परिशिष्ट  पहिलें


गौतमबुद्ध  व  शंकराचार्य


आद्यशंकराचार्यांसंबंधानें जनमनामध्यें फार घोंटाळा झ़ालेला आहे. हिंदुस्थानच्या चारी टोंकांस ज्यांनीं चार मठ स्थापले ते आद्यशंकराचार्य गौतमबुद्धाच्या निर्याणानंतर लवकरच़ उदयास आले. सध्यां ज्या शंकराचार्यांचीं भाष्यें आपण वाचतों ते आद्यशंकराचार्य होत अशी बहुतेकांची समज़ूत आहे; पण ती च़ुकीची आहे. भाष्यकार शंकराचार्य हे इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या आसपास जन्मले. ते आद्यशंकराचार्य नव्हत. अंतर्दृष्टीच्या साहाय्यानें थिऑसफ़ीय पुढाऱ्यांनीं जें संशोधन केलेलें आहे त्यावरून ही गोष्ट स्पष्ट आहे. 'शंकराचार्य व त्यांच़ा संप्रदाय' या नांवाच़ा एक ग्रंथ रा. म.रा. बोडस यांनीं प्रसिद्ध केलेला आहे. त्यांत (पृ. १५ व इतरत्र) ज़ुन्या संस्कृत आधारांच़े उल्लेख एकत्र दिलेले आहेत. आद्यशंकराचार्य इसवी सनापूर्वीं जन्मले असा त्या सर्व आधारांच़ा एकमताच़ा पुरावा आहे. भाष्यकार शंकराचार्य हे सातव्या किंवा आठव्या शतकांत होऊन गेले असें दाखविणारा पुरावा आधुनिक संशोधकांस मिळाला आहे. दोन वेगळ्या व्यक्तींच़ा आपण घोंटाळा करीत आहोंत हें ध्यानांत न आल्यामुळें ज़ुने लोक भाष्यकार शंकराचार्यांना ज़ुन्या आधारावर इसवी सनाच्या मागें नेतात व नवे संशोधक आद्यशंकराचार्यांना विसरून व भाष्यकार शंकराचार्यांस आद्यशंकराचार्य समज़ून त्यांस सातव्याआठव्या शतकांत आणतात. खरोखरी हे दोन वेगळे शंकराचार्य आहेत. ही गोष्ट ध्यानांत ठेवल्यास बुद्ध व शंकराचार्य यांच्याविषयींच्या प्रचलित समज़ुती अगदीं भ्रामक असल्याच़ें दिसून येईल.

गौतमबुद्ध व आद्य शंकराचार्य हे एकाच़ सिद्धसंघांतील दोन मोठे अधिकारी होते व आहेत. त्यांची शिकवण एकमेकांविरुद्ध होती असें हल्लींच्या लोकांच़ें मत आहे. पण तसें असणें शक्य नाहीं. उलट पक्षीं, भाष्यकार शंकराचार्य गौतमबुद्धानंतर सुमारें बारा शतकांनीं उदयास आले. या अवधींत बुद्धधर्माच़ें मूळ स्वरूप ज़ाऊन तो सहज़ इतर सर्व धर्मांसारखा अवनत झ़ालेला असणार हें उघड आहे. गौतमबुद्धांच्या नंतर बऱ्याच़ शतकांनीं बुद्धधर्म ब्रह्मदेश, तिबेट वगैरे देशांत उत्तरेकडे पसरला, आणि सिलोनकडे म्हणजे दक्षिणेसहि पसरला. उत्तरेकडच्या शाखेस महायान पंथ म्हणतात. या पंथांत बुद्धाच्या शिकवणींत इतर अनेक बऱ्यावाईट गोष्टींची भेंसळ झ़ालेली आहे. सीलोनकडील पंथास हीनयान पंथ म्हणतात. त्यांत बुद्धाच्या शिकवणींतला कांहीं भाग गळून नाहींसा झ़ालेला आहे. हीनयान पंथाच़े ग्रंथ पाली भाषेंत आहेत, महायान पंथाच़े संस्कृतांत आहेत. प्रत्येक पंथांत पुढें निरनिराळीं मतें प्रतिपादन करणारे अनेक ग्रंथकार झ़ाले. हिंदुधर्मांत ज़से कालगत्या सांख्य, वैशेषिक, न्याय वगैरे मतांच़े अभिमानी लोक पुढें आले आणि द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत वगैरे परस्परभिन्न विचार प्रसृत झ़ाले, त्याच़प्रमाणें बुद्धधर्मांतहि कित्येक शतकांनंतर मतामतांच़ा गलबला सुरूं झ़ाला. भाष्यकार शंकराचार्यांनीं हीनयान पंथाच़े ग्रंथ पाहिले होते असें फारसें वाटत नाहीं. महायान पंथाचीं कांहीं मतें त्यांच्या वेळीं वातावरणांत होतीं. त्यांच़ें त्यांनीं खंडन केलें आहे. त्यावरून बुद्ध धर्माच़ें खंडन त्यांनीं केलें असें लोक समज़तात. तें अर्थात् च़ुकीच़ें आहे.

