॥ मीं पाहिलेला अनल ॥

शेवटल्या बदलाची तारीख़ २०१३०८११


अनल चिंतामण आपटे या व्यक्तिविशेषाशीं माझी ओळख १९९२ च्या सुमारास झ़ाली असावी. अमेरिकेच्या टेक्सस् राज्यांतील डालस् नामक गांवाज़वळ आम्हीं राहात होतों, आणि तेथल्या अतुल आपटे या माझ्या मित्राच़ा हा धाकटा भाऊ, नुकताच़ पुण्याच्या संगीत-कलाकारांच्या एका ज़थ्थ्यांतून 'सरोदवादक' म्हणून अमेरिकेंत दाखल झ़ाला होता. अतुलकडेच़ आमची अनलशीं प्रथम भेंट झ़ाली. त्याची प्रसन्न वृत्ति, पुणेरी विनोदबुद्धि, व सर्वांशीं सामोपचारानें वागण्याची हातोटी आम्हां दोघांना  ज़ाणवायला फारसा वेळ लागला नाहीं. आमच्या मुलांनासुद्धां 'अनलकाका ' लवकरच़ प्रिय झ़ाला.

पुढें दोनतीन वर्षें तो जेव्हां जेव्हां डालस् मध्यें असे तेव्हां आमच्या अधूनमधून भेंटीहि होत असत. डालस्-फ़ोर्टवर्थ् हिंदु देवळांत त्याच़ा च़ांगला ज़म बसला. देवळाच्या वर्किंग् कमिट्या इत्यादींमध्यें तो काम करूं लागला. देवळाच़ा दर रविवारच़ा 'महाप्रसाद' तयार करणें, तो मंडळींना वाढणें, एकूणच़ रसोईच़ें 'राज्य' सांभाळणें इत्यादि उद्योगांत आवश्यक असणारीं कसबें अनलकडे प्रकर्षानें होतींच़.

आम्हीं अमेरिका सोडल्यानंतर, मीं ज़वळज़वळ दर वर्षीं महिन्याभरासाठीं डालस्-फ़ोर्टवर्थ् भागास भेंट देत असे. त्यावेळीं मीं अनलकडेच़ राहावें असा त्याच़ा हट्ट असे. लवकरच़ त्याच़ेकडे दरवर्षीं राहाण्याच़ा माझ़ा नित्यनियमच़ होऊन गेला. कधींकधीं दोन महिन्यांपर्यंतहि माझ़ा ठिय्या टिके. अनलकडील वास्तव्य गंमतीशीर असे, कारण (त्याच्या म्हणण्यानुसार) - मीं वयानें त्याच़ेपेक्षां ज़रा मोठा असलों, तरी परीटघडीच़ा नसल्यामुळें - तो माझ्याशीं मोकळेपणानें छचोर गप्पा मारूं शके.

त्या पंधराएक वर्षांत अनलबद्दल खूपच़ माहिती मला मिळाली. (भारतांत असतांना झ़रीन दारूवाला बाईंज़वळ सरोद शिकण्याची त्याची तमन्ना होती; पुण्यांत त्याच़ें वडापाव इत्यादींच़ें दुकान टिळक रस्त्यावर होतें; पुण्याच्या महाराष्ट्र मंडळांत तो active होता; तो उत्तम swimmer होता व पोहणें शिकवीतहि असे; शिवा दामले, इत्यादिकांशीं त्याची चांगलीच़ जानपेहेचान होती; तो पुणें आकाशवाणीमध्यें 'आमची माती, आमचीं माणसें' नामक मालिकेसाठीं काम करीत असे; शाळेंत असतांना त्यानें कोठल्यातरी मराठी चित्रपटांत छोट्या श्रीकृष्णाच़ें लहानसें काम केलें होतें - आणि त्या चेंगट प्रकाराला कंटाळूनहि गेला होता; इ.इ.)

दक्षिण आशियांतून अमेरिकेला आलेल्या नवागतांना मदत करण्याच़ा त्याच़ा छंदच़ बनला होता. भारतांतून अथवा पाकिस्तानांतून तेथें नुकतेच़ दाखल झ़ालेले तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी, डालस्-फ़ोर्टवर्थ् भागांत नव्यानेंच़ हज़र झ़ालेलीं sub-continental मंडळी, इत्यादिकांना सुरुवातीला अनलच़ा मोठा आधार असे; कुठें काय मिळतें याची माहिती त्याच़ेकडून मिळे. अगदीं नवविवाहित मुलींनाहि स्वयंपाककलेंतल्या चार युक्तीच्या गोष्टी तो सांगूं शकत असे. मीं कधींकधीं त्याला थट्टेनें 'नारायण' किंवा 'परोपकारी गोपाळ' म्हणत असे; आणि त्याच़ेकडे असतांना मलाहि असलीं कामें करायला मिळत. एकूणच़ सर्वांना यथाशक्ति मदत करण्याची त्याची धारणा होती.

