवश्यक दिसतात तशी वस्तुस्थिति सदा असतेच़ असें नाहीं. उदाहरणार्थ, तत्त्वतः भूलोकांत एकच़ देह असला पाहिजे. पण खरोखरी अन्नमय व प्राणमय असे दोन देह असतात व अन्नमयापासून प्राणमय सुटा होऊन अंतरावर ज़ाऊं असतो. अन्नमय मेल्यावर प्राणमय कांहीं वेळ शाबूदहि राहूं शकतो. या दोहोंस मिळून तत्त्वतः स्थूलदेह असें नांव देण्यास प्रत्यवाय नाहीं व तसें कांहीं लोक करतात; पण वस्तुस्थिति नीट समज़ण्यासाठीं अन्नमय कोष, प्राणमय कोष अशीं दोन नांवें देणें अधिक उपयुक्त होतें व कांहीं लोक तसें करतात. ज़री कोषांचीं दोन नांवें दिलीं, तरी प्राणमय कोषांत असतांना माणसाला कोणत्याहि विशेष अवस्थेच़ा अनुभव घेतां येत नाहीं. तेव्हां दोन कोष व एक अवस्था यांच़ा पडताळा ज़ुळवावा लागतो. स्वर्लोकांत एका देहाऐवजीं दोन देह असतात. एकाच़ें नांव मनोदेह अथवा Mental Body आहे. त्यांत त्या लोकांतील सात उपलोकांपैंकीं (उपतत्त्वांपैंकीं) खालच़े चार असतात. दुसऱ्याच़ें नांव कारणदेह अथवा Causal Body होय. त्यांत बाकीच़े तीन उपलोक असतात. या प्रत्येकानें व्यवहार करीत असतांना वेगवेगळ्या अवस्थेच़ा अनुभव माणसाला येतो. अर्थात् या एका लोकांत दोन कोष व दोन अवस्था असतात असें म्हणणें वस्तुस्थितीस धरून होईल. थिऑसफ़ीच्या वाङ्मयांत ही दृष्टि अंगीकारून हे दोन कोष व या दोन अवस्था वेगवेगळ्या वर्णिल्या आहेत. हें वर्गीकरण स्वीकारल्यास एक कोष व एक अवस्था हीं जास्ती मानावीं लागतील.  नांवें देतांना पुष्कळ वेळां कांहीं लोक वस्तुस्थिति दृष्टीआड करून एखाद्या तत्त्वानुसार तीं देत असतात. उदाहरणार्थ, भुवर्लोकांत व्यवहार करूं शकणारा वासनादेह (Astral Body) व स्वर्लोकाच्या खालच्या चार उपलोकांत व्यवहार करूं शकणारा मनोदेह (Mental Body) असे दोन निरनिराळे देह माणसाला असतात. पण आपण ज्याला 'मन' असें एकच़ नांव देतों, आणि नेहमींच़े भावना-वासना-विचार यांच़े व्यवहार आपण ज्या एका मनामध्यें समाविष्ट करीत असतों, त्या एका मनाच़े आविर्भाव या दोन्हीं देहांत होत असल्यानें तात्त्विक दृष्ट्या मनाच़ें विवरण करणारे लोक त्या दोन्हीं देहांना मिळून मनोमय कोष किंवा सूक्ष्मदेह असें एकच़ नांव देतात. तत्त्वाच्या दृष्टीनें केलेली परिभाषा व वस्तुस्थिति पाहून केलेली परिभाषा यांमध्यें असा फरक पडतो.  ज्या गोष्टी सामान्य माणसाला फार दूरच्या असतात व जेथील वस्तुस्थिति त्याच्या आटोक्यांत येण्याच़ा बिलकुल संभव नसतो, तेथील परिभाषेंत वस्तुस्थितीला धरून नाना भाग-विभाग पाडल्यानें वर्गीकरणांत रिकामा बोज़डपणा येतो. यासाठीं पुष्कळ ग्रंथकार सात देह व सात अवस्था न सांगतां कमी देह व कमी अवस्था सांगतात. उदाहरणार्थ, मांडूक्योपनिषदामध्यें जागृति, स्वप्न व सुषुप्ति अशा तीनच़ अवस्था सांगितल्या आहेत. यावरून असें वाटतें कीं, या उपनिषदांत सर्व अवस्था या तिहींत समाविष्ट केल्या असाव्या व ज़री एकंदर सर्व अवस्था सात असल्या तरी या तिहींपैंकीं एकेकीच्या पोटांत एकापेक्षां जास्त अवस्था घातल्या असाव्या. या तिहींपैंकीं जागृति सर्वांच्या परिचयाची आहे. तेव्हां तिच्या पोटांत दुसऱ्या अवस्था घालतां येणार नाहींत. पण स्वप्न ही कमी परिचयाची अवस्था आहे आणि सुषुप्ति ही तर आणखी कमी परिचयाची आहे. तेव्हां या दोहोंच्या पोटांत जास्त अवस्थांच़ा समावेश या उपनिषदामध्यें केलेला असावा; किंवा कदाचित् असेंहि असूं शकेल कीं, मांडूक्योपनिषदांत अगदीं खालच्या तीन अवस्थाच़ काय त्या (जागृति, स्वप्न व सुषुप्ति) नमूद केल्या आहेत व बाकीच्यांच़ा सामान्य माणसाला कांहीं उपयोग नाहीं म्हणून त्या अजिबात गाळून टाकल्या आहेत. कांहीं ग्रंथकारांनीं तसें समज़ून सुषुप्ति अवस्थेच्या पुढें एक तुर्या नांवाची अवस्था ज़ोडली आहे आणि अवस्थांची संख्या चार केली आहे. कांहींनीं तुर्येच्या पुढें तुर्यातीता अथवा उन्मनी अशी आणखीहि एक अवस्था सांगून सर्व अवस्थांची संख्या पांच़ केली आहे. याच़े परिणाम दोन प्रकारच़े झ़ालेले आहेत. कधीं एकेका अवस्थेच्या नांवाखालीं जास्त प्रांत समाविष्ट झ़ालेला आहे, तर कधीं अवस्थांची संख्या कमी अधिक झ़ालेली आहे. या कारणांमुळें सोबतच्या कोष्टकासंबंधानें मतभेद होणें शक्य आहे. त्यांतल्या त्यांत जें कोष्टक जास्त सर्वमान्य व जास्त समर्पक वाटलें तें आम्हीं दिलेलें आहे.

या कोष्टकांत व या पुस्तकांत पूर्वीं दिलेल्या माहितींत एका बाबीविषयीं वाचकांस फरक आढळून येण्यासारखा आहे. तो येथें नमूद करणें आवश्यक आहे. इंग्रजींत ज्या देहास Causal Body म्हणतात, त्या देहास प्रस्तुत पुस्तकांत सर्वत्र कारण देह असें नांव आम्हीं दिलेलें आहे. सोबतच्या कोष्टकांत Causal Body, Buddhic Body आणि Atmic Body या तिहींच़ा समावेश कारणदेह  या संज्ञेंत केलेला आहे. प्रस्तुत पुस्तकांत पूर्वीं Buddhic Body व Atmic Body यांस अनुक्रमें बुद्धिदेह व आत्मदेह अशा वेगवेगळ्या संज्ञा दिल्या आहेत.  *  *  *  *  *

back to bindhast : home                                    अनुक्रमणिका