उपोद् घातहिंदुधर्मामध्यें अनेक गुप्त संप्रदाय होते व आहेत हें हिंदुधर्मांतील अनेक ग्रंथांतून अधिकारी माणसांनीं पुन:पुन: सांगितलें आहे. यांपैंकीं कित्येक संप्रदाय आज़ नामशेष झ़ालेले आहेत. जगांतील इतर धर्मांतहि असे गुप्त संप्रदाय प्राचीन काळीं होते व हल्लींहि आहेत. सांप्रत त्यांच्यांतहि अवनति दिसून येत आहे. ज्या एका महान् आदिसंप्रदायाला मिळणाऱ्या उपनद्या म्हणून हे सारे निरनिराळ्या देशांतले व धर्मांतले संप्रदाय निरनिराळ्या काळीं अस्तित्वांत आले त्या आदिसंप्रदायाच़ा ओघ मात्र अनादिकालापासून आज़तागायत अखंड वाहत आहे. उपनद्या आटल्यासारख्या दिसल्या तरी ती महानदी मात्र सांप्रतहि जिवंत पाण्यानें तुडुंब भरलेली वाहत आहे. हा आद्यसंप्रदाय गुप्त आहे. पण त्यांतल्या कांहीं अधिकारी पुरुषांच्या संमतीनें त्या विषयींची कांहीं माहिती अलीकडे जगांत परिस्फुट करण्यांत आली आहे. त्या माहितीशीं महाराष्ट्रीय वाचकांचा अल्पसा परिचय करून द्यावा म्हणून हें पुस्तक लिहिलेलें आहे.

ही माहिती थिऑसफ़ीय वाङमयांत सर्वत्र विखुरलेली आहे. मादाम ब्लाव्हाट्स्की यांनीं ती प्रथम सर्वांसमोर मांडण्याची सुरुवात सुमारें पन्नास वर्षांपूर्वीं केली व त्यांच्या मागून अनेक थिऑसफ़ीय लेखकांनीं विशेषत:  डॉ.बेझंट् व श्री.लेड्बीटर् यांनीं तो क्रम तसाच़ चालूं ठेवला. बरीच़शी उपयुक्त माहिती श्री.लेड्बीटरकृत The Masters & the Path (दुसरी आवृत्ति १९२७) या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकांत अलीकडे संकलित करण्यांत आली आहे. त्या व इतर ग्रंथांतून प्रस्तुत लेखकांनीं ती येथें उद् धृत केलेली सांपडेल. ह्या साऱ्या ग्रंथकारांच़े आभार मानणें येथें अवश्य आहे. ह्या पुस्तकांत ज़र वाचकांना कांहीं ग्राह्यांश वाटत असेल तर त्याच़ें श्रेय त्या सर्वांना, मुख्यत: डॉ.बेझंट् व श्री.लेड्बीटर् यांना देणें वाज़वी आहे.

