परिशिष्ट  दुसरें


मौंजीबंधन  व  त्याचें  अंतरंग


हिंदु लोकांत मौंजीबंधनाच़ा संस्कार करण्यांत येतो. त्याच़ा खोल विचार अद्याप आपल्या लोकांनीं केलेला दिसत नाहीं. अलीकडे तो संस्कार मागें पडत आहे. लहान मुलाच्या शिक्षणाच़ा व त्याच्या धार्मिक ज़बाबदारीच़ा प्रारंभ म्हणून हा विधि करण्यांत येतो असें विचारी हिंदु लोक समज़तात.  ही समज़ूत खरी असली तरी मौंजीबंधनाच्या विधीमध्यें आणखी कांहीं खोल भाग आहेत असें आमच़ें म्हणणें आहे. ज्या गोष्टी सिद्धसंघांतील अधिकारी गुप्तरूपानें करीत असतात त्या मौंजीबंधनांत कांहीं प्रमाणांत मुद्दाम घातलेल्या दिसतात. मौंजीबंधनाच़ा संस्कार समाजामध्यें सर्वत्र रूढ करून जे लोक जास्त विचारी असतील त्यांस मौंजीबंधनाच़ा संस्कार पाहून जास्त खोल पाण्यांत शिरण्याची बुद्धि व्हावी आणि तसें केल्यास त्यांस त्या उच्च गोष्टींच़ा सुगावा लागावा असा हेतु या संस्काराच्या मुळाशीं आहे याविषयीं आम्हांस संदेह वाटत नाहीं. सिद्धसंघांतील कांहीं गुप्त गोष्टींच़ें, विशेषतः पहिल्या महादीक्षेच़ें प्रतिबिंब मौंजीबंधनांत आहे असें आमच़ें मत आहे. तें संपूर्णपणें सिद्ध होण्यास निरनिराळ्या काळच़े व प्रांतांतले मौंजीबंधनांच़े विधि गह्यसूत्रांच्या आधारें तुलनात्मक दृष्टीनें तपासावयास हवेत. तसा उद्योग अद्यापि कोणीं केलेला दिसत नाहीं. त्याच्या अभावीं अगदीं निर्णायक असा पुरावा आम्हांस देतां येणार नाहीं. पण मौंजीबंधन व सिद्धसंघांत प्रचलित असलेल्या इतर अनेक गोष्टी यांच़ें साम्य दाखविणाऱ्या व इतर दृष्टींनीं सूचक अशा कांहीं बाबी आम्हीं पुढें देत आहों. त्यावरून आमच्या म्हणण्यास बराच़ आधार मिळेल, व त्या दिशेनें अधिक संशोधन करणें किती अगत्याच़ें आहे तेंहि स्पष्ट होईल. साम्यदर्शक व सूचक गोष्टी आहेत त्या पुढीलप्रमाणें  :---


( १ )  मौंजीबंधन हा नुसता एक सामान्य धार्मिक विधि असला तर त्याला 'नवा जन्म' असें म्हणण्याच़ें प्रयोजन नव्हतें. पण आईच्या उदरांतून बाहेर येणें हा पहिला जन्म व मुंज होणें हा दुसरा जन्म असें लोक मानतात, आणि ज्यांच्या वर्णांत मुंज होते त्यांना 'द्विज' असें म्हणतात. पहिल्या महादीक्षेनंतर माणूस सिद्धसंघाच़ा अगदीं खालच़ा सभासद होतो, त्या संघामध्यें त्याच़ा जन्म होतो. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ती महत्त्वाची पदवी सूचित करण्यासाठीं मौंजीबंधनाला दुसरा जन्म असें मुद्दाम म्हणत असावेत.