या बाबतींत भाष्यकारांची बाज़ू बरोबर आहे असें आपण गृहीत धरलें तरी त्यावरून बुद्धधर्माच़ें खंडण झ़ालें असा त्याच़ा अर्थ कदापि होणार नाहीं. एखाद्या माणसानें ज़र वैशेषिक मताच़ें किंवा सांख्य मताच़ें खंडन केलें तर त्यावरून हिंदु धर्माच़ा पाडाव झ़ाला किंवा भगवद्गीता खोटी ठरली असें होईल काय ?  लोकमान्य टिळकांनीं आपल्या गीतारहस्यांत भाष्यकार शंकराचार्यांच़े गीतेसंबंधींच़े कांहीं मुद्दे खोडून काढण्याच़ा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न यशस्वी झ़ाला आहे असें मानलें तरी त्यावरून भगवद्गीता च़ुकीची ठरली, श्रीकृष्णाच़े विचार अप्रयोजक ठरले, हिंदुधर्म त्याज्य आहे, असें ज़र कोणीं म्हणेल तर तें आपण क्षणभर तरी कबूल करूं काय ?  हिंदुधर्मांत नाना मतें, नाना आचारविचार, नाना प्रकारच्या उपासना आहेत.
त्यांपैंकीं एका गोष्टीच़ें खंडन झ़ालें म्हणजे सर्व हिंदु धर्म च़ुकीच़ा झ़ाला असें कसें म्हणतां येईल ?

कालगत्या प्रत्येक धर्म मलिन होतो हाहि विचार विसरून च़ालणार नाहीं. रामदासस्वामींना ज़ाऊन अद्यापि तीनशें वर्षेंहि झ़ालीं नाहींत. ते विद्यमान असतांना रामदासी मंडळींमध्यें ज़ो जिवंतपणा होता तो आतां नाहीं. जगांतील इतर सर्व पंथांप्रमाणें रामदास स्वामींच़ाहि पंथ कालवशात् मलिन व्हावा यांत आश्चर्य वाटण्याज़ोगें कांहीं नाहीं. समज़ा, आज़ एखाद्या माणसानें रामदासी पंथावर टीका केली तर ती टीका रामदासस्वामींवर आहे अथवा त्यांच्या दासबोधावर आहे असें कसें म्हणतां येईल ?  गौतमबुद्धांनंतर बारा तेराशें वर्षांनीं ज़र भाष्यकार शंकराचार्यांनीं बुद्धधर्मांतल्या कांहीं मतांवर टीका केलेली असली तर त्याच़ा दोष गौतमबुद्धांवर घालणें किंवा बुद्ध धर्मास टाकाऊ म्हणण्याच़ा त्यांच़ा हेतु होता असें मानणें अगदीं अयोग्य होय. सर्व तेजस्वी विचार कालान्तरानें जनतेच्या अज्ञानामुळें मलिन होत असतात. तो मलिनपणा काढूं पाहणारा टीकाकार त्या मूळच्या तेजस्वितेच़ा शत्रु आहे असें मानणें अगदीं गैर आहे.