अनुभवाचा  पाया

या पुस्तकांत दिलेली माहिती व केलेलीं विधानें
काल्पनिक नसून अनुभवसिद्ध आहेत हें वाचकांनीं सतत लक्षांत ठेवणें जरूर आहे. त्या विधानांच़ें समर्थन करण्यासाठीं या पुस्तकांत मुद्दाम कांहींच़ प्रयत्न करण्यांत आलेला नाहीं, कारण हें पुस्तक त्या दृष्टीनें लिहिण्याच़ा आमच़ा  बिलकुल मनोदय नाहीं. पुरावा देणें व बुद्धिवादाच्या दृष्टीनें भवति न भवति करणें हें अवश्य नाहीं असें आमचें म्हणणें नाहीं; पण दुसऱ्या पुस्तकांतून ती चर्चा सांपडूं शकेल. चर्चेच्या वाटाघाटींत कधीं कधीं साध्या गोष्टी गहन होतात, त्यांच़ें रहस्य व माधुर्य लुप्त होतें आणि सरळ मार्ग सुटून वाचक शब्दांच्या चक्रव्यूहांत सांपडतो, क्वचित् प्रसंगीं तर कोंडा फुंकीत राहून तो धान्याच़े दाणे निवडून घेण्यासहि विसरतो. ज़री या पुस्तकांत केलेल्या विधानांस पुराव्याच़ा दुज़ोरा देणें एका दृष्टीनें अवश्य असलें तरी वरील कारणास्तव या पुस्तकांतून बरीच़शी तर्कप्रधान चर्चा मुद्दाम वगळण्यांत आलेली आहे. जिज्ञासूंनीं ती इतरत्र पाहावी. चर्चेच़ा काथ्याकूट अजिबात वगळल्यामुळें हें पुस्तक सर्व भानगडींपासून अलिप्त राहून स्पष्टार्थात्मक व सरळ झालें आहे, असा वाचकांस अनुभव येईल. वादविवादप्रिय लोकांकरितां हें पुस्तक लिहिलेलें नाहीं. स्वतःच़ा आध्यात्मिक विकास करण्याची ज्यांना उत्कंठा  असेल त्यांना हें पुस्तक स्फूर्तिदायक व मार्गदर्शक व्हावें अशा इराद्यानें तें लिहिण्यांत आलेलें आहे. ही गोष्ट वाचकांनीं लक्षांत ठेवल्यास गैरसमज़ होण्याच़ा अथवा निराशा वाटण्याच़ा  प्रसंग येणार नाहीं.

या पुस्तकांत कांहीं ठिकाणीं इंग्रजी, मराठी व संस्कृत ग्रंथांचे आधार दिलेले आढळतील. ज्या अतींद्रिय गोष्टी आहेत त्या सामान्य प्रतीच्या जिज्ञासूला प्रत्यक्ष नसतात.  असा जिज्ञासू हिंदु असला तर गीता, उपनिषदें वगैरे ग्रंथांमधील वचनें त्याच्या विचारांना पुष्कळ वेळां आधारभूत होत असतात. तो वाचक ख्रिश्चन असला तर बायबलमधील वचनांचा त्याला तशाच़ प्रकारच़ा उपयोग होत असतो. महाराष्ट्रसंतांच्या वचनांचाहि महाराष्ट्रांत तोच़ उपयोग होतो. यासाठीं या पुस्तकांत कांहीं थोर