( २ )  मौंजीबंधनांत कमरेभोंवतीं दर्भाची मेखला बांधतात, मौंजीबंधन हें नांव त्या मेखलेला अनुलक्षून आहे. या संस्कारांत मेखला बांधण्याच़ें कांहींच़ प्रयोजन दिसत नाहीं; व ज़री कांहीं लहानसें प्रयोजन असलें तरी त्या सबंध संस्काराला मौंजीबंधन असें नांव देण्याच़ें कारण दिसत नाहीं. फ्री मेसनरीच्या संप्रदायांत माणसाच्या अंगांत शक्ति ओतली ज़ाते, ती शक्ति ज़र कमरेच्या खालीं जननेंद्रियाच्या ज़वळ गेली तर मलिन वासना उत्तेजित होऊन अध्यात्म प्रगतीला विघ्न होण्याच़ा संभव असतो; आणि म्हणून त्या संप्रदायांतील सभासद ज़ो एप्रन् बांधतात त्याच़ा पट्टा कमरेभोंवतीं येतो आणि त्या पट्ट्याच्या वर्तुळांत एक ईथरच़ा पातळ थर निर्माण होतो व अशा रीतीनें ती शक्ति त्या पट्ट्याच्या खालीं ज़ात नाहीं असें तज्ज्ञ सांगतात. (पहा लेडबीटरकृत The Hidden Life in Freemasonry पृ. १२३) मौंजीबंधनांतील मेखला हेंच़ कार्य करीत असावी असें वाटतें. ज़ानव्यांत मंत्रशक्ति असते.  ज़ानवीं परिधान करतांना तिच़ें आवाहन करतात. तसेंच़ रोज़च्या संध्येंतहि ज़ानव्यांत हात घातल्यामुळें ती येत असावी. अर्थात् कमरेच्या खालीं ज़ानवीं अंगास लागूं नये असा निर्बंध ज़रूर असल्यामुळें शौचाच्या वेळीं ज़ानवें कानास अडकविण्याची प्रथा पडलेली असावी. मेखला बांधण्याच़े वेळीं 'तस्य रक्षार्थम् शुद्ध्यर्थम् च मेखलामाबध्नीयात्' असें संस्काराच्या प्रयोगांत म्हटलेलें आढळतें. (पहा चित्रावकृत उपनयन संस्कार पृ. १६)  म्हणजे बटूच्या संरक्षणासाठीं व शुद्धीसाठीं मेखला बांधावयाची असते. मेखला बांधण्याच्या वेळच्या मंत्रांत 'इयम् दुरुक्तात्परिबाधमाना' (म्हणजे ही मेखला दुरुक्तीच़ा नाश करणारी आहे.) 'शर्म वरूथं पुनती' (घर च़ांगलें व शुद्ध करणारी आहे)  प्राणापानाभ्यां बलमाभरन्ती (प्राण व अपान हे बलवत्तर रीतीनें भरूं देणारी) असें वर्णन आहे. त्यावरून ही मेखला वरील कार्य करण्याकरतांच़ बांधली ज़ात असावी या म्हणण्यास दुज़ोरा येतो. मेखला बांधल्यानंतर लगेच़ मेधाजनन नांवाच़ा भाग येतो. त्यावेळीं नवीन शक्ति बटूच्या अंगांत ओतली ज़ाते. ती शक्ति त्याच्या कमरेपर्यंतच़ ज़ावी, खालीं ज़ाऊं नये, जननेंद्रियाशीं संबंध असलेल्या वृत्ति त्या शक्तीनें चेतविल्या ज़ाऊं नयेत यासाठीं ही सोय केलेली आहे असें वाटतें. एरवीं बटूच्या शुद्धतेसाठीं व प्राणापानादि प्रवाह ज़ोरदार करण्याकरितां ही मेखला आहे वगैरे वर्णनाच़ा समर्पक अर्थ लागत नाहीं.

( ३ )  मुंजीला शुक्राच़ा अस्त च़ालत नाहीं. पहिल्या महादीक्षेच्या वेळीं सनत्कुमारांच़ा तारा च़काकतो. सनत्कुमार शुक्रावरून आलेले आहेत. पहिल्या महादीक्षेच्या वेळच़ें ताऱ्याच़ें च़काकणें ध्वनित व्हावें म्हणून शुक्राच़ा अस्त असल्यास मुंज करूं नये असा निर्बंध ठेवलेला असावा. मुंजींत बटूला शुक्राची अगर गुरूची च़ांदणी मुद्दाम समारंभानें दाखवावी अशी कांहीं लोकांत अद्यापि च़ाल आहे असें ऐकतों. मुंजींत सूर्यहि दाखवितात. च़ांदणी च़काकण्याची स्मारक ही च़ाल असावी.

( ४ )  मुंज हा साधा उत्तान प्रकारच़ा संस्कार असेल तर त्या वेळीं बटूला नवें नांव देण्याची गरज़ नाहीं. पण मुंजींत नवें नांव ठेवतात इतकेंच़ नाहीं तर तें होतां होईल तों गुप्त ठेवावें असें सांगण्यांत येतें. रोज़ संध्येच्या वेळीं मुलानें तें नांव घ्यावें व त्या नांवानें गुरूला अभिवादन करावें अशी संध्येंतली प्रथा आहे. 'अमुक शर्मा अहं भो गुरो अभिवादये' असा त्या वेळच़ा मंत्र आहे. तेव्हां शिष्याच़ें गुरूनें ठेवलेलें हें एक वेगळें गुप्त नांव आहे हें उघड आहे. अध्यात्म मार्गावर असें कांहीं तरी नांव असतें व त्या नांवाच़ा उपयोग कधीं कधीं केला ज़ातो. (पहा The Masters & the Path पृ.२५६) त्याच़ें प्रतिबिंब म्हणून हें संध्येंतलें नांव ठेवीत असावेत.