या पंधराएक वर्षांत माझ्या असेंहि लक्षांत आलें कीं, कसेंतरी करून अमेरिकेच़ें 'ग्रीनकार्ड्' (म्हणजे कायमस्वरूपी वीज़ा) मिळविण्याच्या लटपटींत त्याची फारच़ शक्ति खर्च़ झ़ाली. आणि ग्रीनकार्ड् नसल्यामुळें सांपत्तिक स्थिति सुधारण्याची फारशी शक्यताहि नव्हती. काटकसरी राहणीमुळें तेथें टिकून राहूं शकला एवढें मात्र खरें. अमेरिकेच्या बाज़ारांत जीं कसबें सहजीं विकलीं ज़ातात, तीं अनलकडे फारश्या प्रमाणांत नव्हतीं असें खेदानें म्हणावें लागतें. याउलट त्याच़ेज़वळ अशीं कसबें होतीं, कीं जीं भारतांत खूपच़ उपयोगी ठरलीं असतीं. भारतांत कितीतरी अधिक लोकांना (आणि अधिक गरज़ू मंडळींना) तो उपयोगी पडूं शकता. मीं अनेक वेळां त्याला भारतांत परतण्याविषयीं सुच़विलें, पण त्याच़ा अमेरिकेंतच़ राहाण्याच़ा निश्चय मुळींच़ ढळला नाहीं. भारत सोडण्याआधीं पुण्यांतल्या त्याच्या कोणातरी 'face-reader'नें म्हणे सांगितलें होतें कीं त्याच़ा भाग्योदय अमेरिकेंतच़ होणार होता. I'd like to have met this face-reader. Anyway, it's too late now.

शेवटलीं पांच़दहा वर्षें अध्यात्मविषयांत त्याला रस वाढूं लागला होता. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता वगैरे ग्रंथांच्या एका अभ्यासवर्गालाहि तो ज़ात असे.

त्याच्या आयुष्याचीं शेवटलीं दोनतीन वर्षें डालस् मधील एका radio-station वर एकदीड तासाच़ा 'देसी' कार्यक्रम तो दररोज़ सादर करीत असे. ('देसी' म्हणजे भारत-पाकिस्तान-बांगलादेश-श्रीलंका आदि प्रदेशांशीं संबंधित. या कार्यक्रमाच़ा अनल सर्वेसर्वा असे, आणि content बद्दल त्याला संपूर्ण स्वातंत्र्य होतें. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, कलाकारांच्या मुलाखती, इतर दक्षिण-आशियाई सांस्कृतिक गोष्टी, वगैरे विषय तो कार्यक्रमासाठीं निवडीत असे. प्रत्येक कार्यक्रमाची तो कसून तयारी करी. त्याच़े उत्कृष्ट वठलेले असे अनेक कार्यक्रम मीं ऐकलेले आहेत.) हें काम मात्र त्याला अगदीं योग्य - आणि सुखकारक - ठरलें असें मला वाटतें. अनलच़ा हा कार्यक्रम live broadcast होत असे, आणि internet द्वारें जगभर ज़ात असे. या कार्यक्रमाला तेथल्या भारतीय-पाकिस्तानी-बांगलादेशी इ. जनतेच़ा तुफ़ान प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाद्वारें पैसा फारसा मिळाला नसला (आणि अनलला पैश्याची फारशी हांवहि नव्हती), तरी जनमान्यता मात्र भरपूर मिळाली. इतकी कीं, २०१२ सालीं अनलच्या निधनानंतर त्याच्या funeral service बद्दलचीं स्थानिक रेडिओवरील निवेदनें बंद करावीं लागलीं होतीं, कारण त्याच्या चाहत्यांची बेशुमार गर्दी होऊं लागली होती ...

२०१३ च्या मे महिन्यांत मला असें समज़लें कीं अनलला नुकतेंच़ अमेरिकेच़ें 'ग्रीनकार्ड्' बहाल करण्यांत आलें आहे.Go Back to bindhast : home