थिऑसफ़ी व थिओसॉफ़िकल् सोसायटी
( सामान्य माहिती )


थिओसॉफ़िकल् सोसायटी ही संस्था सर्व जगभर पसरलेली आहे. तिची स्थापना १७ नोव्हेंबर १८७५ रोजीं अमेरिकेंत न्यूयॉर्क शहरीं झ़ाली. तिच़ें आद्यपीठ मद्रासनजीक अड्यार येथें आहे. मादाम ब्लाव्हाट्स्की व कर्नल् ऑल्कॉट् हे दोघे या सोसायटीच़े आद्य संस्थापक होत. डॉ.बेझ़ंट् या सोसायटीच्या सुमारें पंचवीस वर्षें अध्यक्ष होत्या. हल्लीं श्री.नीलकंठ श्रीराम हे अध्यक्ष आहेत. या सोसायटींतील सभासदांना पूर्ण मतस्वातंत्र्य असतें. सोसायटीच़े अधिकारी संस्थेच़ा कारभार च़ालविण्याकरतां असतात. त्यांच़ें कोणतेंहि मत सभासदांवर बंधनकारक नसतें.  सभासदांनीं अभ्यास करावा व मग आपल्या बुद्धीच्या अथवा अंतःस्फूर्तीच्या ज़ोरावर आपआपलीं मतें बनवावीं अशी या सोसायटीची इच्छा आहे. सोसायटींत कोणासहि मज्जाव नाहीं, मग त्याचीं मतें कोणतींहि असोत. सोसायटीच़े मुख्य तीन उद्देश प्रसिद्ध आहेत. ते येणेंप्रमाणें :--

     ( १ )  ज़ात, धर्म, लिंग, वर्ण इत्यादि सर्व भेद बाज़ूस ठेवून मानव ज़ातीच्या बंधुत्वाचा केंद्र बनविणें.
     ( २ )  धर्म, तत्त्वज्ञान, भौतिक शास्त्रें यांच्या तुलनात्मक अध्ययनास उत्तेजन देणें.
     ( ३ )  अज्ञात सृष्टिनियम व मनुष्याच्या अंतरंगांत असलेल्या गूढ शक्ति यांच़ें संशोधन करणें.

थिऑसफ़ी म्हणजे अमुक अमुक मतांची किंवा सिद्धांतांची मालिका आहे असें नाहीं. जगांतील सर्व प्रश्नांकडे पाहण्याची ती एक दृष्टि आहे असें म्हटलें तर तें जास्त बरोबर होईल. या दृष्टीच्या कक्षेंत तत्त्वविचार, धर्म, सायन्स इतक्याच़ गोष्टी येतात असें नव्हे; तर योगशास्त्र, कलाशास्त्र, शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण, नीतिशास्त्र, सामाजिक सुधारणा वगैरे मानवी व्यवहाराचीं सर्व क्षेत्रें येतात. या सर्व क्षेत्रांत मानवी विचारांना व मानवी उद्योगांना योग्य दिशा लावावी यासाठीं ही सोसायटी अस्तित्वांत आलेली आहे. प्रत्येक सभासदानें यथाशक्ति स्वतःच्या चरित्राला आणि या क्षेत्रांपैंकीं जीं क्षेत्रें त्याच्या आटोक्यांत असतील त्यांतील उद्योगांना योग्य दिशा लावून स्वतःची आणि जगाची उत्क्रान्ति साधावी हें त्याच़ें कर्तव्य असतें.

थिऑसफ़ी नांवाची जगाकडे पहाण्याची ही जी दृष्टि आहे ती लोकांना नीट समज़ण्यासाठीं धर्म, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्रें यांच्या तुलनात्मक अभ्यासास सोसायटींत उत्तेजन दिलें ज़ातें. ही दृष्टि येण्याला सृष्टींतले नुसते दृश्य व्यवहार समज़ून घेऊन भागत नाहीं. सृष्टींतला पुष्कळसा भाग माणसाला अदृश्य असतो. तोहि त्यानें समज़ून घेणें अवश्य असतें. जगांतील सर्व धर्मांत तो भाग थोड्या फार विस्तारानें आलेला आहे. योगशास्त्रांतील साधनांच़ा उपयोग करून माणसाला हा अदृश्य भाग स्वतःच्या दृष्टीच्या टप्प्यांत आणतां येतो. थिओसॉफ़िकल् सोसायटीच्या कांहीं पुढाऱ्यांनीं या साधनांच़ा अवलंब करून सामान्य माणसाला अदृश्य असणाऱ्या अनेक गोष्टी दृश्य करून घेतल्या आहेत व त्यांच़ें बारकाईनें निरीक्षण करून तें संशोधन जगासमोर मांडलेलें आहे. जीव, परलोक, पुनर्जन्म, माणसाच़े सूक्ष्मदेह, कर्माच़ा नियम, देवदेवता, धर्मांतले विधिसंस्कार, मानवी उत्क्रांतीच़ा पूर्वेतिहास वगैरे अनेक गोष्टींच़े त्यांनीं प्रत्यक्ष अवलोकन करून त्यासंबंधानें ग्रंथ लिहिले आहेत. थिऑसफ़ीची दृष्टि नीट उमज़ण्याला ह्या संशोधनाची माहिती असणें ज़रूर आहे.