( ५ )  पहिल्या महादीक्षेच्या वेळीं दीक्षा देणाऱ्या जीवन्मुक्तासमोर जेव्हां शिष्याला आणण्यांत येतें तेव्हां त्याला अनुलक्षून  'हा कोण आहे' असा ते प्रश्न विचारतात, व मग त्याची माहिती सांगण्यांत येते. (मागें आठव्या प्रकरणांत ह्या महादीक्षेच़ें वर्णन दिलें आहे तें पहा.)  मुंजींतहि कांहीं प्रान्तांत असा परिपाठ आहे असें दिसतें. आचार्यः कुमारं पृच्छति को नामासि। कुमारः देवताश्रयम् नक्षत्राश्रयम् गोत्राश्रयम् वा स्वनाम ब्रूयात्। (पहा भारतसमाजप्रणीत उपनयन-विवाहप्रयोग पृ.२) म्हणजे आचार्यानें बटूला विचारावें 'तुझ़ें नांव काय  ?'  व मग बटूनें 'मीं अमुक अमुक आहे' असें सांगावें. पहिल्या महादीक्षेच्या व मुंजीच्या संस्कारांत हें प्रश्नोत्तराच़ें साम्य आहे. हीं प्रश्नोत्तरें मुद्दाम घालून मुंजीवरून पहिल्या महादीक्षेची आठवण व्हावी व त्या अधिकाराच्या जिज्ञासूंना साम्य ओळखावें अशी ही तज़वीज़ दिसते. बटूला समोर उभा केल्यावर त्याला निरीक्षून पहावें (तन्मुखम् सम्यगीक्षेत्) असेंहि संकल्पांत सांगितलें आहे. (पहा चित्रावकृत उपनयनसंस्कार पृ.३ व भारतसमाज कृत उपनयन-विवाह प्रयोग पृ.२)

( ६ )  मौंजीबंधनाच्या एका भागास 'दीक्षाप्रदानम्' असें स्पष्टच़ नांव आहे. (पहा चित्रावकृत उपनयनसंस्कार पृ.१६)

( ७ )  मुंजीच्या प्रारंभीं बटूच्या अंगावर सामान्य प्रकारच़ें वस्त्र असतें. 'युवं वस्त्राणि' इ. हा मंत्र म्हणून बटूला पांढरें वस्त्र नेसवावें व पिंवळें अंगावर घेण्यास द्यावें असें सांगितलें आहे. (इति मंत्रेण अहतं शुक्लं वासः परिधाप्य अन्येन काषायवाससा तेनैव मंत्रेण तथैव प्रावरेत्। (चित्रावकृत उपनयनसंस्कार पृ.४) पुढें हीं वस्त्रें काढून ठेवावयाचीं व नवीं घ्यावयाची असतात. (पृ.२१) पहिल्या महादीक्षेच़े वेळीं प्रारंभीं कापसाच़ें वस्त्र असतें व मग आपोआप त्या ज़ागीं रेशमी वस्त्र येतें. (मागील प्रकरण ८ पहा.) या दोन्हीं गोष्टी साम्य दर्शवितात. मुंजींत एक मंत्र 'ओम् युवा सुवासाः परिवीत आगात् स उ श्रेयान् भवति जायमानः।  तं धीरासं कवयः उन्नयन्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः।।' असा आहे. त्याच़ा अर्थ पुढीलप्रमाणें आहेः-- 'सुंदर वस्त्रानें वेष्टिलेला हा बटु ज़ात आहे. दुसरा जन्म घेत असणारा हा ऐश्वर्यवान् होत आहे. मनानें ध्यान करणारे व देवांच़ें यजन करणारे ज्ञानी पुरुष त्याची उन्नति करीत आहेत.' या मंत्राच्या अर्थावरून पहिल्या महादीक्षेच्या वेळीं वस्त्रांतर होतें व ऋषिसंघ शिष्याला उन्नत स्थितीप्रत नेतो या गोष्टीच़ें स्मरण होण्यासारखें आहे.