ग्रंथांचे  आधार

दिलेले आहेत. पण धर्मग्रंथांच्या आधारांसंबंधानें आपण प्रायः एक गोष्ट विसरत असतों. एखादा आधार आपणांला मान्य नसला तर आपण त्यांतील शब्दांची ओढाताण करून त्या आधाराच़ा अर्थ फिरवितों, व अशा रीतीनें प्रतिपक्षाला पाडतों. पण सत्य आणि सत्याच़े ग्रंथांतले आधार यांपैंकीं सत्य हें अगोदरच़ें असतें व आधार हे नंतरच़े असतात, हें जनतेच्या ध्यानांत येत नाहीं. माणसाच्या हृदयाला चार कप्पे असतात हें सत्य आहे, आणि तें सत्य जाणणाऱ्या शरीरशास्त्रवेत्त्यांनीं आपल्या ग्रंथांत तसें लिहून ठेवलेलें आहे. पण जरी ग्रंथांत वाटेल तें लिहिलें असलें किंवा त्या ग्रंथांची ओढाताण करून हृदयाला पांच़ कप्पे आहेत असा अर्थ करतां आला तरी माणसाच्या हृदयांतील कप्प्यांच्या संख्येंत बदल होणार नाहीं. हृदयाला चार कप्पे असतात आणि म्हणून जाणत्या शरीरशास्त्रज्ञांच्या ग्रंथांत तें विधान केलेलें असतें. त्या विधानाच़ा अर्थ फिरविला तरी हृदयाच्या रचनेंत फरक होणार नाहीं. ही गोष्ट जरी शास्त्राच्या क्षेत्रांत सर्वांना उघड दिसत असली तरी धर्माच्या क्षेत्रांत लोक ती विसरतात. मनुष्य पुनःपुनः जन्म घेतो म्हणून गीतेंत श्रीकृष्णांनीं 'अनेक जन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्'
(म्हणजे अनेक जन्म घेऊन माणूस परिपक्व होत्साता अंतिम ध्येय गांठतो) असें सांगितलें आहे. पण लोक मात्र उफराटी समजूत करून गीतेंत लिहिलें आहे म्हणून पुनर्जन्मवाद सत्य आहे, म्हणूनच़ माणूस पुनःपुनः जन्म घेतो असें मानतात आणि गीतेच्या ह्या श्लोकाची ओढाताण करून पुनर्जन्मवादाविरुद्ध अर्थ ज़र त्यांतून काढतां आला तर पुनर्जन्मवाद खोटा ठरून माणसें पुनःपुनः जन्म घेण्याचें सोडून देतील असें त्यांस वाटतें. त्यांच्या ध्यानांत येत नाहीं कीं गीतेच्या अगोदर पृथ्वीवर जीं माणसें होतीं तीं पुनःपुनः जन्म घेत होतीं आणि गीतेंत पुनर्जन्मवाद ज़री न सांपडता तरी त्यांच्या जन्ममरणाचें रहाटगाडगें बंद झालें नसतें. या मुद्दयावर येवढ्या विस्तारानें लिहिण्याच़ें कारण या पुस्तकांत जे ग्रंथांच़े आधार दिले आहेत त्या आधारांवर या पुस्तकांतील माहिती उभारलेली आहे, आणि ते ग्रंथ आम्हांस मान्य नाहींत अथवा तुम्हीं करतां तसा त्यांच़ा अर्थ होत नाहीं असें म्हटल्यानें ती माहिती खोटी ठरेल असा आमच्या वाचकांनीं स्वतःच़ा गैरसमज़ करून घेऊं नये. या पुस्तकांतील माहिती प्रत्यक्ष अवलोकनावर उभारलेली आहे. नाना ग्रंथ वाच़ून त्यांवरून ती अनुमानिलेली नाहीं. मोठमोठ्या संतांनाहि तीच़ माहिती प्रत्यक्ष असल्यामुळें ज्या वाचकांना ते संत प्रिय आहेत त्यांच्यासाठीं या पुस्तकांत त्यांचींहि वचनें प्रेमानें आणि आदरानें दाखल केलीं आहेत. त्या संतांना कांहीं जडवादी लोक नाक मुरडीत असले, अथवा कित्येक सनातनी शब्दपंडित त्यांच्या वचनांचा वेगळा अर्थ लावीत असले, तरी त्यामुळें या पुस्तकांत दिलेल्या मुख्य गोष्टीच्या खरेपणांत कांहीं न्यून येणार नाहीं हें वाचकांनीं ध्यानांत बाळगावें.