शंकराचार्यांनीं बुद्धधर्माची हिंदुस्थानांतून हकालपट्टी केली अशी पुष्कळांची समज़ूत आहे. हें म्हणणें आद्य शंकराचार्यांस लागू पडणार नाहीं. कारण त्यांच़े काळीं बौद्ध धर्माच़ा प्रसार सर्व हिंदुस्थानभर झ़ालेलाच़ नव्हता. गौतमबुद्ध हे हिंदुधर्मांतले एक सुधारक म्हणून जनतेसमोर आले होते. हिंदुधर्माची पार्श्वभूमि त्यांच्या  विचारांच्या पाठीशीं होती. हिंदुधर्मांतील अनेक गोष्टी त्यांच्या शिकवणींत गृहीत धरलेल्या होत्या. परंतु हिंदुधर्मांतील ज्या गोष्टी त्यांना बदलाव्याशा वाटल्या त्यांसंबंधानें त्यांनींं मतप्रचार केला. गौतमबुद्ध जिवंत असतांना एका वेगळ्या धर्माच़े संस्थापक अशा पेशानें ते लोकांसमोर कदापि आलेले नव्हते. बुद्धधर्म नांवाच़ा एक वेगळा धर्म स्थापण्याच़ें त्यांच़ें धोरण नव्हतें. अर्थात् त्यांच्या निर्याणसमयीं अशा धर्माची प्राणप्रतिष्ठाहि झ़ालेली नव्हती. बुद्धानंतर बऱ्याच़ काळानें बौद्धधर्म हा एक वेगळा धर्म आहे अशी भावना लोकांत आली आणि बुद्धांच़े हिंदु अनुयायी आणि इतर हिंदु लोक यांच्यामध्यें वैमनस्य आल्यामुळें प्रथमतः बौद्धधर्माला वेगळ्या धर्माच़ें स्वरूप आलें. अशोकासारख्या राजांच़ा आश्रय त्या धर्माला मिळून तो धर्म कांहीं शतकांनीं सर्व हिंदुस्थानभर पसरला. आद्य शंकराचार्य जेव्हां होते तेव्हां बुद्धधर्म हिंदुस्थानभर पसरलाच़ नव्हता. तेव्हां आद्य शंकराचार्यांनीं बुद्धधर्माची हिंदुस्थानांतून उच़लबांगडी केली या बोलण्यांत अर्थ नाहीं.