( ८ )  अनुगृहीत शिष्य मनानें आपल्या गुरूशीं एकरूप झ़ालेला असतो, शिष्याच़े विचार गुरूच्या मनांत ज़ातात व गुरूच़े विचार शिष्याच्या मनांत शिरून त्याच्यावर परिणाम करीत असतात, याविषयींची माहिती मागें (सहाव्या प्रकरणांत) आली आहे. पहिली दीक्षा घेतल्यावर शिष्याची ज़ाणीव व ऋषिसंघाची ज़ाणीव यांच़ाहि त्याच़ प्रकारच़ा संबंध ज़डतो हें आठव्या प्रकरणांत मागें दिलेलें आहे. मुंजींत दीक्षाप्रदानाच्या वेळीं आचार्य पुढील मंत्र म्हणतात  :--

ओम् मम व्रते हृदयं ते दधामि। मम चित्तम् अनु चित्तम् ते अस्तु।
 
म्हणजे बटो, माझ्या व्रतांत (हृदयव्यापारांत) तुझ़ें हृदय मीं स्थापित करतों, माझ्या चित्ताच्या अनुसारें तुझ़े चित्तव्यापार च़ालोत. या दोन्हीं गोष्टींच़ें साम्य स्पष्ट आहे.

( ९ )  मुंजीच़ा समारंभ नुसता लौकिक प्रकारच़ा असता तर त्यांत ज्या कित्येक विशेष क्रिया केल्या ज़ातात त्या निरर्थक आहेत असें म्हणावें लागेल.

मुंजीच्या वेळीं बाप मुलाला मांडीवर घेतो. बापानें मुलाला पांघरुणाखालीं घ्यावें आणि गायत्री मंत्र शिकवावा असेंहि कांहीं लोक करतात. शिष्यस्वीकाराच्या वेळीं गुरु आपले सूक्ष्मदेह शिष्याच्या सूक्ष्मदेहांशीं मिळवून कसे घेतो त्याची माहिती पूर्वीं सातव्या प्रकरणांत आली आहे. मांडीवर घेणें किंवा एका पांघरुणांत घेणें ही गोष्ट एकमेकांच़े सूक्ष्म कोष एकमेकांत मिसळण्याची सूचक आहे. तसेंच़ या मार्गावरील कांहीं ज्ञान गुप्त असतें ही गोष्टहि त्यांत सुच़विलेली आहे.

या विधींत बटूच्या सूक्ष्मदेहाच्या चक्रांच्याद्वारें कांहीं शक्ति ओतण्याच़ा अथवा तीं चक्रें फुलविण्याच़ा कांहीं भाग आहे. एके प्रसंगीं गुरूनें बटूच्या खांद्यावरून आपले दोन्हीं हात लांब पोंच़वावे (बटुं प्राङ्मुखमवस्थाप्य तदंसयोरुपरि स्वपाणी गममित्वा -- चित्रावकृत उपनयनसंस्कार पृ.१०). दुसऱ्या प्रसंगीं बटूच्या हृदयाला हातानें स्पर्श करावा (पाणिभ्याम् बटुहृदयं स्पृशेत् पृ.११). बोटें उभीं पसरून बटूच्या हृदयावर हात ठेवावा (स्वपाणिं ऊर्ध्वांगुलि बटुहृदये निधाय पृ.१६) अशा क्रिया सांगितल्या आहेत. माणसाच्या हृदयापाशीं सूक्ष्मदेहांत एक चक्र असतें हें आमच्या वाचकांना माहीत असेलच़. खांद्यावर हात ठेवण्याची क्रिया शिष्यस्वीकारप्रसंगीं पोटाशीं धरण्याच्या क्रियेची सूचक दिसते.

( १०)  पहिल्या महादीक्षेच्या समारंभांत शिष्याच़ा कारणदेह प्रकाशमान होतो. त्याच़ा वासनादेहहि ज़ोरदार केला ज़ातो वगैरे गोष्टी मागें प्रकरण ८ मध्यें वर्णिलेल्या आहेत. तसेंच़ या वेळीं बुद्धि नामक जी मनापलीकडील उच्च भूमिका आहे तेथील ज़ाणीव जागृत करावी लागते याच़ाहि उल्लेख तेथेंच़ केलेला आहे. असल्या क्रियांनीं माणसाच्या हृदयमनाचे सर्व व्यापार अधिक ज़ोरकस, तीव्र व सखोल होतात. त्याच़ प्रकारच़ा एक भाग मौंजीबंधनांत आहे. ज़र मौंजीबंधनाच़ा संस्कार फक्त बहिरंगापुरता असेल तर त्यांत असला भाग असण्याच़ें कारण नाहीं. या भागाला 'मेधाजनन' म्हणतात. मेधाजनन म्हणजे बुद्धि उत्पन्न करण्याची क्रिया. नुसत्या मेधाजनन या नांवावरूनहि या क्रियेंत कांहीं तरी खोल भाग असला पाहिजे अशी कोणासहि शंका येईल.