थिऑसफ़ीच़ें इंग्रजी वाङ्मय फार मोठें आहे व अभ्यास करण्यास अगदींच़ सोपें आहे असें नाहीं. थिऑसफ़ीच़ा अभ्यास करण्यास आम्हीं कोठून सुरुवात करावी, कोणतीं पुस्तकें वाच़ावीं असा प्रश्न कधीं कधीं विचारण्यांत येतो; पण, थिऑसफ़ीला अनेक बाज़ू आहेत. जिज्ञासूला ज्या अंगांच़ें विशेष अगत्य वाटत असेल त्या प्रकारचीं पुस्तकें त्यानें प्रथम वाच़ावयास घेतलीं पाहिजेत हें उघड आहे. अर्थात् निरनिराळ्या मनोरचनेच्या सर्वच़ माणसांना अमुक एका क्रमानें पुस्तकें वाच़ा असें सांगतां येणार नाहीं. तथापि, सामान्य प्रकारच्या वाचकाला  The Information for Inquirers  हें छोटें पुस्तक व
डॉ.बेझ़ंटकृत  Popular Lectures on Theosophy  हीं प्रथमदर्शनीं फार उपयोगी पडतील असें वाटते. थिऑसफ़ीच़ा नीट अभ्यास करणाऱ्याला स्वतःच्या धर्माची च़ांगलीच़ माहिती हवी. हिंदुधर्माची माहिती  An Advanced Textbook of Hindu Religion and Ethics  यांत वाचकांस सांपडेल. हिंदुधर्मावर इतकें च़ागलें अन्य पुस्तक नाहीं. थिऑसफ़ी समज़ण्यासाठीं हिंदूंनीं भगवद्गीता व उपनिषदें वाच़लीं तर उत्तम. थिऑसफ़ींत सर्व धर्मांच़ा तुलनात्मक अभ्यास येतो. तेव्हां थिऑसफ़ी नीट समज़ण्यासाठीं सर्व धर्मांची माहिती असणें ज़रूर आहे. ती माहिती  The Four Great Religions  व  Religious Problem in India  या डॉ.बेझ़ंटकृत दोन पुस्तकांत वाचकाला सांपडेल. The Universal Text-Book of Religion & Morals, The Essential Unity of All Religions  या पुस्तकांतहि ती उत्कृष्ट रीतीनें दिलेली आहे. थिऑसफ़ीच्या सर्व अंगांची माहिती  A Text Book of Theosophy  या बिशप् लेडबीटर् यांच्या पुस्तकांत दिलेली आहे. डॉ.बेझ़ंट् यांच़ें The Ancient Wisdom  व श्री.जिनराजदास यांच़ें The First Principles of Theosophy  या पुस्तकांतहि ती वाचकाला मिळेल. जिज्ञासूनें हीं तिन्हीं पुस्तकें वाच़णें ज़रूर आहे. मिस् कॉड् यांच़ें  The Ageless Wisdom  व  शीअरमनकृत  Modern Theosophy  या अलीकडच्या पुस्तकांतहि थिऑसफ़ीची सर्वांगीण माहिती च़ांगल्या प्रकारें दिलेली आहे. Theosophy Explained in Questions & Answers या श्री. पावरी यांच्या पुस्तकांत निरनिराळ्या ग्रंथांतील माहिती प्रश्नोत्तररूपानें एकत्र करून दिलेली आहे. नैतिक बाज़ू At the Feet of The Master या श्री.जे.कृष्णमूर्तिकृत पुस्तकांत, किंवा  The Voice of Silelce या मादाम ब्लाव्हाट्स्की बाईंच्या पुस्तकांत, तसेंच़ The Light on the Path  या पुस्तकांत विवरण केलेली आहे. हीं पुस्तकें अगदीं लहान पण फार खोल आहेत. अदृश्य सृष्टीच्या संशोधनाची बाज़ू  The Astral Plane, The Devachanic Plane, The Man and his Bodies, The Man: Visible & Invisible, Thought Forms, Man: Whence, How & Whither?  या पुस्तकांत आहे. मरणोत्तर अवस्थेच़ें वर्णन  The Other Side of Death या मोठ्या किंवा To Those Who Mourn या छोट्या पुस्तकांत दिलेलें आहे. मुमुक्षुमार्ग व जीवन्मुक्त पुरुष यांची माहिती  The Path of Discipleship, The Masters & the Path, The Initiation  या पुस्तकांत आहे. पुष्कळ पुस्तकांपैंकीं वर थोडींच़ निवडून दिलीं आहेत. जिज्ञासूंस तीं निरनिराळ्या थिऑसफ़ीय शाखांकडे वाच़ावयास मिळतील. The Theosophical Publishing House, Adyar, Madras  येथें तीं विकत मिळतात.

थिऑसफ़ीच़ें मराठी वाङ्मय अगदीं थोडें आहे. त्याची माहिती या पुस्तकाच्या मलपृष्ठावर (मागल्या कव्हरावर) दिली आहे.


  *  *  *  *  *

back to bindhast : home                             अनुक्रमणिका