वस्तुस्थिति अशी आहे कीं, अनादि काळापासून आपल्या पृथ्वीवरील सर्व व्यवहारांचीं सूत्रें आंतून हालविलीं जात आहेत. एखाद्या लहान व अज्ञ मुलानें नाटक पाहिलें तर ज्याप्रमाणें त्याला पडद्याआड चाललेल्या गोष्टींची कल्पना येत नाहीं; हें नाटक कोणींतरी बुद्धिमान् माणसानें रचलें आहे, त्याच्या योजनेनुसार कोणींतरी नाटक कंपनीच्या मॅनेजरानें अनेक नटमंडळी गोळा करून व त्यांस निरनिराळ्या भूमिका देऊन तें रंगभूमीवर आणलें आहे, हा भाग जसा त्या लहान मुलाला समजत नाहीं, तद्वत् जगाच्या नाना व्यवहारांकडे पाहतांना आपली स्थिति होत असते. आपण जगांतील बाह्य घडामोडींकडे उथळ बुद्धीनें पहातों. या घडामोडींच्या पाठीमागें कांहीं सूत्र आहे, कांहीं योजना आहे, ती योजना यशस्वी करणारे कोणीतरी सूत्रधार आहेत, याची आपणांला कल्पना होत नाहीं. मानवी इतिहासाच्या रंगभूमीवर अनेक प्रसंग माणसाच्या डोळ्यांसमोर येतात. पण ते सारे उत्क्रांतीच्या नाटकाच़े भाग आहेत व त्या नाटकाच़ें संविधानक सुव्यवस्थित असून त्याचीं सूत्रें हलविणारीं कांहीं परमज्ञानी माणसें इतिहासाच्या पडद्यापाठीमागें काम करीत उभीं आहेत हें लोकांस समज़त नाहीं. खरोखरी सृष्टीच्या पाठीशीं असें ज्ञानगर्भ संविधानक आहे व अनादि काळापासून कित्येक अधिकारी माणसें त्याचीं सूत्रें पद्धतशीर रीतीनें हलवीत आलीं आहेत. हा आंतला कारभार सामान्य बुद्धीच्या माणसांस आकलन होणें दुरापास्त आहे. ज्या थोड्या माणसांच्या अंगीं या गोष्टी समज़ण्याचा कांहीं अल्पस्वल्प अधिकार आलेला असेल, त्यांच्यासाठीं जगांत अनादि कालापासून निरनिराळे संप्रदाय काढण्यांत आलेले होते व आहेत. हे संप्रदाय उघड्या दरवाज्यासारखे होत. त्या दरवाज्यांतून हा आंतला कारभार थोडाफार दिसतो, व पुरेसा अधिकार असल्यास माणसाला त्या दरवाज्यांतून पुढें ज़ातां येऊन कारभाराच़ा कांही अंश स्वतःच्या शिरावर घेतांही येतो. असल्या संप्रदायांचें अस्तित्व इतिहासाला मान्य आहे. प्राचीन ईजिप्तमध्यें इजिप्शियन मिस्टरीज़् नांवाच़े संप्रदाय होते. त्यानंतरच्या काळीं ग्रीक संस्कृतींत ग्रीशन मिस्टरीज़् नांवाच़े नाना संप्रदाय आढळतात. मिस्टरीज़् ऑफ़ जीझ़स् , पायथॅगोरियन् स्कूल्स् , नीओप्लेटॉनिक् स्कूल्स् वगैरे नांवांचे अनेक पाश्चात्य संप्रदाय इतिहासज्ञांच्या परिचयाचे आहेत. आपल्या इकडेहि फार प्राचीन कालापासून पुष्कळ संप्रदाय असून आपल्या मराठी संतांच्या ग्रंथांमध्यें नाथसंप्रदाय, दत्तसंप्रदाय यांचे उल्लेख थोडेथोडके नाहींत. इतर सर्व मानवी संस्थांप्रमाणें जगांतील हे संप्रदाय कधीं चांगल्या स्थितींत असावे तर कधीं अवनत व्हावे असें झ़ालें असेल, पण तो प्रश्न वेगळा आहे. येथें इतकेंच़ सांगावयाच़ें कीं या नाना संप्रदायांच़ा प्रवाह कधीं मोठा तर कधीं लहान असा इतिहासाच्या क्षेत्रांतून आज़तागायत एकसारखा वाहात आलेला आहे. सामान्य प्रतीच्या माणसाला जें ज्ञान पच़णार नाहीं तें अधिकारी माणसाला या संप्रदायांत मिळे व आज़हि मिळतें, आणि जें कर्तव्य सामान्य माणसाला पेलणें कठीण तें त्याला या संप्रदायांत शिरावर घ्यावें लागे व आज़हि घ्यावें लागतें. या कारणामुळें असल्या संप्रदायांतील बऱ्याच़शा गोष्टी गुप्त ठेवणें अवश्य होतें. सृष्टीच्या पाठीशीं जे सूत्रधार उभे आहेत त्यांच्या कार्याची माहिती पूर्वींच्या काळच्या या संप्रदायांतल्या माणसांना मिळूं शके, पण ती त्यांना गुप्त ठेवावी लागे. ' खुणा ज़रि बोलों तरी मौन्य पडलें ', ' मज़ बोलों नये ऐसें केलें ' हीं ज्ञानेश्वरांचीं वचनें व ' इतरांस हें काय सांगणें। खरें खोटें कोण ज़ाणें। साधुसंताचिये खुणें साधुसंत ज़ाणती।। '  हें समर्थांच़ें वचन साऱ्या संप्रदायांच़ें हें धोरण दर्शविण्यास पुरेशीं आहेत.