एक मातीच़ा ओटा करून त्यांत पळसाची खांदी रोंवतात. व तिच्या संनिध बटूला बसवून हा समारंभ करतात. असें वाटतें कीं अरण्यांत खरोखरी एखाद्या झ़ाडाखालीं ज़ाऊन पूर्वीं हा विधि प्रत्यक्ष करीत असतील, पण आज़ तें गैरसोयीच़ें असल्यामुळें फक्त पळसाची खांदी आणून तो करण्याच़ा परिपाठ पडला आहे. पहिल्या महादीक्षेच़ा समारंभ कोणी तरी मोठे ऋषि आपल्या आश्रमासंनिधच़ करीत असणार. भगवान् मैत्रेयांकडे तें काम असलें तर ते तो विधि आपल्या आश्रमाज़वळील बागेंत प्रायः एका मोठ्या वृक्षाखालीं करतात असें ऐकतों. दुसरे ऋषि तो करीत असले तर त्यांच्या आश्रमाशेज़ारीं वृक्षछायेंत ते तो करण्याच़ा संभव आहे. त्याची आठवण म्हणून पळसाची खांदी रोंवण्याच़ा प्रघात पडला असावा. ज्ञानेश्वरांनीं स्वतःसंबंधानें एक ज़ो समारंभ सूचित केला आहे त्यांत स्वतःला, 'वृक्ष एक तेथें होता। तेथें बैसविलें रीती।' असें म्हटलें आहे.

पळसाच्या खांदीपाशीं बसल्यानंतर जे मंत्र म्हणतात (चित्रावकृत उपनयनसंस्कार पृ.२२-२३ पहा)  त्यांत मेधा मला मिळावी अशी बटु प्रार्थना करतो. गंधर्व व अप्सरा यांच्यामध्यें जी मनोरूप मेधा असते, जी दैवी व मानुषी अशी मेधा आहे ती माझ्यामध्यें प्रवेश करो, माझ़ा ब्रह्माशीं संगम होवो, वगैरे प्रार्थना त्या मंत्रांत आहेत. यावरून कांहीं तरी शक्ति त्या बटूमध्यें ओतल्या ज़ात असाव्या अथवा फुलविल्या ज़ात असाव्या असें वाटतें. या शक्ति हानिकारक होऊं नयेत म्हणून मेधाजननाच्या ज़रा अगोदर मेखलाबंधन करतात.

पहिल्या महादीक्षेंतील शिष्याच्या अंतरंगांत नवीन शक्ति ओतण्याच़ा प्रकार व मुंजींतील मेधाजनन यांत पुष्कळच़ साम्य आहे हें आमच़े वाचक ज़ाणतीलच.

( ११)  पहिल्या महादीक्षेच्या समारंभास जे लोक येतात व ज्यांना त्यांतील गुप्त व उघड असा सारा भाग पहावयास मिळतो ते सारे पूर्वीं ती दीक्षा घेतलेले लोक असणार हें उघड आहे. तो दीक्षाविधि संपल्यावर ती सर्व मंडळी आनंदानें त्या नव्या दीक्षिताच़ें अभिनंदन करतात. हल्लींच्या मुंजीच्या वेळीं बटूबरोबर दुसरे मुंज झ़ालेले मुलगे बोलावण्यांत येऊन त्या सर्वांची (अष्ट वर्गांची) जेवणावळ होते. वरील अभिनंदनाच़ें प्रतीक ही जेवणावळ होय असें वाटतें. या जेवणावळीस फक्त दुसरे मुंज झ़ालेलेच़ मुलगे बोलावण्यांत येतात हें सर्वांस माहीत आहे.

ह्या ज्या गोष्टी वर नमूद केल्या आहेत त्यांच़ा विचार केल्यास मुंजीच़ा विधि दिसतो त्यापेक्षां अधिक खोल आहे हें आमच़ें म्हणणें अंशतः तरी वाचकांस पटेल अशी आमची आशा आहे.  *  *  *  *  *

back to bindhast : home                                    अनुक्रमणिका