भाष्यकार शंकराचार्यांनीं कदाचित् हिंदुस्थानांतून बौद्धधर्माची हकालपट्टी केली असेल. बौद्धधर्माची पीछेहाट हिंदुस्तानांतून केव्हां, कशी व कां झ़ाली याच़ा तपशीलवार इतिहास अद्याप उपलब्ध नाहीं. तेव्हां भाष्यकार शंकराचार्यांनीं तशी हकालपट्टी केली किंवा नाहीं तें आज़ निश्चयानें सांगतां येणार नाहीं. पण ज़री तसें मानलें तरी त्यावरून कांहींच़ निष्पन्न होणार नाहीं. भाष्यकारांच्या लिखाणांत कर्मठपणावर बाण सोडलेले आहेत, व कर्मठपणा हा ज्ञानाच़ें स्थान कधींहि घेऊं शकणार नाहीं आणि मुक्ति मिळण्यास ज्ञान अवश्य आहे, कर्मठपणानें मुक्ति मिळणार नाहीं, असें त्यांच़ें आग्रहाच़ें सांगणें आहे.
त्यांच्या ग्रंथांत तें ठिकठिकाणीं दिसतें. ज़र त्या वेळच़े बुद्धधर्मानुयायी सारे कर्मठपणांत बुडालेले असले तर कदाचित् भाष्यकारांनीं बुद्धधर्माची हकालपट्टी केली असेल. पण हिंदु धर्मांतील कर्मठपणावरहि भाष्यकारांनीं शस्त्र धरलेलें होतें हें विसरून च़ालणार नाहीं. खरोखरी भाष्यकारांच़ा कटाक्ष कर्मठपणावर होता; मग तो हिंदुधर्मांतला असो किंवा दुसऱ्या कोठच़ा असो. गौतमबुद्धांची शिकवण कर्मठपणाची नाहीं. नित्यनैमित्तिक कर्मांनीं माणसास मुक्ति मिळते असें गौतमबुद्ध सांगत नाहींत. त्यांनीं आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. तो त्यांच़ा मुक्तिमार्ग आहे.  त्यांत कर्मठपणाला प्राधान्य नाहीं, तर विचारविवेकादिकांना आहे. तेव्हां कर्मठपणाच्या बाबतींत गौतमबुद्ध व भाष्यकार शंकराचार्य यांचीं मतें विरुद्ध नाहींत; तर उलट अनुकूल आहेत. गौतमबुद्धांनीं आपल्या शिकवणींत अहिंसेवर ज़ोर दिलेला आहे. त्यांच्या वेळीं पशुयज्ञ फार होत असत. त्यांच्या शिकवणीमुळें ते सारे संपुष्टांत आले. मांसाशनहि कमी झ़ालें. भाष्यकार शंकराचार्यांनीं ज़री बुद्धधर्माची हिंदुस्थानांतून उच़लबांगडी केली असली, तरी पशुयज्ञ व मांसाशन यांबाबत त्यांच़ें धोरण गौतमबुद्धांसारखेंच़ होतें. त्यांनीं बुद्धधर्मास हांकलून लावल्यावर पुन्हां प्राचीन काळच़े पशुयज्ञ व मांसाशन हीं सुरूं केलीं नाहींत. हें सर्वांसच़ कबूल आहे. तेव्हां या बाबतींतहि भाष्यकार व गौतमबुद्ध यांचीं मतें परस्परांस अनुकूल होतीं हें उघड आहे.

गौतमबुद्धांनीं ग्रंथप्रामाण्याच़ें महत्त्व कमी करून बुद्धिस्वातंत्र्यास वाव दिला हें सर्वांस माहीत आहे. भाष्यकारांनीं ग्रंथप्रामाण्य ठेवलें, त्याची किंमत तत्त्वतः कमी केली नाहीं. पण ग्रंथांच़े त्या वेळीं प्रचलित असलेले अर्थ सोडून देऊन ते आपल्या बुद्धीप्रमाणें लावले, अर्थात् बुद्धिस्वातंत्र्यास त्यांनीं वाव दिला. इतकेंच़ नव्हे तर श्रुति ही ज़र अनुभवाविरुद्ध ज़ात असेल तर ती कोणींहि मानणार नाहीं असें स्वच्छ सांगितलें.

[गीताभाष्यांत भाष्यकारांनीं अध्याय १८ श्लोक ७६ वर व्याख्यान करतांना आपल्या भाष्याच़ा एकंदर सारांश सांगितला आहे व आपले मुद्दे व प्रतिपक्षाच़े मुद्दे थोडक्यांत संकलित रीतीनें मांडले आहेत. तेथें ते लिहितात कीं अग्नि थंड व प्रकाशरहित आहे असें वेदांत शंभरदां लिहिलें असलें तरी तें प्रमाणभूत होणार नाहीं.  (न हि श्रुतिशतमपि शीतो अग्निः अप्रकाशो वेति ब्रुवन् प्रामाण्यमेति।)]

अर्थात् गौतमबुद्ध आणि भाष्यकार यांचीं या बाबतींतील मतें एक नसलीं तरी तीं जितकीं भिन्न वाटतात तितकीं तीं नाहींत.