संप्रदाय  व  त्यांचें  धोरण


या  गुप्त संप्रदायांत जें ज्ञान असे त्यापैकीं सामान्य जनतेस किती पेलेल, त्यांच़ा बुद्धिभेद न करतां व त्यांच्या असत्प्रवृत्तीस उत्तेजन न देतां किती ज्ञान त्यांच़ेसमोर ठेवणें सयुक्तिक होईल, वगैरे विचार करूनच़ संप्रदायांतल्या माणसांकडून कांहीं गोष्टी सर्वांसमोर मांडण्यांत येत असत. हळूंहळूं कां होईना, माणसाची उत्क्रांति होत आहे. अर्थात् त्या उत्क्रांतीच़ा विचार करून पूर्वीं गुप्त ठेवलेल्या गोष्टी कालवशात् थोड्याफार सर्वांसमोर उघड्या करण्याच़े मधूनमधून प्रसंग येणारच़. पृथ्वी स्थिर असून सूर्य तिच्याभोंवतीं फिरतो अशी अनादि कालापासून सामान्य जनतेची समजूत होती. पण पूर्वीं संप्रदायांमध्यें याविषयींचें खरें ज्ञान देण्यांत येत असे. ग्रीक संप्रदायांमध्यें ग्रहांच्या परिभ्रमणाची माहिती शिकवीत असत. पायथॅगोरसला सूर्य स्थिर आहे, पृथ्वी स्थिर नाहीं ही गोष्ट माहीत होती व पायथॅगोरस् हा एका संप्रदायाचा संस्थापक होता.  ज्ञानेश्वरांच्या ' उदोअस्ताचेनि निमित्तें। जैसें न च़ालतां सूर्याच़ें च़ालणें ' या उपमेवरून ज्ञानेश्वरांना सूर्य स्थिर असल्याच़ें माहीत होतें असें वाटतें. पण आज़ मात्र सूर्य स्थिर आहे ही गोष्ट अलीकडे सर्व जनतेला समज़लेली आहे. जनहिताच्या दृष्टीनें कोणत्या काळीं किती ज्ञान माणसाला पच़ेल व पेलेल याच़ा विचार करून पूर्वीं संप्रदायांत गुप्त असलेलें ज्ञान अंशतः जनतेसमोर यावें म्हणून गुप्तपणाच़ा पडदा कांहीं प्रसंगीं ज़रासा बाज़ूस करण्यांत येत असतो. हल्लीं जग फार बदललेलें आहे. सर्व जगाचा विहंगम दृष्टीनें विचार करणें पूर्वींपेक्षां आज़ कितीतरी सोपें झालें आहे. आगगाड्या, आगबोटी, विमानें यांनीं शेंकडों माणसें सांप्रत नानादेशांत प्रवास करतात. तारायंत्र, रेडिओ यांनीं जगांतील एका ठिकाणची बातमी दुसऱ्या ठिकाणीं आज़ निमिषार्धांत ज़ाऊं शकते. कारखाने, यंत्रें, वाहतुकीचीं साधनें, व्यापार वगैरेंनीं निरनिराळे देश परस्परावलंबी होऊन एकमेकांशीं नाना प्रकारच्या हितसंबंधांनीं निगडित झ़ालेले आहेत. सबंध जगाच्या पूर्वेतिहासाच़ा व प्रत्येक देशांतील नाना घडामोडींच़ा सलग चित्रपट आज़च्या सुशिक्षित माणसाच्या डोळ्यासमोर येऊन त्याला या जगाचें थोडक्यांत सिंहावलोकन करण्याची सोय आज़ उपलब्ध झाली आहे. अशा या बदललेल्या काळांत संप्रदायांत पूर्वापार गुप्त असलेल्या ज्ञानाच़ा कांहीं थोडा भाग मुद्दाम जगासमोर येत आहे व तो आणण्याच्या कामीं या विषयाला वाहिलेली, व सर्व जगभर पसरलेली थिओसॉफ़िकल् सोसायटी नांवाची आंतरराष्ट्रीय व सर्वधर्मीय संस्था निमित्तमात्र करण्यांत आलेली आहे. आंतल्या सूत्रधारांशीं स्वतःच़ा ऋणानुबंध असलेले कांहीं पुढारी या सोसायटीला लाभलेले आहेत आणि म्हणून या संस्थेच्या द्वारानें कांहीं नवीन ज्ञान जगासमोर आणण्याची खटपट आंतले सूत्रधार सध्यां करीत आहेत.