गौतमबुद्ध अनात्मवादी होते असें पुष्कळांस वाटतें. माणसाला आत्मा नाहीं अशी त्यांची शिकवण होती असें कित्येक ग्रंथकारांनीं म्हटलें आहे, पण तें च़ूक आहे. भाष्यकार आणि गौतमबुद्ध यांच्या विचारांत या मुद्द्याबाबत इतकें साम्य आहे कीं ज़ाड्या ज़ाड्या विद्वानांनाहि तें दिसूं नये याच़ें आश्चर्य वाटतें !  माणूस पुनः पुनः जन्म घेतो हा सिद्धान्त बुद्धधर्मास संपूर्णपणें मान्य आहे. अर्थात् देह मेला तरी देहाव्यतिरिक्त कांहीं तरी तत्त्व शिल्लक राहतें आणि पुढील जन्मीं तें तत्त्व दुसरा देह घेऊन येतें असा पुनर्जन्मवादाच़ा अर्थ आहे.  तो अर्थ हिंदुधर्म व बुद्धधर्म या दोघांनाहि मान्य आहे. देह ज़ाळून टाकल्यावर जें तत्त्व शिल्लक राहतें त्याला कोणीं जीव म्हणेल, कोणीं जीवात्मा म्हणेल, कोणीं आत्मा म्हणेल. बौद्ध लोकांना हीं नांवें आवडत नसलीं तर ते दुसरीं नांवें देतील. हा नांवाच़ा प्रश्न नाहीं; देहापेक्षां जास्त वेळ टिकणारी, देह मेला तरी नाश न पावणारी व पुढच्या जन्मांतल्या दुसऱ्या देहाशीं संलग्न होणारी कांहीं तरी चीज़ अस्तित्वांत आहे हें गौतमबुद्धाच्या शिकवणींत आहे आणि भाष्यकारांच्या शिकवणींतहि आहे. ही चीज़ मान्य असणाराला अनात्मवादी हें विशेषण लावणें म्हणजे त्या शब्दाच़ा दुरुपयोग होय.

क्षणभंगुर देहाच्या मानानें कायम अशी ही जी चीज़ आहे, तिच़ें स्वरूप काय असें विचारलें तर दोन्हीं धर्मांतल्या नाना पंथीयांचीं वेगवेगळीं उत्तरें येतील. त्या सर्व उत्तरांच्या घोंटाळ्यांत वाचकांना पाडण्याची येथें गरज़ नाहीं. ज्या एका बौद्धधर्मीय मताच़ा या प्रकरणीं वारंवार उल्लेख केला ज़ातो तें मत असें आहे कीं, माणसांत ही जी चीज़ असते, ती बदलणारी असते, शाश्वत व नित्य अशी नसते. हें मत हिंदुधर्माच्या विरुद्ध आहे अशी पुष्कळ टीकाकारांची तक्रार आहे. ती तक्रार खरी असेल अगर नसेल; आम्हांस येथें इतकेंच़ सांगावयाचें आहे कीं भाष्यकार शंकराचार्यांच़ें मत आणि हें बुद्धधर्मीय मत हीं दोन्हीं तंतोतंत एकच़ आहेत. या चिज़ेला सामान्यतः जीव किंवा जीवात्मा असें नांव हिंदुलोक देत असतात. जीव हा शाश्वत नाहीं, देह मेल्यावर ज़री तो कांहीं काळ शाबूत असला तरी तो नित्य टिकणारा नाहीं, तो अनंतकाळ तसाच़ अज्ञ रहात नाहीं, तो परमात्म्यांत केव्हां तरी मिळून ज़ातो, हा विचार भाष्यकारांच्या अद्वैत मताच्या मुळाशीं आहे. आणि आश्चर्य असें कीं हाच़ विचार बुद्धांनीं सांगितला म्हणून भाष्यकारांच़े अनुयायी बुद्धांना नाकें मुरडतात. द्वैतवाद्यांनीं ही तक्रार केली असती तर हें एकवार शोभलें असतें. कारण जीव हा परमात्म्याहून वेगळा आहे, तो परमात्म्याच्या कितीहि ज़वळ गेला तरी तो त्यांत विलीन होत नाहीं, तो अनादि असून अनंतकाळ टिकतो आणि सदा परमात्म्यापासून वेगळा राहतो असें त्यांच़ें म्हणणें आहे. बुद्धधर्म जीवाला शाश्वत टिकणारा मानीत नाहीं आणि म्हणून बुद्धधर्माची शिकवण च़ुकीची आहे असें म्हणण्यास त्यांना थोडी तरी ज़ागा आहे. देह गेल्यावर ज़री जीव शिल्लक राहात असला तरी तो स्थिर व शाश्वत नाहीं असें म्हणणारे भाष्यकारांच़े अनुयायी बुद्धधर्मांतल्या ह्याच़ विचाराला च़ूक म्हणतात हें विचित्र नव्हे काय ?

निर्वाण ही एकच़ गोष्ट शाश्वत, स्थिर व सत्य आहे; बाकी सर्व चंचल व नाशवंत आहे ही बुद्धाची शिकवण आहे. ब्रह्म ही एकच़ वस्तु शाश्वत व खरी आहे बाकी सर्व मिथ्या आहे असें भाष्यकार शिकवितात. या दोघांच्या विचारांत इतकें साम्य असूनहि भाष्यकारांच्या अनुयायांना तें बिलकुल दिसत नाहीं !  लोकांच्या आग्रहाची किती धूळ या वादांत सर्वत्र उधळलेली आहे त्याची कल्पना या गोष्टीवरून आमच्या वाचकांस सहज़ होईल.

तें कसेंहि असलें तरी अंतर्ज्ञानाच्या संशोधनावरून दिसून येतें कीं आद्य शंकराचार्य हे गौतमबुद्धानंतर लगेच़ हिंदुस्थानांत आले. सिद्धसंघाच्या वरच्या पायऱ्यांवर जे तीन कुमार आहेत त्यांपैंकीं एकाच़ा तो जन्म आहे. त्यांनींच़ चार मठ स्थापले. त्यांच़ा अध्यात्माच़ा अधिकार फारच़ मोठा आहे. गौतमबुद्ध हेहि सिद्धसंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैंकीं एक आहेत, व त्यांच़ाहि आध्यात्मिक अधिकार अतिशय उच्च आहे, म्हणूनच़ हिंदुधर्म रामकृष्णादि अवतारांत त्यांची गणना करतो. ते पूर्वीं बोधिसत्त्वाच्या अधिकारावर हज़ारों वर्षें होते. व्यास, झ़रतुष्ट्र, हर्मीज़् , ऑर्फियस् वगैरे जे पुरुष पूर्वेतिहासांत होऊन गेलेले आढळतात ते गौतमबुद्धांनीं त्या अधिकारावर असतांना घेतलेले जन्म आहेत. हें लक्षांत ठेवल्यास हिंदु लोकांनीं व्यासांस मोठें मानणें व बुद्धास कमी मानणें हें किती अप्रयोजक आहे याची कल्पना सर्वांस येईल. भाष्यकार शंकराचार्य हे सातव्या आठव्या शतकांत शंकराचार्यांच्या पीठावर बसलेले अन्य पुरुष होत. सिद्धसंघांतील कोणताहि मोठा अधिकार त्यांच़ेकडे असलेला दिसून येत नाहीं;  ते कांट, स्पेन्सर, कणाद वगैरेंसारखे एक अति तीव्र बुद्धीच़े तत्त्वविचारी पुरुष होते.*  *  *  *  * 

back to bindhast : home                                    अनुक्रमणिका