जगासमोर या ज्या नवीन गोष्टी येत आहेत त्या पूर्वीं जगांतील नाना संप्रदायांतील लोकांस अवगत होत्या. पण त्या परिस्फुट करावयाच्या नाहींत असें त्या संप्रदायांच़ें त्या वेळच़ें धोरण असे; अर्थात् त्या गोष्टी ज़ुन्या काळच्या अधिकारी लोकांच्या ग्रंथांत स्पष्टपणानें अथवा सविस्तर रीतीनें मांडलेल्या असणार नाहींत हें उघड आहे. त्यांच़ा अस्पष्ट व ओझरता निर्देशच़ काय तो त्या ग्रंथांत क्वचित् स्थळीं सांपडणें शक्य आहे. असल्या निर्देशांच़े कांहीं आधार संस्कृत व प्राकृत ग्रंथांतून यथामति वेंच़ून आम्हीं  आमच्या वाचकांसमोर ठेविले आहेत आणि त्यांवरून शाखाचंद्रन्यायानें आमच्या वाचकांस या पुस्तकांतील विषय अधिक च़ांगल्या रीतीनें अवगत होईल अशी आशा आहे. यूक्लिड्च्या सिद्धान्तांस ज़सा शंभर नंबरी पुरावा मिळूं शकतो तसा पुरावा या आधारांत आहे असें आमच़ें म्हणणें नाहीं. तशा प्रकारच़े आधार ज़ुन्या ग्रंथांत मिळणें कां अशक्य आहे हें वरील विवेचनावरून आमच्या वाचकांच्या सहज़ ध्यानांत येण्याजोगें आहे.


वासुदेव लक्ष्मण चिपळोणकर
राजाराम सखाराम भागवत
[ या पुस्तकाची प्रथमावृत्ति इ.स.१९३० च्या सुमारास प्रकाशित झ़ाली असावी.]
  *  *  *  *  *

द्वितीय  आवृत्तीची  प्रस्तावना
 
ह्या १९६० च्या द्वितीय आवृत्तींत कोणतेहि मोठाले फेरफार करण्यांत आलेले नाहींत. या आवृत्तींतील मराठी शुद्धलेखन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या नियमांनुसार केलेलें आहे.

  *  *  *  *  *

back to bindhast : home               अनुक्रमणिका              प्रकरण १ : विषयप्रवेश